बांबू हे भारतातील व्यापारीदृष्ट्या लागवड केलेल्या पिकांपैकी एक आहे आणि त्यास ‘गरीब माणसाचे लाकूड’ देखील मानले जाते. चीननंतर भारत जगात बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशात वार्षिक बांबूचे उत्पादन अंदाजे 3.23 दशलक्ष टन्स एवढे आहे. आशियामध्ये बांबू हा संस्कृतीतला सर्वात समाकलित भाग आहे आणि जंगलाचा पर्याय म्हणून वापरला जातो.
बांबू हे मुख्यतः बांधकाम साहित्य, फर्निचर, लगदा आणि प्लायवुड म्हणून वापरले जाते. बांबूच्या चांगल्या स्त्रोतांचा आशीर्वाद मिळवण्याचा भारताचा भाग्य आहे. शिवाय बांबूच्या फळाचे आहार म्हणून सेवन केले जाते आणि पौष्टिकतेचा चांगला स्रोत मानला जातो. ईशान्य राज्ये ही बांबू उत्पादित करणारी प्रमुख राज्ये आहेत.
बांबू हे गवताच्या पोएसी कुळातील ११५ प्रजातींमध्ये बांबूच्या १,४५० पेक्षा अधिक जाती आहेत. कांडे असलेले, गोल, बहुधा पोकळ, गुळगुळीत व काष्ठयुक्त खोड हे बांबूचे गुणवैशिष्ट्य आहे. बांबूचा व्यास ३० सेंमी.पर्यंत वाढू शकतो, तर उंची काही सेंमी. ते ४० मी.पर्यंत वाढू शकते.
बांबूचे उगमस्थान आशिया आहे. जगातील उष्ण ते थंड तापमान असलेल्या प्रदेशांत बांबू प्रसार झालेला दिसून येतो. आपल्या देशात बांबूच्या साधारणत: १० जाती आढळतात तर भारताच्या पश्चिम व दक्षिण भागांत तो नैसर्गिकरीत्या वाढलेला आढळून येतो. देशातील गंगा नदी खोरे, हिमालयाचा काही भाग व इतर प्रदेशांत बांबूची पद्धतशीर लागवड केली जाते.
हिमालयात समुद्रसपाटीपासून ३,१०० मी. उंचीपर्यंत बांबू आढळतो. आफ्रिकेच्या उष्ण भागात बांबूच्या कमी जाती आढळतात, तर दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतात हिमरेषेपर्यंत तो दिसून येतो. महाराष्ट्रात बांबूच्या ऑक्सिटेनँथेरा स्टॉक्साय आणि ऑक्सिटेनँथेरा रिचेयी या दोन जाती प्रामुख्याने आढळतात.
बांबूचे खास वैशिष्टये
(अ) बांबूच्या बेटाचा काही भाग; (ब) बांबूची फुले.
बांबू ही बहुवर्षायू वनस्पती असून जमिनीतील कोंबापासून तिची वाढ होते. ते नेहमी बेटांच्या रूपात एकत्र वाढतात. त्यांच्या मुळांचे जाळे दाट असून त्यामुळे जमिनीची धूप थांबते. बांबूत कांडी असतात आणि दोन कांड्यांच्या प्रत्येक सांध्यापाशी भक्कम व जलाभेद्य पडदा असतो. खोडाला बहुधा फांद्या फुटत नाहीत. मात्र काही पूर्ण वाढीच्या पक्व बांबूंना आडव्या फांद्या येतात व त्यांना तलवारीच्या आकाराची पाने असतात.
पाने साधी, लांबट, अरुंद, टोकदार, गुळगुळीत, चमकदार आणि गडद हिरवी असतात. पानाला लहान देठ असतो. बांबूचा जमिनीकडचा भाग पानांनी वेढलेला असतो; मात्र ही पाने लगेच गळतात.
फुले गवतांच्या फुलांसारखी बारीक असून त्यांचे गुच्छ असतात. त्यांना आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ती आल्यानंतर बांबू मरून जातात.
बहुतेक बांबूंना क्वचितच दरवर्षी फुले येतात. काही बांबूंना ६५ वर्षांनी, तर काही मोजक्या बांबूंना १३० वर्षांनी फुले येतात. भारतात बांबूंना ३२ व ६० वर्षांनी फुले येतात आणि ती सर्वत्र एकाच वेळी येतात.
अशी वनस्पती इतरत्र नेऊन लावली, तरी तिला त्याच वेळी फुले येतात. फळे शुष्क व कणस्वरूप असतात. बांबूच्या बिया भाताप्रमाणे शिजवून खातात. फळे व बिया दुर्मिळ असल्याने बांबूची लागवड मुनवे व कलमे लावून करतात.
बांबूची वाढ अतिशय जलद होते. त्याची सर्वसाधारणपणे २४ तासांत सुमारे ७ सेंमी. उंची वाढते. त्याच्या काही जाती तर दिवसात ४०–६० सेंमी. वाढतात. अशा रीतीने काही महिन्यांत बांबूची वाढ पूर्ण होते. त्यांचा सभोवती होणारा प्रसारही जलदपणे होतो. बांबूमध्ये दरवर्षाची वाढ दर्शविणाऱ्या वृद्धिवलय रेषा नसतात.
बांबूचे उपयुक्त व महत्त्वपूर्ण फायदे
बांबू मनुष्याला अतिशय उपयुक्त असून त्याचे अनेक उपयोग आहेत. ते खालील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत.
- कठीण पाठीचे बांबू भक्कम व टिकाऊ असल्यामुळे ते बांधकामासाठी उपयोगी येतात.
- मांडव व पराती बांधण्यासाठी बांबूचा उपयोग होतो.
- टोमॅटोसारख्या वनस्पतींना आधार द्यावयाच्या काठ्या, मासेमारीसाठी लागणाऱ्या काठ्या तसेच कुंपण, लाठ्या, खुंटा इत्यादींसाठी लहान व बारीक बांबूचा उपयोग होतो.
- बुरुडकामात बांबूचा मोठा वापर होत असून टोपल्या, करंड्या, हारे, सुपे, कणग्या, पंखे, चटया, पडदे इ. वस्तू बांबूपासून तयार होतात.
- पतंगाच्या कामट्या व फिरक्या अशा काही वस्तू बांबूपासून तयार होतात.
- जहाज बांधणीतही बांबू वापरतात; उदा., डोलकाठ्या, वल्ही, तराफे वगैरे. कठीण बांबूपासून सुऱ्या, तसेच इतर हत्यारे तयार करतात. स्वयंपाकघरातील काही साधने व फर्निचर तयार करता येते.
- संपूर्ण घर, अंतर्गत सजावट, जमीन, छत, वासे, विभाजक पडदे, सजावटीचे सामान इत्यादींसाठी बांबू वापरतात. त्यापासून तक्ते, फळ्याही बनवितात.
- चपला, बूट, पेन, नळ्या, दारे, छत्र्यांचे दांडे, धनुष्यबाण, बैलगाड्या आणि कोंबड्यांचे व डुकरांचे पिंजरे तयार करण्यासाठी बांबूचा उपयोग होतो.
- कागद तयार करण्यासाठी बांबूचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो.
- बांबूची कोवळी पाने गायी व गुरांना खाऊ घालतात, तर त्याचे कोवळे भाग शिजवून खातात. कोवळ्या बांबूचे लोणचे घालतात वा त्याची चटणी तयार करतात.
बांबू लागवडीच्या योग्य जाती
- मानवेल
- माणगा, मेस
- एस्पर
- बुल्का, वनन, ब्रांडीसी
- कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां
- टूल्डा, जाती, मित्रींगा
- नुटन्स, मल्ल बांस
- भालुका, बराक, बाल्कू, भीमा
बांबू लागवडीची संक्षिप्त माहिती
बांबू लागवड करताना बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूचे संक्षिप्त माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे बांबूचे विविध प्रकार, बांबूचे नाव, शास्त्रीय नाव, फुलदाण्याचा कालावधी, योग्य वातावर व देखभाली खाली जाडी, बांबूचा उपयोग व विशेष याप्रमाणे सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
1) बुल्का, वनन, ब्रांडीसी
शास्त्रीय नाव : डेन्ड्रोक्येल्यामस ब्रांडीसी
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ४५-६० वर्षे
देखभाली खाली उंची : ६०-८० फूट
देखभाली खाली जाडी : ६-८ इंच
महत्त्व : बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब,
महत्त्वपूर्ण बाबी : हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
2) कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां
शास्त्रीय नाव : बांबूसा बांबोस
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ३५-५० वर्षे
देखभाली खाली उंची : ६०-८० फूट
देखभाली खाली जाडी : ५-६ इंच
महत्त्व : बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, औषधी पाने, चारा.
महत्त्वपूर्ण बाबी : हा बांबू काटेरी असल्याने याची लागवड आणि व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा हा बांबू कापायला अतिशय त्रास होतो. जर काटेकोर पणे योग्य व्यवस्थापन होणार असेल तर लागवडीला हरकत नाही. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर या बांबूची वाढ जास्त चांगली होते.
3) टूल्डा, जाती, मित्रींगा
शास्त्रीय नाव : बांबूसा टूल्डा
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ३५-६० वर्षे
देखभाली खाली उंची : ३५-४५ फूट
देखभाली खाली जाडी : २-३.५ इंच
महत्त्व : बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या.
महत्त्वपूर्ण बाबी : कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते.
4) नुटन्स, मल्ल बांस
शास्त्रीय नाव : बांबूसा नुतन्स
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ३५-४० वर्षे
देखभाली खाली उंची : २५-४० फूट
देखभाली खाली जाडी : २-३.५ इंच
महत्त्व : बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG, Plyboard
महत्त्वपूर्ण बाबी : कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते. या बांबूची वेगवेगळ्या वातावरणात प्रायोगिक तत्वावर लागवड व्हायची गरज आहे.
5) भालुका, बराक, बाल्कू, भीमा
शास्त्रीय नाव : बांबूसा बाल्कूवा
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ३५-४५ वर्षे
देखभाली खाली उंची : ३५-५० फूट
देखभाली खाली जाडी : ३-५ इंच
महत्त्व : बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG
महत्त्वपूर्ण बाबी : औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा हा बांबू आहे. याची फायदेशीर लागवड करायची असेल तर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करायला हवी. एकट्या दुकट्याने लागवड केली तर औद्योगिक दृष्ट्या वापराला मर्यादा येतात. कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंड सरळ यायला मदत होते.
6) मानवेल
शास्त्रीय नाव : डेन्ड्रोक्येल्यामस स्ट्रीकटस्
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ३०-३५ वर्षे
देखभाली खाली उंची : २५-५० फूट
देखभाली खाली जाडी : २-३.५ इंच
महत्त्व : बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
महत्त्वपूर्ण बाबी : ह्या बांबू ची लागवड केल्यावर वेळोवेळी फांद्यांची तसे वेड्या वाकड्या काठ्यांची छाटणी करणे आवश्यक असते.
7) माणगा, मेस
शास्त्रीय नाव : डेन्ड्रोक्येल्यामस स्टोक्सी
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ठराविक असा नाही.
देखभाली खाली उंची : २५-४० फूट
देखभाली खाली जाडी : २-३.५ इंच
महत्त्व : बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
महत्त्वपूर्ण बाबी : हा बांबू सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
8) एस्पर
शास्त्रीय नाव : डेन्ड्रोक्येल्यामस एस्पर
परिपक्व फुलण्याचा कालावधी : ६०-८० वर्षे
देखभाली खाली उंची : ६०-८० फूट
देखभाली खाली जाडी : ६-८ इंच
महत्त्व : खाण्यासाठी कोंब, बांधकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard,
महत्त्वपूर्ण बाबी : हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
बांबू लागवड केल्यामुळे होणारे फायदे
- पडीक व लागवडीअयोग्य जमिनीचा कार्यक्षम वापर होतो.
- कमी देखभाल खर्च व कमी गुंतवणूकीत हा व्यवसाय करता येतो.
- इतर पारंपरिक पिकांच्या बांबू लागवड सरस व हितावह ठरत आहे.
- बांबूचे औद्योगिक उपयोग व महत्त्व लक्षात घेता बांबूची लागवड करणे फायदेशीर ठरत आहे.
- शाश्वत व कमी खर्चात उत्पादन देणारा बांबू हा एकमेव व्यवसाय आहे.
- शेतकऱ्यांना बांबू हे पीक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत आहे.
- बांबूसाठी वर्षभर चांगली बाजारपेठ उपलब्ध असते. त्यामुळे बांबूला चांगला दर सुद्धा मिळतो.
विशेष संदर्भ :
- https://marathivishwakosh.org/3778/
- https://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/
- https://www.mahabamboo.com/species_list.php
डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447
बांबू लागवड संक्षिप्त माहिती हा लेख आपणास आवडला असल्यास लाईक करावे, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे.