अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान

अश्वगंधा हे बहुपयोगी वनस्पती असून आयुर्वेदात अश्वगंधाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. अश्वगंधाचे शास्त्रीय नाव विनाथिया सोमनी फेरा असे असून ती सोलॅनीसी या वनस्पती कुळातील आहे.

अश्वगंधा या वनस्पतीच्या दोन जाती आढळतात. ही वनस्पती बहुवर्षीय आहे. जंगलात तसेच पडीक जमिनीत सापडणाऱ्या अश्वगंधेला आस्कंद किंवा ढोरगुंज असे म्हणतात. या पिकाची फळे पक्षी मोठ्या प्रमाणात खातात. त्यामुळे तिचा प्रसार आपोआप सर्वत्र होतो. या वनस्पतीच्या मुळांचा वापर दुर्बलतेवर उपयुक्त असतो. अश्वगंधा मुळांना घोड्याच्या लिदेप्रमाणे गंध येतो म्हणूनही तिला अश्वगंधा म्हणत असावे.

प्रस्तुत लेखात आपणास अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान या पिकाच्या लागवडीविषयी माहिती होईल. अश्वगंधा या पिकाच्या विविध औषधी उपयोगांविषयी माहिती होईल. या पिकाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेता येईल.

अश्वगंधा महत्त्व व उपयोग

अश्वगंधाची मुळे बारीक, कमी लांब, ठिसूळ व पांढरी असून पौष्टिक असतात. दुर्बलतेवर ही मुळे फार उपयुक्त असतात. मुळे पौष्टिक असून गर्भधारणेसाठी, नपुंसकत्व जाण्यासाठी, तसेच शुक्रपेशीच्या वाढीसाठी वापरतात. सूज, क्षय, कृमी, दमा, कुष्ठरोग, कफ या विकारात ही मुळे उपयोगी आहेत. अश्वगंधाच्या मुळामध्ये 0.13 ते 0.31 % इतके अल्कोलाईड असून ‘विथाईन’ हे महत्त्वाचे अल्कोलाईड आहे. याशिवाय सोमनिफेराईन, सुडोविथाईन, विधानानिनाईन ही मूलद्रव्ये आहेत. या वनस्पतीची मुळे, पाने, हिरवी फळे, बिया औषधासाठी वापरल्या जातात. अश्वगंधाचा उपयोग आयुर्वेदिक तसेच अॅलोपॅथीक औषधामध्ये करतात. जनावरांच्या औषधांमध्येही अश्वगंधाचा उपयोग होतो. अश्वगंधाचा वापर असणारी 200 पेक्षा जास्त औषधे आज आपल्या देशात तयार होतात.

भारताच्या मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यात ही वनस्पती आढळते. मध्य प्रदेशातील निमच, रतलाम, मंदसौर, कोटा या ठिकाणी अश्वगंधाची अंदाजे 8,000 हेक्टरवर लागवड केली जाते. अलीकडे महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, अकोला, पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांनी अश्वगंधाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात याच्या लागवडीस वाव आहे.

अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान

अलीकडील काळात अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान हे शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे. मात्र हवामानातील प्रतिकूल बदलामुळे तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे अश्वगंधा उत्पादन कमी येत आहे. यामुळेच अश्वगंधाचे  प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता स्तर वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले सुधारित वाण व शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.  

अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान हे फायदेशीर होण्यासाठी हवामान, जमीन, उन्नत वाण, हंगाम आणि लागवड पद्धती, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण, काढणी व उत्पादन, आदी घटकांची माहिती असणे आवश्यक असून त्याची सविस्तर मुद्देनिहाय माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

हवामान

अश्वगंधा पीक उष्ण व समशीतोष्ण हवामानात चांगले येते. हे पीक पावसाळ्यानंतर घेता येते. पावसाळ्यात 600 -800 मिमी. पाऊस आणि हिवाळ्यातील एक दोन पाऊस या पिकाच्या वाढीस पोषक आहेत. वाढीसाठी कोरडे व थंड हवामान मानवते. उशिरा होणाऱ्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढून त्याचा व हिवाळ्यातील थंडीचा मुळांच्या वाढीवर व गुणवत्तेवर चांगला परिणाम होतो.

जमीन

अश्वगंधा या पिकासाठी मध्यम व भुसभुशीत, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागवडीसाठी योग्य असते. हलक्या व भुसभुशीत तसेच रेताड, गाळाच्या किंवा तांबड्या 7.5 ते 8 सामू (पी.एच.) असणाऱ्या जमिनीत हे पीक घेता येते. अगदी मुरमाड व खूप भारी जमिनीत अश्वगंधाची लागवड करू नये.

उन्नत वाण

अश्वगंधाचा मंदसौर (मध्य प्रदेश) येथे जवाहर असगद हा वाण मुळ्यांच्या अधिक उत्पादनासाठी विकसित केला आहे. W – 20 हा आणखी एक सुधारित वाण लागवडीसाठी शिफारस केला आहे. काही भागात रानटी स्वरूपात मिळणारी अश्वगंधा मिळते.

हंगाम आणि लागवड पद्धती

अश्वगंधाची लागवड रोपे तयार करून किंवा बिया पेरून करता येते. रोपांची लागवड पाऊस कमी झाल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये करावी.

रोपवाटिका : मे-जूनमध्ये रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी 1 X 3 चौ.मी. आकाराचे गादीवाफे तयार करावे. एक हेक्टर लागवडीसाठी 2.0 ते 2.5 किलो बियाणे लागते. गादी वाफ्यावर 10 सेंमी. अंतरावर खुरप्याने 2-3 सेंमी. खोल काकऱ्या घ्याव्यात. सुरुवातीला दोनतीन दिवस रोज सकाळी व संध्याकाळी पाणी द्यावे. त्यानंतर गरजेप्रमाणे 2-3 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. साधारण 7 – 10 दिवसांत बियांची उगवण होते. पेरणीनंतर प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. पुनर्लागवडीसाठी 5-6 आठवड्यांत रोपे तयार होतात.

लागवड पद्धती : लागवडीच्या अगोदर जमीन आडवी-उभी नांगरून कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. हेक्टरी 20 – 25 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट मिसळावे. रोपांची लागवड पाऊस कमी झाल्यावर करावी. पिकाच्या लागवडीसाठी व पाणी देण्यासाठी सऱ्या-वरंबे किंवा वाफे तयार करावेत. किंवा उताराच्या जमिनीवर 2 मी. X 30 सेंमी. X 30 सेंमी. आकाराचे चर काढावे व असे चर शेणखत व मातीने भरून लागवड करावी. वाफ्यांमध्ये लागवड करताना दोन ओळींत 45 सेंमी. दोन रोपांत 30 सेंमी. अंतर ठेवावे. बियाणे अगदी बारीक असल्याने त्यात दुप्पट वाळू मिसळावी. सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यात पुनर्लागवड करताना दोन वरंब्यांतील अंतर 60-70 सेंमी. ठेवावे व दोन रोपांमधील अंतर 20 सेंमी. ठेवावे.

बियांची पेरणी करून पीक घेण्यासाठी हेक्टरी 10 – 12 किलो बियाणे दुप्पट वाळूमध्ये मिसळून जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. पेरणी वाफ्यांमध्ये बी फोकून करावी. पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पेरणीनंतर बियांवर हळूवार माती पसरावी. पेरणीनंतर 15 – 20 दिवसांनी बियांची उगवण होते.

खत व पाणी व्यवस्थापन

जमिनीची मशागत करतेवेळी हेक्टरी 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. लागवडीच्या वेळी 25 किलो नत्र व 25 किलो स्फुरद द्यावे. त्यानंतर 40 ते 50 दिवसांनी 20-30 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. जमिनीच्या प्रतीनुसार 12 ते 20 दिवसांनी पाणी गरजेनुसार द्यावे.

आंतरमशागत

तणे काढून पीक स्वच्छ ठेवावे. त्यासाठी 2 – 3 खुरपण्या देऊन मुळांना मातीची भर द्यावी. झाडांची वाढ होऊ न देता मर्यादित ठेवावी. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते.

औषधासाठी मुळ्यांची गरज असते. पेरणी केल्यास उगवणीनंतर प्रति चौ. मीटरला 10 – 15 रोपे राहतील, या बेताने रोपांची विरळणी करावी. कमकुवत रोपे काढून टाकावी.

महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण

अश्वगंधाच्या पिकावर बियांची कूज, रोपे जळणे, पाने करपणे यांसारखे बुरशीजन्य रोग येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी डायथेन एम – 45 हे बुरशीनाशक 10 लीटरला 25 – 30 ग्रॅम या प्रमाणात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. या पिकावर किडींचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. तसेच पिकाला जनावरेही खात नाहीत; पण पिकलेली फळे पक्षी खातात. त्यांचा बंदोबस्त करावा.

काढणी

पहिल्या वर्षी लागवडीनंतर 180 – 210 दिवसांनी किंवा दुसऱ्या वर्षी 18 – 20 महिन्यांनंतर मुळांची काढणी करावी. झाडाची पाने पिकू लागल्यावर व फळे तांबडी झाल्यावर पीक काढणीला येते. असे पीक जमिनीपासून साधारण 20 सेंमी. उंचीवरून कापून शेताला हलके पाणी द्यावे म्हणजे मुळ्या बैल नांगरणीने किंवा कुदळीने खोदून काढायला सोपे जाते. काढणीस आलेली झाडे हलके पाणी देऊन उपटून काढूनही मुळ्या कापून घेता येतात. मुळ्या कापून स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवून घ्याव्या. मुळ्या ओल्या राहिल्यास मुळ्यांना बुरशी लागण्याची किंवा कुजण्याची शक्यता असते. त्यानंतर मुळांचे 7.0 ते 10.00 सेंमी. लांबीचे तुकडे करावेत. प्रतवारी करून विक्रीला पाठवावी.

उत्पादन

बाजारात चांगला भाव मिळण्यासाठी मुळाची लांबी व जाडी लक्षात घेऊन प्रतवारी करावी. हेक्टरी साधारण 5 – 6 क्विटल सुकलेल्या मुळ्या मिळतात. मुळ्या साठवायच्या असल्यास सुकल्यानंतर मुळ्या व बी पोत्यात भरून ठेवाव्या. अश्वगंधाच्या मुळ्यांवर प्रक्रिया करता येते. त्यासाठी मुळ्या धुऊन सावलीत 10-12 दिवस सुकवाव्या किंवा ड्रायरच्या वापर करून 50 – 60° सेल्सिअस तापमानावर 8 – 10 तासांत सुकवाव्या. सुकलेल्या मुळ्या हवाबंद प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये भरून औषध कंपन्यांना विक्री करता येतात. मध्य प्रदेशातील निमच या गावात अश्वगंधाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते.

मुळ्यांची प्रतवारी अ, ब, क आणि कमी प्रतींची मुळे अशा प्रकारे करून विक्री करतात.

  1. अ प्रत : मुळे 7 – 10 सेंमी. लांब, 1 – 1.5 सेंमी. जाड, ठिसूळ असून मोडल्यास आतून पांढरी दिसतात.
  2. ब प्रत : मुळे 5 सेंमी. लांब, 1 सेंमी. जाड, ठिसूळ व आतून पांढरी असतात.
  3. क प्रत : मुळे 3 – 4 सेंमी. लांब, 1 सेंमी. किंवा कमी जाड तर कमी प्रतीच्या मुळ्या, पातळ लहान पिवळसर तुकडे असतात.

याद्वारे शेतकरी बांधवांना अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.अश्वगंधा ही बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. हिची मुळे, पाने, हिरवी फळे आणि बिया औषधासाठी वापरतात. महाराष्ट्रात या वनस्पतीची लागवड वाढत आहे. समशीतोष्ण हवामानात वाढ होणाऱ्या अश्वगंधाचे जवाहर असगद आणि W – 20 हे विकसित वाण आहेत. लागवड बिया पेरून किंवा रोपे तयार करून 5 – 6 आठवड्यांची रोपे सरीवरंबा किंवा चर पद्धतीने किंवा वाफ्यांमध्ये लागवड करून करतात. रोगांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर करावा. काढणीस आलेली मुळे हलके पाणी देऊन, काढून स्वच्छ धुऊन वाळवून घेऊन, प्रतवारी करून विक्री करतात. मध्य प्रदेशातील निमच या गावी अश्वगंधाची बाजारपेठ आहे.

विशेष संदर्भ :

भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-1, य.च.म.मु.वि., नाशिक

https://www.agrowon.com

https://ycmou.digitaluniversity.ac/

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन.

अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

2 thoughts on “अश्वगंधा उत्पादन तंत्रज्ञान”

Leave a Reply