बटाटा लागवडीची पूर्व तयारी

श्री. गजानन तुपकर व डॉ. उमेश ठाकरे, कृषि विज्ञान केंद्र, अकोला

बटाटा हे जमिनीत पोसणारे कंदमुळ वर्गातील पीक आहे. महाराष्ट्रात बटाट्याची लागवड साधारणपणे १५,००० हेक्टर क्षेत्रात होत असून त्यापासून अंदाजे ७५,७०० टन उत्पादन निघते. रबी हंगामामध्ये हेक्टरी ५० क्विंटल तर खरीपामध्ये हेक्टरी ४० क्विंटल असे उत्पादनाचे प्रमाण पडते.

महाराष्ट्रात बहुतांशी पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या  जिल्ह्यात बटाट्याची लागवड केली जाते. चांगल्या प्रतिच्या बेण्याचा अभाव, लहरी पर्जन्यमान, तापमानातील चढ उतार, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, काढणीपश्चात्त सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, या कारणास्तव महाराष्ट्रातील बटाट्याचे उत्पादन इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.

जमिनीची निवड :

या पिकासाठी उत्कृष्ट निचऱ्याची भूसभुशीत जमीन निवडावी, कमी निचऱ्याची, अधिक क्षार असलेली, चोपण व पाणी साचून राहणारी खोलगट जमीन या पिकासाठी निवडू नये. मध्यम प्रतिची, मिश्रीत पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्कृष्ट ठरते. भारी व चिकण पाणथळ जमीनीत या पिकाची लागवड करू नये.

पूर्व मशागत :

सद्य:स्थितीत पिकाची काढणी होताच जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी. नंतर कुळवाच्या २-३ पाळ्या देवून ढेकळे फोडून जमीन भूसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी २५-३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत म्हणून ताग हे पीक जमिनीत गाडणे रबी हंगामातील बटाट्याच्या अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फार फायद्याचे आढळून आले आहे. सोयाबीन किंवा बाजरा या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोतही टिकून राहण्यास मदत होते.

बटाटा बेण्याची निवड :

बटाटा कापून फोडी करून लावायच्या असतील तर विळा व तेथील जागा जंतू विरहीत करणे फार गरजेचे आहे. विळा/चाकू मॅन्कोझेब ०.२ टक्के द्रावणामध्ये बुडवून वापरावा. फोडी कमीत कमी १० ते १२ तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात. एक हेक्टर लागवडीसाठी १५ ते २० क्विंटल बटाटा बियाणे लागते.

बटाटा सुधारित जाती :

बटाटा बेण्याची निवड करतांना खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

बटाटा बेणे हे प्रमाणित, कीड व रोगमुक्त असावे.

बेणे सरकारी यंत्रणेकडून खात्रीशीर असे पायाभूत किंवा सत्यप्रत असलेले वापरावे.

बटाटे बेणे पूर्ण वाढलेले व त्यावर फुगलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत.

बेणे शीतगृहात असल्यास ते लागवडीपूर्वी ७-१० दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे.

बटाटे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे वापरणे फायद्याचे असते.

बेणे बटाटे ५ सें.मी. व्यासाचे किंवा ३० ग्रॅम वजनाचे असावेत.

बटाट्याचे बेणे मोठ्या आकाराचे असल्यास बटाट्याच्या प्रत्येक फोडी २५-३० ग्रॅम वजनाच्या व त्यावर २-३ डोळे राहतील अशा कराव्यात.

१) कुफरी चंद्रमुखी : झाड मध्यम उंच, जोमदार वाढीचे, भूमिगत, खोड आखुड असून बटाटे आकर्षक लांबोळे व मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. बटाट्यातील गर मळकट पांढरा व पिठूळ असतो. या जातीचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी उत्पादन २०० ते २२५ क्विंटलपर्यंत मिळते.

२) कुफरी ज्योती : कालावधी ९० ते १०० दिवस, प्रति हेक्टरी १७५ ते २०० क्विंटल उत्पादन, झाड मध्यम उंच, उभे जोमदार, बटाटे लांबोळे व पांढरे असतात. फुले पांढऱ्या रंगाची, डोळे उथळ असतात.

३) कुफरी सिंदूरी : कालावधी ११० ते १२० दिवस, उत्पादनास चांगली, फुले फिकट जांभळ्या रंगाची, पाने मुरडणाऱ्या रोगाला प्रतिकारक, करपा रोगास मध्यम प्रतिकारक, प्रति हेक्टरी सरासरी उत्पादन २०० ते २२५ क्विंटल, बटाटे मध्यम आकाराचे, गोल व फिकट लालसर रंगाचे, डोळे मध्यम असतात. बटाट्यातील गर फिकट पिवळा अंकुर सौम्य लाल रंगाचा असतो. फुले फिकट जांभळ्या रंगाची असतात.

४) कुफरी जवाहर (जे.एच. २२२) : संकरीत वाण अधिक उत्पन्न देणारा, करपा रोगास प्रतिकारक, हेक्टरी बियाण्याचे प्रमाण २० ते २५ क्विंटल लागते. बटाटे पांढऱ्या रंगाचे व लांबोळे असतात. उत्पन्न २०० ते २२५ क्विंटल.

लागवडीचा हंगाम :

बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. थंड हवामान बटाट्याच्या वाढीस अधिक पोषक असते. महाराष्ट्र राज्यात हे पीक रबी हंगामात अधिक उत्पादन देते. रबी हंगामात बटाटा लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा उपयोग बटाटे चांगले पोसण्यास होतो व अधिक उत्पन्न मिळते. २५ नोव्हेंबर नंतर लागवड केल्यास उत्पादनात घट येते.

लागवड पद्धत :

नांगराने अथवा रिजरने ५० ते ६० सें.मी. अंतरावर सरी-वरंबे पाडावे. त्यात १५-२० सें.मी. अंतरावर बटाटा लागवड करावी. रबी हंगामातील लागवडीसाठी प्रथम जमीन ओलावून घेणे आवश्यक आहे. बटाट्याची लागवड जमीन वापशावर आल्यावर करावी म्हणजे उगवण चांगली होते. प्रथम दोन फुट अंतरावर सलग सऱ्या पाडाव्यात त्यात बटाट्याची लागवड १५ ते २० सें.मी. अंतरावर करावी आणि लगेच सरी फोडून घ्यावी म्हणजे वरंब्याच्या ठिकाणी सरी तयार होते आणि बटाट्याच्या खापावर वरंबा तयार होतो. बटाटे उगवण झाल्यावर १२ ते १५ दिवसांनी पाणी द्यावे.

आंतरमशागत :

लागवडीनंतर अंदाजे २५ दिवसांनी बटाटा पिकास माती चढविणे जरूरीचे आहे. यावेळी बटाट्याच्या जमिनी खालील कोंबाला आऱ्या येवून त्यावर बटाटे लागायला सुरूवात होते. आऱ्या चांगल्या झाकल्या गेल्यास व जमिनीत हवा खेळती राहिल्यास झाडाची वाढ जलद व चांगल्या प्रकारे होते. याचवेळी नत्राची उरलेली मात्रा द्यावी. भर देण्याचे काम लाकडी नांगराने किंवा रिजरने करता येते. बटाटे संपूर्ण उगवून वर आल्यानंतर खुरपणी करावी.

अशाप्रकारे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी बटाटा पिकाची लागवडीची पूर्व तयारी करण्यासाठी प्रामुख्याने जमीन, हवामान, बटाट्याच्या सुधारित जाती, लागवडीचा हंगाम, बटाटा बेण्याची निवड, लागवड पद्धती व आंतरमशागत इत्यादी घटकांचा योग्य समतोल साधणे आवश्यक आहे. यामुळे बटाटा पिकाच्या प्रती हेक्टरी उत्पादनात निश्चितपणे वाढ होऊ शकेल.       

श्री. गजानन तुपकर व डॉ. उमेश ठाकरे, कृषि विज्ञान केंद्र, अकोला

बटाटा लागवडीची पूर्व तयारी हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply