तूर पिकापासून भरपूर उत्पादन मिळते त्यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्हणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत जात आहे. परंतु हे सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत आढळून येत नाही. सर्वसाधारणपणे याची प्रमुख कारणे म्हणजे तुरीची लागवड मुख्यता कोरडवाहू पद्धतीमध्ये करतात. स्थानिक, जास्त कालावधीच्या व कमी उत्पादन क्षमता असलेल्या वाणांची लागवड करतात. असे स्थानिक वाण रोगांना अधिक बळी पडून उत्पादनात घट आणतात. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येते.
तुरीचे उत्पादन :
देशात सन 2017-18 मध्ये 43.8 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीही साधारण एवढ्याच क्षेत्रावर तुरीची लागवड झालेली होती. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात तुरीचे लागवड क्षेत्र घटले असले, तरी कर्नाटकमध्ये लागवड वाढल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्वाधिक तूर उत्पादन करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात सन 2017-18 तुरीचा पेरा गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.2 टक्के घटला आहे. तर मध्य प्रदेश या आणखी एका महत्त्वाच्या तूर उत्पादक राज्यात पेरा 3.4 टक्के कमी आहे. परंतु कर्नाटकात तुरीच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 16.5 टक्के वाढ झाल्याने देशातील एकूण तूर लागवडीतील तफावत भरून निघाली आहे. (दै. सकाळ www.sakal.com)
तक्ता क्र. 1 : राज्यनिहाय तूर लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अ.क्र. | राज्य | 2018-19 | 2017-18 | घट/वाढ % |
1 | महाराष्ट्र | 1209800 | 1262600 | 4.2 घट |
2 | मध्य प्रदेश | 625000 | 647000 | 4.4 घट |
3 | कर्नाटक | 966000 | 829000 | 16.5 वाढ |
4 | आंध्र प्रदेश | 155000 | 175000 | 11.4 घट |
5 | छत्तीसगड | 123900 | 136400 | 9.2 घट |
6 | गुजरात | 245800 | 264700 | 7.1 घट |
7 | उत्तर प्रदेश | 345200 | 335800 | 2.8 वाढ |
तक्ता क्र. 2 : भारतातील तुरीचे उत्पादन व भाग शेकडा प्रमाण (000 Tonnes)
अ.क्र. | राज्य | तूर उत्पादन (2017-18) | |
उत्पादन (मे. टन) | भाग Share (%) | ||
1 | महाराष्ट्र | 1,070.00 | 25.18 |
2 | मध्य प्रदेश | 840 | 19.76 |
3 | कर्नाटक | 770 | 18.12 |
4 | गुजरात | 340 | 8 |
5 | उत्तर प्रदेश | 330 | 7.76 |
6 | तेलंगणा | 260 | 6.12 |
7 | झारखंड | 220 | 5.18 |
8 | आंध्र प्रदेश | 120 | 2.82 |
9 | ओरिसा | 120 | 2.82 |
10 | तामिळनाडू | 60 | 1.41 |
11 | इतर | 120 | 2.82 |
तुरीचे कमी उत्पादनाची कारणे :
तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक असून या पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण शेतकरी वर्ग हा नगदी पिकांकडे अधिक प्रमाणात आहे. तूर हे वार्षिक पीक असल्याने इतर पिकाच्या तुलनेत या पिकाचे उत्पन्न कमी मिळते. मात्र अलीकडे सतत ओलावा अथवा कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे या पिकांचे आतोनात नुकसान होऊन प्रति हेक्टरी तुरीचे उत्पादन व उत्पादकता घटलेली आहे. अशा प्रकारे तुरीचे कमी उत्पादनाची कोण-कोणती प्रमुख कारणे आहेत याबद्दलची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.
- तूर पिकाची लागवड करण्यात शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीला प्राधान्याने देतात.
- तूर पिकाला इतर पिकांच्या तुलनेत दुय्यम दर्जा दिला गेला.
- तूर लागवडीत तंत्राज्ञान, नवनवीन जाती, खतमात्रा, योग्य लागवडीची वेळ इ. बाबींचा विचार केला जात नाही.
- तुरीचे पीक पेरणीसाठी पूर्वी शेतातून काढलेले किंवा घरगुती बियाणेच वापरले जाते.
- बियाण्यास बीजप्रक्रिया केली जात नसून परिणामी बियाणे चांगल्या प्रतीचे नसल्यास उत्पादनही चांगले मिळत नाही.
- पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडींची ओळख नसल्याने नियंत्रण करणे पुर्णपणे शक्य होत नाही. याचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो.
- तूर पिकासाठी खत व पाणी व्यवस्थापनाच्या या बाबतीत फारशे दुर्लक्ष केले जाते.
- तुरीला पाणी देण्याच्या संवेदनशील अवस्थांची माहिती अभावामुळे फुले व शेंगा लागण्याच्या वेळी व दाणे भरण्याच्या वेळी पाण्याची कमतरता भासते, परिणामी उत्पादन कमी येते.
- अधिक उत्पादन असणारे, रोग व कीड प्रतिकारक्षम असणारे सुधारित बियाणे शेतकऱ्यांना सहजासहजी व वेळेवर उपलब्ध होत नाही.
- तुरीची शेती प्रामुख्याने जिरायत (कोरडवाहू) भागात केली जात असल्याने तुरीचे पीक पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.
- कृषी विद्यापीठांनी ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा प्रती हेक्टरी कमी बियाणे वापरले जाते. परिणामी झाडाची संख्या कमी होते व उत्पादन कमी मिळते.
तूरीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाय :
काही संशोधक तज्ज्ञांच्या अहवालानुसार आणि प्रत्यक्ष पीक पाहणी केल्यावरून खालील प्रमाणे तूरीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपाय सुचविण्यात येत आहेत.
- तुरीचे दर्जेदार व सुधारित बियाण्याची निवड करून पेरणीसाठी वापरावे.
- तुरीची पेरणी शक्यतो ट्रॅक्टरचलित यंत्राने योग्य अंतर ठेवून टोकण पद्धतीने करावी.
- पेरणीसाठी शक्यतो बियाणे महामंडळाने शिफारशीत केलेल्या बियाण्यांची निवड करावी.
- पेरणीपूर्वी तुरीच्या बियाण्यास कार्बेन्डॅझिम किंवा रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.
- आंतरमशागतीचे कामे उदा. कोळपणी व खुरपणी वेळेवर करण्यात यावी.
- तूर पिकाला फुलोऱ्या अवस्थेत एक ते दोन संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- तुरीवरील प्रमुख किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
- तुरीची काढणी शेंगा पूर्णपणे वाळल्यानंतर किंवा दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पाहून करण्यात यावी.
विशेष संदर्भ :
- https://www.esakal.com/agro/tur-plantation-agriculture-140451
- Ministry of Agriculture, Indian Government of India
- https://agriexchange.apeda.gov.in/India%20Production/India_Productions.aspx?cat
तुरीचे कमी उत्पादनाची कारणे व उपाय हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !