आले उत्पादन तंत्रज्ञान

आले उत्पादन घेण्यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे गरजेचे आहे. तसेच आले लागवडीच्या पद्धती, बेण्याची निवड, आंतरमशागत, पाणी व खत व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान इत्यादी विशेष बाबींचा विचार करून आले उत्पादन घेतल्यास निश्चित उत्पादन वाढविणे शक्य होते.

अलीकडच्या काळात हवामानात सतत होणारे अनुकूल वा प्रतिकूल बदल यामुळे आले पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला असून पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट आलेली आहे.  यामुळे भाजीपाला उत्पादक विशेषत: आले लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याच उद्देशाने आले उत्पादन तंत्रज्ञान हा लेख तयार करून शेतकऱ्यांना आले लागवडीबाबत सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.

आले उत्पादन :

खालील दिलेल्या आले उत्पादन विश्लेषणात्मक तक्त्यावरून (सन 2019-20) देशातील आले उत्पादनात आसाम राज्य आघाडीवर असून167.39 मे. टन इतके उत्पादन आहे. यानंतर आले उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर असून 140.60 मे. टन इतके उत्पादन आहे, याच खालोखाल भारतातील पश्चिम बंगाल 130.40, गुजरात 108.25, केरळा 86.27, मेघालय 66.20, मिझोरम 60.13, कर्नाटक 58.39, नागालँड 48.65  व उत्तराखंड 19.07 राज्यांचा क्रम लागतो.

तक्ता क्र. 1 : भारतातील आले उत्पादन विश्लेषणात्मक माहिती तक्ता

अ.क्र.राज्य(000 Tonnes) सन 2019-20
उत्पादनभाग (%)
1आसाम167.3917.53
2महाराष्ट्र140.6014.72
3पश्चिम बंगाल130.4013.65
4गुजरात108.2511.33
5केरळा86.279.03
6मेघालय66.206.93
7मिझोरम60.136.30
8कर्नाटक58.396.11
9नागालँड48.655.09
10उत्तराखंड19.072.00
 एकूण885.35

स्त्रोत : National Horticulture Board (NHB)

वरील विश्लेषणावरून असे स्पष्ट होते की, महाराष्ट्रात आले उत्पादन घेण्यास चांगला वाव असून त्यासाठी पोषक अनुकूल हवामान आहे. यामुळे आले पिकाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात संधी उपलब्ध आहे. 

आले उत्पादन तंत्रज्ञानाच्या बाबी :

आले पासून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे गरजेचे आहे. तसेच बेण्याची निवड, आले लागवडीच्या पद्धती, बेणेप्रक्रिया, लागवडीचा हंगाम आणि लागवड, खत व्यवस्थापन, चुनखडी व्यवस्थापन, आले : कीड व्यवस्थापन, आले : रोग व्यवस्थापन, काढणी व साठवण व्यवस्थापन इत्यादी बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते.

जमीन :

आले पिकासाठी चांगली निचरा होणारी मध्यम प्रतीची, भुसभुशीत, सामू ६.५ ते ७ असलेली कसदार जमीन मानवते. जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी. आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीत तसेच तांबड्या जमिनीत या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. जमीन सपाट असण्यापेक्षा एका बाजूस उतार असलेली जमीन चांगली असते. आले पिकाची लागण उन्हाळ्यात व पुढील वाढ पावसाळ्यात होत असते आणि आपल्या भागात एकूण पाऊसमान किती होतो हे खात्रीशीर माहीत नसल्यामुळे जमीन एका बाजूस उताराची निवडावी. त्याचबरोबर जमिनीच्या मगदुराप्रमाणे चारही बाजूने चर काढून पावसाचे पाणी शेतात न थांबता चरीतून निघून जावे अशी उपाययोजना अगोदरच करून घ्यावी.

आले : उन्नत व सुधारित वाण :

महाराष्ट्रात प्रामुख्याने आल्याच्या माहीम या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची लागवड केली जाते. याशिवाय रिवो-दि-जनेरो, चिनी, जमैका, जपानी, कोचीन, सिरुची, सुरभी, इत्यादी सुधारित जाती आहेत. शेतात मूळकुजव्या रोग असेल अशा शेतातील कंद लागवडीसाठी वापरू नये.

बेण्याची निवड :

आले लागवड यशस्वी होण्यासाठी योग्य बेण्याची निवड ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. बेण्याची निवड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण करावी. या महिन्यात रोग विरहीत आले बेणे प्लॉटची पाहणी करावी व स्थानिक हवामानानुसार, जमिनीच्या मगदुरानुसार जाती निवडाव्यात. प्रत्यक्षात बेणे प्लॉटची पाहणी केल्यानंतर एप्रिल महिन्यात बेणे खरेदी करावे व बीजप्रक्रिया करून सावलीच्या ठिकाणी साठवणूक करावी. मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावे. बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅम, लांबी २.५ ते ५ सें.मी., सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले असावे. २५ क्विटल/हेक्टरी लागवडीच्या वेळेपर्यंत या बियाण्याच्या वजनात घट होऊन साठवणुकीच्या पद्धतीनुसार त्याचे वजन १५ ते १८ क्विटल होते.

आले लागवडीच्या पद्धती

रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :

काळ्या जमिनीत किंवा आधुनिक सिंचन पद्धती जसे तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो अशा ठिकाणी १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी. १२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ४५ ते ६० सें.मी. रुंदीचा असावा. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ ते ६० सें.मी., रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी., २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतरावर लागवड करावी.

बेणेप्रक्रिया :

उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने जिवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया करावी. यामध्ये अॅझोस्पिरीलम व पी.एस.बी. प्रत्येकी ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यामध्ये १५ मिनिटे कंद बुडवून लागवड करावी. रासायनिक व जैविक दोन्ही बेणेप्रक्रिया करावयाचा झाल्यास प्रथम रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीमध्ये ठेवावे व लागवड करताना जैविक बेणे प्रक्रिया करून लागवड करावी.

लागवडीचा हंगाम आणि लागवड :

लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.  कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावे. कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. आले पिकाला मध्यम प्रकारच्या सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. परंतु आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार उन्हाळ्यात लागवड केली जाते व रोपअवस्था सुद्धा उन्हाळ्यात येते. त्यामुळे रोपाला इजा झाल्यास (सन बर्निंग) उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी सगळ्यात आवश्यक बाब म्हणजे आर्द्रता कायम ठेवणे व मातीचे तापमान नियंत्रित करणे फार गरजेचे असते.

जमिनीच्या उताराप्रमाणे आपल्या लागणीची पद्धत निश्चित करून जमिनीवर उताराच्या दिशेने बेड उठवून घ्यावेत. लागणीच्या वेळी आढीत ठेवलेले बियाणे बाहेर काढून त्याचे एकसारखे तुकडे करून (मोड) घ्यावेत. या मोडीला लहान कोंब फुटलेले असतात. आल्याचा तुकडा ज्या दिवशी जमिनीत पुरला जाईल त्याच दिवशी त्या जमिनीस भरपूर पाणी मिळालेच पाहिजे. योग्य प्रकारे मशागत करून ट्रॅक्टरचलित लागवड यंत्राने लागवड केल्यास मजूर टंचाईवर मात करता येते व लागवडीचा खर्च व भरणीच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येते.

पाणी व्यवस्थापन :

पाणी जमिनीस एवढे द्यावे की किमान लावलेल्या तुकड्याच्या खाली चार ते पाच इंच संपूर्ण ओल गेलेली असावी. अन्यथा दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढेच पाणी द्यावे. त्यानंतरच्या पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रतवारीनुसार एक दिवसा आड एक दिवस किंवा दोन आड एक दिवस अशी ओल कायमस्वरूपी राखून ठेवली जाईल एवढेच पाणी द्यावे. यामध्ये जास्तीत जास्त पाणी देणे व कमी पाणी देणे चूक ठरू शकते.

लागणीपासून आठ दिवसांनी हलकी भर टाकणे योग्य, कारण लागणी वेळी लांब तुकड्याची टोके जमिनीच्या पृष्ठभागाबरोबर असतात. त्यास उष्णतेची झळ लागू नये किंवा उघडे असणारे डोळे खराब होऊ नयेत म्हणून या भरीची आवश्यकता आहे. लागवड केल्यानंतर जमिनीचे तापमान सिंचन देऊन नियंत्रित करणे गरजेचे आहे. जमिनीचे तापमान बाहेरील वातावरणाच्या तुलनेत जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेण्यातील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. बेण्यातील ओलावा कमी झाल्यास उगवण शक्ती व येणाऱ्या फुटव्यावर परिणाम होतो.

खत व्यवस्थापन :

हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली यांनी केलेल्या शिफारशीनुसार व माती परीक्षणाच्या अहवालानुसार मध्यम काळ्या जमिनीमध्ये सुपीकतेसाठी २५ टन/हेक्टरी शेणखत, विद्राव्य स्वरूपातील नत्र, स्फुरद आणि पालाशची अनुक्रमे ९०:५७:५७ किलो/हेक्टर ठिबक सिंचन पद्धतीतून लागवड ते उगवण, शाखीय वाढ, कंद वाढीची सुरुवात, कंद तयार होण्याची अवस्था अशा विविध अवस्थेत विद्राव्य स्वरूपातील खते द्यावीत.

रोजच्या आहारात आल्याचा उपयोग केला जातो. आले पिकात कंद खराब होण्याची कारणे समजून न घेता या पिकात रासायनिक बुरशीनाशकांची मोठ्या प्रमाणात जमिनीत आळवणी केली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढीबरोबरच मनुष्याच्या शरीराला हानिकारक ठरते. या कारणास्तव आले कंद खराब होण्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे सांगता येतील.

तापमान :

पारंपरिक पद्धतीनुसार आले पिकाची लागवड उन्हाळ्यात केली जाते. लागवडीच्या वेळी लांब कंदाची टोके जमिनीच्या पृष्ठभागावर असतात. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. अशा वाढलेल्या तापमानामध्ये उष्णतेमुळे कंद मऊ पडतात. त्याला स्थानिक भाषेत कंद गाभाळणे असे म्हणतात. त्यामुळे आल्याची उगवणक्षमता कमी होते.

व्यवस्थापन :

लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावेत, कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता घ्यावी. उष्णतेची झळ लागू नये किंवा उघडे असणारे डोळे खराब होऊ नयेत म्हणून हलकी भर लावावी. आर्द्रता कायम ठेवणे व मातीचे तापमान नियंत्रित करणे फार गरजेचे असते. याकरिता पाणी एवढे द्यावे की, लावलेल्या कंदाच्या खाली किमान चार ते पाच इंच संपूर्ण ओल जाईल. शेणखताच्या कमतरतेमुळे काही भागात मळी वापरली जाते अशा अर्धवट कुजलेल्या मळीमध्ये असणाऱ्या उष्णतेमुळे कंद गाभाळण्याचे प्रमाण वाढते. म्हणून मळी पूर्णपणे कुजवूनच पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत घालावी.

रोगग्रस्त बियाणे :

अर्धवट, कुजलेले बियाणे लागवडीस वापरू नये. ज्या शेतातील आले बियाणे म्हणून वापरायचे आहे. अशा शेतातील पीक पक्व होण्याअगोदर म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात रोगमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.

आले : कीड व्यवस्थापन :

) हुमणी : हुमणीची अळी कंदाला कुरतडल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा शिरकाव होऊन कंदकूज होऊ शकते.

उपाय : प्रकाश सापळे, फेरोमेन ट्रॅपचा वापर करून भुंगेरे गोळा करावेत व नष्ट करावेत. शेतामध्ये लागवडीपूर्वी शेणखतात २० किलो मेटा-हाझियम (जैविक बुरशी) मिसळून द्यावे व लागवडीनंतर प्रादुर्भाव दिसताच शेणखतात मिसळून झाडाभोवती मातीत मिसळावे.

) कंद माशी : कंदमाशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अळी पिवळसर पांढरट रंगाची असते. या किडीच्या अळ्या उघड्या पडलेल्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात त्यामुळे कंद कुजतो, पाने पिवळी पडून, झाडाची वाढ खुंटते. अशा गड्ड्यात पिथीयम, फ्युजरियम यासारख्या हानिकारक बुरशींचा शिरकाव होतो. त्यामुळे कंद कुजतात.

उपाय : शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. प्रत्येक भरीच्या वेळी निंबोळी पेंड जमिनीत घालावी. निमतेलाची फवारणी करावी. कंद उघडे पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

) सुत्रकृमी : ही कीड मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच सूत्रकृमीने केलेल्या छिद्रातून कंदकूज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज शिरकाव होतो. त्यामुळे कंद सडण्यास सुरवात होते. परिणामतः उत्पादनात लक्षणीय घट येते.

उपाय : निंबोळी पेंडीचा १८ ते २० क्विटल प्रति हेक्टर वापर करावा. झेंडूच्या रोपांची आले पिकात लागवड करावी. त्यामुळे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पासिलोमायसिस हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक जमिनीत मिसळावे.

आले : रोग व्यवस्थापन

बुरशीजन्य रोग : बुरशीजन्य रोगाचा प्रसार माती, रोगग्रस्त कंदाद्वारे होतो. रोगग्रस्त झाडाची पाने व कडा पिवळ्या पडून वाळण्यास सुरवात होते. काही दिवसाने संपूर्ण झाड वाळते. बुंधा पांढरट दिसतो व नरम पडतो. पांढरट नारंगी कंदाचा रंग तपकिरी दिसू लागतो व नंतर कंदावरही बुरशीची वाढ होऊन कंद कुजतात व नरम पडतात.

उपाय : एकाच जमिनीत आल्याच्या पिकानंतर आल्याचे किंवा हळदीचे पीक घेऊ नये. ट्रायकोडर्मा वापरत असताना एकरी ५ किलो ट्रायकोडर्मा, ५० किलो शेणखतामध्ये मुरवून ठेवावा आणि जमिनीत योग्य ओलावा असताना मातीत मिसळावे.

कीड व रोग व्यवस्थापन

१) बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा.

२) सेंद्रीय खत कुजलेले वापरावे. मळी वापरताना ती पूर्णपणे कुजवून त्यामध्ये जैविक खतांचे आंतरीक्षण करून वापरणे.

३) निंबोळी पेंड व करंजी पेंड भरीच्या वेळी वापरणे.

४) ट्रायकोडर्मा वापरताना ७ ते १० दिवस सेंद्रीय पदार्थात मुरवूनच जमिनीत घालावे व माती आड करावे.

५) कीड नियंत्रणासाठी निमतेल १ टक्के फवारणी करावी.

६) हमणी नियंत्रणासाठी मेटा-हाझीयम या जैविक कीडनाशकाचा वापर करावा. तसेच भुंगेरे आकर्षित करण्यासाठी एरंड आंबवण सापळ्याचा वापर करावा.

७) पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

८) सर्व जैविक कीडनाशकांचा वापर जमिनीत योग्य ओलावा असताना करावा.

काढणी :

ओल्या आल्यासाठी लागवडीनंतर साधारणत: सहा ते आठ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यानंतर पीक काढणीसाठी योग्य होते. मात्र सुंठ तयार करण्यासाठी पाला वाळवून खाली पडल्यावर म्हणजे २४५ ते २६० दिवसांनी कुदळीने आल्याची काढणी करावी.

उत्पादन :

सुधारित पद्धतीने आले लागवड केल्यास हेक्टरी १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. परंतु जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आले पिकांसाठी जमीन, हवामान, बियाणे, लागवड पद्धती, कीड व रोगांचा योग्य व्यवस्थापन, काढणी, साठवण इत्यादी घटक आवश्यक असतात. याचे योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते.

दर्जेदार आले लागवडीमुळे होणारे फायदे :

  • इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत आल्याचे दर्जेदार व किफायतशीर उत्पादन घेता येते.
  • उपलब्ध भूधारण क्षेत्रावर आल्याची लागवड करता येते.
  • उत्पादीत अद्रकला बाजारात वर्षभर समाधानकारक दर मिळतो.
  • शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून आद्रक पिकाचे उत्पादन घेता येते.
  • चांगल्या व उत्तम दर्जाचे अद्रक उत्पादन घेणे शक्य होते.

विशेष संदर्भ :

श्री. भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, प्रा. मोहन शिर्के, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव, ता. जि. सातारा.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर वेबसाईट ॲडमीन :

आले उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply