सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण

सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे गळीतधान्य विशेषत: तेलवर्गीय पीक आहे. सोयाबीन पिकांवर हवामानातील प्रतिकूल बदलामुळे पांढरी माशी, पाने गुंडाळणाऱ्या अळ्या, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, उंट अळी, फुलकिडे, खोडमाशी इ. प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. किडींचे योग्य वेळेवर नियंत्रण न केल्यास झाडांची वाढ खुंटते, पानावर छिद्र पडतात, त्यामुळे हरिद्रव्य शोषण क्रियेस अडथळा निर्माण होतो, परिणामी सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान होते. सदर नुकसान टाळण्यासाठी किडींचे एकात्मिक नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते.  

सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण या लेखाद्वारे शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकांवरील किडींची ओळख होईल. किडीमुळे होणारे नुकसान समजून घेता येईल. कीड नियंत्रणासाठी करावे लागणारे रासायनिक उपाय याची माहिती होईल. सोयाबीन वरील किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करणे शक्य होईल. सदरील लेख हा महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  

सोयाबीन पिकांवरील किडींची ओळख व नियंत्रण

1)  पांढरी माशी (Bemisia tabaci) :

ही अतिशय महत्‍वाची कीड असून पांढऱ्या रंगाची असते या किडींच्‍या पंखावर मेणकट पदार्थ असतो. पिल्‍ले प्रौढ पानातून रस शोषून घेतात. त्‍यामुळे पाने पिवळी पडून गळतात. शिवाय फुले व शेंगाही गळण्‍याची शक्‍यता असते. माशी शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ स्‍त्रावते. त्‍यावर काळ्या रंगाची बुरशी वाढते त्‍यामुळे प्रकाश-संश्‍लेषण क्रियेत अडथळा येतो. त्‍यामुळे  झाड अशक्‍त होते. प्रौढ माशी पिल्‍ले झाडाच्‍या कोवळ्या पानांतील व खोडातील रस शोषताना आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचा प्रसार होत असतो. या किडींचा उपद्रव तीव्र स्‍वरूपाचा असल्‍यास नुकसान बऱ्याच प्रमाणात होते.

नियंत्रण :

  • पांढरीमाशी या किडींच्‍या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी.
  • कडुलिंबाच्‍या पाल्‍याचा किंवा निंबोळीचा अर्क 5 टक्के किंवा तेल 2 टक्के फवारावे.
  • मिथिईल डोमेटॉन- 200 मिली औषध 500 लीटर पाण्‍यात मिसळून एक हेक्‍टरवर गरजेप्रमाणे फवारावे.

2) पाने गुंडाळणाऱ्या अळ्या (Sylepta derogata) :

या किडींच्‍या पतंगाला पांढऱ्या रंगाचा फिक्‍कट ठिपका असतो. आळी तपकिरी करड्या रंगाची असून पाठीमागे निमुळती असते. फक्‍त आळी पिकांचे नुकसान करते. प्रथम अळी पानांचा वरचा पापुद्रा पोखरते. अळ्या मोठ्या झाल्‍यावर पानांचा गुंडाळी करून आत राहते. पानांचा रस  शोषण करते व त्‍यामध्ये आपली उपजीविका करते. त्‍यामुळे पाने करपून आकसतात व वाळून जातात. या किडीचा प्रादुर्भाव जास्‍त झाल्‍यास पीक करपल्‍यासारखे दिसते म्‍हणजेच ही अळी प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत अडथळा करते. सोयाबीनच्‍या उत्‍पादनात घट होते.

नियंत्रण :

  • पाने गुंडाळणाऱ्या अळीचा उपद्रव दिसून येताच ट्रायझोफॉस 16 मी. ली. प्रति 10 लि पाण्‍यातून फवारावे. त्‍यामुळे किडीचे उत्तम प्रकारे नियंत्रण दिसून येते.
  • या किडीचे पतंग रात्रीचे वेळी प्रकाश आपल्‍याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्‍याने सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत 100 वॅट विजेचा बल्‍प चालू ठेवून त्‍याच्‍या खाली राकेल मिश्रित पाण्‍याचे पसरट भांडे ठेवल्यास किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात मरतात.

3)  तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera litura) :

या किडीचा पतंग मध्‍यम आकाराचा असून पुढचे पंख तपकिरी रंगाचे असतात व त्‍यावर फिकट पिवळसर चट्टे व रेषा असतात, मादी पतंग रात्रीच्‍या वेळी पानाच्‍या खालच्‍या बाजूस शिरेजवळ पुंजक्‍याने अंडी घालते. या अंड्यातून 2 ते 3 दिवसांनी अळ्या बाहेर पडतात. या नवीन लहान अळ्या सुरूवातीलाच समूहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. या लहान अळ्या हिरव्‍या असून त्‍यांचे डोके काळ असते व शरीराच्‍या दोन्‍ही बाजूस काळे ठिपके असतात. पूर्ण वाढलेली अळी गडद तपकिरी किंवा हिरवट पांढऱ्या रंगाची असते. मोठ्या अळ्या पानावर मोडे छिद्र पाडून खातात. जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणवर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाल्‍लेली व फक्‍त शिल्‍लक राहिलेली दिसतात. फुले व शेंगा लागल्‍यानंतर या अळ्या ते सुद्धा खातात.

नियंत्रण :

  • या किडीचे नियंत्रणासाठी क्‍लोरोपायरीफॉस 20 टक्के 20 मि.ली. किंवा कडुलिंबाच्‍या अर्काची 5 टक्के फवारणी करावी.
  • वरील कोणत्‍याही भुकटीची धुरळणी हेक्‍टरी 20 हेक्‍टरी किलो याप्रमाणे करावी. 

4)  पाने पोखरणारी अळी (Aproaerema modicella) :

पतंग लहान, राखाडी रंगाचा असून पुढील पंख मागच्‍या पंखापेक्षा गडद असतात. पुढच्‍या पंखाच्‍या वरच्‍या कडेला पांढरा चट्टा असतो तर मागच्‍या पंखाच्‍या कडा केसाळ असतात. पूर्ण वाढ झालेली अळी मध्‍यम आकाराची व पाठीमागे निमुळती होत गेलेली असते.

अळीचे शरी हिरवट किंवा तपकिरी व डोके चमकदार काळ्या रंगाचे असते, सुरूवातीला अळी पानाच्‍या वरच्‍या बाजूने पान पोखरून आत शिरते. आठवडाभर आत राहून बाहेर निघते व पानावर कप्‍पा बनवून त्‍यात राहते, यानंतर आजूबाजूची पाने एकमेकाला जोडून बाहेर त्‍यामध्‍ये राहून उपजीविका करते. प्रादुर्भावग्रस्‍त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसे झाडाला शेंगा  लहान लागतात व शेंगा भरत नाहीत.

नियंत्रण :

  • एक हेक्‍टर सोयाबीनच्‍या क्षेत्रासाठी एका प्रकाश सापळयाचा वापर फायदेशीर ठरतो. 
  • एका झाडावर दोन अथवा त्‍यापेक्षा जास्‍त अळ्या आढळून आल्‍यास डेकामे‍थ्रीन 8 मि.ली. 10 ली. पाण्‍यात, सायपरमोथ्रिन 25 टक्के प्रवाही 50 मि. लि. 10 लिटर पाण्‍यात मिसळून प्रति हेक्‍टरी फवारणी करावी.
  • पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचे प्रमाण थोडेफार असेल तर, 2 किलो पाण्‍यात मिसळणारी 50 टक्‍के कार्बारिल भुकटी 500 लिटर पाण्‍यातून फवारावी. 

5) केसाळ अळ्या (Spilosoma oblique) :

सोयाबीन या पिकावर कोणत्‍याही प्रकारच्‍या फवारव्‍या अथवा धुरळव्‍या वेळच्‍या वेळी केल्‍या गेल्‍या केसाळ आळ्यांसारख्‍या किडीदेखील या पिकाला उपद्रव करायला लागतात. ह्या आळ्या बदामी रंगाच्‍या असतात. त्‍यांच्‍या शरीरावर बारीक-बारीक तंतुमय केसांची वलय सहजरीत्‍या पाहीले तरी ओळखून येतात. म्‍हणून त्‍यांना केसाळ अळ्या असे म्‍हणतात. ह्या अळ्या सोयाबीनची पाने कुरतडून खातात व पानांच्‍या शिरा शिल्‍लक ठेवतात. ह्या आळ्यांना सुरवंट म्‍हणतात. केसामुळे त्‍यांना अस्‍वल अळ्या म्‍हणतात.

नियंत्रण :

  • केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच त्‍वरीत औषधांच्‍या फवारण्‍या अथवा धुरळण्‍या कराव्‍यात. कारण ह्या अळ्या लहान असतानाच त्‍यांचे चांगल्‍या प्रकारे नियंत्रण करता येते.
  • नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 16 मि.ली. पाण्‍यात मिसळून फवारावे.

6)  उंट अळी (Gesonia geina) :

सोयाबीनवर विविध प्रकारच्‍या उंट अळ्या आढळून येतात. अळीचा रंग फिकट हिरवा असून शरीरावर मध्‍यभागी निळसर हिरवी रेषा असते व रेषेच्‍या कडा पांढऱ्या असतात. अळीच्‍या शरीराच्‍या दोन्‍ही बाजूस फिकट पिवळी रेषा असते. उंट अळ्यांच्‍या लहान अळ्या पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून खातात. त्‍यामुळे पानाचा फक्‍त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्‍यावर पानांना छिद्र पाडून खाते. मोठ्या प्रमाणांत प्रादुर्भाव झाल्‍यास झाडाची संपूर्ण पाने खाऊन फक्‍त शिराच शिल्‍लक ठेवतात. याशिवाय फुले व शेंगासुद्धा खातात.

नियंत्रण :

  • या अळीच्‍या नियंत्रणासाठी इन्‍डोकार्ब 6.6 मि.ली. किंवा क्‍लोरएंट्रानिल 18.5 ईसी 2 ते 3 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्‍यात मिसळून एक हेक्‍टर मध्‍ये फवारावे.
  • 5 टक्‍के निंबोळी अर्क किंवा 5 टक्‍के  निंबोळी अर्काबरोबर शिफारस केलेल्‍या कीटकनाशकाची अर्धी मात्रा वापरावे.

7)  फुलकिडे (Thrips tabaci) :

सोयाबीन पीक फुलोऱ्याच्‍या अवस्‍थांमध्‍ये असताना ह्या किडीचे अस्तित्‍व स्‍पष्‍ट दिसून येते. पाऊसमान तसेच जास्‍त तापमान अशा  हवामानाची झाली कि फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडी पाने खातात व आतील रस शोषून घेतात. या उपद्रवामुळे पाने चिरडू लागतात. फुलकिडीची एक मादी साधारणतः 4 ते 6 दिवसांच्‍या काळात 50 ते 60 अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडताच पिल्‍ले पूर्ण वाढ होईपर्यंत पानांतील व कळ्यामधील रस शोषण करतात. फुलकिडीचा आयुष्‍यक्रम हा 25 दिवसाचा आहे.

नियंत्रण :

  • या किडींपासून संरक्षण करण्‍याचा हमखास उपाय म्‍हणजे सोयाबीनची पेरणी पाऊस पडल्‍यावर शक्‍य तितक्‍या लवकर जुलैच्‍या आत करावी.
  • फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्‍यास 100 मिली लिटर फॉस्‍फॅमिडॉन 85टक्के प्रवाही किंवा 500 मिली लीटर डायमोथोएट 30  टक्के प्रवाही पाण्‍यात मिसळून फवारावे.

8)  खोडमाशी (Melanagromyza sojae) :

सोयाबीन पिकावर सुद्धा ही कीड उपजीविका करू शकते. याकिडीची अंडी, पांढरट चपटी, लांबट आकाराची असून पानाच्‍या खालच्‍या बाजूस मध्‍य शिरेजवळ 3 ते 5 पानावर आढळून येतात. तिला पाय नसतात. काप घातलेल्‍या ठिकाणी खोड सडू लागते. त्‍यावर अळी उपजीविका करते व सोयाबीन पिकाचा शेंडा हळूहळू सुकून जातो. व सोयाबीन पिकाचा शेंडा हळूहळू सुकून जातो. अळीची अवस्‍था साधारणतः एक आठवडाभर टिकते. पूर्ण वाढ झालेली अळी तिथेच शंखी अवस्‍थेत जाते. ही शंखी तांबड्या रंगाची दिसते मुळखोड कुजल्‍यामुळे येणाऱ्या फुटव्‍यांवर देखील या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. उत्‍पादनावर विपरीत परिणाम होतो.

नियंत्रण :

  • या किडींपासून संरक्षण करण्‍याचा हमखास उपाय म्‍हणजे सोयाबीनची पेरणी पाऊस पडल्‍यावर शक्‍य तितक्‍या लवकर जुलैच्‍या आत करावी.
  • किडीमुळे रोपट्यांची मर मोठ्या प्रमाणात होत असल्‍यामुळे रोपांची प्रमाणित संख्‍या विचारात घेऊन थोड्या फार बियाण्‍यांचा ज्यादा वापर केला तरी चालेल पेरणीला उशीर झाल्‍यास ही कीड हमखास येतेच.
  • पेरणीनंतर 7 ते 10 दिवसाच्‍या अंतराने ट्रायझोफॉस 40  टक्के प्रवाही 10 मि. ली. 10 पाण्यात मिसळून फवारणी दोन वेळा फवारावे.

टीप : शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकांवर रासायनिक औषधांची फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकाचे नाव, त्याचे योग्य प्रमाण, पाण्याची क्षमता, फवारणी करतांना आवश्यक काळजी घ्यावी, तसेच जे कीटकनाशक वापरणार आहोत त्यास शासनाने बंदी घातलेले कीटकनाशक वापरू नये, कारण कोणत्याही अन्य दुष्परिणामाशी वेबसाईट ॲडमीन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण फायदे :

  • शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकांवरील किडींची ओळख होईल.
  • सोयाबीन पीक कीडमुक्त होईल.
  • किडीमुळे होणारे नुकसानाची माहिती होईल.
  • सोयाबीनच्या किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करता येईल.  
  • सोयाबीन उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल.

प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर

Prajwal Digital

1 thought on “सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण”

Leave a Reply