फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

भारत सरकारने फुलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्यास 100% निर्यातभिमुख दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबाग लागवडीच्या मागणीत सतत वाढ होत राहिल्याने कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे.

फुलांची मागणी देवपूजेसाठी, सणावारांसाठी उदा. गणेशोत्सव,  नवरात्र, दसरा, दिवाळी, नाताळ, गुढीपाडवा व लग्नसमारंभ,  वाढदिवस,  मृतदिन या वेळी मोठ्या प्रमाणावर असते. फुले हार,  गजरा,  वेणी,  माळा,  तोरणे,  सजावटीसाठी,  गुच्छ आणि फुलदाणीत ठेवण्यासाठी वापरतात.

प्रस्तुत लेखाद्वारे आपल्याला फुलांचे उत्पादन व महत्त्व, फुलांची व्यवसायिक महत्त्व त्याचबरोबर फुले लवकर किंवा उशिरा पक्व करण्याच्या पद्धती माहिती होतील. फुले लवकर किंवा उशिरा पक्व करण्याची माहिती होईल. यासाठी फुल उत्पादक शेतकरी बांधवांना फुले परिपक्व करण्याच्या पद्धती हा लेख उपयुक्त व महत्त्त्वपूर्ण माहिती देणारा आहे.

फुलांचे उत्पादन व महत्त्व :

सन 2018 मध्ये भारतीय फ्लोरीकल्चर मार्केटची किंमत 157 अब्ज डॉलर्स इतकी होती. सन 2024 पर्यंत मार्केट रु. 472 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज दर्शवला आहे, सन 2019-2024 मध्ये ते 20.1 % च्या CAGR सीएजीआरने वाढण्याची शक्यता आहे. (Source: Research and Markets)

फुलांच्या शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलझाडांचे संवर्धन, फुलांच्या आणि शोभेच्या वनस्पतींच्या लागवडीस मदत करते. जरी फुले भारतीय समाजातील अविभाज्य घटक आहेत आणि सौंदर्यापासून ते सामाजिक आणि धार्मिक हेतूपर्यंत विविध कारणांसाठी फुलांची लागवड केली गेली आहे. कट आणि सैल फुलांच्या मागणीत जोरदार वाढ झाल्याने भारतीय शेतीतील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय म्हणून फ्लोरीकल्चर बनला आहे.

निर्याती ही लागवड करणाऱ्यांसाठी महत्त्वाची प्रेरक राहिली आहे, विशेषत: महानगर आणि मोठ्या शहरांमध्ये फुलांची देशांतर्गत मागणीही झपाट्याने वाढत आहे. आधुनिकीकरण आणि वाढत्या पाश्चात्य सांस्कृतिक प्रभावांमुळे ग्राहकांना व्हॅलेंटाईन डे, विवाह, वर्धापन दिन, वाढदिवस, मैत्री दिन, मातृदिन, फादर्स डे इत्यादी बऱ्याच प्रसंगी फुले खरेदी करण्यास लोकांना प्रवृत्त केले गेले आहे. देशभरातही फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर धार्मिक सण-उत्सवात केला आहे.

महानगर आणि मोठी शहरे सध्या देशातील फुलांच्या मोठ्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करतात. वाढत्या शहरीकरण आणि पाश्चात्य संस्कृतींच्या प्रभावाच्या परिणामी, व्हॅलेंटाईन डे, वाढदिवस, सण, वर्धापनदिन, विवाह, विदाई पार्टी, धार्मिक समारंभ इत्यादीसारख्या कित्येक प्रसंगी ते फुलांचे महत्त्व खूप लोकप्रिय झाले आहे. शहरीकरण आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव यांचा ट्रेंड येत्या काही वर्षांत आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.

सौंदर्य आणि सजावटीच्या उद्देश्यांव्यतिरिक्त, औद्योगिक अनुप्रयोगांमध्येही फुलांचा महत्त्वपूर्ण प्रमाणात वापर होतो. यामध्ये फ्लेवर्स, गंध, नैसर्गिक रंग, औषधे इत्यादींचा समावेश आहे. यावरून अंदाज करण्यात येतो की, या उत्पादनांच्या वापरामध्ये फ्लोरीकल्चर उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल.

फुलांची व्यावसायिक महत्त्व :

भारतात फुलांचा वापर प्रामुख्याने ज्या फुलांना आखूड दांडा असतो, अशी फुले वापरूनच करतात. अशा फुलांना काही विशिष्ट वेळीच मागणी आणि जास्त भाव असतो. विशिष्ट फुले फुलझाडाची लागवड केल्यानंतर किती कालावधीने बाजारात उपलब्ध होऊ शकतात, ह्याची पूर्वकल्पना असल्यास त्याप्रमाणे फुलांच्या लागवडीचे नियोजन करून योग्य वेळी फुले बाजारात पाठवून जास्त फायदा मिळवता येतो. त्यामुळे फुलांची गरज व महत्त्व हे मानवी जीवनात अधिक आहे.

बहुतांशी फुलांना हार, गजरा, वेण्या आणि माळांसाठी वर्षभर मागणी असते. काही फुलझाडांना छाटणीसारखी प्रक्रिया केल्याशिवाय नवीन फूट आणि फुले येत नाहीत. तसेच चांगल्या गुणवत्तेच्या फुलांसाठी शेंडे खुडणे अथवा बगलफूट काढणे ह्या प्रक्रिया फुले योग्य वेळी येऊन पक्व होण्यास मदत करतात.

निवडक वैशिष्ट्यपूर्ण फुले उदाहरणार्थ, निशिगंध, ग्लॅडिओलस, लिली यांचे कंद साठविण्याच्या विशिष्ट पद्धती आणि संजीवकांचा उपयोग करून बाजारात हव्या असलेल्या वेळी पाठविता येतात. फुलांचा वापर युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. युरोपियन देशांमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात तेथील अतिथंडीमुळे कोणत्याही फुलांचे उत्पादन घेता येत नाही.

या काळात त्या देशांमध्ये आपल्याकडील चांगल्या गुणवत्तेच्या फुलांना भरपूर मागणी असते. अशा वेळी नियोजनपूर्वक फुलशेती करून आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची फुले युरोपियन देशांना निर्यात करून भरपूर पैसा मिळवता येऊ शकतो.

फुले परिपक्व करण्याच्या प्रमुख बाबी :

बाजारासाठी लागणारी फुले ही पक्व अवस्थेतील आणि काढणीनंतर पूर्णत्वास येतील अशी असावीत. फुलांच्या वाढीसाठी योग्य वातावरण उदाहरणार्थ, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, जमीन, मशागत, खते, पाणी, कीड, रोगांपासून प्रतिबंध या प्रमुख बाबी महत्त्वाच्या आहेत. तसेच फुलांच्या प्रकारानुसार आणि जातींच्या वैशिष्ट्यांनुसार फुले लवकर अथवा उशिरा पक्व होतात.

हवामान : जमीन, खते व पाणी व्यवस्थापन :

1) हवामान

प्रत्येक फुलाला किंवा फुलझाडाला त्याच्या नैसर्गिक जोमदार वाढीसाठी आणि दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी आणि फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य वाढविण्यासाठी ठरावीक तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू या घटकांची आवश्यकता असते. तरच ठरलेल्या कालावधीत आपल्याला फुलझाडांपासून फुले मिळवता येतात. ह्या घटकांचे संतुलन बिघडल्यास त्याचा झाडाच्या वाढीवर, फुलांच्या उत्पादनावर, गुणवत्तेवर आणि फुले मिळण्याच्या कालावधीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून वरील बाबींचा फुलशेती करताना विचार करणे महत्त्वाचे आहे.  

उदाहरणार्थ, कार्नेशन आणि शेवंती ह्या फुलांच्या वाढीच्या काळात जर सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी असेल तर काढणीनंतर ती फुले लवकर खराब होतात. तसेच गुलाबामध्ये दिवसाचे तापमान हे 20 ते 22 अंश सेल्सिअसपेक्षा अतिशय कमी किंवा अतिशय जास्त असल्यास फुलांच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

सर्वसाधारणपणे सरासरी 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान असताना आणि 50 ते 65% सापेक्ष आर्द्रता असताना फुलांमध्ये चांगली वाढ, उत्तम गुणवत्ता आणि रंग येतात. हिवाळ्यात यापेक्षा कमी तापमान आणि आर्द्रता असल्यामुळे फुले येण्यास जास्त कालावधी किंवा उशीर लागतो. उन्हाळ्यात अतिजास्त तापमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुले जास्त येत नाहीत आणि कमी आर्द्रतेमुळे त्यांना हवा तसा रंगही येत नाही.

2) जमीन

प्रत्येक फुलझाडाला चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी विशिष्ट प्रकारच्या जमिनीची आवश्यकता असते. तरीसुद्धा बहुतेक सर्व फुलझाडांना चांगल्या निचऱ्याची आणि सुपीक जमीन लागते. चुनखडीयुक्त, पाणथळ जमिनी फुलशेतीस योग्य नसतात. सर्वसाधारणपणे सुपीक, काळ्या, कसदार जमिनीत फुलांची लागवड केल्यास फुले उशिरा येतात. तर हलक्या, माळरान किंवा मुरमाड जमिनीत फुलांची लागवड केल्यास फुले लवकर येतात.

3) खते आणि पाणी

फुलझाडांच्या जोमदार वाढीसाठी योग्य वेळी, योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा देणे आवश्यक असते. चांगल्या गुणवत्तेची फुले मिळविण्यासाठी पालाशयुक्त खतांचा जास्त प्रमाणावर वापर करावा. फुलशेतीला नियमित पाणी देणे, विशेषतः फुले येण्याच्या आणि त्यांच्या वाढीच्या काळात, अत्यंत आवश्यक असते.

हंगामानुसार आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने द्यावे. बागेत फुले लवकर हवी असल्यास फुले येण्याच्या अपेक्षित कालावधीपूर्वी काही प्रमाणात पाण्याचा ताण दिल्यास म्हणजेच पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर वाढविल्यास झाडांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊन फुले लवकर मिळतात. उदाहरणार्थ, निशिगंधामध्ये मुख्य फुलांचा बहार ओसरल्यानंतर 2 महिने बागेचे पाणी तोडावे. त्यामुळे जमिनीतील कंदांना विश्रांती मिळून त्यांच्यामध्ये अन्नाचा साठा होतो. नंतर पुन्हा नियमितपणे पाणी दिल्यास कंद जोमाने फुटतात आणि पाणी दिल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनी पुन्हा फुलांचा बहार येतो.

फुलझाडांच्या जाती :

फुले लवकर अथवा उशिरा पक्व अवस्थेत हवी असतील तर त्यानुसार हळव्या, निमगरव्या आणि गरव्या प्रकारच्या म्हणजे लवकर, मध्यम आणि उशिरा फुलणाऱ्या जाती प्रत्येक फुलपिकांमध्ये उपलब्ध आहेत. ज्या कालावधीत फुलांची आवश्यकता असेल त्याप्रमाणे जातींची निवड करून फुले योग्य वेळी बाजारात पाठवता येतात.

शेतकऱ्यांकडील उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठीसुद्धा एकाच प्रकारच्या जाती न लावता, ह्या तिन्ही प्रकारच्या गटांतील जातींची लागवड करून फुले जास्त काळ बाजारात पाठवता येतात. बाजारात फुलांचा नियमित पुरवठा केला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळतात. उदाहरणार्थ, झेंडू, अॅस्टर, शेवंती, गेलार्डिया, झिनिया, इत्यादी हंगामी फुलझाडांमध्ये अशा प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत.

फुलझाडांची छाटणी :

जाई, जुई, मोगरा आणि गुलाब ही बहुवर्षीय फुलपिके आहेत. या फुलपिकांमध्ये नवीन फुटीवर शेंड्याकडे फूल किंवा फुले येतात. म्हणून अशा फुलपिकांमध्ये नवीन फूट मिळण्यासाठी त्यांचा काही भाग झाडापासून कापून काढून टाकतात. म्हणजेच उरलेल्या भागावरील सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फूट मिळते आणि नवीन फुटीपासून फुले मिळतात. या प्रक्रियेला छाटणी म्हणतात.

गुलाबामध्ये दोन वेळा छाटणी करतात. पहिली जून महिन्यात आणि दुसरी डिसेंबर महिन्यात करतात. जाई, जुई, मोगरा या फुलपिकांमध्ये डिसेंबर महिन्यात छाटणी करतात. छाटणी करताना फांद्यांचा एकतृतीयांश भाग छाटून दोनतृतीयांश भाग शिल्लक ठेवतात. छाटणी करताना रोगग्रस्त आणि वाळलेल्या फांद्यासुद्धा काढतात. दरवर्षी छाटणी केल्यामुळे झाडांची वाढ नियमित होते. फुलांचे उत्पादन जास्त मिळते.

गुलाबामध्ये छाटणी केल्यानंतर जातिपरत्वे 6-8आठवड्यांनी फुले काढणीस येतात. तर जाई, जुई, मोगऱ्यामध्ये फुले दोन ते अडीच महिन्यांत काढणीस येतात. बागेचे क्षेत्र मोठे असल्यास, बागेची लहान लहान सम भागांत विभागणी करून ठरावीक अंतराने छाटणी करावी. त्यामुळे फुलांची विक्री करताना विक्रीचे नियमन करता येते, तसेच बाजारात फुलांचा नियमित पुरवठा करता येतो. योग्य बाजारभाव मिळतो आणि जास्त काळ फुले पाठवता येतात. तगर, जास्वंद, कण्हेर, इत्यादी फुलझाडांची छाटणी पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी.

1) शेंडा खुडणे : झेंडू, अॅस्टर, शेवंती, झिनिया, इत्यादी हंगामी फुलपिकांमध्ये अपेक्षित वेळी फुले बाजारात आणण्यासाठी रोपांची लागवड केल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी प्रत्येक रोपाचा शेंड्याकडील 10 सेंटिमीटर भाग कापून टाकतात. त्यामुळे झाडाला भरपूर उपफांद्या फुटतात. उपफांद्यांच्या टोकाला फुले येतात. शेंडे खुडल्यामुळे उपफांद्यांची वाढ होण्यास काही काळ लागतो, त्यामुळे फुले उशिरा मिळतात.

2) बगलफूट काढणे : चांगल्या गुणवत्तेची फुले हवी असल्यास झाडावर ठरावीक फांद्या ठेवून, त्यांच्याजवळील बगलफूट वेळीच काढून, लांब फुलदांडे मिळविले जातात. ह्या पद्धतीला बगलफूट काढणे असे म्हणतात. उदाहरणार्थ, गुलाब, कार्नेशन, शेवंती या पिकांमध्ये बगलफूट काढल्यामुळे लांब दांड्याची, चांगल्या गुणवत्तेची फुले मिळतात. ही फुले काढणीनंतरही जास्त काळ टिकतात.

फुलांसाठी संजीवकांचा वापर :

फुलझाडांमध्ये संजीवकांचा वापर करून फुलदांड्यांची लांबी वाढविणे, बी, बेणे यांची उगवणशक्ती वाढविणे, झाडांची झपाट्याने वाढ होऊन फुले लवकर मिळविणे, इत्यादी परिणाम साधता येतात. काही वेळा शेंडा खुडण्याऐवजी झाडाची शाखीय वाढ थांबवून फुले येण्यास मदत व्हावी यासाठी संजीवकांचा वापर करतात. ऑक्झिन, जिबरेलीन यांसारखी संजीवके झाडाच्या फुले येण्याच्या प्रक्रियेवर इष्ट परिणाम करतात. ही संजीवके अल्प प्रमाणात झाडांवर फवारून लवकर अथवा उशिरा फुले मिळविता येतात.

गुलाबामध्ये छाटणीनंतर जिबरेलिक अॅसिडच्या 50 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाचा फवारा दिल्यास झाडावर फुले लवकर मिळतात आणि फुलदांड्याची लांबी वाढते. ग्लॅडिओलस, निशिगंध, इत्यादी कंदवर्गीय फुलझाडांचे कंद लागवडीपूर्वी जिबरेलिक अॅसिडच्या 100 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणात 24 तास भिजवून नंतर लागवड केल्यास कंद लवकर उगवतात. त्यांची वाढ झपाट्याने होते आणि त्यांना फुले लवकर लागतात. ह्या कंदवर्गीय फुलपिकांमध्ये फुले उशिरा येण्यासाठी कंदांची लागवड न करता कंद शीतगृहात ठेवतात. अपेक्षित कालावधीनंतर लागवड केल्यास फुले उशिरा मिळतात.

झेंडू, अॅस्टर आणि शेवंती ह्या फुलपिकांमध्ये भरपूर शाखीय वाढ झाल्यास त्यांना फुले कमी लागतात. अशा पिकांमध्ये लागवडीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी 1,000 पीपीएम तीव्रतेचा मॅलिक हायड्रॅझाईड किंवा सायकोसिल ह्या संजीवकांचा फवारा दिल्यास झाडांची जास्तीची वाढ थांबून त्यांना उपफांद्या फुटतात आणि फुले मोठ्या प्रमाणावर मिळतात. मात्र फुले उशिरा मिळतात.

शेतकऱ्यांना फुले लवकर किंवा उशिरा पक्व करण्याच्या पद्धतींची माहिती असल्यास, फुले बाजारात योग्य वेळी आणता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी जास्त बाजारभाव मिळवता येतात आणि फुलशेतीपासून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती या लेखाच्या मदतीने फुलझाडांमध्ये फुले येण्याच्या प्रक्रियेवर हवामान, जमीन, खते आणि पाणी यांचा परिणाम होतो. या घटकांचे संतुलन बिघडल्यास फुलझाडांना फुले येण्याच्या कालावधीत बदल होतो. फुलझाडांची छाटणी करून अथवा संजीवकांचा वापर करून फुलझाडांना लवकर फुले आणता येतात किंवा फुले येण्याची प्रक्रिया पुढे ढकलता येते.

फुले परिपक्व झाल्यामुळे होणारे फायदे

  1. हवामान, जमीन, खत व पाणी दिल्यामुळे फुलांची वाढ योग्य होते.
  2. फुलांची प्रतवारी करणे सुलभ जाते.
  3. फुलांना बाजारात चांगली मागणी वाढते.
  4. फुलांची गुणवत्ता योग्य असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षिले जातात.
  5. फुलांची आवक वाढवून फुल उत्पादकांना आर्थिक नफा मिळवता येतो.
  6. प्रती हेक्टरी फुलांचे उत्पादन व उत्पादकता वाढविता येते.

विशेष संदर्भ :

  1. Indian Floriculture Market Trends, Share, Size, Growth, Opportunity and Forecast 2019-2024
  2. https://www.globenewswire.com/
  3. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (AGR-213-216)
  4. http://www.apeda.gov.in/apedawebsite/SubHead_Products/Floriculture.htm
  5. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका – 1 : पृ.क्र. 11-15
  6. https://www.globenewswire.com/news-release/2019/02/21/1739431/0/en/Indian-Floriculture-Market-Trends-Share-Size-Growth-Opportunity-and-Forecast
  7. http://www.apeda.gov.in/apedawebsite
  8. February 21, 2019 09:25 ET | Source: Research and Markets

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/


फुले परिपक्व करण्याच्या पद्धती हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

उपयुक्‍त लेख वाचकांसाठी

फुलांची परिपक्वता

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading