फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

महाराष्ट्रात अलीकडील काळात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, अहमदनगर या ठिकाणी गुलाब, ग्लॅडिओलस, जरबेरा, निशिगंध, मोगरा ह्या फुलपिकांची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. 

या भागातील काही शेतकरी प्रतवारी करून फुले विकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना फुलशेतीपासून चांगले उत्पन्न मिळते. काही भागांत व्यवस्थित प्रतवारी न करता फुलांची विक्री केली जाते. त्यामुळे खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आणि येईल त्या भावाला माल विकावा लागतो.


फुलांची प्रतवारीसाठी आवश्यक बाबी

निरनिराळ्या बाजारपेठांत फुलांच्या प्रतवारीची मानके (स्टँडर्डस्) वेगवेगळी असतात. फुलांची प्रतवारी करण्यासाठी मोठ्या आकाराचे टेबल आणि हॉल असणे आवश्यक असते. फुलांची प्रतवारी करण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

(अ) दांडीची लांबी

प्रत्येक दोन प्रतींमध्ये 10 सेंटिमीटरचा फरक असावा.

(आ) दांडीची क्षमता

दांडी भक्कम आणि ताठ असेल तर बाजारात जास्त किंमत मिळते.

(इ) दिखाऊपणा

प्रत्येक फूल दिखाऊ असले पाहिजे. दांडीवर असणारे फूल किंवा फुले दांडीच्या समतोल प्रमाणात असावीत.

(ई) फुलांची क्षमता

निरनिराळ्या फुलांच्या मुख्य जातीत प्रत्येक दांडीला एकच फूल असते; परंतु स्प्रे प्रकारच्या जातीत कमी फुले आणि जास्त कळ्या असाव्यात.

(उ) कीड आणि रोगमुक्तता

सर्व फुले आणि दांड्या किडी आणि रोगांपासून मुक्त असाव्यात.

(ऊ) वजन

काही फुले वजनानुसार प्रतवारी करून विकतात.

काही महत्त्वाच्या फुलांची प्रतवारी पुढीलप्रमाणे करतात :

(1) गुलाब : गुलाबाच्या फुलांची प्रतवारी बाजारपेठेनुसार आणि मागणीनुसार केली जाते. आपल्याकडे पहिल्या प्रतीचा माल मुंबई बाजारपेठेत, दुसऱ्या प्रतीचा माल पुणे, नाशिक, नागपूर बाजारपेठेत तर तिसऱ्या प्रतीचा माल जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेत पाठवितात. जागतिक बाजारपेठेत फुलांची प्रतवारी पुढीलप्रमाणे करतात:

तक्ता 1 : फुलांच्या जागतिक बाजारपेठेत ताज्या फुलांच्या प्रतवारीची पद्धत

संकेतांकदांड्याची लांबी / (सेंटिमीटर)संकेतांकदांड्यांची लांबी (सेंटिमीटर)
054040-50
55-105050-60
1010-156060-80
1515-208080-100
2020-30100100-120
3030-40120120 पेक्षा जास्त

जागतिक बाजारपठेत गुलाबाच्या फुलांची दांडीच्या लांबीनुसार प्रतवारी करतात. गुलाबाची फुले 20 किंवा 100 फुलांच्या जुड्या बांधून विकतात. अशाच जुड्या ग्राहकांना पसंत पडतात. मुंबई बाजारपेठेत ग्लॅडिएटर या गुलाबाची विक्री मुख्यतः तीन प्रतींवर होते. सुपर – 45 ते 50 सेंटिमीटर लांब दांडा, ए ग्रेड – 30 ते 45 सेंटिमीटर लांब दांडा, बी ग्रेड – 20 ते 30 सेंटिमीटर लांब दांडा आणि सी ग्रेड – 20 सेंटिमीटरपेक्षा कमी लांबीचा दांडा. मुंबई बाजारात ग्लॅडिएटर जातीची फुले 12 किंवा 18च्या जुड्या बांधून पाठवतात.

(2) शेवंती : स्थानिक बाजारपेठेत शेवंतीची विक्री फुलांच्या आकारावरून किंवा वजन करून करतात. उत्तम प्रतीच्या शेवंतीची विक्री फुलांचा आकार, दांडीची लांबी यांनुसारही करतात. अशी फुले पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. सोसायटी ऑफ अमेरिकन फ्लोरिस्ट यांनी शेवंतीच्या प्रतवारीची पद्धत पुढीलप्रमाणे ठरविलेली आहे. आपल्याकडे फुलांची प्रतवारी न करता फक्त वजन किंवा वाटे (ढीग) करूनच फुले विकतात.

तक्ता 2 : सोसायटी ऑफ अमेरिकन फ्लोरिस्ट यांनी ठरविलेली शेवंतीच्या फुलांची प्रतवारी

मालाची प्रत /प्रतवारी गुणधर्मप्रतवारी
निळी(ब्ल्यू)लाल (रेड)हिरवी (ग्रीन)पिवळी (यलो)
दांडीची कमीत कमी लांबी (सेंटिमीटर)75756060
फुलांचा कमीत कमी व्यास (सेंटिमीटर)1512.510
दांडीची क्षमताबळकटबळकटबळकट

तक्ता 3 : शेवंतीच्या फुलांची पोलंडमधील प्रतवारी

गुणधर्मप्रतवारी
प्रत – 1प्रत – 2
फुलांचा व्यास (सेंटिमीटर)138
दांडीची लांबी (सेंटिमीटर)6045

तक्ता 4 : स्प्रे प्रकारातील शेवंतीची प्रतवारी

प्रतप्रत्येक दांडीवरील फुलांची संख्यावैशिष्ट्ये
गोल्ड (सोनेरी)106 किंवा जास्त उमललेली फुले अथवा उमलणारी
सिल्व्हर (रूपेरी)15फुले 4-5 पूर्णपणे उमललेली फुले आणि बाकी फुले उमलण्याच्या स्थितीत
ब्राँझ (कथील)203 उमललेली फुले आणि बाकी फुले उमलण्याच्या स्थितीत

ब्रिटनमध्ये शेवंतीच्या फुलांची प्रतवारी फुलांच्या व्यासानुसार करतात. तर अमेरिकेत स्प्रे शेवंती वजनानुसार विकतात. शेवंतीच्या फुलांसाठी शिफारस केलेली वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

  1. पाने, फुले स्वच्छ आणि टवटवीत असावीत.
  2. एकजातीय आणि एकसारख्या फुलांचाच गुच्छ करावा.
  3. फुलांचा आकार व्यवस्थित असावा व मध्यभाग पूर्णपणे उमललेला नसावा.
  4. फुले आणि पाने जखम झालेली किंवा खरचटलेली नसावीत आणि धूळविरहित
  5. असावीत.
  6. शेवंतीची फुले रंगहीन अथवा कुपोषित नसावीत.
  7. सर्वसाधारणपणे फुले भरगच्च आणि घट्ट असावीत. फुलांच्या दांड्या सरळ, ताठ आणि उभट असाव्यात.
  8. तिसऱ्या देठाखालील पाने फक्त काढावीत.
  9. प्रतवारीला योग्य अशी दांड्याची लांबी असावी.

(3) कार्नेशन : कार्नेशनची प्रतवारी करताना फुलांच्या दांडीची लांबी आणि त्यांची भौतिक स्थिती हे दोन मुख्य मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. कार्नेशनच्या फुलांची प्रतवारी करताना किंवा करण्यापूर्वी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत :

  1. फुले आणि पाने स्वच्छ, ताजी आणि टवटवीत असावीत.
  2. फुलांच्या मध्यभागातील पाकळ्या घट्ट असाव्यात.
  3. फुलांचा आकार सर्वत्र सारखाच असावा.
  4. फुलाच्या दांड्याला जास्त फुटवे नसावेत.
  5. दांडीवरील फुले खराब झालेली नसावीत.
  6. दांडी ताठ आणि सर्वसाधारण वाढ झालेली असावी.

तक्ता 5 : कार्नेशनच्या फुलांची प्रतवारी

प्रत /गुणधर्मनिळी (ब्ल्यू)लाल (रेड)हिरवी (ग्रीन)
फुलांचा व्यास (सेंटिमीटर)7.55.7
फुलांच्या दांडीची लांबी (सेंटिमीटर)564325

(4) ग्लॅडिओलस : ग्लॅडिओलसच्या फुलाच्या दांड्याची लांबी, फुलांची संख्या, आकार, रंग, वजन, फुलांची लांबी यांवरून फुलांची गुणवत्ता ठरवतात. ग्लॅडिओलसच्या फुलांची प्रतवारी प्रामुख्याने फुलांचा आकार आणि दांड्याची लांबी यांनुसार करतात. फुलांच्या आकारानुसार प्रतवारी पुढीलप्रमाणे करतात :

(1) फॅन्सी , (2) ए ग्रेड, (3) बी ग्रेड, (4) सी ग्रेड. सर्वांत मोठ्या आकाराच्या फुलांना फॅन्सी असे म्हणतात.

ग्लॅडिओलसच्या फुलांची प्रत ही कंदांची स्थिती आणि आकारावर अवलंबून असते. कंद जर मोठ्या आकाराचे किंवा पूर्ण वाढ झालेले असतील तर त्यापासून मोठ्या आकाराची फुले मिळतात. कंद लहान आकाराचे असल्यास त्यांपासून कंदांचीच पैदास करावी लागते. त्यांपासून फुलांचे उत्पादन घेऊ नये….

तक्ता क्र. 6

अमेरिकन ग्लॅडिओलस कौन्सिलने ठरविलेली ग्लॅडिओलसच्या कंदांची प्रतवारी

प्रत प्रतीचे नावकंदाचा व्यास (सेंटिमीटर)
मोठे (फुलांसाठी वापरावयाचे कंद)जेम्बो5.1 पेक्षा जास्त
नं. 13.8 – 5.1
मध्यम (फुलांसाठी वापरावयाचे कंद)नं. 23.2 – 3.8
नं. 32.5 – 3.2
छोटे (कंदांसाठी वापरावयाचे कंद)नं. 41.9 – 2.5
नं. 51.3 – 1.9
नं. 51.3 – 1.0

 तक्ता 7

ग्लॅडिओलसच्या फुलांची संख्या आणि दांडीच्या लांबीनुसार प्रतवारी

प्रतप्रत्येक दांडीवरील फुलांची संख्याफुलदांड्याची लांबी(सेंटिमीटर)
फॅन्सी18 पेक्षा जास्त110-120
स्पेशल16 – 18100-110
14 – 1687-100
बी12 – 1475-87
सी10 – 1260-75
युटिलिटी10 पेक्षा कमी60 पेक्षा जास्त

(5) इतर फुले : आपल्याकडे बहुतेककरून प्रतवारी न करताच फुले बाजारात आणतात. त्यामुळे मालाला योग्य ती किंमत मिळू शकत नाही. आपल्याकडे काही फुले खालील प्रकारे प्रतवारी न करता विकली जातात. 

तक्ता 7 :  इतर फुलांचा प्रकार व प्रतवारी

फुलांचा प्रकारफुले कशी विकली जातात
गुलाब6 किंवा 12 फुलांची जुडी
मोगराकिलो
शेवंतीकिलो (किंवा वाटे करून)
निशिगंधकिलो
लिली50 फुलांची जुडी
झेंडूकिलो (किंवा वाटे करून)
गाजरा (झिनिया)5 फुलांची जुडी

फुले हे नगदी पीक असल्यामुळे योग्य प्रकारे वाढवून, काढणी, हाताळणी आणि प्रतवारी करून योग्य त्या बाजारपेठांत नेली असता आपणांस फुलांपासून पूर्णपणे मोबदला मिळतो. ठरावीक बाजारपेठेत ठरावीक प्रतीच्या फुलांना मागणी असते. त्यानुसार फुलांची प्रतवारी करावी, म्हणजे शेतकऱ्यांना कष्टाच्या किंवा खर्चाच्या प्रमाणात मोबदला मिळवता येईल.

विशेष संदर्भ :

  1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका – 1 : 68-77
  2. https://www.agrowon.com/
  3. कृषि दैनंदिनी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
  4. ई-बुक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  5. कृषि दैनंदिनी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
  6. https://ycmou.ac.in/ebooks
  7. कृषि दैनंदिनी : बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली

शब्दांकन : आकाश अशोक बानाटे, (बी.एस्सी. ॲग्रीकल्चर, लातूर.)

फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे हा लेख आपणास आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बाधंवापर्यंत Link Share करुन, वेबसाईट ला “Subscribe, Web Push Notification Allow” करुन सहकार्य करावे.

फुलशेतीचे उपयुक्त लेख

गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

फुलांची काढणी व्यवस्थापन 

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान 

Prajwal Digital

Leave a Reply