फुलांची परिपक्वता

सर्वसाधारणपणे फुले कोणत्या अवस्थेत काढावीत, हे जरी शेतकऱ्याला माहीत असले तरी, बाजारात जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्यासाठी केव्हा आणि कोणत्या अवस्थेत फुलांची काढणी करावी, काढणीपूर्वी किंवा काढणीनंतर फुलांवर कोणत्या प्रक्रिया कराव्यात, फुलांची परिपक्वता यांविषयी सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

वाढणाऱ्या वनस्पतीप्रमाणेच तोडलेली फुले ही सजीव असतात. सभोवतालच्या वातावरणाचा उदाहरणार्थ, तापमान, सापेक्ष आर्द्रता, निरनिराळ्या वायूंतील घटकांचे प्रमाण, इत्यादींचा फुलांच्या टिकाऊपणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे फुलांच्या पक्वतेनुसार फुलांची काढणी करणे उत्पादनाच्या दृष्टीने योग्य असते.

फुलांची काढणी कोणत्या अवस्थेत केली जाते, यावर फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य अवलंबून असते. फुलांची काढणी फुले परिपक्व झाल्यावर करावी. म्हणजेच अशा वेळी करावी की काढणीनंतरही त्यांची वाढ होत राहून जास्तीत जास्त चांगला दर्जा ठेवून त्यांची वाढ पूर्ण होईल.

फुलांच्या कळ्या लवकर म्हणजेच परिपक्व नसताना तोडल्यास पाकळ्या नीट उघडत नाहीत आणि अशा फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य फारच कमी असते. कोणत्याही फुलांची परिपक्वता काढणीच्या वेळी कळीचा आकार आणि पाकळ्यांची वाढ यांवर अवलंबून असते.

प्रस्तुत लेखाद्वारे फुल उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याला फुलांच्या परिपक्वतेची लक्षणे समजण्यास मदत होईल. फुलांची परिपक्वतेनुसार काढणी करणे सोयीस्कर होईल. फुलांच्या पक्वतेची क्रिया कशी घडते, याबद्दल सविस्तर माहिती फुलांची परिपक्वता या लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. 

फुलांच्या परिपक्वतेची लक्षणे :

फुलशेतीच्या उद्योगामध्ये योग्य त्या अवस्थेत फुले ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. शेतामधून फुलांची काढणी केल्यापासून सर्वसाधारणपणे 1 ते 4 दिवसांत फुले ग्राहकांपर्यंत पोहोचतात. या कालावधीत फुलांची फार मोठ्या प्रमाणात हाताळणी होते.

फुले झाडांपासून अलग केलेली असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे ती सजीव असल्यामुळे त्यांची श्वसनक्रिया सुरूच असते. पर्यायाने अशा फुलांतील आणि त्यांच्या दांड्यांतील साठलेल्या अन्नाचे विघटन चालूच असते.

फुलाचे काढणीनंतरचे आयुष्यमान हे त्या फुलामध्ये काढणी करताना उपलब्ध असलेल्या साखरेच्या (कार्बोहायड्रेट्स्) प्रमाणाशी  निगडित असते. म्हणून योग्य परिपक्वता असल्याशिवाय फुलांची काढणी करू नये.

फुलांच्या परिपक्वतेची लक्षणे प्रत्येक फुलाच्या प्रकारानुसार, जातीनुसार आणि फुले लागवडीच्या उद्देशानुसार वेगवेगळी असतात.

सर्वसाधारणपणे फूल पक्व झाले आहे किंवा नाही हे त्या फुलाच्या फांदीची पक्वता, फुलाच्या दांड्यावरील पानांची संख्या आणि अवस्था, कळीची किंवा फुलाची अवस्था, आकार आणि रंग यांवरून ठरविले जाते.

1) फांदीची पक्वता :

फांदीमध्ये साठलेल्या कार्बोहायड्रेट्सच्या साठ्याच्या प्रमाणावर फांदीची पक्वता अवलंबून असते. फुलझाडांची वाढ योग्य त्या हवामानात म्हणजेच आवश्यक तापमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाशात झाली असल्यास फांद्यांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण भरपूर असते.

हवामानातील घटकांच्या फेरबदलानुसार फांदीमधील कार्बोहायड्रेट्स्चे प्रमाण कमी अधिक होते. पक्व झालेली फांदी ओळखण्यासाठी तिला हाताने वाकविल्यानंतर ती पूर्ण न वाकता मोडते. अशा फांद्यांमध्ये लाकडी भागाचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच त्यामध्ये साठलेल्या साखरेचे (कार्बोहायड्रेट्सचे) प्रमाणही जास्त असते.

फुलाच्या प्रकारानुसार फुलदांड्याची लांबी जेवढी जास्त, तेवढे त्यामध्ये साठलेल्या साखरेचे प्रमाण अधिक असते. म्हणून गुलाब, कार्नेशन, शेवंती, गुलछडी, ग्लॅडिओलस, अॅस्टर ही फुले जास्तीत जास्त लांब दांडा असतानाच्या अवस्थेत काढावीत. अशी फुले काढणीनंतर जास्त काळ टिकतात. लांब दांडा असलेली परंतु कोवळ्या अवस्थेतील तसेच अतिआखूड दांडा असलेली फुले काढणीनंतर जास्त काळ टिकत नाहीत.

2) फुलदांड्यावरील पानांची संख्या व अवस्था :

झाडापासून फूल वेगळे करताना त्या फुलदांड्याला जेवढ्या जास्त प्रमाणात पाने असतील तेवढे चांगले असते. काढणीनंतरही फुले, पाने आणि दांडे सजीव अवस्थेतच असतात. ह्या काळात पानांमार्फत अन्ननिर्मितीचे कार्य चालू असते. त्यामुळे फांदीत साठलेल्या किंवा फुलदाणीतील संरक्षित द्रवातील अन्नांशाचे योग्य त्या अवस्थेत विघटन घडवून आणून फुलांच्या श्वसनास म्हणजेच पूर्णावस्थेच्या क्रियेस पाने हातभार लावतात. म्हणून फुलाच्या दांडीवर पानांची योग्य संख्या असणे आवश्यक आहे.

फुले ताजी, टवटवीत आणि स्वच्छ राखण्यासाठी फांदीवरील पाने जेवढी टवटवीत, तजेलदार, कीड व रोगमुक्त असतील त्या प्रमाणात फुलांचे आयुष्य वाढते. जी फुले पूर्ण उमललेल्या अवस्थेत आणि बिनदांडीच्या स्वरूपात काढली जातात, अशा फुलांच्या बाबतीत फुलदांड्यावरील पानांच्या संख्येचा फुलांच्या काढणीनंतरच्या आयुष्यावर परिणाम होत नाही.

उदाहरणार्थ, झेंडू, शेवंती, अॅस्टर, जाई, जुई, मोगरा, अबोली, गेलार्डिया, झिनिया, इत्यादी. अशा फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य वाढविण्यासाठी फुलांची योग्य अवस्थेत काढणी करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

3) कळीची अवस्था, आकार आणि रंग :

फुलदाणीतील आकर्षक पुष्परचनेसाठी तसेच पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी लांब फुलदांडा असलेली फुले आवश्यक असतात. अशा फुलांची काढणी करताना फुले पूर्ण उमललेल्या अवस्थेत न काढता, कळीच्या अवस्थेत, परंतु काढल्यानंतर पूर्ण वाढतील अशा अवस्थेत काढावीत.

ही अवस्था त्या कळीच्या पक्वतेवरून, आकारमानावरून आणि रंगावरून ठरविता येते. कळी पूर्ण बंद अवस्थेत असेल तर म्हणजेच तिच्यावरील हिरव्या दलांचे आवरण घट्ट असल्यास आणि आतील पाकळ्यांचा रंग दिसत नसल्यास अशा कळ्या अपक्व असतात.

अशा कळ्यांची काढणी केल्यास, काढणीनंतर त्यांची वाढ होत नाही, पाण्यात ठेवल्यावरही ह्या कळ्या उमलत नाहीत. म्हणून दूरच्या बाजारपेठेसाठी फुले काढावयाची असल्यास, कळ्यांची हिरवी दले उघडू लागल्यानंतर, आतील पाकळ्यांचा रंग दिसू लागल्यावर लांब दांड्यासहित फुलांची काढणी करावी.

कार्नेशन, ट्युलिप, आणि ईस्टर लिली या फुलांची काढणी हिरवी कळी किंवा व्हाईट पफी अवस्थेत केल्यास काढणीनंतर फुलांची वाढ होत राहून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची फुले तयार होतात. कळी उमलण्यापूर्वी तिचा कमाल व्यास 15 मिलिमीटर असतो. ज्या वेळी पाकळ्या दिसू लागतात, त्या वेळी व्यास 15-20 मिलिमीटर असावा. कळ्या लवकर अथवा अपक्व असताना तोडल्यास पाकळ्या नीट उघडत नाहीत आणि अशा फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य फारच कमी असते.

गुलाब फुलांचे पीक घेणारे शेतकरी झाडाची छाटणी केल्यानंतर उन्हाळ्यात सहा आठवड्यांत फुले मिळवू शकतात; तर हिवाळ्यात त्यांना आठ आठवड्यांत फुले मिळतात. फुलांची काढणीची वेळ फुलांच्या जातीवर आणि बाजारपेठेच्या अंतरावर अवलंबून असते.

सर्वसाधारणपणे गुलाबाच्या पिवळ्या जातींची फुले 1-2 दिवस उशिरा काढली तरी चांगली टिकतात. गुलाबाच्या लाल व गुलाबी जातींच्या फुलांच्या पाकळ्या फुलांच्या देठाला 90 अंशाने उघडतात, तेव्हा त्यांची काढणीची योग्य वेळ असते.

सोनिया जातीच्या गुलाबाची फुले पूर्णपणे उमलल्यानंतर जास्तीत जास्त पैसे बाजारपेठेत मिळवून देतात. तर फॉरएव्हर युवर्स जातीची फुले कळी उमलण्यापूर्वी बाजारात आणली असता जास्तीत जास्त पैसे मिळवून देतात.

ग्लॅडिओलसच्या फुलांची काढणी ही ज्या वेळी देठाच्या सर्वांत खालील एक किंवा दोन फुले कळीच्या अवस्थेत असून त्यांचा रंग दिसू लागतो त्या वेळी करावी. हिवाळ्यात ग्लॅडिओलसच्या फुलांची काढणी थोडी उशिरा केली तरी चालते. परंतु उन्हाळ्यात फुलांची काढणी थोडी लवकर केल्यास अशा फुलांना काढणीनंतर आयुष्य जास्त असते.

शेवंतीची फुले पूर्वी पूर्ण उमलल्यानंतर काढली जात असत; परंतु हल्ली फुलांची काढणी कळीची अवस्था पूर्ण होत असताना किंवा हिरवी असतानाच करतात. स्टॅण्डर्ड शेवंतीच्या बाबतीत बाहेरचा भाग पूर्णपणे लांब वाढलेला असताना आणि मधला भाग पूर्ण वाढलेला असताना फुलांची काढणी करावी.

जी फुले वेण्या अथवा गजरे तयार करण्यासाठी वापरतात, त्यांच्या कळ्या ह्या पूर्ण पक्व अवस्थेत अथवा कळ्यांतील एखादी पाकळी नुकतीच उघडू लागताच काढावीत. उदाहरणार्थ, जाई, जुई, मोगरा, निशिगंध, इत्यादी. सुगंधी तेले, अत्तरे तयार करण्यासाठी जी फुले वापरली जातात, त्यांची काढणी फुले पूर्ण उमललेली असताना करावी.

फुलांमधील पक्वतेची प्रक्रिया :

फुले ही फळे आणि भाजीपाला यांच्या तुलनेत वनस्पतिशास्त्रीय दृष्ट्या खूपच वेगळी असतात. बहुसंख्य फळे आणि भाजीपाल्यामध्ये खाण्यायोग्य भाग हा एकच घटक असतो. त्यामुळे त्यांची योग्य वेळी, योग्य तऱ्हेने काढणी करणे आणि काढणीनंतर पिकविणे ह्या अवस्था महत्त्वाच्या असतात. याउलट फुले ही फळे आणि भाजीपाल्याच्या तुलनेत अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे फुलांची योग्य अवस्थेत काढणी करणे आणि काढणीनंतर त्यांची योग्य तऱ्हेने हाताळणी करणे ही अत्यंत कठीण बाब आहे.

फुलांमध्ये प्रत्येक फूल हे पाकळ्या, हिरवी दले, पुंकेसर आणि स्त्रीकेसर अशा अनेक उपघटकांचे मिळून एकत्रित स्वरूप असते. फुलांच्या काढणीनंतरही त्यांची वाढ होत राहते. काढणीनंतर फुले जास्त काळ टिकविणे महत्त्वाचे आहे. यासाठी फुलांच्या पक्वतेची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

गुलाबाच्या झाडास छाटणी, शेंडा खुडणी अथवा बगलफुटीची काढणी केल्यानंतर वाढणाऱ्या फांद्यांची जोमदार वाढ होऊन त्यांच्या शेंड्यावर फुले येतात. प्रथम फांदीची शाखीय वाढ होऊन शेवटी शेंड्यावर फुलकळी तयार होते. हा कालावधी फुलपिकानुसार आणि जातिपरत्वे एक ते तीन महिन्यांचा असतो. ह्या कालावधीत फांद्यांची झपाट्याने वाढ होऊन त्यांवर भरपूर पाने येतात आणि ही पाने सतत अन्ननिर्मिती करतात.

नंतरच्या काळात मात्र पानांनी तयार केलेले अन्न पानांमध्ये साठविण्याची क्रिया सुरू होते. त्याचेच रूपांतर आपणांस फांदीवर फुलकळ्या मिळण्यात होते. साठलेले अन्न फुलदांड्यावरील नुकत्याच आलेल्या कळ्या त्यांच्या वाढीसाठी वापरतात आणि त्यानंतर त्यांचे पक्व कळ्यांमध्ये रूपांतर होते.

पक्व कळ्या झाडावर तशाच ठेवल्यास त्यांचे पूर्ण उमललेल्या फुलांत रूपांतर होते. पक्व कळ्या मुख्य झाडापासून लांब फुलदांड्यासहित वेगळ्या करून पाण्यात ठेवल्यास त्यांचे पूर्ण फुलांत रूपांतर होते. कळी लागल्यापासून फूल काढणीस येईपर्यंत सर्वसाधारणपणे 1 ते 2 आठवडे इतका कालावधी लागतो. या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या जैवरासायनिक क्रिया घडून येतात आणि त्यामुळे कळीचे आकर्षक फुलात रूपांतर होते.

कार्नेशन या फुलपिकात कळीपासून पूर्ण फुलाच्या अवस्थेपर्यंत एकूण 6 अवस्थांमधून कळीचे फुलात रूपांतर होते. पहिली अवस्था अपक्व कळीची असते. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत कळीची वरची हिरवी दले उघडू लागतात.

चौथ्या अवस्थेत फुलातील पाकळ्या वाढतात आणि त्यांचा रंग दिसू लागतो. ह्या चारही अवस्थांमध्ये फुलांची काढणी केल्यास त्यांची वाढ पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यामुळे या कळ्या काढणीनंतर उमलत नाहीत.

पाचव्या अवस्थेत पाकळ्यांचा समूह एकमेकांपासून उघडू लागतो आणि सहाव्या अवस्थेत तो पूर्ण उमललेल्या स्थितीत असतो. अशी फुले काढणीनंतर जास्त काळ टिकतात; म्हणून पाचव्या आणि सहाव्या अवस्थेतील फुलांची काढणी करावी.

ग्लॅडिओलस आणि निशिगंध ह्या कंदवर्गीय फुलांमध्ये कंद लावल्यापासून जाती आणि हंगामानुसार अडीच ते तीन महिन्यांत पूर्ण शाखीय वाढ होऊन फुलदांडे दिसू लागतात. त्यानंतर त्यांची चांगली वाढ होऊन 10 ते 15 दिवसांत फुलदांडे काढणीस येतात.

ग्लॅडिओलसच्या एका फुलदांड्यावर 10 ते 24 फुलकळ्या असतात. फुलकळ्यांच्या वाढीच्या काळात पाकळ्यांच्या वरच्या बाजूस हिरव्या दलांचे आवरण असते. कळी वाढत जाऊन हिरव्या दलांच्या आवरणाबाहेर येते आणि कळीचा रंग दिसू लागतो.

ग्लॅडिओलसमध्ये दांड्यावरील सर्वांत खालील फुलकळीचा रंग दिसल्यावर फुलदांडा काढावा. निशिगंधामध्ये एका फुलदांड्यावर 26 ते 40 फुलकळ्या असतात. दांड्यावरील सर्वांत खालच्या फुलकळीची जोडी उमलू लागताच त्याची काढणी करावी.

या दोन्ही फुलपिकांमध्ये फुलदांडा येऊ लागल्यापासून तो काढणीस येईपर्यंतच्या काळात पानांनी आधी तयार केलेल्या कार्बोहायड्रेट्स्चे अनेक अवस्थांत रासायनिक बदल होऊन फुलांची अपेक्षित वाढ होत असते. अशा प्रकारे प्रत्येक फुलपिकानुसार झाडाची शाखीय वाढ होणे, साठलेल्या अन्नाचा वापर करून कळी तयार होणे, कळ्यांची योग्य पक्वतेकडे वाटचाल होणे आणि फूल काढणीस तयार होणे ह्या प्रक्रिया सुरू असतात.

फुलांची परिपक्वता जाणून घेतल्यामुळे होणारे फायदे :

  1. फुलांची गुणवत्ता व दर्जा चांगला राखला जातो.
  2. कार्नेशन, ग्लॅडिओलस, गुलाब, निशिगंध जाई, जुई, मोगरा, निशिगंध, इत्यादी फुलांची काढणी करणे सुलभ करता येते.
  3. बाजारपेठेच्या मागणी व चालू दरानुसार फुलांची काढणी करणे सोईस्कर होते.
  4. विविध फुलांच्या परिपक्वतेनुसार फुलांची काढणी करता येते.
  5. फुलांची परिपक्वता होण्याचे गणित समजल्यास बाजारातील आवकेनुसार फुलांची काढणी करता येते.
  6. फुलांना बाजारात योग्य किंमत (दर) मिळते.

विशेष संदर्भ :

  1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका- 1, पृ.क्र. 1-6
  2. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (AGR-213-216)

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/


फुलांची परिपक्वता हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल. 

Prajwal Digital

Leave a Reply