पीक उत्पादनात आच्छादन फायदेशीर

महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण खूपच कमी होत चाललेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना पाण्याअभावी शेतातील पीक उत्पादन घेणे कठीण जात असून परिणामी पिकांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणूनच उपलब्ध पाण्याचा पीक उत्पादनासाठी किफायतशीर वापर होणे अत्यंत आवश्यक आहे.

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस इत्यादी पिके महत्त्वाची असून यासाठी पाण्याचे व्यवस्थापन पिकांच्या संवेदनशील अवस्थेत करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे शाश्वत स्त्रोत नसल्यामुळे एक ते दोन संरक्षित पाणी पिकांना द्यावे लागते. अशा परिस्थितीत जमिनीत तापमानाचा ताण वाढत जाऊन ओलाव्याअभावी पिकांचे नुकसान होत असते. तसेच पीक वाढीच्या काळात पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही, प्रती हेक्टरी उत्पादनात लक्षणीय घट येते. अशा समस्येवर ठोस उपाय म्हणून पीक उत्पादनात आच्छादनाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.    

आच्छादन म्हणजे काय ?

जमिनीचा पृष्ठभाग झाकण्यासाठी जे सेंद्रिय पदार्थ, प्लास्टिक कागद / कोरडी माती वापरली जाते त्यास आच्छादक असे म्हणतात. जमिनीवरील आच्छादकाच्या साह्याने जमिनीवर तयार केलेला थर म्हणजेच आच्छादन’ होय. आच्छादनामुळे बाष्पीभवनास आळा बसतो. जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ साठवून ठेवता येतो. जमिनीला भेगा पडण्याचा काळ पुढे ढकलता येतो.

सर्वसाधारण आच्छादनासाठी ज्वारीची धसकटे, तुरकाट्या, गव्हाचे काड, उसाचे पाचट, कपाशीचे काड, पालापाचोळा अशा अनेक गोष्टी वापरता येतात. आच्छादनाच्या वापराने जमिनीचा पृष्ठभाग (वरचा थर) झाकला जातो आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. उदाहरणार्थ, रब्बी ज्वारी पिकाला आच्छादनाचा वापर केल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो आणि उत्पादनात अंदाजे 30 ते 40 टक्के वाढ होते. ज्या वर्षी पेरणीनंतर फारसा पाऊस पडत नाही त्या वर्षी आच्छादनाचा जास्त चांगला परिणाम दिसून येतो.

जमिनीवर आच्छादनाची आवश्यकता काय ?

पावसाच्या पाण्याचा अपव्यय होतो हे आपण पाहिले तर 65 ते 70 टक्के पाणी बाष्पीभवनाने हवेत पुन्हा जाते. 5 ते 10 टक्के पृष्ठभागावरून वाहते. 5 ते 10 टक्के जमिनीत खोलवर मुरते. फक्त 5 ते 10 टक्के पाणी पिकाला उपलब्ध होते. त्यांपैकी 90 टक्के पाणी पानामधून बाष्पनिस्कासन पद्धतीने हवेत जाते. या सर्व नैसर्गिक क्रिया आहेत. त्यामुळे त्या अपरिहार्य आहेत. आपण फक्त त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतो. सूर्याच्या उष्णतेमुळे आणि वाऱ्याच्या वेगाने जमिनीच्या पृष्ठभागावरून बाष्पीभवनाचे पाणी वाफ होऊन हवेत जात असते.

पीक पंधरा दिवसांचे होईपर्यंत खूप ओलावा उडून जातो. जेव्हा ओलावा जास्त असतो, तेव्हा बाष्पीभवन वेगाने होते. कोरड्या हवामानात हा वेग जास्त असतो. वाऱ्याचा वेग जास्त झाला तर बाष्पीभवन जलद होते. त्यामुळे जमिनीला भेगा पडावयास सुरुवात होते. काळ्या जमिनीचा तो गुणधर्म आहे.

जसजशी जमिनीच्या भेगांची रुंदी, खोली आणि लांबी वाढू लागते, तसतसा खोलवर असणाऱ्या ओलीचा बाष्पीभवनासाठी उपयोग होऊ लागतो, पिकांना ओलावा अपुरा पडतो. त्यामुळे पीक उत्पादनात घट होते. त्यास पर्याय म्हणजे बाष्पीभवनास आळा घालणे. कोळपणीसारख्या मशागती तसेच सेंद्रिय आच्छादन यांचा बाष्पीभवनास आळा घालण्यासाठी उपयोग होतो.

सेंद्रिय आच्छादनात ज्वारीची धसकटे, तुरकाट्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा, काड, उसाचे पाचट, कपाशीचे काड, वाळलेली पाने, कागद, प्लास्टिक, रबर, तेल, प्लास्टिक फिल्म, इत्यादी गोष्टींचा आच्छादनासाठी उपयोग होऊ शकतो.

सेंद्रिय आच्छादन हेक्टरी 5 टन या प्रमाणात दोन ओळींमध्ये किंवा रोपांमध्ये पसरावे. पृष्ठभाग जितका जास्त परिणामकारकरित्या झाकला जाईल, तितका जास्त फायदा मिळू शकेल. आच्छादनामुळे सूर्याचे किरण मातीच्या संपर्कात येण्यास अडथळा निर्माण होतो व ते परावर्तित होतात. त्यामुळे जमिनीला उष्णता कमी मिळते. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया बरीच मंदावते. येथे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आच्छादनामुळे बाष्पीभवन पूर्णपणे थांबत नाही आणि आच्छादनाचा तो उद्देशही नाही. बाष्पीभवनास आळा बसल्याने पिकाला जमिनीतील ओलावा उपलब्ध होतो आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते असे आढळून आले आहे.

आच्छादनासाठी लागणारी साहित्य :

सर्वसाधारण शेतातील पिकांच्या तुरकाट्या, पालापाचोळा, उसाचे पाचट, प्लास्टिक कागद, गव्हाचे काड, बाजरीचे काड, इत्यादी.

आच्छादनाची कार्यपद्धती :

1) पिकांचे अवशेष : जुन्या पिकांच्या अवशेषातच नवीन पिके लावल्याने बाष्पीभवन कमी होते. नांगरलेल्या जमिनीपेक्षा अशा जमिनीतून कमी बाष्पीभवन होते. यालाच कमीत कमी मशागत म्हणतात. नांगरलेल्या जमिनीत तणे गाडली जातात, पण कमीत कमी मशागत पद्धतीत तणांचा बंदोबस्त तणनाशके वा हाताने तणे काढून करणे जरुरीचे ठरते. कधीकधी कमीत कमी मशागत पद्धतीने जमिनी एवढ्या घट्ट होतात की त्या खणून पाणी पिकाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावा लागतो.

2) बारीक खडीचा आच्छादक म्हणून वापर : खडीचा जमीन आच्छादक म्हणून वापर केल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे व पाण्याच्या संधारणाचे प्रमाण वाढते. खडीचा 5 ते 10 मिमी. जाडीचा थर वापरल्यानेदेखील वरील क्रिया घडून येतात. खडीच्या आच्छादनामुळे वाऱ्याने व पावसाने होणारी जमिनीची धूप कमी होते. खडी फिक्या रंगाची असल्यास जमिनीचे तापमान कमी राहते व खडी गडद रंगाची असल्यास जमीन गरम राहण्यास मदत होते. दोन्ही परिस्थितीत पिकांच्या वाढीला खडीचे आच्छादन पोषक ठरते.

मशागत व यांत्रिक लागवडीच्या वेळी मात्र खडीच्या आच्छादनांचा अडथळा येतो. खडी अंथरण्याच्या मशीनचा वापर करून जमिनीवर खडी अंथरता येते.

3) कागद व प्लास्टिकचे जमीन आच्छादन : कागद व पॉलिथीन प्लास्टिकचा जमीन आच्छादक म्हणून वापर करून त्याद्वारे तणांचा बंदोबस्त, जमिनीअंतर्गत तापमान वाढविणे, बियांची उगवण व पिकांची वाढ घडवून आणता येते. या आच्छादकांचा वापर अवर्षणग्रस्त क्षेत्रात जमिनीच्या पृष्ठभागावरचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केला जातो. उन्हाळी भुईमूग पिकात बियाण्याची लवकर उगवण, पाण्याची बचत, तणांचा बंदोबस्त व शेंगाच्या योग्य वाढीसाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या आच्छादनाने उत्पन्नात दुप्पटीने वाढ झालेली आढळून आली आहे.

4) रबर, डांबर व तेलाचे जमीन आच्छादन :विशिष्ट वाळवंटी प्रदेशात रबर, डांबर व तेलाचा जमीन आच्छादक म्हणून वापर करून जमिनीत ओलाव्याचे संरक्षण, पावसाचे पाणी अडविणे व वाऱ्याने वाळू उडून जाण्याचे प्रमाण थांबविणे यांबाबत चाचण्या झाल्या आहेत.

वरील प्रकारचे जमीन आच्छादक व्यापारी तत्त्वावर वापरून पाण्याचा अंश असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यांवर पिकांची लागवड करण्यात आली. हे प्रयोग लिबिया, भारत व ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहेत. दिवसभराची उष्णता साठवून हे वाळूचे ढिगारे रात्री गरम राहतात. त्यामुळे वनस्पती जगण्याचे प्रमाण वाढते. कारण या वनस्पतींच्या मुळ्यांना रोजच्या तापमानाच्या फरकांना तोंड द्यावे लागत नाही.

पीक उत्पादनात आच्छादनाचा वापर केल्यामुळे होणारे फायदे :

  1. आच्छादकांचा वापर केल्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो.
  2. आच्छादनामुळे पाण्याची बचत होऊन तेच अन्य पिकांसाठी वापरता येते.
  3. पाणी व वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी करता येते.
  4. पिकांना पाण्याचा ताण कमी लागत असून पिकांच्या उत्पन्नात वाढ होते.
  5. अवर्षणग्रस्त भागातील पिकांसाठी आच्छादन वरदान ठरत आहे.
  6. काडी-कचरा व गव्हाचे तनीस याचा आच्छानासाठी पुरेपूर वापर करता येतो.
  7. पिकांत आच्छान केल्याचा वापर केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो.

आच्छादनाच्या मर्यादा

जमीन आच्छादकाचा वापर काहीसा खर्चीक आहे. त्यामुळे आज अशा प्रकारची आच्छादने फक्त अननस, स्ट्रॉबेरीसारख्या पैशाच्या पिकांना योग्य ठरली आहेत. आच्छादनाचा खर्च चार प्रमुख बाबींवर अवलंबून असतो.

  1. द्रव्यांची उपलब्धता (उदाहरणार्थ, रबर, तेल)
  2. ज्या क्षेत्रावर जमीन आच्छादक वापरायचे आहे त्या जमिनीचा उंचसखलपणा. त्या जमिनीला लागणारी खते व जमिनीचे सपाटीकरण व इतर तयारी.
  3. योग्य अशा यंत्रसामग्रीची व मनुष्यबळाची उपलब्धता.
  4. त्या क्षेत्रात कोणती पिके लावायची आहेत.

जमीन आच्छादक म्हणून पिकांचे अवशेष वापरायची प्रमुख अडचण म्हणजे ती फार थोडा काळ टिकतात. प्लास्टिक खराब व्हायला बराच काळ लागतो, पण ते खर्चीक आहे. खडीचे जमीन आच्छादक वाऱ्याने उडत नाहीत व पावसाचे पाणी जमिनीत मुरायला या जमीन आच्छादकांमुळे अडचण येत नाही. परंतु हे आच्छादन जमिनीवर पसरवण्यास खर्च येतो तसेच त्यांच्यामुळे मशागतीला अडथळा येतो.

अशाप्रकारे पीक-उत्पादनात आच्छादनाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. आच्छादकांमुळे जमिनीअंतर्गत तापमानात वाढ होते. जमिनीला लागून येणाऱ्या फळांची प्रत जमीन आच्छदकांमुळे सुधारते. कारण आच्छादकांमुळे फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही. झाडाभोवतालच्या खोलगट भागात पावसाचे पाणी प्लास्टिक व पेट्रोलियम आच्छादकांमुळे जमा होते व त्या पाण्याचा अवर्षणग्रस्त भागातल्या झाडांना उपयोग होतो.

विशेष संदर्भ :

  1. पीक-उत्पादनाची मूलतत्त्वे आणि कार्यपद्धती : कार्यपुस्तिका : 2, पान 14-17
  2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (AGR-201-204)

शब्दांकन : किशोर ससाणेलातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/


पीक उत्पादना आच्छादन फायदेशीर हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईककंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

 

Prajwal Digital

Leave a Reply