झुकिनी हे काकडीवर्गीय पीक; फळांवर हलक्या धारा असणारे, घट्ट गराचे, झुडपासारखे वाढ असणारे पीक आहे. झुकिनी याचा काकडीवर्गीय पिकांमध्ये विविध पिकांचा समावेश होतो. सलाडसाठी उपयोगात येणारे एक पीक म्हणजेच झुकिनी होय.
अलीकडेच या पिकाची लागवड आपल्या भागात करण्यास सुरवात झाली असून बाहेरून आयात केलेल्या वाणांची लागवड शेतकरी मोठ्या शहरांच्या आसपास करू लागले आहेत. या पिकाला मोठ्या हॉटेल्समधून आणि विशिष्ट वर्गाच्या श्रीमंत लोकांकडून मागणी वाढत आहे. काकडीसारखेच दिसणारे हे फळ अधिक मुलायम, कुरकुरीत आणि चविष्ट असल्याने याचा वापर व प्रसार इतर लोकांमध्येही होण्यास वाव आहे.
झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान या लेखात आपणास झुकिनी म्हणजे काय, झुकिनी पिकाचे महत्त्व व उपयोग समजून घेता येईल. झुकिनी या नवीन पिकाच्या लागवड, वाणांविषयी आणि रोग व किडींच्या नियंत्रणाविषयी माहिती होईल आणि या झुकिनी पिकाची व्यापारी तत्त्वावर लागवड करता
येईल.
झुकिनी महत्त्व
काकडीवर्गीय पिकांमध्ये झुकिनी लागवड सलाड आणि प्रक्रिया उद्योगासाठी करण्यात येते. याची मागणी मोठ्या शहरांतून वाढत आहे. सध्या लहान प्रमाणावर लागवड होत असली तरी काकडीसारखाच उपयोग होत असल्याने याची लोकप्रियता वाढून मागणी वाढण्याची शक्यता आहे. झुकिनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पिकाचा काकडीवर्ग असल्याने हे काकडीसारखेच आहारदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
हवामान आणि जमीन
झुकिनी या पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभुशीत आणि सुपीक जमीन निवडावी उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात येणारे हे पीक आहे याची लागवड काकडी पिकाप्रमाणेच उन्हाळी हंगामात करावी.
लागवडीचा हंगाम
झुकिनीची लागवड उन्हाळी हंगामात प्रामुख्याने केली जाते. पेरणी जानेवारीमध्ये करावी. रोपे रूट ट्रेनरमध्ये तयार करून एक महिन्याची रोपे मुख्य शेतात लावतात. पेरणी केल्यापासून 10 – 14 आठवड्यांत पीक काढणीसाठी तयार होते.
उन्नत वाण
झुकिनीचे हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. हे आयात झालेले पीक असल्याने सर्वच वाण हे परदेशातील आहेत. यामध्ये आपल्या भागात लागवड करण्यासाठी झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश आणि ॲरिस्टोक्रॅट या वाणांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
झुकिनीची गर्द हिरव्या रंगाची फळे असलेली जात फार लोकप्रिय असून फळांचे उत्पादन अधिक येते. याचा वापर सलाड म्हणून तसेच भाजी करण्यासाठी होतो.
गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांच्या जाती असून गर दुधाळ रंगाचा आणि चांगल्या स्वादाचा असतो. गोल्ड रश वाण लवकर येणारा असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. ॲरिस्टोक्रॅट हा संकरित वाण आहे. हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.
बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धत
झुकिनी हे पीक एक हेक्टर लागवडीसाठी 1.5 ते 2 किलो बियाणे लागते. लागवड 60 सेंमी. X 60 सेंमी. अंतरावर करावी. लागवड बियाणे टोकून किंवा रोपे तयार करून पुनर्लागवड करूनही करता येते. एका ठिकाणी 3 बिया टोकून उगवण झाल्यावर सशक्त व निरोगी एकच रोपटे ठेवावे. उगवणीसाठी सर्वसाधारण 5 – 8 दिवस लागतात. उगवण चांगली होण्यासाठी पेरणीच्या अगोदर बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून घ्यावे.
झुकिनी पिकाची पुनर्लागवड करण्यासाठी रोपे रूट ट्रेनर्समध्ये तयार करून सर्वसाधारण एका महिन्याची रोपे मुख्य शेतात लावावी. लागवड सऱ्यांवर किंवा ठिबक सिंचन पद्धतीने केल्यास गादीवाफ्यांवर करता येते. झुकिनीची
लागवड शेतात तसेच शेडनेट हाऊसमध्येही चांगल्या प्रकारे करता येते. शेडनेटचा वापर केल्यास उत्पादन चांगले येते.
खते आणि पाणी व्यवस्थापन
झुकिनी या पिकाच्या लागवडीच्या अगोदर शेताची तयारी करताना हेक्टरी 20 – 25 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 50 किलो पालाश याप्रमाणे खते द्यावी. ठिबक सिंचनावर पीक घेतल्यास खते ठिबक सिंचनाद्वारे थोडीथोडी द्यावी. त्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करावा. झुकिनीच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत नियंत्रित ओलावा असणे आवश्यक आहे. हवामानाला अनुसरून नियमित पाणी द्यावे. ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा (मल्चिंग) वापर करावा.
आंतरमशागत
बियाण्याची उगवण होऊन चांगली वाढ झालेले एका जागी एकच रोप ठेवावे. तण काढून जमीन स्वच्छ ठेवावी. फळे खराब होऊ नये म्हणून त्यांचा ओल्या मातीशी संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी जमिनीवर गवताचा भाग ठेवून त्यावर फळ टेकवावे.
महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण
काकडीवर्गीय पिकाप्रमाणेच झुकिनी पिकावर मावा, लाल भुंगे, लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिआन फुले येण्याच्या अगोदर आणि फुले आल्यानंतर 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर प्रमाणे डिमेक्रॉन फवारावे. कीड लागलेली फळे काढून नष्ट करावीत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळयांचा (ट्रॅप्स) वापर करता येतो. लीफ मायनरच्या नियंत्रणासाठी सुरुवातीलाच डिमेक्रॉन या कीटकनाशकांचा वापर करावा. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाच्या चिकट सापळयांचा वापर करावा.
रोगांमध्ये केवडा, भुरी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. काही ठिकाणी जमिनीत ओलावा वाढल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. विषाणूमुळे होणाऱ्या केवडा रोगाने ग्रासलेली रोपे उपटून नष्ट करावी आणि मॅन्कोझेबची 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलिक्झीन 3 ते 4 किलो किंवा बाविस्टीन 10 ग्रॅम किंवा कॅराथेन 5 मिली. यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यातून फवारणी करावी. गंधकाची धुरळणी करू नये. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांच्या मुळाजवळ कॉपरऑक्सिक्लोराईड किंवा कॅपटान 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम प्रमाणे द्रावण करून त्याचप्रमाणे सुरुवातीस ट्रायकोडर्मा व्हीरीडी या जैविक बुरशीचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतांबरोबर करावा.
(टीप : रासायनिक कीटकनाशकाचा मशरूम पिकांवर वापर करावयाचा असल्यास तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञ यांचा सल्ला घेऊनच करावा, कारण बहुतांशी रासायनिक औषधांवर महाराष्ट्र शासनाने बंदी घालण्यात आलेली आहे.)
काढणी आणि उत्पादन
फळे काढणीची वेळही त्यांचा वापर कशासाठी करावयाचा आहे त्यावर अवलंबून असते. सलाडसाठी वापरल्यास 10 – 12 सेंमी. लांबीची कोवळी फळे काढावीत. फळे जून झाल्यास त्यांचा कडकपणा वाढतो आणि चवही बिघडते. प्रक्रिया उद्योगासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार काढणीची वेळ ठरवावी.
सर्वसाधारण एक झाडापासून 10 – 14 आठवड्यांच्या कालावधीत काढणी केल्यास सरासरी 15 – 16 फळे मिळतात. फळांच्या वजनाला अनुसरून हेक्टरी जवळपास 4 – 5 टनांपर्यंत उत्पादन मिळते.
झुकिनीच्या फळांची साठवण 8 – 10 सेल्सिअस तापमान आणि 90 – 95% आर्द्रता असलेल्या साठवणगृहात 1 – 2 आठवड्यांपर्यंत करता येते.
झुकिनी हे नव्यानेच लागवड करण्यात येणारे काकडीवर्गीय पीक आहे. लागवडीसाठी मोठ्या शहरांच्या आसपास वाव आहे. लागवड बी टोकून किंवा पुनर्लागवड करून करता येते. हिरव्या आणि सोनेरी पिवळ्या रंगाच्या वाणाची लागवड करण्यात येते. याचा वापर सलाड आणि प्रक्रिया करण्यासाठी तसेच भाजीसाठी करता येतो. लागवड सरी पद्धतीने किंवा ठिबक सिंचनावर गादीवाफ्यावर करता येते. 10 – 14 आठवड्यांच्या कालावधीत प्रत्येक झाडापासून साधारण 15 – 16 फळांचे उत्पादन मिळते. या पिकाची लागवड शेड हाऊसमध्ये केल्यास चांगले उत्पादन मिळते.
विशेष संदर्भ :
- भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग – 2 : पाठ्यपुस्तिका – 2 : 83
- https://ycmou.ac.in/ebooks
झुकिनी उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.
इतर पॉप्युलर लेख
टोमॅटो उत्पादनाचे सुधारित तंत्र
दर्जेदार आले उत्पादन तंत्रज्ञान
दर्जेदार चवळी – गवार उत्पादनाचे तंत्र