प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर
मूग व उडीद हे खरीप हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. मूग पिकावर हवामानातील अनिश्चित बदल किंवा ढगाळ वातावरणामुळे मावा, फुलकिडे, ब्लिस्टर भुंगे, पाने खाणारी स्पिंजीड अळी, ठिपक्याची बोंडअळी, पांढरी माशी, फुलकिडे इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. मूग व उडीद पिकांवरील किडींचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते, परिणामी शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होते. किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मूग व उडीद पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते.
कीड नियंत्रणाचा उद्देश :
- मूग व उडीद पिकांवरील प्रमुख किडींची ओळखणे स्पष्ट करणे.
- मूग व उडीद पिकांवरील किडींचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करणे.
- मूग व उडीद पिकांचे किडींपासून संरक्षण करणे.
मूग व उडीद पिकांवरील किडींची ओळख व नियंत्रण
मूग व उडीद पिकांवरील मावा, ब्लिस्टर भुंगे, तुडतुडे, पाने खाणारी स्पिंजीड अळी, ठिपक्याची शेंग अळी, शेंग अळी, पांढरी माशी व फुलकीड इत्यादीचा प्रादुर्भाव होतो, अशा किडींची ओळख व नियंत्रण खालील प्रमाणे करण्यात येत आहे.
1) मावा (Aphid, Aphis craccivora Koch)
प्रौढ व पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषण करतात त्यामुळे पाने आकसतात. झाडाचा जोम कमी होऊन वाढ खुंटते. तसेच ही कीड शरीराद्वारे चिकट गोड पदार्थ बाहेर सोडते. तो झाडावरून पसरून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पानाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. हा गोड स्त्राव खाण्यास मुंगळे बहुसंख्येने प्रादुर्भावग्रस्त झाडावर आढळतात.
नियंत्रण :
- आजूबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा.
- शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30 ईसी 10 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
2) ब्लिस्टर भुंगे (Blister bettle, Mylabris phalerata)
प्रौढ भुंगेरे फुलकळी व फुले अधाशीपणे खातात. एका दिवसात एक भुंगा 20 ते 30 फुलांना हानी पोहोचवितो. पावसाळ्यात ही कीड उग्र स्वरूप धारण करते.
नियंत्रण :
- उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी, कारण या किडीचे अंडी व अळी अवस्था जमिनीमध्ये असते.
- पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसताच हाताने किंवा कीड पकडण्याच्या जाळीद्वारे प्रौढ पकडून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावा.
3) तुडतुडे (Leaf hopper Empoasca kerri)
प्रौढ व पिल्ले पानातून रस शोषण करतात. त्यावेळी विषारी लाळ पानाच्या पेशीत सोडतात. त्यामुळे पाने फिक्कट पिवळी पडून सुकतात व तांबडी पडतात. कीडग्रस्त पाने खालच्या बाजूने आकसतात. कधी- कधी वाळून गळतात. झाडाची वाढ खुंटून उत्पादनामध्ये घट येते.
नियंत्रण :
- आजूबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा.
- शिफारस केलेल्या अंतरावरच मूग व उडीद पिकाची लागवड करावी.
- फोरेट 10 जी 15 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे ओलावा असतांना जमिनीतून मिसळून द्यावे.
4) पाने खाणारी स्पिंजीड अळी (Spingid larva, Acherontia styx Weotwood)
अळ्या अधासी पणे पाने कुरतळून खातात. त्यामुळे झाड पर्णहीन होऊन पिकाची अतोनात नुकसान होते.
नियंत्रण :
- पिकावरील आढळून आलेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
- क्लोरॅन्ट्रॉलिप्राल 18.5 एस.सी. 2 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून मिसळून पिकावर फवारणी करावी.
5) ठिपक्याची शेंग अळी (Maruca testuadis)
पतंग मध्यम आकाराचा व गर्द तांबड्या रंगाचा असून अळी काळपट रंगाची व काळे चट्टे असलेली असते. अळी पाने जाळे करून गुंडाळते व त्यामध्ये फुलांचे तुरे सुद्धा गुडाळते व आत राहून त्यावर खाते यामुळे उपत्न्नात घट येते.
नियंत्रण :
- प्रादुर्भावग्रस्त पाने अळीसहीत नष्ट करावेत.
- रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
6) शेंग अळी (American bollworm Helicoverpa armigera Hubner)
शेंगा लागल्यानंतर अळ्या शेंगाना छिद्र पाडून आतील दाणे खातात. याची लागण ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात पिकावर होते.
नियंत्रण :
- पीक काढणीनंतर खोल नांगरट करावी. पिकांचे अवशेष/धसकटे गोळा करून नष्ट करावीत.
- आजूबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा.
- शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी.
- मूगाच्या चार ओळीनंतर एक ओळ ज्वारीची पेरणी करावी, जेणेकरून त्यांचा पक्षी थांबे म्हणून उपयोग होईल.
- क्लोरॅन्ट्रॉलिप्राल 18.5 एस.सी. 2 मि.ली / 10 लिटर, फ्ल्यूबॅडॅमाईड 39.35 एस.सी. 2 मि.ली /10 लिटर पाण्यातून मिसळून पिकावर फवारणी करावी.
7) पांढरी माशी (White fly, Bemisia tabaci G.)
पांढरी माशी ही पिकावरीलप्रौढ व पिल्ले पानातील रस शोषण करीत असल्यामुळे झाडाचा जोम कमी होतो. तसेच आपल्या शरीरावाटे पानावर गोड चिकट पदार्थ सोडते त्यावर काळी बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. झाडाची वाढ खुंटते. मुगामध्ये ही कीड पिवळ्या चट्टयाचे विषाणू या रोगाचा प्रसार करते. त्यामुळे मुगाची पाने पिवळी पडून वाळतात व उत्पादनामध्ये घट येते.
नियंत्रण :
- फोरेट 10 जी 10 किलो /हेक्टर याप्रमाणे ओलावा असताना जमिनीतून मिसळून द्यावा.
- क्लोरॅन्ट्रॉलिप्राल 18.5 एस.सी. 2 मि.ली / 10 लिटर पाण्यातून मिसळून पिकावर फवारणी करावी.
8) फुलकिडे (Thrips)
फुलकिडे फुलामध्ये राहून पृष्ठभाग खरडतात व त्यातून निघणारा रस शोषण करतो. त्यामुळे फुले गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त फुलावर शेंगा धरल्यातरी त्यातील दाणे आकसलेले व लहान आकाराचे असतात. झाडाची वाढ खुंटते व उत्पादनामध्ये घट येते.
नियंत्रण :
- शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी
- क्लोरॅन्ट्रॉलिप्राल 18.5 एस.सी. 2 मि.ली / 10 लिटर पाण्यातून मिसळून पिकावर फवारणी करावी.
मूग व उडीद पिकांवरील किडींचे नियंत्रण केल्यामुळे होणारे फायदे :
- मूग व उडीद पिकांचे किडींपासून संरक्षण होते.
- मूग व उडीद धान्याची प्रत व दर्जा उत्तम राखला जातो.
- कीडविरहित धान्यास चांगला दर मिळतो.
प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर
टीप : शेतकरी बांधवांनी मूग व उडीद पिकांवर रासायनिक औषधांची फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकाचे नाव, त्याचे योग्य प्रमाण, पाण्याची क्षमता, फवारणी करतांना आवश्यक काळजी घ्यावी, तसेच जे कीटकनाशक वापरणार आहोत त्यास शासनाने बंदी घातलेले कीटकनाशक वापरू नये, कारण कोणत्याही अन्य दुष्परिणामाशी वेबसाईट ॲडमीन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.