सध्या खरीप हंगाम चालू झाला असून शेतकरी बांधव पेरणीपूर्वी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व इतर शेतीउपयोगी निविष्ठा खरेदी करण्याच्या प्रयत्नात असून काही शेतकरी बांधव घरच्या घरी उपलब्ध असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे ठरविलेले असते.
सदरील बियाण्याची उगवण क्षमता, बियाण्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, बियाण्याचा दर्जा, गुणवत्ता ही कशी असावी याविषयी माहितीचा अभाव शेतकऱ्यांमध्ये असतो. यामुळे शेतकरी बांधवांना पेरणीपूर्वी बियाणे उगवणक्षमता तपासण्याची माहिती व्हावी, त्यांचेकडील उपलब्ध बियाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करता यावा, बियाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने बियाणे उगवणक्षमता तपासण्याचे तंत्र हा लेख तयार करण्यात येत आहे.
बियाणे उगवणक्षमता म्हणजे काय?
बियाण्यामधील बीजाकुराची जमिनीमध्ये पोषक वातावरणात परिपूर्ण रोपामध्ये रुपांतरीत करण्याच्या शक्तीस उगवण शक्ती म्हणतात.
पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, दर्जा, गुणवत्ता पाहणे यामुळे बियाण्याची जैविक, रासायनिक गुणधर्म समजून घेता येतात आणि बियाण्याची भौतिक आणि अनुवंशिक शुद्धता याची माहिती होते.
बियाण्याचे परिक्षण आणि उगवण :
बऱ्याच वेळा शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य बियाणे म्हणून पेरणीसाठी वापरतात. परंतु असे बियाणे पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातींच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते.
बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबरोबर पेरणीचा हंगामसुध्दा वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी चांगल्या प्रतीचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्यास सांगितले पाहिजे.
चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी त्यांची भौतिक आणि अनुवंशिक शुद्धता राखावी लागते. यासाठी बिजोत्पादन, बीज प्रक्रिया, बीज परिक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण, पॅकिंग आणि विक्री यामध्ये विशिष्ट प्रकारची योग्य ती काळजी घ्यावी लागते. बियाण्याची पेरणीसाठी उपयुक्तता पाहणे यालाच बीज परिक्षण असे म्हणतात. यामध्ये बियाण्याच्या वेगवेगळ्या बाबींची तपासणी करतात.
उदाहरणार्थ बियाण्याची उगवणक्षमता, बियाण्याचा जोम, बियाण्याचे आरोग्य, बियाण्यातील भेसळ म्हणजेच भौतिक शुद्धता, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण, यांच्या परिक्षणावरूनच बियाणे पेरणीसाठी योग्य किंवा अयोग्य ते ठरवितात.
बीज परिक्षणाचे प्रमुख उद्देश :
- बियाण्याची पेरणीसाठी योग्यता पहाणे
- बियाणे चांगले नसल्यास त्याची कारणे शोधणे.
- बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पहाणे आणि साठवणूकीसाठी योग्य आहे किंवा नाही ते ठरविणे.
- बियाण्याची गुणवत्ता ठरविणे.
- खरेदी केलेले बियाणे खूणचिठ्ठीवरील माहितीप्रणाणे त्या प्रतीच्या गुणवत्तेस उतरते का ते तपासणे.
- परिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध व चांगल्या प्रतीचे बियाणे पोहचविणे हा होय.
बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?
बियाण्याच्या एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्यांच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीतकमी 400 बी तपासावे लागते. ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.
प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मीनेटर) हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते.
बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला टॉवेल पेपर असे म्हणतात, ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.
बियाणे उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती :
सर्वसाधारणपणे बियाणे उगवण क्षमता तपासण्याच्या काही महत्त्वाच्या पद्धती ज्यामध्ये शोषकागदाच्या वरती उगवणक्षमता तपासणे, कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे, वाळूमध्ये उगवणक्षमता तपासणे इ. आहेत.
1) शोषकागदाच्या वरती (Top of paper) :
लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता याप्रकारे तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो.त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहिल याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मीनेटरमध्ये) उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्याप्रकारे आर्द्रता (70% पेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरीउगवण होण्यास पुरेसे होते.
2) कागदामध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे (Between paper) :
उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदामध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावे. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्स पेपर) खालच्या 3/4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मीनेटरमध्ये ठेवतात. ओले कागद बोटाने दाबले असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.
3) वाळूमध्ये उगवणक्षमता तपासणे (Sand) :
कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1 ते 2 सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावे. बियाच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मीनेटर मध्ये उगवणीसाठी ठेवतात.बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण 8-10 दिवसात बियाण्याची उगवण होते.
उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण:
साधारण किंवा चांगली रोपे (Normal Seedings): उगवणक्षमता चाचणीत 8-10 दिवसात बियाणे उगवते. ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रुपांतर होण्याची क्षमता असते. त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते.
या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतू थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपे सुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.
विकृत रोपे (Abnormal Seedings):
दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीत सुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्याच्या कोंब आणि मुळांना इजा पोहचलेली असते. तसेच बियाणांशी निगडीत असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.
कठीण बी (Hard Seed):
तिसरा प्रकार हा न उगवलेल्या बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर 8-10 दिवसात अजिबात उगवत नाहीत. यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाही. यांनाच कुचर किंवा कठीण बी म्हणतात. परंतु काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाही (Dormant seed). काही बी हे मेलेले (Dead seed) असतात. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ (Embryo) नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात.
अशाप्रकारे उगवलेल्या बियाणांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकांमध्ये प्रमाणिकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणीत केलेली आहे. बीजोत्पादीत केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता या प्रमाणकापेक्षा कमी असल्यास बीजोत्पादन नापास होऊ शकते. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10 टक्के पर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 10 टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये.
शेतकऱ्यांनी जे बियाणे पेरणीसाठी वापरावयाचे आहे अशा बियाणांचे परिक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित बीज प्रयोगशाळा, कृषि महाविद्यालये, कृषि विद्यालये यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी किंवा घरच्याघरी ओल्या पोत्यामध्ये वाळू (बारीक रेती), शोष कागदामध्ये अशा प्रकारची उगवण परिक्षा घेऊन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पाहू शकतात.
ज्या बियाण्याची उगवणक्षमता प्रमाणीत प्रमाणकापेक्षा जास्त आहे असेच बियाणे पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे एकरी अपेक्षीत रोपांची संख्या राखण्यात मदत होते पर्यायाने उत्पादनात वाढ होऊन फायदा होतो.
बियाणे उगवण क्षमता तपासल्यामुळे होणारे फायदे
- घरगुती बियाण्याची गुणवत्ता व दर्जा ओळखता येतो.
- अतिरिक्त बियाण्यावर खर्च कमी करता येतो.
- पेरणीसाठी उत्तम दर्जाचे व गुणवत्तेचे बियाणे उपलब्ध होते.
- कमी खर्चात चांगल्या प्रकारे बियाण्याची शुद्धता ओळखता येते.
डॉ. योगेश सुमठाणे, (M.Sc., Ph.D., M.B.A.), बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, Mob. +91 88062 17979