मधुमक्षिका पालन व्यवसाय

डॉ. योगेश सुमठाणे, (M.Sc., Ph.D., M.B.A.), Agricultural Senior, Bamboo Research & Training Centre, Chandrapur (MS), Mob. 8806217979

20 मे हा जागतिक मधमाशा (Honey bee) दिवस हा भारताबरोबरच संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून मधमाशांचे संगोपन करून त्यापासून उत्तम दर्जाच्या मधाची निर्मिती करावी आणि त्याद्वारे निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन अबाधित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.  

मधुमक्षिका पालन हा शेतीला पूरक असा व्यवसाय असून कमी खर्चात शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारा महत्त्वाचा व्यवसाय आहे. मधुमक्षिका (मधमाशा) अन्नाची गरज भागविण्यासाठी प्रत्यक्षपणे मधाच्या रुपाने आणि अप्रत्यक्षपणे तृणधान्ये व कडधान्ये पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचन फार महत्त्वाची मदत करत असतात.  

भारतात आयुर्वेदाचा प्रसार वाढत असल्याने मधाची मागणी येणाऱ्या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मध आणि त्यापासून तयार केलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी  दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरणार आहे.

मधुमक्षिका पालन करतांना योग्य नियोजन केले तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या व्यवसायातून मिळू शकते. देशात विशेषत: महाराष्ट्रात रोजगार निर्मितीला वाव असल्याने हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेकारी आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला चांगला रोजगार  उपलब्ध होऊ शकेल.

मधमाशी पालनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास उत्तम मदत होते. त्याचबरोबर वनस्पतीच्या परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका मधमाशा बजावतात असून तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये व फुलपिके इत्यादींच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मधमाशांचा सहभाग वाढवून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज झालेली आहे.

भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. देशात मधाचे उत्पादन वाढत असून याचा किफायतशीर आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

मधाचे देशात उत्पादित होण्याचे प्रमाण सन 2018-19 मध्ये अंदाजे 1 लाख 20 हजार टनांपर्यंत झाले असून निर्यात अंदाजे 61 हजार 33 टन इतकी झाली आहे. मागील पाच वर्षांच्या उत्पादनाच्या तुलनेत 57.58 टक्के वाढ झाली आणि निर्यातीमध्ये 116.13 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे भारतात विशेषत: महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनास चांगली संधी असून उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.  

वाढत्या धावपळीच्या जीवनात स्थलांतरित स्वरुपाच्या मधमाशी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने बाहेरील देशांमधून मागणी वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे कृषीपूरक व्यवसाय रोजगात संधी म्हणून पाहिल्यास अर्थकारणाला मोठा वाव आहे.

सन 2018-19 भारतातून अंदाजे 61 हजार 33 टन निर्यात झाली  असून यातून 732 कोटी 16 लाख परकीय चलन भारताला मिळाले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार व हिमाचल प्रदेश या राजांमध्ये ह्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात मधुमक्षिका पालन उद्योग राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवला जातो. 

मधुमक्षिकापालक शेतीपूरक व्यवसायातून कमी गुंतवणूक करुन व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या, मोकळ्या जागेची गरज असते, जिथे मधमाशा पेट्या ठेवता येतात. जर 200 ते 300 पेट्या ठेवणार असाल तर अंदाजे 4 हजार ते 5 हजार स्क्वेअर फूट इतकी जागा लागते. दरम्यान पेट्या आणि मधमाश्या वेगळ्या खरेदी कराव्या लागतात.

एपिस मेलीफेरा ही माशी सर्वात जास्त मध उत्पादन देणारी आणि अंडे देणारे मधमाशी आहे. ही प्रजाती खरेदी करणे मधमाशा पालन करण्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. मधुमक्षिकापालन या शेतीपूरक उद्योगाला साह्या म्हणून सरकारकडून 2 ते 5 लाख रुपये कर्जही मिळू शकते. मधमाशी पालन कसे करावे यासाठी आपल्याला प्रशिक्षणही दिले जाते. भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च  अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांना उत्तम व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध मधुमक्षिकापालन या व्यवसायाने दिलेली आहे.

मधुमक्षिकापालन हा व्यवसाय कमी वेळेत, कमी आर्थिक गुंतवणूकीत किफायतशीर उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय असल्याकारणाने इतर व्यवसायाच्या तुलनेत या व्यवसायापासून हमखास उत्पन्न घेता येऊ शकते. यासाठी मधुमक्षिकापालनाचे सुधारित तंत्राचा अवलंब करणे, मधमाशाच्या सुधारित प्रजाती किंवा जातींची निवड करणे, मधमाशी संगोपनाच्या विविध पद्धतीचा वापर करणे, मधमाशी क्षेत्रालगतच्या जमिनीमध्ये गळीतधान्ये, कडधान्ये, फुलशेती या पिकांची लागवड करणे ज्यामुळे मधमाशांना परागकण उपलब्ध होऊन परागीकरण प्रक्रियेस चालना मिळेल, मधांची काढणी व्यवस्थापन व हाताळणी योग्य पद्धतीने केल्यास मधुमक्षिकापालन हा व्यवसाय यशस्वी आणि फायदेशीर होऊ शकेल.    

मधुमक्षिकापालन केल्यामुळे होणारे फायदे

  • शुद्ध मधाचे उत्पादन मिळते.
  • शुद्ध मेणाचे उत्पादन मिळते.
  • परागीभवनामुळे शेती व फळ बागायती पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • प्राग, मधमाशांचे विष संकलन होते.
  • रॉयल जेली संकलन व मधमाशांचे संरक्षण व संवर्धन होते.
  • पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते.
  • नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करता येते.
  • मधमाशांमुळे कडधान्ये आणि तृणधान्ये पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

*** Please Like, Comments & Share ***

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading