फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांच्या काढणीची वेळ फुलांच्या जातीवर, बाजारपेठांच्या अंतरावर आणि फुलांच्या कळीच्या आकारावर अवलंबून असते. फुले कोणत्या वेळी आणि कोणत्या अवस्थेत काढली जातात यांवर फुलांचे आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे फुलांची काढणी करतांना वरील बाबींचा विचार करणे आवश्यक असते.

काही फुलांच्या बाबतीत सकाळी आठ वाजता काढलेल्या फुलांपेक्षा संध्याकाळी चारच्या सुमारास काढलेली फुले जास्त काळ टिकतात. कारण संध्याकाळी काढलेल्या फुलांमध्ये कोर्बोहायड्रेट्स्चे प्रमाण सकाळी काढलेल्या फुलांपेक्षा जास्त असते.

या कार्बोहायड्रेट्स्चा उपयोग फुलांना श्वसनासाठी होतो. त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रकार आणि मजुरांची उपलब्धता यांवर फुलांच्या काढणीची वेळ अवलंबून असते.

फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे 70% त्यांच्या काढणीच्या वेळेवर तर उर्वरित 30% हे काढणीनंतरच्या घटकांवर अवलंबून असते. फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे फुलांची परिपक्वता, फुले काढणीची पद्धत तसेच फुलांची काढणीनंतरची हाताळणी, फुलांचे पॅकिंग, वाहतुकीच्या योग्य पद्धती आणि साठवणीच्या पद्धती यांवर अवलंबून असते.

प्रस्तुत लेख फुलांची काढणी व्यवस्थापन यावर आधारित असूनआपल्याला फुलांची परिपक्वता आणि प्रकारानुसार फुलांची काढणी केव्हा करावी, तसेच ‍विविध फुलांची काढणी व्यवस्थापन प्रक्रिया याबाबत माहिती समजून घेता येईल. त्यामुळे सदर माहिती फूल उत्पादक शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्टीकोनातून अतिशय उपयुक्त व महत्त्वाची ठरणार आहे.

फुलांची काढणी

फुलांची काढणी करताना फुलांची परिपक्वता, बाजारपेठेचे अंतर, बाजारपेठेतील मागणी, फुलांचा उपयोग, इत्यादी गोष्टी लक्षात घ्याव्यात.

1) फुलांची परिपक्वता

ज्या अवस्थेत फुलांची काढणी केली असता काढणीनंतरही फुलांची वाढ होत राहते आणि फुलांची प्रत जास्तीत जास्त चांगली राखून वाढ पूर्ण होते, त्या अवस्थेला फुलांची परिपक्वता असे म्हणतात.

उदाहरणार्थ, कार्नेशन, ट्युलिप आणि इस्टर लिली या फुलांची काढणी कळी, हिरवी कळी किंवा व्हाईट पफी अवस्थेत केल्यास कळी वाढत राहून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची फुले तयार होतात. फुलांची टिकण्याची गुणवत्ता ही त्यांमध्ये असलेल्या कोर्बोहायड्रेट्सच्या प्रमाणावर तसेच अन्नाचे विघटन होताना तयार होणाऱ्या घटकांवर अवलंबून असते. तसेच ताजी फुले वर्षात ज्या वेळी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश असतो अशा वेळी काढल्यास ती कमीत कमी सूर्यप्रकाशात काढलेल्या फुलांपेक्षा जास्त दिवस टिकतात. परदेशात एप्रिल ते जुलै या कालावधीत काढलेली शेवंतीची फुले नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काढलेल्या फुलांपेक्षा दुप्पट काळ टिकतात.

2) ग्राहकांची मागणी

फुलांची काढणीची वेळ किंवा काढणीच्या वेळेची परिपक्वता ही बाजारपेठेतील मागणीवर अवलंबून असते. ग्राहकांची मागणी फुले कोणत्या वेळेत काढली आहेत, यावर अवलंबून असते.

3) बाजारपेठेचे अंतर

फुलांच्या काढणीची वेळ ही ज्या बाजारपेठेत फुले पाठवावयाची आहेत त्या बाजारपेठांच्या अंतरावर अवलंबून असते. फुले दूरच्या बाजारपेठेत पाठवावयाची असल्यास पूर्ण वाढ होण्यापूर्वी फुलांची काढणी करावी. कळीच्या अवस्थेत फुलांचा आकार लहान असल्यामुळे जास्तीत जास्त फुले प्रत्येक कागदी पेटीत भरून पाठविता येतात. जवळच्या बाजारपेठेसाठी फुलांची पूर्ण वाढ झाल्यानंतरच फुलांची काढणी करावी.

4) फुलांचा उपयोग

फुलांचा वापर कोणत्या कारणासाठी करायचा आहे यावरही फुलांच्या काढणीची वेळ अवलंबून असते. हार, गजरे, वेण्या तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या कळीच्या अवस्थेत फुले काढावीत. सजावटीसाठी अथवा फुलदाणीत फुले ठेवण्यासाठी लांब दांड्याची फुले काढताना पूर्ण वाढ झालेल्या कळीच्या अवस्थेत फुले तोडावीत. सुगंधी तेले, अत्तरे तयार करण्यासाठी जाई, जुई, मोगरा, कागडा यांसारखी फुले पूर्ण उमललेल्या अवस्थेत काढावीत. पूर्ण उमललेल्या फुलांपासून सुगंधी द्रव्याचा उतारा जास्त प्रमाणात मिळतो.

काही महत्त्वाच्या फुलांची काढणी व्यवस्थापन :

1) गुलाब : गुलाब फुलांची काढणी शक्यतो सूर्योदयापूर्वी करावी. गुलाबाच्या लाल आणि गुलाबी जातींमध्ये फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उघडण्यास सुरुवात झाल्यावर त्यांची काढणी करावी. हार तयार करण्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. फुले काढल्यानंतर लगेच ती पाणी असलेल्या भांड्यात ठेवावीत. त्यानंतर थंड ठिकाणी सावलीत ठेवून 4 ते 5 तास 2 % साखरेच्या द्रावणात ठेवावीत. सोय असल्यास फुले 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमानात साठवावीत.

2) कार्नेशन : कार्नेशनच्या लागवडीनंतर 5 महिन्यांनी फुले काढणीस येतात. फुलांच्या कळ्यांच्या बाहेरील पाकळ्या तुऱ्याच्या लांबीशी काटकोनात उमलल्यावर कार्नेशनच्या फुलांचे तुरे तोडतात. अलीकडच्या काळात फुलांच्या कळ्या घट्ट असतानाच तुऱ्याची काढणी करतात. तुऱ्याच्या काढणीनंतर दांडे पाण्यात बुडतील अशा रितीने फुले 4 ते 6 तास पाण्यात ठेवावीत.

3) जरबेरा : जरबेराची फुले मुख्यतः कटफ्लॉवर्स म्हणून वापरली जातात. जरबेराची अर्धवट उमलेली फुले काढणीनंतर उमलत नाहीत. म्हणून पूर्ण उमललेली फुले तोडावीत. फुले पूर्ण उमलल्यानंतर फुलांचे दांडे कापून काढतात अथवा दांडे तळाशी धरून आजूबाजूस वाकवून बुडापासून वेगळे करतात. फुलांचे देठ जाड असल्यास फूल टिकण्यास जास्त मदत होते. तसेच वाहतुकीस सोपे जाते.

4) जाई : लागवडीनंतर जाईच्या वेलींना 2 वर्षांनंतर फुले येऊ लागतात. जाईला वर्षभर फुले येतात. फुलांची काढणी हातानेच करतात. फुले कोणत्या कारणासाठी लावली आहेत याचा विचार करून ती केव्हा काढावीत हे ठरवावे. वेणी, गजरा यांसाठी फुले उमलायच्या आत म्हणजेच कळीच्या अवस्थेत तर सुवासिक द्रव्ये काढण्यासाठी फुले पूर्णपणे उमलल्यानंतर काढतात. काढणीनंतर फुले लगेच थंड ठिकाणी सावलीत ठेवतात.

5) झेंडू : झेंडूची फुले पूर्ण उमलल्यानंतर त्यांच्या देठापासूनच तोडून वेचणी करतात. अशी फुले हार, माळा तयार करण्यासाठी वापरतात. दिवाळी आणि दसरा या सणांच्या काळात फुलांची काढणी केल्यास फुलांना जास्त किंमत मिळते. कटफ्लॉवरसाठी झेंडूची गेंडेदार फुले 20-25 सेंटिमीटर दांड्यासह कात्रीने कापून काढतात. फुले काढल्यानंतर त्यांवर पाणी शिंपडू नये. शक्यतो फुलांची तोडणी दुपारनंतर करावी. पूर्ण उमललेली फुले विक्रीसाठी पाठवावीत.

6) निशिगंध : कंद लागवडीनंतर 60-80 दिवसांत फुलांचे दांडे दिसू लागतात. असे दांडे दिसू लागल्यानंतर 15-20 दिवसांच्या दरम्यान फुले उमलू लागतात. पूर्ण उमललेली फुले सुगंधी द्रव्य काढण्यासाठी वापरतात. हार-वेण्या तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या कळ्यांची तोडणी करावी. कळ्यांची वेचणी सकाळी आठ वाजण्यापूर्वी अथवा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर करावी. फुलदाणीत फुले ठेवण्यासाठी निशिगंधाच्या फुलदांड्यावरील सर्वांत खालच्या दोन कळ्या उमलल्यानंतर फुलदांड्याची काढणी करावी. काढणी केल्यानंतर दांड्यांचा काही भाग पाण्यात बुडेल अशा रितीने फुलदांडे पाण्यात ठेवावेत. सिंगल प्रकारातील निशिगंधाची फुले फुलदाणी, पुष्पगुच्छ आणि वेणीसाठी तसेच सुगंधी तेल तयार करण्यासाठी वापरतात. डबल प्रकारातील निशिगंधाचा उपयोग फक्त पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी आणि फुलदाणीत ठेवण्यासाठीच केला जातो.

7) अॅस्टर : अॅस्टरची लागवड केल्यापासून हळव्या जाती दोन ते अडीच महिन्यांत फुलू लागतात; तर गरव्या जातींना फुले येण्यासाठी तीन ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. अॅस्टरची पूर्ण वाढलेली आणि उमललेली फुले दांड्यासह कापून घ्यावीत. फुलांचे दांडे 10 सेंटिमीटर ते 20 सेंटिमीटर लांब ठेवावेत. 4, 6, 9, 12 अशा फुलांच्या गड्या बांधतात.

8) ग्लॅडिओलस : ग्लॅडिओलसच्या फुलदांड्यावरील सर्वांत खालील फूल उमलण्याच्या किंवा त्याला रंग दिसण्याच्या स्थितीत असताना जमिनीपासून सुमारे 1520 सेंटिमीटर उंचीवर चाकूने कापून घ्यावे. कात्रीने दांडे कापू नयेत. कात्रीने दांडे कापल्यास पानेही कापली जातात. पाने कापली गेल्यास जमिनीत राहिलेल्या कंदाचे पोषण चांगले होत नाही. ग्लॅडिओलसचे कापलेले फुलदांडे पाण्यात बुडवून ठेवावेत.

9) शेवंती : शेवंतीची पूर्ण उमलेली फुले तोडावीत. ही फुले प्रामुख्याने हारांसाठी, वेण्यासाठी वापरतात. शेवंतीच्या हळव्या जातींना सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात, तर गरव्या जातींना डिसेंबर महिन्यात फुले येतात. शेवंतीच्या फुलांची काढणी करताना पूर्ण उमललेली फुले कळ्यांना धक्का न लावता काळजीपूर्वक तोडून टोपलीत गोळा करावीत. ऊन कमी झाल्यावर किंवा संध्याकाळी फुलांची काढणी करावी. फुलांची काढणी ऊन असताना केल्यास पाकळ्यांची मोठ्या प्रमाणात गळ होते.

फुलांची काढणी केल्यामुळे होणारे फायदे :

  1. फुलांच्या काढणीसाठी योग्य वेळपत्रक आखणी करता येते.
  2. फुलांची काढणी वेळेत केल्यामुळे फुलांचा दर्जा व गुणवत्ता उत्तम राहते.
  3. बाजारपेठेचा विचार करून फुलांची काढणी करणे सोयीस्कर होते.
  4. कोणत्याही प्रकारची फुलांची नासाडी होत नाही.
  5. ग्राहकांना बाजारात ताजी व उत्तम दर्जाची फुले मिळतात.
  6. फुलांची उत्पादनात वाढ होते.

अशाप्रकारे फुलांची काढणी व्यवस्थापन प्रक्रिया आपण या लेखामध्ये समजून घेतली आहे. फुलांची काढणी ही योग्य वेळेवर व बाजारपेठेतील किंमतीचा विचार करून फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांची काढणी करणे आवश्यक आहे. अन्यथा बाजारपेठेत कमी भाव लागून परिणामी फुलांच्या शेतीचे नुकसान होऊ शकते. यासाठी व्यापारी तत्त्वावर फुलांची काढणी व विक्री व्यवस्थापन करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते.    

विशेष संदर्भ :

  1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका- 1, पृ.क्र. 1-6
  2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (AGR-213-216)
  3. https://ycmou.digitaluniversity.ac/
  4. https://drive.google.com/drive/folders/0B451Yjwt_acQcHV4YzA0Q2pOZXc?tid=0B451Yjwt_acQR1VPSUQ4Q0tvams
  5. http://www.agrowon.com
  6. http://www.sakal.com
  7. http://mpkv.ac.in/
  8. http://www.vnmkv.com 

 

Prajwal Digital

Leave a Reply