शेळीपालन हा ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय असून तो भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: महाराष्ट्रात शेतीबरोबर शेळीपालनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. या व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आर्थिक उन्नतीचा मार्ग देणारा व्यवसाय आहे. मात्र, यात आधुनिक व सुधारित तंत्रज्ञान वापरणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शेळीपालन व्यवसाय फारसा यशस्वी ठरत नाही
आपला देश हा कृषिप्रधान असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी व मेढीपालनास विशेष महत्त्व आले आहे. मर्यादित स्वरूपातील या व्यवसायाकडे अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. कमी खर्च व तुलनेने कमी कष्ट यातून जास्त उत्पन्न मिळत असल्याने या व्यवसायाकडे अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी व महिलांचा कल अधिक वाढला आहे तसेच शेळीपालन व्यवसायाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून शेतकरी पाहत आहेत.
शेळीपालन व्यवसायाचे चोख नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानास मेहनत व चिकाटीची जोड दिल्यास शेळीपालनातून किफायतशीर उत्पादन मिळून चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. राज्यात मांसाची मागणी व उत्पादकता यात मोठी तफावत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे अधिक दर्जेदारपणे शेळ्यांचे संगोपन करून जास्तीत जास्त उत्पादन स्तर या व्यवसायातून वाढवणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.
शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पद्धतीने शेळ्या व मेंढ्यांचे व्यवस्थापन, पैदास रोगनियंत्रण, आहार व्यवस्थापन, संगोपन पद्धती, शेळ्यांच्या विविध प्रजाती, शेळ्यांचे रोग व उपाययोजना, लसीकरण, गोठ्यांच्या पद्धती, विविध प्रकारचे पालाखाद्य, सरकारी अनुदानित योजना, व्यवसायाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, शेळ्यांची निवड व विक्री व्यवस्थापन, शेळीच्या दुधाचे महत्त्व, विमा योजना, उपयुक्त लेंडीखत अशी एकत्रित माहितीचा उपयोग शेळीपालन शेतकऱ्यांना होतो यामुळे शेळीपालन एक बहुउपयोगी व्यवसायाने म्हणून पुढे येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहूभूधारक शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शेळीपालन व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामुळे त्यांचे शेळीपालन व्यवसायातून उत्पन्न वाढावे, आधुनिक पद्धतीने शेळीपालन व्यवसाय व्हावा, या उद्देशाने शेळीपालन एक बहुउपयोगी व्यवसाय हा लेख तयार करण्यात येत असून याद्वारे शेळीपालनाचे सुधारित पद्धतीने व्यवस्थापन करून पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत शेळीपालनातून अधिक उत्पादन निश्चित मिळू शकेल.
शेळीपालन व्यवसाय का करावा?
- शेळीपालन व्यवसाय कमी गुंतवणूकीत कोणत्याही व्यक्तीस अतिशय चांगल्या प्रकारे करता येतो.
- शेळीपालन व्यवसाय शेतीपूरक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
- शेळीपालनातून दुधाचे उत्पादन होते.
- शेळीपालतून उत्तम दर्जाचे मांस उत्पादन मिळते.
- बहुतांशी लोकांच्या आहारात बकरीच्या मांसाचा उपयोग केला जातो.
- शेळीपालनातून चांगल्या प्रकारचे लेंडीखत शेतीचा कस सुधारण्यासाठी उपयोग होतो.
- मांस विकल्यानंतर उर्वरित कातडीला सुद्धा चांगला दर मिळतो.
- बकरीच्या कातडीपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात.
- विविध शासकीय योजनांचा लाभ शेळीपालनासाठी घेता येतो.
शेळीपालन व्यवसायात संधी व वाव :
- शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.
- खाद्याचे, शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोट्या मध्येच पुरवला जातो. अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळ्यांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात, यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.
- भारतात असणाऱ्या शेळ्यांची संख्या सुमारे 123 दशलक्ष इतकी आहे. तर जगात एकंदर 620 दशलक्ष शेळ्या आहेत. असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. या देशातील उत्पन्न बघू जाता, दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त 3 टक्के दूध, 45 ते 50 टक्के मांस व 45 टक्के कातडी प्राप्त होते. भारतात शेळ्यांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर इतके आहे.या दुधाला मागणी असत नाही.
शेळीपालन व्यवसायातून होणारे फायदे :
- शेळीपालन व्यवसायअल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.
- काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्या मध्ये दोनदा वितात यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
- शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देण्याची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.
- पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकून तो उभा करता येऊ शकतो.
- शेळी हा प्राणी काटक असतो, त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवून घ्यायची असते.
- शेळ्यांसाठीखाण्यास निकृष्ट प्रतीचाही चारा चालतो, त्याचे रुपांतर त्या दूध व मांसात करतात.
- शेळीचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.
- शेळ्यांचा आकार लहान असल्याने त्यांना निवाऱ्यास जागा कमी लागते.
- शेळ्यांच्या विष्ठेचे उत्तम खत म्हणून उपयोग होतो.
- बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त असून ती दिवसेंदिवस वाढत आहे.
- शेळ्यांचे शिंगापासून व खुरापासून वस्तू बनतात.
- बकरीचे मांस खाण्यास चविष्ट असून मांसहार करणाऱ्या लोकांचे आवडीचे खाद्य आहे.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर, मो.नं. 9689644390