बीटरूट हे महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. बीटरूट या पिकाची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतात मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात बीटरूटची लागवड केली जाते. शहरी भागातील मोठ्या हॉटेलांमध्ये बीटरूटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बीटरूटच्या लागवडीला भरपूर वाव आहे.
बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान या लेखाद्वारे आपणास बीटरूटचे महत्त्व व उपयोग, बीटरूटच्या व्यापारी लागवडीचे तंत्र, बीटरूटवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण करता येईल. तसेच बीटरूट उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल सखोल व अद्यावत माहिती या लेखात आपणास मिळणार आहे. त्यामुळे बीटरूट उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती अतिशय उपयोगी व महत्त्वाची ठरणार नाही.
बीटरूट उत्पादन तंत्रज्ञानाचे शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास किफायतशीर बीटरूट उत्पादन घेता येऊ शकते. त्यामुळे बीटरूटचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविता येतो. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळणार आहे. त्यातून त्यांचे शेतीचे आर्थिक सशक्तीकरण होऊ शकेल.
बीटरूट : महत्त्व व उपयोग
बीटरूट हे एक मूळवर्गीय भाजीपाला पीक आहे. बीटरूटची पाने पालकासारखी असतात आणि कंद गोल आकाराचा असतो. मुळा किंवा गाजराप्रमाणेच बीटरूट हे अन्न साठवून ठेवणारे भूमिगत मूळ आहे. पाने हिरवी पालकासारखीच दिसतात. मुळे गोलसर चपटी, टोके एकदम निमुळती, आतून गडद लाल असतात. कंदाचा आतील भाग गर्द लाल रंगाचा असतो. कंदाची चव गोड असून त्यापासून साखर मिळविता येते.
बीटरूटचा भाजी म्हणून निरनिराळ्या प्रकारे उपयोग केला जातो. बीटरूटचा उपयोग सॅलड किंवा भाजी करण्यासाठी केला जातो. लोणचे आणि चटणीसाठीही बीटरूटचा वापर करतात. बीटरूटमध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स तसेच कॅल्शियम, फॉस्फरस ही खनिजे आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. बीटरूटच्या हिरव्या पानांमध्ये 0.003% लोह असते, तसेच 100 ग्रॅम हिरव्या पानांमध्ये 50 मिलिग्रॅम अॅसकॉर्बिक अॅसिड आणि 21,000 इंटरनॅशनल युनिट ‘अ’ जीवनसत्त्व असते. बीटरूटचा उपयोग भाजी, सलाड आणि आता साखर उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे बीटरूट पिकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जमीन व हवामान
बीटरूट हे थंड हवामानातील पीक असून बीटरूटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन रंगाच्या स्तरांची रचना दिसून येत नाही. पाने मोठी गर्द हिरवी आणि मरून रंगमिश्रित असतात. कंदाचा वरील भाग मध्यम ते उंच असतो. याशिवाय बीटरूटचे क्रॉसब्रॉय इजिप्शियन आणि अर्ली वन्डर हे उन्नत वाण आहेत.
बियाण्याचे प्रमाण
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे साधारणपणे 7 ते 10 किलो बियाणे लागते किंवा 8 ते 11 किलो बियाणे जमिनीचा मगदुराप्रमाणे व आवश्यकतेनुसार वापरावे. बीटरूटचे एक बी म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो. बीटरूटची लागवड पाभरीने पेरून किंवा बी टोकून करतात.
लागवडीचे अंतर व पद्धती
बीटरूटची लागवड करण्यासाठी 45 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या कराव्यात आणि वरंब्यावर 15 – 20 सेंटिमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. काही वेळा 30 सेंटिमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करतात. नंतर विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. बीटरूटचे बी पेरण्यापूर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. बीटरूटची लागवड 30 – 45 X 15 – 20 सेंटिमीटर अंतरावर करावी.
खत व पाणी व्यवस्थापन
जमिनीच्या मशागतीच्या वेळी 15 – 20 गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटरूटच्या पिकाला 60 – 70 किलो नत्र, 100 – 120 किलो स्फुरद आणि 60 – 70 किलो पालाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पालाशाची पूर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पीकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला 8 – 10 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.
आंतरमशागत
बीटरूटच्या बियाणाची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बीटरूटच्या एका बीजामध्ये 2 ते 6 बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते; म्हणून बीटरूटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
विरळणी करताना एका ठिकाणी फक्त एकच रोप ठेवावे आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत. पिकातील तण खुरप्याने काढून निंदणी करावी आणि शेत तणरहित ठेवावे. पीक 45 दिवसांचे झाल्यावर खोदणी करून मुळाला भर द्यावी. बीटरूट हे क्षारांना दाद देणारे पीक असल्याने बीटरूट 3 – 5 पानांवर असताना 10 लीटरला 2 किलो मिठाचे द्रावण फवारल्याने तणांचा नाश होतो. पण याच्याऐवजी इतर तणनाशकांचा वापर करणे जमिनीच्या दृष्टीने योग्य आहे.
आंतरपिके
बीटरूट हे कमी कालावधीत तयार होणारे पीक असल्याने हे पीक आंतरपीक म्हणून फळबागांमध्ये घेता येते. मिरचीसारख्या अधिक कालावधीच्या पिकामध्ये वाफ्यांच्या सऱ्यांवर बीटरूटची लागवड आंतरपीक म्हणून करता येते.
महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण
1) पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) : या किडीच्या पांढऱ्या अळ्या पानाच्या खालच्या भागावर राहून पानांत शिरतात आणि पानांच्या पेशीतून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने खराब होतात आणि पिकाची वाढ खुंटते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन 10 लीटरला 10 मिली. प्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे 10 लीटर पाण्यात 25 मिली. निंबोळी अर्क मिसळून (4%) फवारावे.
2) हिरवी उंट अळी (सेमी लूपर) : हिरव्या रंगाच्या अळ्या पाने खातात आणि पिकाचे नुकसान करतात.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलॅथिऑन किंवा 30 ग्रॅम कार्बारिल मिसळून फवारणी करावी.
महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण
1) पानांवरील ठिपके : या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर लहान, गोल, तपकिरी रंगाचे डाग पडतात. डागाच्या कडा गडद रंगाच्या असतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास पाने सुकून जातात. ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी आणि 15 दिवसांच्या अंतराने ताम्रयुक्त औषधाची किंवा बोर्डो मिश्रण 1 टक्क्याप्रमाणे फवारणी करावी.
2) केवडा (डाऊनी मिल्ड्यू) : केवडा रोग थंड हवामानात बीटरूटवर मोठ्या प्रमाणावर येतो. पानाच्या खालच्या भागावर बुरशीची वाढ होते. पानांच्या कडा खाली वाकतात. पाने सुकतात
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्याला पेरणीपूर्वी कॅप्टान या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. पिकावर 15 दिवसांच्या अंतराने डायथेन एम – 45 या बुरशीनाशकाची फवारणी करावी. पिकाची फेरपालट करावी.
याशिवाय बीटरूटवर रायझोक्टोनिया बुरशीमुळे होणारी मूळकूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी बीटरूटचा कांदा, वाटाणा या प्रतिकारक पिकांसोबत फेरपालट करावा आणि बटाटे, टोमॅटो आणि लेट्यूससारखी पिके बीटरूटच्या शेतात लावू नयेत.
(टीप : कीटकनाशक अथवा रसायनाचा बीटरूट पिकांवर कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करावयाची असल्यास कीटक तथा कृषि तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार करण्यात यावी. कारण शासनाने वेळोवेळी कीटकनाशके व औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे.)
काढणी
बीटरूटच्या कंदाची वाढ 3 ते 5 सेंटिमीटर झाल्यावर बीटरूटची काढणी करावी. बीटरूटची काढणी हातांनी उपटून करावी. काढणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बीटरूटची काढणी बियांच्या लावणीनंतर 70 ते 75 दिवसांनी करावी. बीटरूटची मुळे आतून स्पंजासारखी होण्यापूर्वी त्यांची काढणी करावी. काढणीनंतर कंदांची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापूर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. कंद पॉलिथीनच्या पिशव्यांत भरून पाठविल्यास जास्त काळ चांगले राहतात. काही वेळा 4 – 6 बीट जुड्यांमध्ये एकत्र बांधून विक्रीस पाठवतात.
उत्पादन
बीटरूटचे सर्वसाधारण उत्पादन हेक्टरी 25 टन इतके मिळते. परंतु जमीन, हवामान, पिकाचा वाण, लागवड पद्धत, पीकसंरक्षण, काढणीपश्चात व्यवस्थापन इ. घटकांवर बीटरूटचे उत्पादन अवलंबून असते.
डॉ. योगेश वाय. सुमठाणे (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447
बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास करून लाईक करावे, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे.