जागतिक व्यापार व माहिती तंत्रज्ञान

‘जागतिक व्यापार संघटना’ (WTO) आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्यात जागतिक व्यापार नियम बनविले आहे. सन 1995 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाच्या नंतर गॅट (जीएटीटी) च्या स्थानावर करण्यासाठी चालू केले असून ‘जागतिक व्यापार संघटना’ माध्यमातून उत्पादक, शेतकरी व व्यापारी यांना आपला कृषीमाल कोणत्याही देशात विक्री करता येतो. अशा सर्व व्यापारावर ‘जागतिक व्यापार संघटना यांचे नियंत्रण असते.

शेतकरी व उत्पादक यांना कृषिमाल कशा पद्धतीने निर्यात होतो, त्यामध्ये कशा प्रकारची साखळी असते यांबाबत फारशी माहिती नसते. त्याबद्दल माहिती या प्रस्तुत लेखात दिली आहे. देशांतर्गत बाजारपेठामध्ये कृषिमाल पाठवावयाचा असेल तर त्याबद्दलची माहिती, अद्ययावत माहिती-तंत्रज्ञानाद्वारे (Information Technology) समजते.

जागतिक बाजारपेठेसंबंधी माहिती घेण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान (Information Technology) फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये संगणक, ई-मेल, इंटरनेट, फॅक्स, आंतरराष्ट्रीय टेलिफोन, आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाणी चॅनेल्स यांचा समावेश फार महत्त्वाचा आहे. त्यांचा कशा प्रकारे उपयोग होतो ते या घटकामध्ये सांगितले आहे. याचबरोबर निर्यातीमधील आर्थिक धोरणे व निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँक व नाबार्ड कशा प्रकारे उपयोगी पडतात त्याचाही उल्लेख आहे.

प्रस्तुत लेखात निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची माहिती, माहिती-तंत्रज्ञानाचा जागतिक बाजारपेठेसाठी उपयोग, जाहिरातींचा उपयोग, आयात-निर्यात धोरणे, निर्यातीमध्ये नाबार्ड, रिझर्व्ह बँक यांची कार्ये याबद्दल माहिती होईल.

निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची माहिती

अलीकडील काही वर्षांपर्यंत कृषिमाल निर्यात करणारे फक्त ठरावीक खाजगी उद्योगपतीच होते. अर्थात विविध कृषिमालासाठी वेगवेगळे निर्यातदार असत. या सर्व निर्यातदारांचा प्रमुख निर्यात केंद्रांवर उद्योग असायचा. उदाहरणार्थ, मुंबई, चेन्नई, कोलकाता, इत्यादी निर्यात पॉइंट असणाऱ्या शहरांमध्ये यांची कामे आहेत.

मुंबईमध्ये फळांसाठी क्रॉफर्ड मार्केट (फुले मंडई), भाजीपाल्यासाठी भायखळा येथे प्रमुख खाजगी निर्यातदार कार्यरत आहेत. त्यामध्ये फळांसाठी भगवानदास भेरूमल अँड कंपनी (बीबीसी), काश्मीर फ्रुट कंपनी तर भाजीपाल्यासाठी हिंदुस्थान ट्रेडिंग कंपनी (एचटीसी) हे भायखळा भाजीपाला बाजारपेठेत वर्षानुवर्षे कार्यरत आहेत.

त्याच प्रकारे कांदा व बटाटा निर्यातीसाठी वाशी मार्केटवर एक-दोन निर्यातदार कार्यरत आहेत. हे सर्व खाजगी निर्यातदार त्यांच्या स्तरावर जागतिक बाजारपेठेशी संपर्क ठेवून मगच कृषिमाल निर्यात करतात.

आता जागतिक व्यापार संघटना (World Trade Organization) कायद्यान्वये भारतातून कोणीही व कोठेही कृषिमाल निर्यात करू शकतो. अर्थात हे एका-दोघा शेतकऱ्यांना अथवा उत्पादकांना शक्य नाही. कारण कृषिमाल निर्यात करावयाचा ठरविल्यास तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असावयास हवा. त्यासाठी एक तर तो सामुदायिकरित्या अथवा सहकारी पद्धतीनेच निर्यात करावा लागेल. नाहीतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावा लागेल.

निर्यातीसाठी आपल्या कृषिमालाची कोणत्या देशामध्ये मागणी जास्त आहे हे प्रथम माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध देशांमधील विपणन मंडळे, सुपर मार्केटस्, इत्यादींशी संपर्क साधून त्याची माहिती मिळवावी लागेल. त्याचप्रमाणे त्या देशांमध्ये असणारे भारताचे दूतावास कार्यालय अथवा व्यापारी सल्लागार कार्यालये यासंबंधीची माहिती पुरवू शकतात. यापुढे जाऊन विविध देशांमध्ये भारतातून पूर्वी कोणता व किती कृषिमाल निर्यात झाला याची नोंद एफएक्यू ट्रेड इयर बुकमध्ये सापडते. मालास तेथे किती किंमत मिळाली हेही त्या पुस्तकात असते.

अलीकडे खुल्या अर्थव्यवस्थेमुळे विविध देशांमधील वैयक्तिक आयातदारांशी संपर्क साधून कृषिमालाची थेट निर्यात करता येते. कित्येकदा आयातदारांना भारतात बोलावून त्यांच्याशी संपूर्ण प्रकारच्या वाटाघाटी करून मग कृषिमाल निर्यात करता येतो. यामध्ये धोका एकच असतो की, आयातदार, व्यापारी हे कृषिमालाची किंमत वेळेवर अथवा पूर्णपणे बऱ्याचदा देत नाहीत.

अर्थात नाशिक व सांगली जिल्ह्यांतील द्राक्ष बागाईतदार तसेच सोलापूर भागातील डाळिंब बागाईतदार हे अशा प्रकारे सामुदायिकरित्या त्यांची फळे निर्यात करीत आहेत. त्याचप्रमाणे पुणे शहराजवळील, लांब दांड्यांच्या फुलांचे उत्पादक स्वतः फुलांची निर्यात हॉलंड, इंग्लंड, जपान, इत्यादी देशांना व्यावसायिकरित्या करीत आहेत.

माहिती-तंत्रज्ञान जागतिक बाजारपेठेसाठी उपयुक्त  

माहिती-तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठेचा विकास होण्यास महत्त्वाची भूमिका आहे.सध्या अद्ययावत माहिती-तंत्रज्ञान युग सुरू आहे. त्यामध्ये संगणक, इंटरनेट, ईमेल, वेबसाईट, आंतरराष्ट्रीय टेलिफोन सेवा, फॅक्स, इत्यादींची सुविधा काही क्षणात उपलब्ध झालेली आहे. त्याद्वारे उत्पादक शेतकऱ्यांना पाहिजे ती माहिती ताबडतोब उपलब्ध होऊ शकते.

उदा. शेतकऱ्यांना सामुदायिकरित्या द्राक्षे निर्यात करावयाची आहेत. त्यांना  पुढील प्रकारची माहिती विविध माहिती-तंत्रज्ञानाद्वारे मिळू शकते.

1. जगातील कोणकोणते देश द्राक्षे पिकवितात.

2. द्राक्ष पिकाखाली त्या त्या देशांमध्ये किती क्षेत्र आहे व सरासरी किती उत्पादन होते.

3. त्या देशांनी द्राक्षे निर्यात केलेली असल्यास कोणत्या देशास व किती प्रमाणात.

4. द्राक्षे कोणकोणत्या देशांनी किती आयात केलेली आहेत.

5. त्या देशांनी काय भाव दिलेत.

6. कोणकोणत्या महिन्यांत/आठवड्यात मालाची आवक-जावक.

वरील सर्व माहिती इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या वेबसाईटवर मिळू शकते. त्यानंतर ठरावीक देशांमध्ये आयात करणाऱ्या संस्था अथवा व्यापारी यांची माहिती त्या त्या देशाच्या ‘व्यापारी सल्लागार, राजदूत’ यांच्या कार्यालयाकडे फॅक्सने अथवा ई-मेल पाठवून आपणास मिळू शकते. याशिवाय आंतरराष्ट्रीय टेलिफोनवरूनसुद्धा त्याबद्दलची माहिती मिळू शकते.

अशा प्रकारे अद्ययावत माहिती-तंत्रज्ञानाचा कृषिमाल निर्यातीमध्ये उपयोग होऊ शकतो. शिवाय ही सर्व माहिती संगणकामध्ये साठवून निर्यातदार स्वतः त्यासंबंधीचे आराखडे, नियोजन करू शकतात. त्याचप्रमाणे इंटरनेटवर विविध वेबसाईटमध्ये जाऊन दररोजच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कृषिमालाच्या काय किंमती आहेत, किती आवक झालेली आहे याबद्दलची माहिती मिळवू शकतात.

शिवाय विविध कार्यालयांशी ई-मेल ने पत्रव्यवहार, बँकिंग व्यवहार करता येतो. शिवाय बँकांचे व्यवहारसुद्धा क्रेडिट कार्ड, एटीएम कार्डद्वारे, जी माहिती-तंत्रज्ञानाचे आविष्कार आहेत त्याद्वारे करता येतात. अशा प्रकारे माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग जागतिक बाजारपेठेसाठी करता येतो.

कृषिमाल निर्यातीसाठी जाहिरातींचा उपयोग

जाहिरातींचा प्रत्यक्षपणे कृषिमाल निर्यातीमध्ये सहभाग नसला तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा उपयोग होतो. भारतात पिकत असलेला कृषिमाल हा गुणवत्तेने कसा चांगला आहे, त्याचा टिकाऊपणा, त्यामध्ये असणारे अन्नघटक कसे उपयोगी आहेत, शिवाय त्यामध्ये कीटकनाशकाचे व रोगनाशकाचे अवशेष नाहीत म्हणजे प्रयोगशाळेमध्ये वेळोवेळी त्याचे परीक्षण केले जाते, इत्यादींसंबंधीची माहिती आयातदार देशांना सांगणे, पटविणे गरजेचे असते. त्यासाठी अर्थातच जाहिरातीचा उपयोग करणे आवश्यक आहे.

आयातदाराबरोबर थेट गि-हाईक म्हणजेच उपभोक्ते यांना जाहिरातीद्वारे याचा प्रसार करण्यास उपयोग होतो. जाहिराती विविध दूरचित्रवाणी चॅनेलद्वारे, त्या त्या देशांमधील वर्तमानपत्रे, कृषिविषयक मासिके, इत्यादींमधून करता येतात. याचा उपयोग आपण निर्यात केलेल्या कृषि-उत्पादन खरेदीसाठी चांगला होतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे भारतामध्ये सध्या वॉशिंग्टन येथील सफरचंद, स्वित्झर्लंडमधील दूध अथवा ऑस्ट्रेलियामधील संत्री यांचे देता येईल. त्याविषयीची जाहिरात ठिकठिकाणी पहावयास मिळते.  

जागतिक व्यापारासाठी आयात-निर्यात धोरणे

आजपर्यंत कृषिमाल निर्यात करावयाचा असेल अथवा आयात करावयाचा असेल तर तो शासनाच्या काही धोरणाशी निगडित असावयास हवा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या कृषिमालाच्या किंमती कितीही असोत, देशांतर्गत उत्पादन कितीही असो, शासन तशा प्रकारचे निर्णय घेऊन आयात-निर्यात धोरणे राबवीत अथवा त्यावर बंधने आणीत असे. त्यामध्ये शासनाचे अथवा राज्यकर्त्यांचे मुख्य उद्देश देशांतर्गत किमती स्थिर ठेवणे व विविध देशांमधील करारांचे पालन करणे हे असते. त्यासाठी खालील धोरणात्मक निर्णय घेतले गेले.

1. क्वाँटिटिव्ह सेलिंग धोरण

2. कॅनालायझेशन पॉलिसी धोरण

3. लघुतम निर्यात किंमत धोरण

सध्या गॅट करारामुळे जागतिक बाजारपेठा ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सर्व देशांना खुल्या केल्या आहेत. त्यामुळे आयात-निर्यात धोरणे फारशी परिणामकारक ठरणार नाहीत. असे जरी असले तरी विकसनशील देशांतील शेतकऱ्यांवर व उत्पादकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यासंबंधी निर्णय घेण्यात येत आहेत.

कृषिनिर्यातीमध्ये नाबार्ड, रिझर्व्ह बँक, इत्यादींची कार्ये

कृषिमालाची निर्यात वाढावी यासाठी नाबार्ड (NABARD), रिझर्व्ह बँकेची धोरणे बरीच शिथिल होती. त्यांनी कित्येक सहकारी संस्थांना, निर्यात करावयाच्या कृषिमालाच्या उत्पादनासाठी अथवा इतर सुधारणा यासाठी आर्थिक भांडवल मोठ्या प्रमाणावर कमी व्याजदराने उपलब्ध करण्याचे धोरण ठेवले आहे.

ग्रुप सेल संघटनासाठी प्री-कूलिंग सेंटर, शीतगृहे उभारणी, इत्यादींसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. त्याचप्रमाणे लांब दांडी फुले उत्पादकांना पॉलिहाऊस उभारणी, रेफ्रिजरेटेड व्हॅन, प्री-कूलिंग सेंटर (EOU – एक्सपोर्ट ओरिएटेड युनिट) यासाठी आर्थिक मदत उपलब्ध केली आहे. कित्येकदा ही आर्थिक मदत थेट किंवा नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कौन्सिल (एन.सी.डी.सी) मार्फत होते. याशिवाय रिझर्व्ह बँकेची परदेशी चलन मिळविणे, त्याचे रुपयात रूपांतर करणे, इत्यादींसंबंधी मदत होते.

जागतिक व्यापार व माहिती – तंत्रज्ञानाचे फायदे

  1. जागतिक व्यापार संघटना (World Trade Organization) कायद्यान्वये सध्या आंतरराष्ट्रीय व्यापार खुला झाला आहे.
  2. कृषीमाल किंवा उत्पादनासाठी आयात व निर्यातीला चालना मिळाली आहे.
  3. निर्यातदारांना जागतिक बाजारपेठांची पाहिजे ती अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाद्वारे काही क्षणांत उपलब्ध होते.
  4. माहिती-तंत्रज्ञानाची साधने म्हणजे संगणक, ईमेल, इंटरनेट, फॅक्स, आंतरराष्ट्रीय टेलिफोन, इत्यादींची सुविधा सर्वांना उपलब्ध होतात.
  5. एकंदरीत जगातले सर्वच देश माहिती-तंत्रज्ञानाद्वारे जोडले गेले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठांची माहितीसुद्धा सर्वांना खुली झाली आहे.
  6. कोणत्या देशांच्या बाजारपेठा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहेत, याचा निर्णय घेण्यास माहिती-तंत्रज्ञानाची मोठी मदत होते.

विशेष संदर्भ

कृषिव्यवसाय व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि कार्यपध्दती : 153-158

E-book, Agriculture, ycmou, Nashik

जागतिक व्यापार व माहिती तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply