प्रक्रिया उद्योग उभारणी व्यवस्थापन

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

प्रक्रिया उद्योग उभारणीचे व्यवस्थापन  म्हणजे काय ? हा प्रश्न बहुतांशी उद्योजकांना ज्ञात आहेच परंतु उद्योगाचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केल्यास उद्योग कमी वेळेत चांगल्या प्रकारे भरभराटीला येऊ शकतो.

प्रक्रिया उद्योग उभारणी व्यवस्थापनाचे टप्पे :

व्यवसाय कल्पनेची निर्मिती,  संकल्पित उद्योगक्षेत्राबद्दल माहिती मिळविणे, उद्योगाची निवड, संघटना प्रकाराची निवड, उत्पादित वस्तूची निवड करणे, तांत्रिक व वित्तीय बाबींचा अभ्यास करणे, व्यवसायाची नोंदणी व स्थापना, भांडवल उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पायाभूत सेवा-सुविधांची व्यवस्था, यंत्रसामग्री व साधनांची व्यवस्था, कर्मचारी नियुक्ती, कच्च्या मालाची खरेदी व उत्पादन व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन करणे आदी घटकांची माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

1) व्यवसाय कल्पनेची निर्मिती :

कोणताही यशस्वी व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यासाठी आणि त्यानंतरही व्यवसायाची स्पर्धात्मकता टिकविण्यासाठी एका चांगल्या व्यवसाय कल्पनेची आवश्यक असते. तथापि, कोणतीही चांगली व्यवसाय कल्पना, उद्योजकाच्या मनात अचानक उद्भवत नाही, तर व्यवसाय कल्पनेची निर्मिती ही उद्योजकाचे अपार कष्ट, प्रयत्न आणि सर्जनशीलतेचा परिणाम असतो.

2) संकल्पित उद्योगक्षेत्राबद्दल माहिती मिळविणे :

उद्योगाची निवड करण्याआधी उद्योगांबद्दलची माहिती असणे अथवा ती मि ळवणे आवश्यक असते. यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, सरकारी विभाग, स्थानिक उद्योजक, व्यापारी, स्थानिक बाजारपेठ, इंटरनेट, प्रसारमाध्यमे इत्यादींच्या साह्याने आवश्यक माहिती मिळवता येते. उद्योग सुरु करताना त्या त्या भागातील स्थानिक लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणे तितकेच महत्वाचे आहे. स्थानिक लोकांच्या अवाक्यापेक्षा जास्त किमती ठेऊ नये. ही बाब उद्योजक आणि ग्राहक या दोघांच्याही हिताची असल्याने प्रक्रिया उद्योग निश्चित करताना या गोष्टीला प्राधान्य देण्यात आले पाहिजे.

कडधान्य प्रक्रियेवर आधारित बेसन लाडू, शेव, चकली उत्पादन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अंदाज घेणे गरजेचे आहे. परिसरात अजून कोणी प्रतिस्पर्धी स्पर्धक असतील तर त्यांच्या मालाचा दर्जा व किंमत यांचाही अभ्यास केला पाहिजे. आर्थिक गणित किफायतशीर ठेवायचे असल्याने उत्पादन खर्च व विक्रीची किमत यामधील गुणोत्तर प्रमाण सांभाळणे आवश्यक असते. जास्तीचे उत्पादन घ्यायचे असेल तर तेवढ्या प्रमाणत कच्च्या मालाची उपलब्धता होणे आवश्यक आहे. नियोजित सदर उद्योगाच्या परिसरात कच्चा माल उपलब्ध झाल्यास जास्त सोयीचे पडते, कारण त्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही कमी होतो आणि संकलनासाठी खर्च होणारा वेळही वाचतो.

3) उद्योगाची निवड :

उद्योगांबद्दलची माहिती मिळविल्यावर उद्योग किंवा स्वयंरोजगाराची निवड करणे सोपे होते. उद्योग किंवा स्वयंरोजगार निवडताना स्वतःचे शिक्षण, अनुभव, कौशल्य, आवड, आपल्या व्यक्तिमत्त्वातला विशेष गुण, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, गुंतवणूक क्षमता व बाजारपेठ, आपल्याला किती उत्पन्न अपेक्षित आहे, या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

4) संघटनाप्रकाराची निवड :

प्रस्तावित व्यवसायासाठी मालकी, भागीदारी किंवा खाजगी मर्यादित कंपनी यांपैकी कोणता संघटनाप्रकार असावा हे ठरवावे लागेल. संघटनाप्रकार हा उद्योगातील कार्याचे प्रमाण व उद्योगातील जोखमीचे प्रमाण यावर अवलंबून असतो. व्यवसायसंघटनाचा प्रकार एकदा ठरला की, त्यानुसार नोंदणीच्या औपचारिकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी लागतात.

5) उत्पादित वस्तूची निवड करणे :

उद्योगाची निवड करून त्याबद्दलची माहिती मिळविल्यानंतर त्या उद्योग क्षेत्रात कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे करणे फायदेशार आहे याचा विचार करून उत्पादनाची निवड करावी लागते. उदा. एखाद्या भागात कडधान्य प्रक्रिया उद्योग सुरू करायचे ठरविल्यास यातील डाळ निर्मिती, बेसन निर्मितीसारखे किंवा खाद्यपदार्थांचे उत्पादन उद्योग किंवा पुरवठा सेवा व्यवसाय अशा अनेक पर्यायांपैकी एखाद्या पर्यायाची निवड करायची असते. यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू/ सेवांचे उत्पादन करता येईल? या उद्योग-व्यवसायासाठी आपल्याकडे आवश्यक ती संसाधने उपलब्ध आहेत का अथवा आपल्याला त्यांची उपलब्धता करता येईल का? संकल्पित उत्पादनातून चांगला परतावा मिळेल काय? अशा महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करावा लागतो.

6) तांत्रिक व वित्तीय बाबींचा अभ्यास करणे :

प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी त्याच्याशीसबंधित तांत्रिक व वित्तीय बाबींचा अभ्यास करणे आवश्यक असते. यासाठी संकल्पित उद्योगासाठी आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री, आवश्यक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या उपलब्धतेचे मार्ग, तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचे पुरवठादार, संकल्पित उद्योगासाठी आवश्यक भांडवलाचे प्रमाण, अर्थसाहाय्य उपलब्धतेचे मार्ग आणि अर्थसाहाय्य योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे व इतर कायदेशीर बाबी इ. गोष्टींचा तपशीलवार अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावे लागतात.

7) व्यवसायाची नोंदणी व स्थापना :

अलीकडील उदारीकरणाच्या काळात लघुउद्योगांची नोंदणी करण्याचे काम अवघड किंवा गुंतागुंतीचे राहिलेले नसले तरी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रांकडे आपल्या लघुउद्योगांची नोंदणी करण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असते. उद्योगांच्या भावी नियोजनाच्या दृष्टीने शासनाला लघुउद्योगांची केलेली गोंदणी उपयुक्त ठरते. सर्वच उद्योग वा व्यवसायांना काही परवाने आवश्यक असतात. उदा, संबंधित पालिकेचा ना हरकत परवाना, शॉप अॅक्ट लायसन्स इ. उद्योगव्यवसायाच्या स्वरूपानुसार कोणकोणते परवाने मिळवावे लागतील हे निश्चित होते. काही परवाने उद्योग-व्यवसायाची नोंदणी करतानाच मिळवावे लागतात; तर काही नोंदणीनंतर गरजेनुसार मिळवावे लागतात.

7) भांडवल उभारणी :

निवड केलेल्या उद्योगास एकूण किती स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज आहे याची आकडेवारी निश्चित झाल्यानंतर भांडवल उभारणीची व्यवस्था करण्यासाठी पावले उचलावी लागतात. शक्य असल्यास उद्योगासाठी स्वतःचा भांडवल उभारावे किंवा बँका किंवा वित्तीय संस्थांमार्फत भांडवल उभारणी करावी. बँका किंवा वित्तीय संस्थांमार्फत भांडवल उभारणी करण्यासाठी त्यांच्याकडे कर्ज मागणीसाठी रितसर अर्ज करावा लागतो.

8) प्रकल्प अहवाल तयार करणे :

प्रकल्प अहवालामुळे व्यवसायाचे पुढील विशिष्ट काळातील चित्र आपल्यापुढे उभे असल्यामुळे उद्योग-व्यवसायात त्याप्रमाणे वाढ करण्याबाबतचे धोरण ठरविता येते. प्रकल्प अहवालात नमूद केल्याप्रमाणे त्या प्रमाणात व्यवसायाची वाढ होत आहे की नाही हे समजते.

9) पायाभूत सेवा-सुविधांची व्यवस्था :

कोणत्याही उद्योगासाठी शेड, वीज, पाणी, जागा, वाहतूक व इतर सुविधांची आवश्यकता असते, कारण या पायाभूत सुविधांच्या आधारेच उत्पादनकार्य सुरू करता येते. कडधान्य प्रक्रिया उद्योगांची स्थापना ग्रामीण भागात करायची असल्यास त्या ठिकाणी अशा पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का ते पाहावे लागते.

10) यंत्रसामग्री व साधनांची व्यवस्था :

उद्योग उभारणीचे प्राथमिक टप्पे पार पाडल्यावर यंत्रसामग्री व साधनांची खरेदी करण्याची व्यवस्था करावी लागते. चांगल्या दर्जाची यंत्रसामग्री नेमकी कोठे मिळेल? त्यांची उत्पादनक्षमता किती आहे? अशा स्वरूपाची चौकशी करून व्यवसायासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री खरेदी केली जाते आणि यानंतर उत्पादन स्थळावर तिची स्थापना केली जाते.

यंत्रसामग्रीची व साधनांची निवड करताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतात :

 • करावयाच्या उत्पादनासाठी अशा यंत्रसामग्रीची उपयुक्तता/अनुरूपता
 • यंत्रसामग्रीची किंमत
 • यंत्रसामग्रीच्या साहाय्याने होणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण
 • यंत्रसामग्रीसाठीच्या तंत्रज्ञानाची उपलब्धता
 • अशी यंत्रसामग्री हाताळू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता
 • यंत्रसामग्रीचा उत्पादक देत असलेल्या विक्रीपश्चात सेवा
 • यंत्रसामग्रीच्या सुट्या भागांची उपलब्धता
 • यंत्रसामग्रीच्या नियमित देखभाल-दुरुस्तीची सुविधा
 • यंत्रसामग्री अद्ययावत करण्याची संभाव्यता

11) कर्मचारी नियुक्ती :

प्रक्रिया उद्योगामध्ये उत्पादन करण्यासाठी उद्योगाच्या स्वरूपानुसार कुशल, अकुशल /अर्धकुशल कर्मचारी नेमावे लागतात. उद्योग व उत्पादनाचे स्वरूप, उद्योगाची उत्पादनक्षमता यांचा विचार करून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

उद्योगाची स्थापना, संचालन व विस्तार यात मनुष्यबळाची भूमिका महत्त्वाची आहे. उत्पादन, विपणन, जनसंपर्क अशी सर्वच कार्ये मनुष्यबळाच्या साहाय्याने पार पाडली जातात. आपल्या उद्योगातील मनुष्यबळाच्या गरजेचा विचार विचार करून उद्योजकाला मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत निर्णय घ्यावा लागतो. योग्य त्या प्रकारची कुशल माणसे योग्य ठिकाणी नियुक्त करून त्यांच्यांकडून आपल्याला हवे तसे काम करून घ्यावे लागते. चुकीच्या माणसांची नियुक्ती चुकीच्या ठिकाणी केली तर अपेक्षित काम होत नाही.

वारंवार मनुष्यबळ बदलत जाणे ही उद्योगाच्या दृष्टीने हानिकारक गोष्ट असल्याने कर्मचारी काम सोडून दुसरीकडे जाणार नाहीत व एकनिष्ठेने काम करतील याकडे लक्ष द्यावे लागते. कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन, आर्थिक सुरक्षा, पगारी सुट्या, कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवादी संबंध प्रस्थापित करणे, प्रशिक्षण देणे, त्यांच्या समस्यांचे निवारण करणे, कार्यक्षा नियंत्रण ठेवणे अशा मार्गानी कर्मचाऱ्यांना प्रेरित करून त्यांच्याकडून अपेक्षित कामे करून घेता येतात. आपल्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जात आहे, असे कर्मचाऱ्यांना दिसून आले तर ते आपल्या उद्योग संस्थेसाठी निलेने काम करतात.

एखाद्या कडधान्य प्रक्रिया उद्योगाचा विचार करता, छोट्या उद्योगांसाठी स्थानिक भागातील कर्मचारी कामावर ठेवणे परवडू शकते, तर मोठ्या उद्योगांना दूरवरच्या ठिकाणांवरून कुशल व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे परवडू शकते.

12) कच्च्या मालाची खरेदी :

कोणता माल उत्पादनासाठी योग्य आहे? आवश्यक ती कच्च्या मालाची बाजारपेठ कोठे आहे? दर्जेदार, परंतु कमी किमतीचा असलेला कच्चा माल कोठे मिळेल? याबाबतचा विचार करून कच्च्या मालाची खरेदी करावी लागते.

शेतकऱ्यांकडून आपल्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी हंगामाच्या शेवटी म्हणजे पिकाचे उत्पादन होताच करणे योग्य ठरते. या काळातच प्रकल्पाच्या नफ्याच्या उद्देशाने कमीतकमी दरामध्ये जास्तीत जास्त कच्च्या मालाचा पुरवठा प्रक्रिया उद्योगासाठी होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांशी शेतातून पीक निघण्याअगोदरच संपर्क साधून कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत खात्री करून घ्यावी.

कच्च्या मालाची खरेदी करताना साधारणपणे खालील बाबींची पडताळणी करणे आवश्यक असते. कच्चा माल म्हणून वापरायचे कडधान्य पीक हे कीड व रोगग्रस्त नसावे, अशा पिकावर जास्त प्रमाणात किडी व रोगनाशक रसायनाची मात्रा वापरली गेलेली नसावी, कचा माल हा त्यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून विकण्यासाठी योग्य दर्जाचा असावा. पिकाची काढणी पिकाच्या परिपक्वतेनंतरच केलेली असावी आणि त्याची हाताळणी आणि प्रतवारी योग्य पद्धतीने केलेली असावी. पिकाची आवश्यकतेनुसार योग्य वाळवणूक आणि साठवणूक केलेली असावी. पिकाचे योग्य पॅकिंग होऊन त्याची वाहतुकीदरम्यान जास्त हेळसांड  झालेली नसावी.

13) उत्पादन व्यवस्थापन :

उत्पादन हे महत्त्वाचे व्यावसायिक कार्य आहे, त्यामुळे त्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे लागते. उत्पादन कार्य सुरळीतपणे पार पाडणे व उत्पादनाचा दर्जा उत्तम ठेवणे हा उत्पादन व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश असतो. उत्पादन व्यवस्थापनालाच आपण कार्य व्यवस्थापन असे म्हणू शकतो. या ठिकाणी आपण उत्पादनात वस्तू निर्मितीबरोबरच सेवा प्रदान करण्याच्या उपक्रमचाही समावेश करणार करू शकतो.

उत्पादन व्यवस्थापन करताना घ्यावयाची दक्षता :

 • व्यवसायाची धोरणे व उद्दिष्टे
 • उत्पादनाचे स्वरूप व प्रकार
 • उत्पादनाच्या मागणीचे स्वरूप व कालावधी
 • उद्योगाची वित्तीय क्षमता
 • उद्योगातील मनुष्यबळ क्षमता
 • साधनसामग्रीवरील नियंत्रण
 • उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान
 • बाजारपेठेतील परिस्थिती (तेजी-मंदी, स्पर्धा इ.)
 • विपणन व्यवस्था

14) विपणन व्यवस्थापन करणे :

उत्पादित मालाची विक्री किती होते यावर कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते. उद्योजक हे वस्तू व सेवांचे उत्पादन करतात ते आपले उत्पादन ग्राहकांना विकून त्यातून पैसा मिळविण्यासाठी म्हणून उत्पादकाने विक्री व्यवस्थेचे योग्यप्रकारे नियोजन करणे आवश्यक ठरते.

बाजारपेठ सर्वेक्षणाद्वारे ग्राहक व त्यांच्या गरजांबाबत सतत संशोधन करून व त्यानुसार आवश्यक ते बदल करून उत्पादन करावे लागते. हे उत्पादन ग्राहकांपर्यंत वेळेवर पोहोचविण्यासाठी वितरण व्यवस्थापनाचा आधार घेतला जातो. वितरक/ मध्यस्थांमार्फत घाऊक व्यापाऱ्यांकडे आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून अंतिम ग्राहकांकडे माल पोहोचविला जातो. उद्योजकाने मध्यस्थांमार्फत उत्पादन वितरित न करता जर अंतिम ग्राहकांपर्यंत थेट माल पोहोचवला तर होणारा नफा वाढतो.

प्रक्रिया उद्योग उभारणीचे व्यवस्थापन केल्यामुळे होणारे फायदे :

 • व्यवसायाचे ‍नियोजन आणि कल्पनेची निर्मिती करणे सुलभ होते.  
 • संकल्पित उद्योगक्षेत्राबद्दल माहिती मिळविता येते.
 • प्रक्रिया उद्योगाची निवड करून संघटना प्रकार निवडता येतो.
 • उत्पादित वस्तूची निवड करणे, तांत्रिक व वित्तीय बाबींची माहिती मिळते.
 • व्यवसायाची नोंदणी व स्थापना करणे सोयीस्कर येते.
 • भांडवल उभारणी करून प्रकल्प अहवाल तयार करणे शक्य होते.
 • पायाभूत सेवा-सुविधांची व्यवस्था, यंत्रसामग्री व साधनांची व्यवस्था करणे शक्य होते
 • प्रशिक्षित व कुशलकर्मचारी नियुक्ती करता येते.
 • कच्च्या मालाची खरेदी व उत्पादन व्यवस्थापन करता येते.
 • उत्पादीत मालाचे विपणन व्यवस्थापन करता येते.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

Prajwal Digital

Leave a Reply