कोरडवाहू शेती

पृथ्वीच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे 35 टक्‍के क्षेत्र (40 ते 49 दशलक्ष चौ. कि.मी.) कोरड्या प्रदेशाचे आहे. यांपैकी निम-कोरडे क्षेत्र 14 टक्के, कोरडे क्षेत्र 16 टक्के आणि अति कोरडे क्षेत्र 5 टक्के आहे. या प्रदेशामध्ये जागतिक सुमारे 17 ते 20 टक्के लोकसंख्या वास्तव्य करते. त्यांचे जीवन कोरड्या हवामानाच्या पर्यावरणाशी निगडीत आहे.

निम-कोरड्या प्रदेशातील लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. देशातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 45 टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण 18 टक्के आहे. संपूर्ण सिंचनक्षमता विकसित केल्यावरही राज्यातील सुमारे 70 टक्के क्षेत्र कोरडवाहूच राहणार असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करून जनतेचे जीवनमान उंचावण्याकरिता कोरडवाहू शेतीचा अग्रक्रमाने विकास करणे अपरिहार्य आहे.

सिंचनाच्या अत्यंत सीमित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची, अवनत जमिनिची तसेच हलक्या जमिनिची मोठ्या प्रमाणावरील व्याप्ती ही पिकांच्या कमी उत्पादकतेची प्रमुख कारणे आहेत. राज्यामध्ये अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती सुमारे 52 टक्के असून हलक्या जमिनीचे प्रमाण 39 टक्के इतके आहे.

राज्यातील क्षारपड व चिबड जमिनीचे क्षेत्र 12 लाख हेक्टर पेक्षा जास्त असून विविध प्रकारच्या धुपीमुळे अवनत झालेल्या जमिनीचे प्रमाण 42 टक्के आहे. या सर्व कारणामुळे राज्यातील कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची असून या शेतीचा कायमस्वरूपी विकास करून कृषि उत्पादनात सातत्य व स्थिरता
आणणे आवश्‍यक आहे.

कोरडा किंवा शुष्क प्रदेश म्हणजे काय?

ज्या प्रदेशात ओलावा किंवा आर्द्रतेची कमतरता, कायमस्वरूपी, ऋतुकालीन
किंवा नियतकालिक असते आणि त्याची विभागणी वार्षिक पर्जन्यमान किंवा वनस्पतीचे आच्छादन यावर आधारित निमओसाड व अतिओसाड अशी होते
, त्याला कोरडा किंवा शुष्क प्रदेश असे म्हणतात.

कोरडवाहू शेती म्हणजे काय?

कोरड्या प्रदेशात जलसिंचन विरहित अवर्षण प्रतिरोधक पिकांची लागवड करणे आणि मृदेतील ओलावा बाष्पीभवनापासून राखून शेती केली जाते, याला कोरडवाहू शेती असे म्हणतात.

ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाची आहे. अशा ठिकाणी लागवड करून शेती केली जाते, त्यास कोरडवाहू शेती असे म्हणतात.

कोरडवाहू शेतीची वैशिष्टये :

कमी पावसाचा प्रदेश

कोरडवाहू शेतीमध्ये कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये कार्यक्षम व्यवस्थापन आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग करून शेती करतात.

वार्षिक पर्जन्य 50 सें.मी. पेक्षा कमी

ज्या प्रदेशात वार्षिक पर्जन्य 50 सें.मी. पेक्षा कमी असतो तेथील शेतकऱ्यास जीवन जगण्यासाठी झगडावे लागते. तेथील कोरडवाहू शेती अनिश्चित अवस्थेत असते.

सातत्याने ओलाव्याची कमतरता

शेतकऱ्यांना उपलब्ध पीक चक्रामध्ये सातत्याने ओलाव्याच्या कमतरतेशी जुळवून घ्यावे लागते. यामधून कोरडवाहू शेती विकसित होत असते. सीमांत
प्रदेशातील शेतकऱ्यास वारंवार अनेक वर्षे कमी पिकांच्या उत्‍पादनाशी तोंड द्यावे
लागते.

उपलब्ध पावसाचे पाणी अडवून त्याचे संवर्धन करणे

उपलब्ध पावसाचे पाणी साठवून त्याचा पिकासाठी वापर केला पाहिजे. यासाठी पिकांच्या फेरपालटीमध्ये एका उन्हाळयाच्या हंगामात जमीन पडीक
ठेवावी लागते. यामुळे दोन हंगामामधील पावसाच्या पाण्याचा उपयोग एका पिकाच्या वाढीसाठी होतो. शेतावर धान्याच्या ताटाचा बुडखा तसाच ठेवला जातो की
, ज्यामुळे आर्द्रता पकडली जाते. विषेशतः समशीतोष्ण प्रदेशात वाऱ्याने वाहत येणारे हिम पकडले जाते आणि पायऱ्या-पायऱ्यांच्या शेतीमुळे वाहत जाणारे पाणी अडविले जाते. याचप्रमाणे डोंगरावरून पायथ्याकडे जाणाऱ्या पाण्याचा वेग शेतीमधल्या सरीमुळे थोड्याप्रमाणात कमी होतो. शेतीमधील तण काढल्यामुळे ओलाव्याचे संवर्धन होते.

उपलब्ध ओलाव्याचा परिणामकारक उपयोग

एका जमिनीला पिकांच्या वाढीसाठी ओलावा प्राप्त झाल्यावर कोरडवाहू शेती परिणामकारक होण्यासाठी त्याचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. बियांची खोली आणि रोप लावण्याची वेळ काळजीपूर्वक ठरवावी लागते. ज्या स्थानावर पुरेसा ओलावा प्राप्त होत आहे त्याची निवड करावी लागते किंवा कोठे व केव्हा पाऊस पडेल याचा पण विचार केला पाहिजे.

शेतकऱ्याची अशी प्रवृत्‍ती असते की, पीक विविधता, अवर्षण आणि कडक उन्हामध्ये तग धरू शकणाऱ्या वाणाची निवड करणे. एक वेळ कमी उत्पादन झालेतरी चालेल. यामुळे ऋतुकालीन पाऊस नेहमीपेक्षा  लवकर थांबला तरी यशस्वीरित्या पीक येण्याची संभाव्यता वाढते. 

मृदा संवर्धन

कोरडवाहू शेतीचे स्वरूप असे असते की, जमिनीची धूप सहज होते. विशेषतः वाऱ्यापासून मृदेची धूप होते. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्‍यक असते. कोरडवाहू शेतीच्या शाश्‍वततेसाठी मृदेचा वरचा थर अतिशय महत्वाचा असतो. कोरडवाहू शेती प्रदीर्घ कालखंडासाठी मृदेचा वरचा थर राखणे सर्वांत महत्वपूर्ण असते आणि यासाठी मृदेमधील ओलावा टिकविण्यासाठी मृदा संवर्धन आवश्‍यक असते. धूप नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वाऱ्याचा वेग कमी करणे, नांगरणी कमी करणे किंवा नांगरणी न करणे, संवेदनशील भूमीवर कडबा पसरणे आणि पट्टेदार शेती यांचा अवलंब करावा लागतो.

शेतामधील आदानांच्या किंमतीवर नियंत्रण राखणे

कोरडवाहू शेतीचे तंत्र अशा प्रदेशात वापरले जाते की, जेथे स्वभाविकपणे जलसिंचनविरहित कृषिसाठी योग्य असते. हा असा प्रदेश आहे की, शेतकऱ्यांनी कितीही पैसा खर्च केला किंवा पिकासाठी  कितीही प्रयत्न केले तरी शेतकऱ्यांनी शुष्क वर्षांमध्ये पिकांचे अपयश आणि अत्यंत कमी उत्पादन येण्याचा धोका असतो.

म्हणूनच कोरड्या प्रदेशामधल्या शेतकऱ्यांना पिकाच्या हंगामात सातत्याने उत्पादनाच्या क्षमतेवर लक्ष ठेवलेच पाहिजे. खतांसारख्या आदानाचा खर्च कमी करण्याची तयारी केली पाहिजे आणि असे आढळले की, शेतामधील अपुऱ्या ओलाव्यामुळे पिकाचे उत्पादन कमी येणार आहे तर तण नियंत्रण करणे आवश्‍यक असते.

भरपूर ओलावा असणाऱ्या वर्षात कमाल उत्पादन घेणे

ज्या वर्षी जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहे त्या काळात शेतकऱ्यांनी आदानांमध्ये वाढ करून त्या प्रमाणात खर्च करून कमाल उत्पादन घ्यावे व
कमी उत्पन्नाच्या हंगामाची भरपाई करावी.

कमी कालखंडात येणाऱ्या पिकाच्या जातीची निवड

पिकाच्या बुटक्या जातीची निवड करण्याची मुख्य तत्व असे की, त्या कमी काळात तयार होतात. त्याची मुळे खोलवर जातात आणि उत्पादनही जास्त येते.

पिकांची पेरणी लवकर करणे

कोरड्या प्रदेशात अनिश्चित मान्सूनला तोंड देण्यासाठी पिकांची पेरणी लवकर करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. याचा पडताळा खरीप आणि रब्बी हंगामात आलेला आहे. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन विशिष्ट पिकांची पेरणी आधीच करावी आणि पाऊस पडण्याची वाट पाहू नये. परंपरा न पाहता शेतजमिनीच्या ओलाव्याची स्थिती पाहून पिकाच्या पेरणीची तारीख ठरवावी.

खत फक्त एकदाच न देता त्याच्या मात्रा द्याव्यात

कोरड्या जमिनीतफक्त एकदाच खत देणे योग्य नाही तर पिकाच्‍या पोषणासाठी खताच्या कमाल मात्रा विशेषतः नत्रयुक्त खते हप्‍त्‍यानेद्यावीत की ज्यामुळे कमाल उत्पादन येऊ शकेल.

पावसाचे पाणी साठविणे

कोरड्या प्रदेशात उपलब्ध होणारे पावसाचे पाणी साठवून ठेवणे हा एक सर्वांत चांगला उपाय आहे. बाष्पीभवनापासून वातावरणात जाणारे पाणी थोपविण्यासाठी तलावाच्या तळाशी मातीबरोबर सोडिअम क्लोराइड आणि कार्बोनेट मिसळून लावणे.

भारतामधील कोरडवाहू शेती

भारतामध्ये सुमारे 32 दशलक्ष (एकूण पीक क्षेत्राच्या 25 टक्के) कोरडा प्रदेश आहे. कोरड्या प्रदेशांनी राजस्थान आणि गुजरातचा बराचसा प्रदेश व्यापलेला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांच्या काही प्रदेशांचा समावेश होतो.

कोरडवाहू शेतीची वैशिष्टयपूर्ण लक्षणे

 1. कोरडवाहू शेतीचा पाया ओलावा आर्द्रता संवर्धन हा आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतजमीन विशेषतः पावसाळयात जमिनीची नांगरणी वारंवार करतात.
 2. शेतात एकदा पीक काढल्यानंतर पुढच्या हंगामात शेती पडीक
  ठेवली जाते. यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते.
 3. जमिनीत पेरणी करण्यापूर्वी तिचे चूर्णन करतात.
 4. पिकाची कुळवणी आणि तण वारंवार काढणे. सर्वसाधारण
  सूर्योदयापूर्वी कुदळणी करतात की
  , ज्यामुळे रात्रीचे दंव जमिनीत मिसळते आणि पिकांना ओलावा प्राप्त होतो.
 5. मृदेमधील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी शेतजमीन कडब्याने
  झाकणे आणि धूप नियंत्रण करतात.
 6. कोरडवाहू प्रदेशात कृषिला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि
  दुग्धव्यवसाय केला जातो.

पिके

कोरडवाहू शेतीमधील प्रमुख पिके भरडधान्ये (ज्वारी, बाजरी, मका); कडधान्ये, भुईमूग, तेलबिया आणि चारा आहेत. कोरडवाहू शेती प्रदेशामधील 75 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कृषिवर अवलंबून असले तरी त्यांचे राहणीमान कमी दर्जाचे असते.

कोरडवाहू शेतीच्या प्रमुख समस्या

 1. पावसाची कमतरता, अनिश्चित स्वरूपाचा मान्सून यांचा परिणाम अवर्षण, दुष्काळ व पूर येण्यात होतो.
 2. मृदा बऱ्याच प्रमाणात वाळूमिश्रित असून त्यामध्ये ह्युमस व
  पोषणमूल्यांची कमतरता असते.
 3. कोरड्या शेतीमधील प्रदेश मृदेच्या धुपेला संवेदनशील असतो.
 4. पिकांचे दर हेक्टरी उत्पादन कमी असते.
 5. जमिनीमधील ओलावा व जलसिंचनाची अनुपस्थिती असल्याने उच्च
  पैदास बी-बियाणे आणि नंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य असत नाही.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर, वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

कोरडवाहू शेती हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply