पशुखाद्य निर्मिती : समस्या व उपाय

आजही दुग्ध व्यवसायात दुधाच्या प्रतीनुसार भाव या संकल्पनेचा वापर होत नाही. दिवसेंदिवस दुधाच्या भेसळीचे प्रमाण वाढत जात आहे. शेतकऱ्याने दूध उत्पादित केल्यानंतर पुढील सर्व पातळ्यांवर दुधात जास्तीत जास्त अवैध प्रमाणात भेसळ होऊन शेवटी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त दूध पोहोचत आहे. यासाठी दूध गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

दुग्ध व्यवसायामध्ये चारा आणि पशुखाद्याच्या नियोजनाचा अभाव हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधव व पशुपालकांना सतत भेडसावत आहे. शेतकरी आणि शासनाला जास्त पैसा देणाऱ्या या व्यवसायासाठी लागणाऱ्या चारा पिकाखाली फक्त दोन-तीन टक्केच क्षेत्र आहे. चारा पिकाला अनेक ठिकाणी पाण्याचीही उपलब्धता करून दिली जात नाही. दूध उत्पादकही वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन करत नाहीत. उपलब्धतेनुसार एकाच प्रकारचा चारा जनावरांना खाऊ घालतात. त्याचा परिणाम गाईंच्या आरोग्यावर तसेच दुग्ध उत्पादनावर होतो.

ऊस कारखाना सुरू असताना जनावरांना केवळ उसाचे वाढे खाऊ घालून दुग्ध व्यवसाय केला जातो. परंतु ऊसाच्या वाढ्यामध्ये असलेल्या ऑग्झिलेटमुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊन गाईंचे आयुष्य कमी होते. गाईंना एकदल, द्विदल आणि कोरडा चारा संतुलित प्रमाणात देण्यासाठी योग्य नियोजन होत नाही. गरजेनुसार पोषणाचा अभाव ही एक मोठी समस्या दुग्ध व्यवसायामध्ये आहे.

नसर्गिक पद्धतीने जनावराचे पालन केल्यास दुग्धोत्पादन वाढते. परंतु आपल्या पारंपरिक दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांना गोठय़ामध्ये बांधून ठेवले जाते. शिवाय बंदिस्त गोठय़ात गाई जेथे चारा खातात, तेथेच त्यांचे शेण पडते. या शेणावरच त्या बसतात. त्यामुळे त्यांच्यात कासदाह या घातक आजाराचे प्रमाण वाढते. गाई आजारी पडण्याचे प्रमाण वाढून त्यांचा वैद्यकीय खर्च वाढतो. गोचिडांचे प्रमाण वाढून ताप येण्याचे प्रमाणही वाढते.

दुग्ध व्यवसायात सुयोग्य तंत्रज्ञान निर्मिती आणि विस्तार, चांगल्या योजना, चांगल्या गुणप्रतीची दूध निर्मिती आणि वितरण यांसारख्या उणिवा आहेत. तसेच मजुरांची उपलब्धता, चाऱ्याचा अभाव, भांडवलाची उपलब्धता, दुधाचा दर याबरोबरच समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन या समस्यांना तोंड देत या व्यवसायाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.

शेतीचे विविध कामे करण्यासाठी पशुधनाची नितांत आवश्यक असते. मात्र पशुंचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी चाऱ्याची व चांगल्या दर्जेदार पशुखाद्याची आवश्यकता असते. यामुळे चारा निर्मिती व पशुखाद्य खुराक तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक व मूरघास तंत्रज्ञान सध्या विकसित झालेले आहे. यामुळे चाऱ्यांवर  विविध प्रकारची प्रक्रिया करून जनावरांना पर्यायायी चारा म्हणून एक नवीन पर्याय निर्माण झालेला आहे. मात्र याबाबत अनेक समस्या शेतकरी, पशुपालकांना भेडसावत असतात. यांपैकी काही समस्या खालील प्रमाणे मांडण्यात येत आहेत.

पशुखाद्य निर्मितीच्या प्रमुख समस्या :

प्रस्तुत लेखामध्ये लेखकांनी संशोधन करून पशुखाद्य निर्मितीच्या प्रमुख समस्या जाणून घेतल्या असून त्यावर चाऱ्याबद्दल सद्य:परिस्थितीचा आढावा घेऊन खालील प्रमाणे समस्या मांडण्यात आलेल्या आहेत.

  • महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक असल्यामुळे त्यांना चारा निर्मितीप्रक्रियेचे नवीन सुधारित तंत्रज्ञान वापर करण्याचा अभाव असल्याचे दिसून येतो.
  • चारा निर्मिती करण्यासाठी शेतकरी तथा पशुपालकांना योग्य प्रशिक्षणाची सोय नसणे.
  • कमी दर्जाचा व कमी गुणवत्तेचा चारा जनावरांना मिळत असल्यामुळे अत्यावश्यक पोषक घटक हे जनावरांना मिळत नसल्यामुळे फारशा प्रमाणात चाऱ्याचा उपयोग होत नाही. 
  • वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात चाऱ्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे मूरघास, हायड्रोपोनिक, ॲझोला, कडबा खाद्य या प्रकारचा बहुपर्यायायी चाऱ्याचा उपयोग शेतकरी करीत नाही.
  • चारा निर्मिती करताना शेतकरी जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता खालावते.
  • चारानिर्मिती करण्यासाठी आधुनिक चारा पिकांचे उत्पादन घेण्याचा अभाव.
  • चारा निर्मिती : काढणी पद्धती व सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव.
  • हंगामनिहाय चाऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा अभाव शेतकऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो.
  • मागील 5 ते 6 वर्षापासून पावसाचे प्रमाण अगदी कमी होत चालले आहे. त्यातच मागील वर्षी तर अगदी जून पासूनच समाधानकारक असा पाऊस पूर्ण महाराष्ट्रात विदर्भाचा काही भाग वगळता कोठेच झाला नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्कळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांसाठी अन्नधान्य उत्पादनाबरोबरच चाऱ्याच्या उत्पादनावर खूप मोठे संकट आले आहे.
  • चारा-वैरण उत्पादनासाठी योग्य नियोजन करणे पशुपालकांसाठी काळाची गरज बनली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर पशुपालकांना कमी उत्पादन खर्चात जनावरांना चारा उपलब्ध करून देणारे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करीत नाहीत. 
  • हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाव्दारे चारा उत्पादन करण्यासाठी शासनाकडून राज्यात योजना राबविण्यात येतात त्याचा फायदा पशुपालक शेतकऱ्यांनी घ्यावयाचा आहे.
  • शेतकऱ्यांच्‍या वाढत्‍या तुकडीकरणामुळे तसेच पाण्‍याचे शाश्‍वत स्‍त्रोत उपलब्‍ध नसल्‍यामुळे म्‍हणावे तसे चाऱ्याचे उत्‍पादन घेता येत नाही.
  • कृषि विद्यापीठे तसेच कृषि संशोधन संस्था यांनी विकसित सुधारित व संकरित चारा पिकांच्या जातींचा लागवडीसाठी उपयोग न करणे.
  • पंचसूत्री चारा निर्मितीच्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये अभाव मोठ्या प्रमाणात आहे.

पशुखाद्य निर्मिती उपाय :

  1. हंगामनिहाय चारा पिके उदा. मका, बाजरी, ज्वारी, लसून घास, नेपिअर गवत, सुबाभळू, शेवरी इत्यादी पिकांची लागवड करावी.
  2. दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी चारा म्हणून मूरघास व हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाव्दारे चारा निर्मिती करावा.
  3. चारा निर्मितीसाठी कृषि विद्यापीठे, कृषि संशोधन संस्था यांनी विकसित केलेल्या सुधारित व संकरित चारा पिकांच्या जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा.
  4. शेतकऱ्यांनी पशुखाद्य चारा निर्मिती करण्यासाठी जवळीलमूरघास व हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे चारा उपलब्ध करावा.
  5. चारा निर्मिती करण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांना योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  6. वर्षभर चारा कसा उपलब्ध होईल या उद्देशाने चाऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. त्यामध्ये पारंपारिक हा कडबा कुट्टी यंत्राद्वारे बारीक करून पशुंना दिल्यास चाऱ्याची मोठी बचत होते आणि चाऱ्याचा जनावरांसाठी पुरेपूर उपयोग होतो.
  7. शेतातील सोयाबीन, ज्वारी, बाजारी इत्यादी पिकाचे मळणी केल्यानंतर निघणारे गूळ किंवा भुसकटावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यापासून चांगल्या गुणवत्तेचा चारा उपलब्ध होईल.
  8. तयार केलेल्या पशुखाद्य चाऱ्याची गुणवत्ता ही उत्तम असली पाहिजे अथवा त्या चाऱ्यामध्ये जनावरांना मिळणारे अत्यावश्यक पोषक घटक उपलब्ध असले पाहिजे. 

पशुखाद्य निर्मितीचे फायदे :

  • जनावरांना चांगल्या गुणवत्तेचा व पोषक घटक असणारा चारा उपलब्ध होतो.
  • जनावरांची वाढ चांगली होते आणि दुधाची गुणवत्ता चांगली राखली जाते.
  • पशुखाद्य निर्मितीमुळे जनवरांना वर्षभर उपलब्ध होऊ शकतो.
  • शेतकरी व पशुपालकांना भेडसावणारा चाऱ्याचा प्रश्न कमी होतो.
  • जनावरांना कमी वेळेत व कमी कालावधीत चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध होतो.
  • पशुखाद्य निर्मिती केल्यामुळे पशुपालकांना चाऱ्याचे व्यवस्थापन करणे सोयीस्कर होते.
  • उपलब्घ चाऱ्याचा जनावरांसाठी पशुखाद्य म्हणून योग्य प्रमाणात उपयोग होतो.

शब्दांकन : किशोर ससाणे लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

पशुखाद्य निर्मिती : समस्या व उपाय हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply