मशरूम : एकात्मिक रोग नियंत्रण

मशरूम पिकांवर वातावरणातील बदलामुळे बहुतांशी रोग व किडींचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र रोग व किडींचा वेळेत नियंत्रण न केल्यास उत्पादनावर याचा अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे मशरुम लागवडीत रोग व किडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक असते.

मशरूमवर येणारे रोग हे कंपोस्ट तयार करण्यात दोष असल्यास किंवा केसिंग मातीमधून किंवा आर्द्रता आणि तापमान योग्य नसल्यास उद्भवतात. यावर येणारे रोग नियंत्रण करण्यास कठीण असल्याने रोग येऊ न देणे हेच हिताचे आहे. आपल्या देशात मशरूमवर येणारे रोग खालीलप्रमाणे आहेत.

(1) ड्राय बबल तपकिरी ठिपके किंवा व्हरटीसिलीयम रोग :
व्हरटीसिलियम या नावाच्या बुरशीमुळे होणाऱ्या रोगात मशरूमला हलके तपकिरी ठिपके दिसतात. ते वाढत जाऊन मशरूमची वाढ खुंटते ते आकुंचन पडून चिवट होतात आणि आकार खराब होतो तसेच त्यांचा विशिष्ट स्वाद राहत नाही.

नियंत्रण : केसिंग माती वाफेने निर्जंतूक करून घ्यावी किंवा 4.5% फॉर्मेलीनचे द्रावण वापरावे. तापमान वाढू देऊ नये. पुरेशी खेळती हवा ठेवावी आणि डायथेन एम – 45 च्या 0.25% ते 0.5% प्रमाणे 3 फवारण्या द्याव्या. पहिली फवारणी केसिंगच्या वेळी, दुसरी पिनहेड तयार होण्याच्या वेळी आणि तिसरी दोन पिके घेतल्यावर करावी.

(2) पांढरी बुरशी, वेट बबल मायकोगोन रोग : हा रोग मायकोगोन परवीसिओस या बुरशीमुळे होतो. त्यामुळे पांढरी वाढ होऊन घाण वास आणि सोनेरी रंगाचा द्राव निघतो. मशरूमचा आकार बिघडतो.

नियंत्रण : हा रोग टाळण्यासाठी कंपोस्ट आणि केसिंग मातीचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. डायथेन एम – 45 चे 2-3 फवारे द्यावे. किंवा क्लोरीनचे 100 पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारावे.

(3) केवडा, नरम सड किंवा कॉबवेब रोग : डॅक्टिलियम डेन्ड्राईड्स् बुरशीमुळे होणाऱ्या या रोगामुळे मशरूम नरम पडून सडतात.

नियंत्रण : मशरूमगृहाचे 5% फॉरमॅलीनने निर्जंतुकीकरण करून घ्यावे. हवा खेळती ठेवावी आणि आर्द्रता वाढू देऊ नये.

(4) ट्रफल : हा बटन मशरूमचा सर्वसाधारण रोग असून सुडोबाल्सेमिया मायक्रोस्पोरा नावाच्या बुरशीमुळे होतो. त्यामुळे मशरूमची वाढ होण्यास अडथळा येतो.

नियंत्रण : पुरेशी खेळती हवा राखावी. तापमान 17-18° सेल्सिअस ठेवावे.

(5) पांढरी किंवा करडी प्लॅस्टर बुरशी : स्कोपुलरिओपसीस फ्युमिकोला या बुरशीमुळे मशरूमची वाढ होत नाही आणि खूप नुकसान होते.

नियंत्रण : स्पॉन रनिंगचे तापमान 28 ते 32° सेल्सिअस आणि पिकाच्या वाढीचे तापमान 18° सेल्सिअस ठेवावे. तापमान, आर्द्रता, पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. रोगग्रस्त भाग 2% फॉरमॅलीनने प्रक्रिया करून घ्यावा.

याव्यतिरिक्त इंकी कॅप्स आणि पीझोआ स्पिसीज हे बुरशीजन्य रोग मशरूमवर येतात. म्हणून कंपोस्ट तयार करताना खूपच काळजी घेणे आवश्यक आहे.

याशिवाय मशरूमवर बॅक्टेरियल पीट हा सुडोमोनास फ्लुरेस्केन्स यामुळे होणारा आणि बॅक्टेरियल स्पॉट ब्लाँच किंवा तपकिरी ब्लाँच हा सुडोमोनास या जिवाणूमुळे होणारा रोग होतो.

यांच्या नियंत्रणासाठी कंपोस्टचे निर्जंतुकीकरण काळजीपूर्वक करावे. पाणी दिल्यावर भरपूर हवा खेळती ठेवावी. किडी आणि कोळी माश्या यांचे नियंत्रण वेळेवर करावे. 1,000 ते 2,000 पीपीएम तीव्रतेचे क्लोरिनेटेड पाणी वापरावे.

मशरूमवर विषाणुरोग तसेच रोझकॉम्ब ही जास्त कीटकनाशके वापरल्याने होणारी व्याधी, अपूर्ण व्हेंटिलेशनमुळे येणारी लांब दांडीच्या मशरूमची व्याधी, इत्यादी समस्या मशरूममध्ये येतात.

किडी : मशरूमवर कोळी, स्प्रिंगटेल्स आणि माश्यांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मशरूम खाण्यास अयोग्य होतात. यासाठी 0.05% प्रमाणे मॅलॅथिऑनची एक-दोन वेळा फवारणी करावी. 100 वर्गमीटर जागेत 10 लीटर पाणी फवारणीसाठी वापरावे. फवारणीनंतर कमीत कमी पाच दिवस मशरूम खाण्यास काढू नये. काही वेळा मुंग्यांचा त्रास होतो.

त्यासाठी कीटकनाशकांची फवारणी मुंग्या होतात त्या ठिकाणी करावी. काही वेळा मशरूमवर (निमॅटोड) सूत्रकृमीचादेखील प्रादुर्भाव होतो. कंपोस्ट तयार करताना योग्य काळजी न घेतल्यास हा उपद्रव संभवतो. संरक्षक उपाय म्हणून कंपोस्ट आणि केसिंगच्या वेळी दर 300 किलोस 30 मिली. निमॅगॉन किंवा तत्सम सूत्रकृमीनाशक वापरावे.

(टीप : रासायनिक कीटकनाशकाचा मशरूम पिकांवर वापर करावयाचा असल्यास तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञ यांचा सल्ला घेऊनच करावा, कारण बहुतांशी रासायनिक औषधांवर महाराष्ट्र शासनाने बंदी घालण्यात आलेली आहे.)

Prajwal Digital

Leave a Reply