गटशेतीचे प्रभावी व्‍यवस्‍थापन तंत्र

देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शेतीचे तुकडीकरण होऊन भूधारण क्षेत्राचे विभाजन होत असून शेतीचा लागवडीचा खर्च वाढत आहे. यामुळे शेतकरी बांधवाला मजूर बनण्याची वेळ आलेली आहे. सरासरी प्रत्येक शेतकऱ्याकडे आता 20-30 गुंठे शेतीही उरली नाही. परिणामी शेती व्‍यवसाय आर्थिक‍ दृष्‍टया परवडत नाही. जमीन पडीक ठेवणेही योग्य वाटत नाही. म्हणून शेती व्‍यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात असून शेतकरी बांधव शेतीचे तुटपूंजी उत्‍पन्‍न व शेतीचा वाढता खर्च यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. 

जमिनीची धारण क्षमताही दिवसेंदिवस कमी होत आहे. सन 2010-11 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 1970-71 मध्ये असलेली 4.28 हेक्‍टरची धारण क्षमता
कमी होत जाऊन ती 2010-11- मध्ये 1.44 हेक्‍टर प्रतीखातेदार इतकी कमी झाली. काही ठिकाणी तर ती 11 ते 15 गुंठे इतकी कमी आहे. इतक्या अल्प छोट्या क्षेत्रावर शेती करणे आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होत नाही. या समस्येवर समूह शेती किंवा गटशेती पद्धती हा प्रभावी उपाय ठरू शकतो.

गटशेतीमुळे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर होण्यास मदत होईल. सामूहिकरीत्या शेतीमालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन फायदा वाढवता येईल. काही शेतमालांवर काढणी पश्‍चात प्रक्रिया करणे शक्‍य होईल. त्यामुळे शेतमालास योग्य दर मिळणे शक्‍य होईल.

गटशेतीतून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी व उत्पादने निर्माण होणार असल्याने शेतमालावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येईल. गटशेतीमुळे पशुपालन, रेशीम व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, रोपवाटिका, मधुमक्षिका पालन आदी शेतीपूरक जोडधंदे किंवा व्यवसाय करणे शक्‍य होऊन शेतकऱ्यांचा उत्पादन स्तर वाढवून त्यांचे आर्थिक सशक्तीकरण होऊ शकेल.

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्र या लेखाद्वारे गटशेती पद्धतीचा अवलंब करून समविचारी व अल्पभूधारक शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन गटशेती केल्यास निश्चितपणे उत्पादनात स्थिरता आणणे शक्य होईल. तसेच शेतीचा लागवडी खर्च, पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान राबविणे, उपलब्ध मनुष्यबळ, मशागतीवरील वाढता खर्च, नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात्त सुधारित तंत्रज्ञान आणि मालाची विक्री व्यवस्था इत्यादीसाठी शेतकऱ्यांना हा लेख उपयुक्त व फायदेशीर ठरू शकेल.

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्राच्या बाबी

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्र या लेखामध्ये आपणास गटशेतीचा कृती आराखडा, सभासदांचे कौशल्यगुण नोंद, गटशेती सभासदांची जबाबदारी, गटशेती बैठकांचे नियोजन, दैनंदिन कामाच्या नोंदी ठेवणे, नोंदवहीचे प्रकार, निविष्ठा व सेवा पुरवठादार यांच्याशी वाटाघाटी, खरेदीदारांशी वाटाघाटी, मागणी पुरवठा नियोजन, करारातील अटी शर्तीचे पालन, एकत्रित शेतमाल विक्री, गट व्यवस्थापन समिती, ज्ञानाची देवाण-घेवाण, नियमित संवादाचे महत्व, गट सभासदातील सामंजस्य, सकारात्मक दृष्टिकोन, प्रमाणिकपणा आणि सांघिक भावना, सदस्यांची क्षमता वाढविणे, गटशेतीत वापरलेले महत्वाचे मुद्दे, पायाभूत सुविधा व आधुनिक तंत्रज्ञान, गटशेतीत तंत्रज्ञानाचा वापर, गटशेतीमुळे झालेली बचत, गटशेतीची फलनिष्पती आदी प्रभावी घटकांची उपयुक्त माहिती ‍मिळणार आहे.

गटशेतीचा कृती आराखडा :

 • गटशेतीची वाटचाल सुरळीत चालण्यासाठी कृती आराखडा तयार करुन त्यानुसार कामाची आखणी व अंमलबजावणी करावी.
 • कृती आराखड्यामध्ये गटशेतीतील सर्व महत्वाच्या कामांची यादी करुन प्रत्येक कामाच्या अंमलबजावणीसाठी सखोल कृती कार्यक्रम तयार करावा.
 • कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी गटशेतीतील सभासदांनी त्यांच्या अनुभव व कौशल्यानुसार स्विकारावी.
 • गटशेती प्रवर्तकांनी अथवा समन्वयकांनी सभासदांच्या अनुभव व कौशल्य गुणांची नोंद ठेवावी व त्यानुसार जबाबदारीचे वाटप करावे.
 • काही कामासाठी गटामध्ये अनुभव कौशल्याची उणीव असेल तर काही निवडक सभासदांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.

सभासदांचे कौशल्य गुण नोंद :

 1. गटशेतीचा सभासद असलेला प्रत्येक शेतकऱ्यांना काही विशिष्ट कामांची गोडी व कौशल्य असते.
 2. सभादांना त्यांची आवड व अनुभव आधारित कामे दिल्यास कार्यक्षमता वाढते.

काही महत्वाच्या कामाची यादी खाली दिली आहे.

 • यंत्र-औजारे देखभाल दुरुस्ती
 • ट्रॅक्टर चालवणे
 • मशागत ते मळणी, प्रक्रिया पर्यंत सर्व कामे
 • निविष्ठांची खरेदी
 • बाजार व विक्री व्यवस्था
 • वाटाघाटी कौशल्य
 • नेतृत्व कौशल्य
 • आर्थिक ताळेबंद लिहिणे

गटशेती सभासदांची जबाबदारी :

 • सभासद त्यांच्या इच्छेनुसार आवडीच्या कामाची जबाबदारी स्विकारु शकतात त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढते.
 • प्रत्येक सभासदांनी प्रामणिक व कार्यक्षमपणे काम करणे हे त्यांची जबाबदारी आहे.
 • अनुभव व कौशल्याच्या कार्यक्षम वापरामुळे गटाची कार्यक्षमता वाढते.
 • ठरलेली कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करणे ही सभासदांची जबाबदारी आहे.

गटशेती बैठकांचे नियोजन :

 1. गटशेतीचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी
  बैठकांचे नियोजन आवश्यक असते.
 2. बैठकामधून सर्व सभासदांना नियोजनात
  भाग घेता येतो व कामकाजाची इत्यंभूत माहिती मिळते.

गटाच्या बैठकीचे नियोजन खालीलप्रमाणे करावे.

 • बैठकांची सूचना सभासदांना देणे.
 • कार्यसूची बनविणे.
 • कार्यसूचीची टिप्पणी तयार करणे.
 • कार्यासूचीनुसार बैठकीत चर्चा करणे.
 • चर्चेत योजना, कृती, अंमलबजावणी इ. विषय असावे.
 • चर्चा करुन झालेल्या निर्णयाची नोंद
  इतिवृत्तात करणे.
 • बैठकीनंतर इतिवृत्त लिहून सभासदांना
  पाठविणे.

दैनंदिन कामकाजाच्या नोंदी ठेवणे :

 • गटशेतीमध्ये प्रत्येक कामाची नोंद असणे आवश्यक आहे.
 • नोंदीमुळे कामाचा आढावा घेऊन कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते.
 • प्रत्येक कामासाठी नोंदवह्रा तयार करुन त्यात नोंदी जतन कराव्यात.
 • नोंदीसाठी खाली काही कामे नमूद केले आहेत.
 • निविष्ठा खरेदी व वापर शेतातील प्रत्येक कामाच्या नोंदी
 • शेतमजूर नोंद
 • यंत्राचा वापर
 • पीक उत्पादन
 • शेतमाल साठा
 • शेतमाल विक्री
 • उत्पन्न नोंद
 • ताळेबंद

नोंदवहीचे प्रकार :

खर्चाची नोंदवही प्रत्येक खर्चाची नोंद

 • रोखीचे पुस्तक : रोख व्यवहाराची नोंद
 • पावती पुस्तक : प्रत्येक देवाण-घेवाण व्यवहाराचही पावती.
 • बँक खातेपुस्तिका : बँक व्यवहाराच्या अद्यावत नोंदी
 • मजूर रोजंदारी पुस्तिका : मजूरांचे नावे व हजेरी नोंद
 • लाँगबुक : ट्रॅक्टर वापराची नोंदवही
 • यंत्रकाम नोंदवही : प्रत्येक यंत्राच्या वापराची नोंदवही.

निविष्ठा व सेवा पुरवठादार यांच्याशी वाटाघाटी :

 • निविष्ठा विक्रेते, सेवा पुरवठादार यांची
  माहिती घेऊन यादी तयार करावी.
 • यादीतील नावांची छाननी करुन काही
  ठराविक चांगल्या पुरवठादारांची नावे यादीत समाविष्ट करावे.
 • यादीतील पुरवठादारासोबत किफायतशीर
  किंमतीविषयी वाटाघाटी कराव्यात.
 • वाटाघाटीनंतर दर्जेदार माल किंवा सेवा
  पुरवठ्यासाठी करारनामा करावा.

खरेदीदारांशी वाटाघाटी :

 • चांगला खरेदीदार निवडण्यासाठी व्यापार व्यवस्था, स्थितीचे पृथ:करण करावे व यादी तयार करावी.
 • बाजार माहितीनुसार निवडक चांगल्या खरेदीदारांची यादी तयार करावी व त्यामधून ठराविक चांगले खरेदीदार ओळखावे.
 • खरेदीदाराशी समन्वय करुन त्यांची मागणी, मालाचा दर्जा व विशिष्ट गरजा माहित करुन घ्याव्यात.
 • निवडक खरेदीदाराशी वाटाघाटी कराव्या, करार करुन मालाची गुणवत्ता व वेळेवर पुरवठ्याचे आश्वासन द्यावे.
 • भविष्यातील विक्री, चांगले दर याचा अंदाज काढावा व खरेदीदाराशी नियमित संवाद व समन्वय ठेवावा.

मागणी पुरवठा नियोजन :

 • खरेदीदारांच्या मागणीची नोंद घेऊन
  मालाची गुणवत्ता व पुरवठा याचे नियोजन करावे.
 • मागणीच्या अंदाजानुसार किती व कोणता
  माल उत्पादित करावा हे ठरवता येते.
 • खरेदीदारांसोबत किंमतीच्या वाटाघाटी
  करुन करार करावा व मागणीनुसार पुरवठा नियोजन करावे.
 • करारात खरेदीदाराकडून वेळेवर पेंमेटची
  अट असावी.

करारातील अटी शर्तीचे पालन :

 • खरेदी-विक्री-सेवा करार करताना ज्या अटी व शर्ती दोन्ही पक्षाच्या सहमतीने लिहिलेल्या आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे.
 • मालाची गुणवत्ता, वजन, माप योग्य आहे याची काळजी घ्यावी.
 • मालाचा वेळेवर पुरवठा होण्यासाठी वाहतुकदार व इतरांशी समन्वय ठेवावा.
 • व्यवहारात पारदर्शकता असावी व
  त्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शहानिशा करावी.
 • आर्थिक व्यवहाराबाबत काही गैरसमज निर्माण झाल्यास त्याचे वेळीच निराकरण करावे.
 • खरेदीदाराला पुरवठ्याविषयी प्रत्येक टप्प्यावर अचूक माहिती मिळेल याची जबाबदारी घ्यावी.
 • व्यवहारात पत निर्माण होऊन विश्वासार्हता वाढते.

एकत्रित शेतमाल विक्री :

 • गटशेतीमध्ये सर्व शेतकऱ्यांचा माल मध्यवर्ती केंद्रात एकत्रित करुन विक्री केली जाते.
 • एकत्रित विक्रीमुळे वाहतूक खर्चात बचत होते.
 • शेतमाल स्वच्छ, प्रतवारी व पॅकिंग करुन योग्य वेळी विक्रीस नेला जातो त्यामुळे वाढीव भाव मिळतो.
 • गटातील तज्ञ सभासद खरेदीदाराशी वाटाघाटी करुन करार करतात हे एकत्रित विक्रीमुळे शक्य होते.
 • वैयक्तिक विक्रीपेक्षा एकत्रित माल जास्त असल्यामुळे विक्री प्रक्रिया सुलभ होते.
 • जास्त माल एकाच ग्राहकाकडून मिळाल्यामुळे खरेदीदार उत्सुक असतात.
 • गटशेतीमुळे एकत्रितपणे शेतमाल विक्री करणे शक्य होते.
 • निविष्ठा पुरवठादाराशी करार केल्यामुळे खर्चात बचत होते.
 • खरीददाराशी करार केल्यामुळे शेतमालास चांगली किंमत मिळते.
 • खरेदीदाराशी थेट करारामुळे मध्यस्थांचा वाटाघाटीची ताकद वाढते.
 • शेतकरी सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असतात.
 • बाजाराची बुद्धिजिवी माहिती घेण्यासाठी शेतकरी सक्षम होतात.
 • खरेदीदारास उत्कृष्ट दर्जाचा माल वेळेवर निश्चित पुरवठा होतो.

गट व्यवस्थापन समिती :

 • कामकाजाचे धोरण, नियोजन व अंमलबजावणीसाठी गट व्यवस्थापन समितीची गरज भासते.
 • व्यवस्थापन समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य असावे.
 • गटप्रवर्तक किंवा समन्वयकाने गरजेनुसार व्यवस्थापन समितीच्या बैठका आयोजित करुन गटाचे कामकाज सुनिश्चित करावे.
 • व्यवस्थापन समिती कामकाज सुरळीत चालवून गटशेती फायदेशीर करण्यासाठी जबाबदार असते.
 • विशिष्ट कामासाठी उदा: शेतमाल निर्यात सारख्या कामासाठी गटाची उपसमिती नेमावी.

ज्ञानाची देवाण-घेवाण :

 • गटशेती सभासदांमध्ये काहीजण अनुभवी व ज्ञानी असतात.
 • ज्यांच्याकडे विशिष्ट कामे अथवा व्यवस्थापनाविषयी ज्ञान असेल ते गटातील इतर सहकार्यांबरोबर संपर्कात आल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांचा सर्वांना फायदा होतो.
 • सभासदामध्ये ज्ञानाची देवाण-घेवाण हा कार्यक्रम नियमित आयोजित करावा. त्यामुळे क्षमता वाढ होऊन गट कार्यक्षम होतो.

नियमित संवादाचे महत्व :

 • गटाच्या कामांचे नियोजन, त्याची अंमलबजावणी व सुधारणा यामुळे गटाचे सामर्थ्‍य वाढते.
 • संवादामुळे हे सुलभ होते व विचाराच्या देवाण-घेवाण यासाठी नियमित संवाद ठेवावा लागतो.
 • प्रत्येक आठवडा, पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने अथवा सवलतीप्रमाणे संवाद बैठकीचे आयोजन करावे.
 • नियमित संवादामुळे सभासदामध्ये जागृती निर्माण होते व सामंजस्य भावना वाढते.

गट सभासदातील सामंजस्य :

 • गटातील सर्व सभासदामध्ये सामंजस्य असणे हे गटाच्या यशासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
 • कामाबद्दल, व्यवस्थापनाविषयी एकविचार व समविचार असणे गरजेचे आहे.
 • एखादा सभासद गटहिताच्या विरोधात कार्य करुन सामंजस्य बिघडवत असेल तर बहुमतांनी निर्णय घेऊन गटातून मुक्त करावे.
 • सामंजस्यामुळे गटशेतीतून सभासदांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बळ मिळते.

सकारात्मक दृष्टिकोन  :

 • गटशेतीच्या यशस्वी वाटचालीसाठी सभासदांमध्ये सकारात्मक विचार प्रवृत्ती असणे गरजेचे आहे.
 • गट मोठा करणे, गटाची क्रियाशक्ती वाढवणे, गटाचे उत्पन्न वाढवून गट स्वयंपूर्ण करणे हे ध्येय
  साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन मदतगार ठरतो.
 • सकारात्मक विचारामुळे गटाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
 • गटशेतीद्वारे सर्वांगीण विकास साध्य होतो.

प्रमाणिकपणा आणि सांघिक भावना  :

 • गटशेती पद्धती यशस्वी करण्यासाठी गटातील सदस्यांमध्ये तसेच व्यवस्थापन समितीमध्ये प्रामाणिकपणा व सांघिक भावना असणे आवश्यक आहे.
 • गटशेतीमध्ये नवीन सदस्य स्विकारण्यापुर्वी त्याचा प्रामाणिकपणा व सांघिक भावना हा मुख्य निकष असावा.
 • प्रत्येक सदस्याने गटशेती उद्येागासाठी वैयक्तिक आणि संस्थात्मक एकनिष्ठता राखली पाहिजे.
 • गटशेतीतील सर्व सभासदांनी प्रामाणिकपणे व सांघिक भावनेने काम केल्यास गटातील सर्व सदस्यांना त्याचा लाभ होतो.

सदस्यांची क्षमता वाढविणे  :

 • गटशेतीत आधुनिक दृष्टिकोन समोर ठेऊन नवीन तंत्रज्ञान व व्यवस्थापनाचा अवलंब करण्यासाठी सभासदांना विशिष्ट प्रशिक्षण देऊन तयार करावे.
 • गटातील सदस्यांची क्षमता वाढविण्यासाठी खालील विषयात विशेष प्रशिक्षण द्यावे.
 • शेतकामात कौशल्य, किफायतशीर भावात निविष्ठा खरेदी, आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजार सर्वेक्षण, बाजार विश्लेषण, विपणन कौशल्य, आर्थिक व्यवस्थापन कौशल्य आणि गटशेती विषयक उपक्रमांचे व्यवस्थापन.

यशोगाथातून प्रबोधन  :

 • महाराष्ट्रात गटशेतीचा बराच प्रसार होत असून अनेक गट स्थापन झाले आहेत.
 • यशस्वी गटशेतीस अथवा गटशेती आधारित उद्योगांना भेटी आयोजीत कराव्या त्यामुळे प्रबोधन होते.
 • यशोगाथेमुळे सभासदांना ज्ञानवर्धन होऊन प्रेरणा मिळते.
 • गटशेतीतील अडचणीची जाण होते व तोडगा निघतो.
 • यशस्वी गटशेती व्यवस्थापनासाठी प्रबोधन महत्वाचे.

गटशेतीत वापरलेले महत्वाचे मुद्दे  :

 • चर्चेद्वारे योग्य वाणाची निवड
 • जैविक बीजप्रक्रियासाठी अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबीचा वापर.
 • शिफारशीनुसार योग्य रोपांची / झाडांची संख्या
 • मृद व जलसंधारणासाठी सरी-वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा सरी पद्धत अवलंब
 • सेंद्रीय आच्छादन, समतल मशागत व पेरणी आंतरपीक.

पायाभूत सुविधा व आधुनिक तंत्रज्ञान  :

 • संरक्षित पाण्यासाठी शेततळी
 • पाण्याचा योग्य वापरासाठी ठिबक व
  तुषार सिंचन
 • जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी पिकाची फेरपालट
 • अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी माती परिक्षण
 • बाह्य खताचा वापर कमी करण्यासाठी संजीवकांचा वापर
 • झाडाची अन्न निर्माण कार्यक्षमता वाढीसाठी छाटणी व वळण देणे.

गटशेतीत तंत्रज्ञानाचा वापर  :

 • सेंद्रिय तथा जैविक शेती
 • एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन
 • मूल्यवर्धन करुन विक्री
 • आधुनिक विपणन व्यवस्थेचा अभ्यास
 • स्थानिक गरजेनुसार सुलभ तंत्रज्ञानाचा वापर

गटशेतीमुळे झालेली बचत  :

तक्‍ता क्र. 1

गटशेतीमुळे पीक पद्धतीत झालेल्‍या बचतीची माहिती दर्शविणारा तक्‍ता

पिकाचे नाव

पाण्याची बचत

मशागतीच्या खर्चातील
एकूण बचत

खताची बचत

मजूराची बचत

उत्पन्न वाढ

कापूस

40

20

20

50

450

मका

40

20

15

20

50

बाजरा

40

20

20

15

25

मिर्ची

40

25

25

25

35

रब्बी ज्वारी

40

20

25

20

50

गहू

40

20

25

20

25

हरभरा

40

20

25

20

30

सोयाबीन

40

20

25

20

30

मोसंबी

40

20

25

50

30

डाळिंब

40

20

25

50

35

गटशेतीची फलनिष्पती  :

 • गटशेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.
 • उत्साहवर्धक वातावरण निर्मिती.
 • सामाजिक व आर्थिक विकासाकडे वाटचाल.

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापनामुळे होणारे फायदे :

 • शेतकऱ्यांमध्ये समविचार, संघटितपणा व सामंजस्य वाढते.
 • कमीत कमी भूक्षेत्रावर एकत्रित पीक उत्पादन घेता येते.
 • शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करता येतो.
 • पीक उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक सशक्तीकरण होते.
 • शेतकऱ्यांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण होते.
 • शेतकऱ्यांना समान हिस्साने उत्पादनांचा उपभोग घेता येतो.
 • शेतकऱ्यांमध्ये संवाद, कौशल्य, ज्ञान व आत्मनिर्भरपणा वाढतो.
 • शेतकऱ्यांची वाटचाल विकासाच्या दिशेने होते.
 • शेतकऱ्यांना प्रशिक्षण ‍दिल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेचे
  गणित समजून घेता येते.

विशेष संदर्भ :

 1. कृषी विषयक विशेष प्रकल्‍प, (PMKVY), कार्यपुस्तिका,2019
 2. केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य ‍विकास योजना 2.0
 3. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रम
 4. शासन निर्णय, महाराष्‍ट्र शासन, (05 सप्टेंबर, 2018): गट शेतीस प्रोत्‍साहन व
  सबलीकरणासाठी  शेतकऱ्यांच्‍या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्‍यास मान्‍यता
  , कृषि, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, शासन निर्णय क्रमांक कृविका – 2018/प्र.क्र. 32
  (भाग-1)/3 –अे
  , मंत्रालय, मुंबई-400032

 

डॉ. योगेश सुमठाणे (पीएच. डी. कृषि, एम. बी. ए., डी. मार्केटिंग व फायनान्स), मो.नं. 7588692447

 

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

गटशेतीचे प्रभावी व्यवस्थापन तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply