आरोग्याच्या दृष्टीने कडधान्ये उपयुक्त

आरोग्याच्या दृष्टीने कडधान्ये उपयुक्त

 181 views

उडीद, तूर, मूग, हरभरा, मसूर व मटकी हे प्रमुख कडधान्ये पिके असून कडधान्यांच्या डाळीचा उपयोग मानवी आहारात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळेच डाळवर्गीय पिकांचे विशेष महत्त्व शाकाहारी मानवाकरिता आहे. भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील लोकांच्या दैनंदिन आहारात सर्वसाधारण 10 ते 15 टक्के प्रथिने आणि 20 टक्के कार्बनयुक्त ऊर्जा ही कडधान्यातून मिळते. कडधान्यात प्रथिनाशिवाय कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्त्वाचे प्रमाणसुद्धा चांगले आहे.

कडधान्ये शरीरास पचण्यास सुलभ असून प्रथिने, लायसिन आणि रिबॉफ्लेवीन कडधान्यात उपलब्ध असतात. तूर आणि मसूर मधील प्रथिने लहान मूल व वयोवृद्धांना पचण्यास हलकी व सुलभ असतात. आहारात इटालिक अमायनो आम्ले ही मूलभूत व अत्यंत आवश्यक असतात, त्यांची उपलब्धतता कडधान्यांपासून होते. कडधान्यांच्या कोवळ्या हिरव्या शेंगाचा उपयोग भाजी म्हणून केला जातो तसेच जनावरांचा आहार म्हणूनही कडधान्य पिके उपयुक्त आहेत.

1) उडीद

उडीद हे एक द्विदल धान्‍य आहे. भारतात सर्वत कमी-जास्‍त प्रमाणात पिकते. याचे झाड सुमारे हातभर उंच असते. ह्या झाडाला शेंगा येतात. शेंगा जून झाल्‍यावर झाडे उपटून वाळवतात. उडीदाचा रंग काळा असतो, परंतु त्‍याची डाळ पांढरी असते. उडीद हा पौष्टिक व शीतल आहे. उडीदामुळे मांसाहाराची उणीव भरुन काढली जाते. उडीद हे मज्‍जातंतू व विषयवासना उत्‍तेजीत करतात. नुसत्‍या उडदामुळे पोटात गॅसेस धरतात. त्‍यामुळे त्‍याच्‍याबरोबर दुसरे एखादे धान्‍य वापरण्‍याची पद्धत आहे. तसेच पदार्थात हिंग, मिरपूड व आले घातले जाते. उडदाचे अनेक पदार्थ तयार करता येतात. इडली, डोसा, मेदूवडे, भजी, आमटी, चटणी, सांडगे, पापड, लाडू, वड्या वगैरे.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व :

 • उडीद डाळ आणि काळे उडीद पचायला थोडे जड, पण त्यात शरीराला आवश्यक असणारी कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने योग्य प्रमाणात आहेत.
 • उडीद डाळीच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते, स्टॅमिना वाढतो. उडीद डाळीत कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम यांचे प्रमाण उत्तम आहे.
 • उडीद डाळीच्या पिठाचे पोटीस सुजलेल्या सांध्यांवर लावल्यास आराम पडतो.
 • उडीद डाळ भिजवून वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे बॅक्टेरिआ आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ मेंदूसाठी पोषक ठरतात.

तक्ता क्र. 1 : उडीदातील 100 ग्रॅम दाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण

अ.क्र.घटकप्रमाण (100 ग्रॅम)
1ऊर्जा334 (किलो कॅलरी)
2प्रथिने24 ग्रॅम
3स्निग्ध पदार्थ1.3 (ग्रॅम)
 पिष्टमय पदार्थ56.6 (मि. ग्रॅम)
4कॅल्शियम140 (मि. ग्रॅम)
5लोह8.4 (मि. ग्रॅम)
6फॉस्फरस280 (मि. ग्रॅम)
7जीवनसत्त्व-ब 10.47 (मि. ग्रॅम)
8जीवनसत्त्व-ब 10.39 (मि. ग्रॅम)
9नायसीन2 (मि. ग्रॅम)

2) मूग

मूग हे सहज पचणारे कडधान्‍य आहे. हे भारतात सर्वत्र पिकते. हातभर उंचीचे व हिरवट शेंगा येणारे असे हे झाड आहे. मूग हे हिरवे किंवा पिवळे असतात. मुगाची डाळ मात्र पिवळी असते. फार जुन्या काळापासून मूग सर्वांना माहीत आहेत. मूग शीतल आहेत व वातुळ नाहीत. आख्‍खे मूग भिजत घालून, त्‍याला मोड आणून आहारात वापरतात. मूग भाजूनही त्‍याची उसळ करतात. मुगाच्‍या डाळीचेही अनेक पदार्थ करतात. आजारी व्‍यक्‍ती, वृद्ध व लहान मुले ह्यांना मूग डाळीची खिचडी देतात. ती पचायला हलकी आहे. त्‍यामुळे पोषण होऊन आरोग्‍य चांगले राहते. मुगाच्या डाळीची आमटी, उसळ, खिचडी, लाडू, वड्या, सांबार वगैरे अनेक पदार्थ तयार करता येतात.

आरोग्यदृष्ट्या महत्त्व :

 • मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते.
 • मुगाचा आहारात समावेश असल्यास अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.
 • मुगामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेह व लठ्ठपणासारखे रोग टाळता येतात.

तक्ता क्र. 3 : मूगातील 100 ग्रॅम दाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण

अ.क्र.घटकप्रमाण (100 ग्रॅम)
1ऊर्जा334 (किलो कॅलरी)
2प्रथिने24 ग्रॅम
3स्निग्ध पदार्थ1.3 (ग्रॅम)
 पिष्टमय पदार्थ56.6 (मि. ग्रॅम)
4कॅल्शियम140 (मि. ग्रॅम)
5लोह8.4 (मि. ग्रॅम)
6फॉस्फरस0.30 (मि. ग्रॅम)
7जीवनसत्त्व-ब 10.47 (मि. ग्रॅम)
8जीवनसत्त्व-ब 10.39 (मि. ग्रॅम)
9नायसीन2 (मि. ग्रॅम)

3) हरभरा

हरभरे व हरभऱ्याची डाळ भारतात सर्वत्र वापरली जाते व डाळीचे पीठ हे विविध अन्नपदार्थात वापरले जाते. हरभऱ्याची उसळ, डाळीचे विविध पदार्थ, हरिताची मिठाई व अनेक भाज्‍यांत व्‍यंजन म्‍हणून उपयोग केला जातो. हरभरे खाण्यास पौष्टिक आहेत. हरभऱ्याच्‍या पानांत लोह असते. त्‍याची भाजी करतात. पानांवरील देव गोळा करतात. त्‍याला आंब असे नाव आहे. ही आंब अपचन, अतिसार यावर गुणकारी आहे. रक्तदोषाच्या रोगावर अंकुर आलेले बियाणे हे औषधे म्हणून उपयोगी आहे. हिरव्या पानातून मिळणारे मॉलिक आणि ऑक्झालिक ॲसिड पोटांच्या विकारांवर उपाय म्हणून वापरता येते.  

आरोग्यदृष्ट्या महत्त्व :

 • रक्तदोषाच्या रोगावर अंकूर आलेले बियाणे हे औषध म्हणून उपयोगी आहे.
 • हिरव्या पानातून मिळणारे मॉलिक आणि ऑक्झालिक ॲसिड पोटांच्या विकारांवर उपाय म्हणून वापरता येते.

तक्ता क्र. 4 : हरभऱ्यातील 100 ग्रॅम दाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण

अ.क्र.घटकप्रमाण (100 ग्रॅम)
1ऊर्जा372 (किलो कॅलरी)
2प्रथिने20.8 ग्रॅम
3स्निग्ध पदार्थ5.6 (ग्रॅम)
4कॅल्शियम202 (मि. ग्रॅम)
5लोह5.8 (मि. ग्रॅम)
6नायसीन2.9 (मि. ग्रॅम)
7थायमीन0.30 (मि. ग्रॅम)
8जीवनसत्त्व-क3 (मि. ग्रॅम)
9रीबोफ्लेवीन0.15 (मि. ग्रॅम)

4) तूर

तुरीचे पीक भारतात गुजरात व दक्षिण भारतात पुष्‍कळ येते. तसेच महाराष्‍ट्रात सुद्धा अधिक प्रमाणात घेतले जाते. तुरीचे झाड दोन अडीच हात उंच वाढते. सुरती तुरीची डाळ उत्‍कृष्‍ट मानली जाते. तुरीची डाळ पित्‍तकर व किंचित वातुळ आहे. तुरीचे वरण भातावर घेतल्‍यावर त्‍यावर साजूक तूप घ्‍यावे, म्हणजे वात धरत नाही. तुरीच्‍या डाळींचे वरण, आमटी, सांबार वगैरे पदार्थ करतात. तुरीत प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. तुरीतील प्रथिने लहान मुलांना वृद्धांना पचण्यास हलकी असतात.   

तक्ता क्र. 5 : तुरीतील 100 ग्रॅम दाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण

अ.क्र.घटकप्रमाण (100 ग्रॅम)
1ऊर्जा335 (किलो कॅलरी)
2प्रथिने22.3 ग्रॅम
3स्निग्ध पदार्थ1.7 (ग्रॅम)
4कॅल्शियम7.3 (मि. ग्रॅम)
5लोह5.8 (मि. ग्रॅम)
6नायसीन2.9 (मि. ग्रॅम)
7थायमीन0.45 (मि. ग्रॅम)
8रीबोफ्लेवीन0.19 (मि. ग्रॅम)

5) मसूर

मसूर हे द्विदल धान्‍य पीक आहे. याची झाडे हातभर उंचीची असतात. आख्‍खे मसूर काळसर रंगाचे असतात, परंतु ह्याची डाळ मात्र गुलबट, केशरी रंगाची असते. मसूर पौष्टिक व उष्‍ण आहेत. हे धान्‍य वातुळ आहे. मसुराची उसळ, भात, आमटी वगैरे पदार्थ करतात. याच्‍या पिठाची शेव, लाडू, बर्फी वगैरे करतात.

6) मटकी

मटकी हे एका हंगामात पूर्ण होणारे व लागवडीतील कडधान्य आहे. मटकीची वेल किंवा झुडूप असतो. या पिकाची भारतात सर्वत्र लागवड केली जाते. मटकीची मुळे मादक असतात. ज्वरात मटकी पथ्यकर आहे. मटकीचा जेवणात भाजी म्हणून वापर करतात. तसेच मोड आलेल्या मटकीचा उपयोग स्वयंपाकात भाजी म्हणून करतात.

Sp-concare-latur

कडधान्यामुळे होणारे फायदे :

 • विविध पीक पद्धतीमध्ये कडधान्यांचा समावेश केल्यामुळे उत्पादन व जमिनीचा कस सुधारतो.
 • मानवी आहारातील प्रथिनांची गरज कडधान्यापासून भागविले जाते.
 • कडधान्याच्या डाळीचा उपयोग दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
 • कडधान्यापासून विविध प्रकारच्या डाळींची निर्मिती करता येते.
 • कडधान्यापासून ‍निरनिराळे प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती करता येते.
 • कडधान्ये निर्मितीत पदार्थांचे सेवन केल्यामुळे शारीरिक सुदृढता वाढण्यास मदत होते.
 • कडधान्यामुळे एखादा लघु उद्योग (मीनी डाळ) निर्मितीला चालना मिळते.

आरोग्याच्या दृष्टीने कडधान्ये उपयुक्त हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: