फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज

 1,621 views

भारतात फळे व भाजीपाल्यांचे समाधानकारक उत्पादन असतानासुद्धा देशात अंदाजे 1 ते 2 टक्के फळे व भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. त्याउलट जागतिक स्तरावर ब्राझीलसारख्या देशात 70 टक्के, अमेरिका 70 टक्के, मलेशिया 83 टक्के आणि फिलिपाईन्स देशात 78 टक्के कृषि उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. सध्या भारतात अंदाजे 4500 फळ प्रक्रिया उद्योग असून चालू असलेले प्रक्रिया उद्योग केवळ 50 टक्के क्षमताच वापरतात. म्हणून त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

निरनिराळ्या फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांऐवजी विविध फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले पाहिजेत. उदा. केळी, आंबा, डाळिंब, द्राक्षे, आवळा, बोर, संत्रा इत्यादी फळांच्या उत्पादनात देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याने त्यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी येथे फार मोठा वाव व संधी उपलब्ध आहे. याकडे आताच सर्व सामर्थ्यासह वळणे, हे कृषि व फळबाग क्रांती खऱ्याअर्थाने यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे.

प्रस्तुत लेखाच्या आधारे आपल्याला आरोग्यासाठी फळे व भाजीपाल्याची गरज, फळे व भाजीपाला यांच्या उत्पादनाची सद्य:स्थिती समेजल व त्यांच्या उत्पादन वैशिष्टयांची ओळख होईल. फळे आणि भाजीपाला यांच्या विक्री व्यवस्थापन, फळे व भाजीपाला घटकांचे वर्गीकरण व फळे व भाजीपाला प्रक्रिया करण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे समजून घेता येईल आणि देशात व महाराष्ट्रात फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.

आरोग्यासाठी फळे व भाजीपाल्याची गरज :

अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण व आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. यांपैकी आरोग्य ही एक महत्त्वाची गरज आहे. म्हणतात ना, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती ! सध्याच्या डिजीटल युगात घड्याळाच्या काट्याबरोबर चालणारे आपले धावपळीचे जीवन. यामुळे अनावधानाने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. खरे पाहता फळे आणि भाजीपाला ही आपल्या आरोग्याची कवच कुंडले आहेत. आरोग्य रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निसर्गाने मानवाला दिलेली ती एक अनमोल देणगी आहे. मात्र या देणगीचा नियमितपणे संतुलित वापर न केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते व आपल्याला आजार आणि व्याधींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी फळे आणि भाजीपाला यांचे नियमित सेवन केले पाहिजे.

आहारशास्त्रज्ञांच्या मते, माणसाच्या समतोल आहारात एक व्यक्तीसाठी दररोज 85 ग्रॅम फळांची व 300 ग्रॅम भाजीपाल्यांची शिफारस केली आहे, पण दुर्देवाने ते प्रमाण अनुक्रमे 45 ग्रॅम व 100 ग्रॅम इतकेच असते. म्हणून त्यांच्या उत्पादनास फार मोठा वाव आहे. मात्र फळे व भाजीपाला हंगामी असल्याने त्यांची आवक एकाच वेळी बाजारात झाल्याने बाजारभाव घसरतो व ती नाशवंत असल्याने मिळेल त्या भावाला विकावी लागतात. तर बऱ्याच वेळा विकली न गेल्यामुळे टाकून द्यावी लागतात. अशा फळे व भाजीपाला यांच्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनविल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या अन्नघटकांचा उपयोग केला जाईल. फळे व भाज्या बिगर हंगामात उपलब्ध होतील व शेवटी शेतकऱ्यालाला चांगला वाजवी नफा मिळेल.

 फळे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन :

भारताची विशिष्ट अशी भौगोलिक परिस्थिती आणि लाभलेले विविध प्रकारचे हवामान यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या फळांचे आणि भाजीपाल्यांचे उत्पादन निरनिराळ्या राज्यांतून घेणे शक्य होते. अन्न व कृषि संघटन या युनोच्या संलग्न संस्थेच्या एका वार्षिक अहवालानुसार भारताने फलोत्पादनाच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकून जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

सन 2019-20 साली भारतात फळांच्या लागवडीखालील अंदाजे क्षेत्र 98.68 लाख हेक्टर एवढे होते व त्यापासून 56.93 दशलक्ष टन एवढे उत्पादन मिळाले होते, तर 89.86 दशलक्ष टन एवढे भाजीपाल्याचे उत्पादन 53 लाख हेक्टर एवढया क्षेत्रापासून मिळाले होते. भाजीपाल्याच्या उत्पादनात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो.

महाराष्ट्र 2019-20 साली फळबाग लागवडीखाली एकूण अंदाजे 5,10,754 हेक्टर क्षेत्र होते व त्यातून अंदाजे 79,80,899 मे. टन उत्पादन झाले. त्याच काळात 2,16,259 हेक्टर क्षेत्र भाजीपाला लागवडीखाली होते व त्यापासून अंदाजे 29,57,335 मे.टन उत्पादन मिळाले होते.

फळे व भाजीपाला उत्पादन :

भाजीपाला, सुगंध व औषधी वनस्पती व वृक्षारोपण पिके यांचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे तर फळे, फुले व मसाल्यांचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे. सन 2019-20 मध्ये फळांचे उत्पादन 2018-19 तुलनेत 2.27 टक्क्यांनी कमी होईल. मुख्यतः द्राक्षे, केळी, आंबा, लिंबूवर्गीय, पपई आणि डाळिंबाच्या उत्पादनातील तोटा यामुळे होतो.

कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे उत्पादन वाढल्यामुळे भाजीपाला उत्पादनात 2018-19 च्या तुलनेत सन 2019-20 मध्ये 2.64 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे उत्पादन 2018-19 मधील 19.33 दशलक्ष टनांच्या तुलनेत 19.01 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. 2018-19 मधील 22.82 दशलक्ष टनांच्या तुलनेत कांद्याचे उत्पादन 24.45 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे तर 2018-19 मधील 51.94 दशलक्ष टनांच्या तुलनेत बटाट्याचे उत्पादन 50.19 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.

देशाचे एकूण फलोत्पादन उत्पादन सन 2018-19 मध्ये 310.74 दशलक्ष टन्स एवढे आहे, जे सन 2018-19 मध्ये उत्पादनाच्या जवळपास आहे. सन 2017-18 च्या 96.45 दशलक्ष टनांच्या तुलनेत फळांचे उत्पादन अंदाजे 97.97 दशलक्ष टन्स एवढे आहे. उत्पादनात घट झाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन 183.17 दशलक्ष टन, कांदा 22.82  दशलक्ष टन; बटाटा 50.19 दशलक्ष टन आणि टोमॅटो 19.01 दशलक्ष टन इतके उत्पादन झाले आहे. 

वरील विश्लेषणावरून फळे व भाजीपाल्याच्या उत्पादनात सातत्याने चढउतार पाहण्यास मिळत आहे, परंतु भारतात फळे व भाजीपाला खालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढण्यास मोठा व संधी उपलब्ध झालेली आहे.

फळे व भाजीपाला उत्पादनाची वैशिष्टये :

अलीकडील काळात आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाने, औद्योगिक विकासामुळे, साक्षरतेच्या आणि दूरदर्शनच्या प्रसारामुळे इतकी वर्षे दुर्लक्षित राहिलेले हे क्षेत्र पुढे येत आहे. लोकांचा फळे खाण्याकडे कल वाढत आहे. फळांची लागवड हा उद्योगधंदा अधिक काळापर्यंत भरपूर पैसा मिळवून देतो, तर भाजीपाला लागवड पैशाची सदोदित गरज भागवितो. जगात दरवर्षी जवळजवळ 300 दशलक्ष टनांपेक्षा जास्त फलोत्पादन होते.

सद्य:स्थितीत फलोत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे. वाढत्या लोकसंख्येची फळांची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला फलोत्पादन 45 दशलक्ष टनांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. फळांत नैसर्गिकपणे काढणीनंतर खराब होण्याचे प्रमाण अधिक असते.

उदाहरणार्थ, आंबा, सिताफळ, स्ट्रॉबेरी, जांभूळ, फालसा, इत्यादी हे प्रमाण थोडे कमी असणारी फळे देखील आहेत, की जी थोडी जास्त दिवस टिकतात. उदाहरणार्थ, डाळिंब, कवठ, लिंबूवर्गीय फळे, इत्यादी.

महाराष्ट्राला विविधतेचे हवामान लाभले आहे. मुख्यत: महाराष्ट्राचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे चार विभाग पडतात. यामुळे महाराष्ट्रात नारळ, सुपारी, केळी, डाळिंब, बोर, द्राक्षे, काजू, कोकम, अंजीर, संत्री, चिकू, आंबा, पेरु, लिंबू इत्यादी फळांची लागवड यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रातील द्राक्षे, डाळिंब व आंबे परदेशात निर्यात होतात.

अलीकडे अवर्षणप्रवण क्षेत्रात चिंच, आवळा, सीताफळ, कवठ, बोर, जांभूळ, इत्यादी फळांची लागवड वाढत आहे व त्यास महाराष्ट्र शासनाचे पाठबळ लाभत आहे. भारताचे लोकसंख्यावाढीचा दर लक्षात घेता भाजीपाला उत्पादनात भारत अजूनही स्वयंपूर्ण नाही. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांना व शेतकऱ्यांना हे एक आवाहन आहे.

इतर पिकांच्या लागवडीपेक्षा भाजीपाला पिकांची लागवड शेतकरीवर्गाला फायदेशीर ठरते. कारण कमी कालावधीमध्ये इतर पिकांमध्ये जास्त फायदा मिळतो. महाराष्ट्रात भाजीपाल्याची शेती महत्त्वाची मानली जाते. येथील भाजीपाला भारतात महत्त्वाच्या बाजारपेठेत पाठविला जातो. अनुकूल हवामानामुळे वर्षातील तीनही हंगामात काही भाजीपाल्याची पिके घेतली जातात.

महाराष्ट्रातील हवामानाच्या विविधतेमुळे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. यामध्ये कांदा, लसूण, वांगी, मिरची, ढोबळी, मिरची, भेंडी, गवार, कोबी, फुलकोबी, नवलकोल, कारली, दोडका, दुधीभोपळा, तांबडाभोपळा, टरबूज, खरबूज, वेगवेगळ्या शेंगवर्गीय भाज्या, मेथी, पालक, कोथिंबीर, मुळा, गाजर, बटाटा इत्यादी प्रमुख भाजीपाल्यांचा समावेश करता येईल. फळांप्रमाणेच काही भाजीपाल्यांमध्येही औषधी गुणधर्म असल्याने तसेच त्यांच्या जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने व आपल्याकडील वैविध्यपूर्ण हवामानामुळे त्यांच्या लागवडीस मोठा वाव आहे.

फळे व भाजीपाला उत्पादन विक्री व्यवस्थापन :

फळे व भाजीपाला उत्पादकांची भरभराट किंवा फायदा केवळ किती उत्पन्न झाले यावर अवलंबून नसते, तर ते ह्रा उत्पादनाच्या यशस्वी विक्री व्यवस्थापनावर अवलंबून असते. जो पर्यंत ग्राहकापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादनात कमीत कमी मध्यस्थांच्या साखळीतून योग्य किंमतीत पोहोचत नाही, तो पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होणार नाहीत.

सध्याच्या डिजीटल युगामुळे, आर्थिक उदारीकरणामुळे आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग लहान होत चालले आहे. तसेच फळे व भाजीपाला यांच्या नाशवंतपणा यामुळे त्यांच्या उत्पादनाच्या विक्री व्यवस्थापनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. फळे आणि भाजीपाला यांच्या विक्री व्यवस्थापनामध्ये त्यानंतरच्या काढणीपासून ते त्यांची विक्री करेपर्यंत कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टीचा समावेश होतो. काढणीनंतर त्यांच्या अंतर्गत रचनेमुळे व बाह्र कारणांमुळे ती लगेच खराब होऊ लागतात.

काही फळे उदाहरणार्थ, डाळिंब, कवठ, लिंबूवर्गीय फळे काही दिवस टिकू शकतात, तर जांभाळू, स्ट्रॉबेरी, फालसा, इत्यादी फळे व काही भाजीपाला यांच्या तजेलदारपणा काढणीनंतर काही तासांतच कमी होऊन ती सुकू लागतात. त्यामुळे अशा फळांना बाजारभाव मिळत नाही. म्हणून त्यांची काढणी केल्याबरोबरच लवकरात लवकर बाजारात पोहोचली पाहिजेत. फळे आणि भाजीपाला, उत्पादकापासून तो ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत 30 ते 40 टक्के उत्पादनाची नासाडी होते.

फळांच्या प्रकारानुसार त्यांची परिपक्वता अवलंबून असते. फळे योग्य पक्वतेची असताना व भाजीपाला खाण्यायोग्य पक्वतेचा असताना त्यांची काढणी काळजीपूर्वक करावी. किडलेली, खरचटलेली, दबलेली फळे व भाज्या वेगळ्या कराव्यात.

त्यानंतर चांगल्या मालातून आकारमान, रंग, वजन, जाती, आकर्षकपणा आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन त्यांची प्रतवारी केली जाते. परकीय बाजारपेठेत विक्रीसाठी तसेच देशांतर्गत दूरच्या बाजारपेठांसाठी प्रथम दर्जाचा व चांगल्या गुणवत्तेचा माल पाठविला जातो. त्यांच्या वाहतुकीत पॅकिंगकडे विशेष लक्ष पुरविणे गरजेचे असते. अन्यथा वाहतुकीत त्यांची फार नासाडी होते.

भारतात एकूण फळे आणि भाजीपाल्यांच्या उत्पादनाच्या 92 टक्के मालाची वाहतूक रस्त्याने होते व 8 टक्के मालाची वाहतूक रेल्वेने होते. रेल्वेने होणारी वाहतूक ही रस्त्याच्या वाहतुकीपेक्षा 8-10 पटीने कार्यक्षम असली तरी रस्त्यावरील वाहतुकीमुळे माल घरोघरी पोहोचविणे शक्य होते.

मध्य-पूर्वेकडील देशांत माल पाठविताना सागरी मार्गाचा (जहाजाचा) वापर करतात, तसेच काही ठिकाणी विमांनाचादेखील वापर केला जातो. फळांची वाहतूक करताना किंवा त्यांची चढउतार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. अत्यंत घाई-गडबडीत केल्यास फळे एकमेकांना घासली जाऊन फळांवर डाग पडतात. अशा डाग पडलेल्या फळांना बाजारात मागणी नसते. तसेच भाजीपाल्याचेसुद्धा योग्य पॅकिग करुन वाहतुकीकडे बारीक लक्ष पुरविले पाहिजे, जेणेकरुन नुकसान होणार नाही.  

शेतकरी आर्थिक व हवामानविषयक अशा अनेक अडचणींवर मात करुन उत्कृष्ट फळे व भाज्यांचे उत्पादन करतो. पण त्यांना योग्य भाव न मिळाल्यास त्याचे आर्थिक नुकसान तर होतेच त्याचबरोबर त्यास मानसिक त्रासही सोसावा लागतो. फळे व भाज्या अत्यंत नाशवंत असल्याने काढणीनंतर त्यांची लवकरात लवकर विक्री करणे आवश्यक असते. फळांचे उत्पादन करणे शेतकऱ्यांच्या हातात असते. परंतु कोणत्या बाजारभावाने आपला माल विकला जाईल याची खात्री नसते. त्यासाठी शेतकऱ्याला बाजारपेठेची विस्तृत माहिती मिळवणे आवश्यक असते.

निरनिराळ्या बाजारपेठांत फळांची व भाज्यांची आवक केव्हा होते, कोणत्या फळाला मागणी जास्त असते, इत्यादी गोष्टींवर शेतकऱ्याला बारीक लक्ष ठेवावे लागते. त्यानुसार उत्पादनाची विक्री व्यवस्था करावी लागते. बाजारात मालाची आवक जास्त झाल्यास शेतमालाचे दर (भाव) कोसळतात. त्यामुळे शेतकऱ्याला पडेल त्या भावाने त्यांची विक्री करणे याशिवाय दुसरा मार्ग नसतो. म्हणूनच तर बाजारपेठेचा व विक्री व्यवस्थेच्या परिस्थितीनुसार अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

फळे आणि भाज्यांच्या विक्री व्यवस्थेत शक्यतो शेतकरी कधी स्वत: विक्री करत नाही. त्यांच्या विक्रीमध्ये शेतकरी, स्थानिक व्यापारी, घाऊक व्यापारी, दलाल, आडत्ये आणि सहकारी संस्था, इत्यादींचा समावेश असतो.

सर्व साधारणपणे मालाच्या किंमतीत बराचसा वाटा दलाल किंवा अडत्या खातो व शेतकऱ्यांची फसवणूक होते. पण शासनाने त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्या स्थापन करुन मालाच्या उघड लिलाव पद्धतीचा अवलंब केला आहे. अलीकडे सहकारी तत्वावर फळे आणि भाजीपाला विक्रीच्या संस्था स्थापन करुन फळांची विक्री व निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे व त्यास सरकार प्रोत्साहन देत आहे.

उच्च दर्जाची व चांगल्या गुणवत्तेची फळे आणि भाजीपाला यांची निर्यात केली जाते. आपल्या मालाला परकीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. भारतातून डाळिंब, द्राक्षे, आंबा इत्यादी फळे व कांदा, बटाटा, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी, इत्यादी भाज्यांची निर्यात केली जाते.

फळे व भाजीपाला घटकांचे वर्गीकरण :

भारतात तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाल्याची शेती केली जाते. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग हा भाजीपाला प्रमुख व्यवसाय म्हणून करतात, तर फळांची शेती ही व्यवसायासाठी केली जाते. तसेच त्यांपासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीसुद्धा करता येते. फळे व भाज्यांपासून पुढील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

 • आंबा : लोणचे, मुरंबा, पोळी, हवाबंद डब्यांत भरलेला रस, जॅम, चटणी, पन्हे, सरबत
 • केळी  : वेफर्स, पावडर, वाळलेले काप
 • पपई  : पेपेन, टूटीफ्रुटी, पेक्टीन
 • डाळिंब : अनारदाणा, सरबत, सिरप, वाईन, अनार
 • बोर   : सुकामेवा, चिवडा
 • संत्रा  : सरबत, सिरप, मार्मालेड, स्क्वॅश
 • आवळा : सुपारी, कँडी, पावडर, च्यवनप्राश, लोणचे, सरबत, रस
 • जांभूळ : रस, स्क्वॅश, सिरप, जेली, बियांची भुकटी
 • अंजीर : सुकविलेले अंजीर
 • पेरु    : सरबत, जेली, बर्फी
 • चिकू  : सरबत, कँडी, बर्फी
 • काजू  : सरबत, स्क्वॅश, सिरप, बर्फी, फेणी
 • द्राक्षे  : बेदाणा, शॅम्पेन, जॅम, सरबत
 • गाजर : लोणचे, मुरंबा, हलवा
 • टोमॅटो : केचअप, सॉस, प्युरी, पेस्ट
 • भाज्या : अनेक भाज्या वाळवून टिकविणे
 • कांदा : पावडर, फ्लेक्स
 • खरबूज : सरबत, कँडी

वरील प्रमाणे फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करता येते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा कमवता येतो. यामुळे भारतात विशेषत: महाराष्ट्रामध्ये फळे व भाजीपाल्यावर प्रकिया करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध आहे आणि त्याद्वारे लघु प्रक्रिया उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे वाटचाल करणे शक्य होणार आहे. गरज आहे फक्त फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून शेतीचे अधिकाधिक उत्पादन वाढवून देशाच्या उत्पन्नात हातभार लावणे.  

फळे व भाजीपाला प्रक्रिया करण्याचे फायदे :

 • फळे व भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढेल व विक्री होईल.
 • फळे व भाजीपाल्यांची नासाडी होणार नाही.
 • शेतीमालाचा दर्जा व किंमत यामध्ये स्थिरता आणता येते.
 • शेतीचे उत्पादन व उत्पन्न स्तर वाढविता येतो.
 • फळे व भाजीपाल्यापासून मोठ्या प्रमाणावर उद्योगावर उभा होऊ शकतो.
 • कुशल व अकुशल मजूरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
 • वाढती बेकारी व बेरोजगारींना काही प्रमाणात आळा बसवता येतो.
 • ग्रामीण भागाकडून होत असलेले शहराकडे वाढते स्थलांतर कमी करता येते.
 • फळे व भाजीपाला उद्योग स्थापन करण्यासाठी शासकीय योजनेतून कर्ज उपलब्ध होते.
 • शासकीय व निमशासकीय बँकेकडून कर्ज पुरवठा होऊ शकतो.
 • ग्राहकांना पसंतीनुसार उच्च दर्जाचा प्रक्रियायुक्त तयार केलेले पदार्थ मिळू शकतात.

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन :https://www.agrimoderntech.in

फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Leave a Reply