रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय

रेशीम शेती व्यवसाय दुग्ध आणि कुक्कुटपालन व्यवसाय या सारखाच शेतीस पूरक व्यवसाय आहे. रेशीम शेती व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात, कमी भूधारण क्षेत्रात आणि शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साधन-सामुग्रीत सहजपणे करता येतो.

रेशीम शेती व्यवसायात नवीन तुती लागवड पद्धत व नवीन कीटक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय कमी मजुरी खर्चात मोठ्या प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग रेशीम शेती व्यवसायात चांगल्या प्रकारे करून घेता येतो. शेतकऱ्यांचा कमीत कमी वेळेत महिन्याअखेर जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळविता येते.

रेशीम शेती उद्योगासाठी तुतीची लागवड, पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. तुती लागवड ही पट्टा पद्धतीने केल्याने तुती पाल्याच्या उत्पन्नात वाढ होते. पट्टा पद्धतीस अत्यंत कमी पाणी लागते. 1 एकर ऊसाकरिता लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत सर्वसाधारण 3 एकर तुतीची चांगल्या प्रकारे जोपासना करता येते.

तुतीची लागवड एकदा केल्यानंतर सर्वसाधारणपणे 15 वर्षे पर्यंत तुतीचे झाड जिवंत राहत असल्याने, दरवर्षी तुतीचे पिकाची लागवड करावयाची गरज लागत नाही. त्यामुळे लागवडीच्या खर्चात इतर पिकांप्रमाणे वारंवार खर्च करावयाची आवश्यकता नाही. तुतीस एप्रिल, मे महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती झाडाचे नुकसान होत नाही तर पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांस देखील रेशीम शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येतो.

रेशीम शेती व्यवसायाचे महत्त्व :

रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा व शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. या उद्योगापासून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत आहे. भारतात प्रामुख्याने रेशीम उद्योग हा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा पारंपारिक रेशीम उद्योग करणारी राज्य म्हणून उल्लेख केला जातो. 

महाराष्ट्रात देखील रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. रेशीम उद्योग घेणाऱ्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण अंदाजे 20 ते 22 जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग शासनामार्फत यशस्वीपणे राबविला जात आहे. 1 हेक्टर बागायत तुतीपासून वर्षांत अंदाजे 790 मनुष्याला दिवसभर रोजगार निर्मिती होते.    

भारतात रेशीम उद्योगाचे परंपरागत व्यावसायिक स्वरूप ते आधुनिक व शास्त्रीय तंत्रज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित व्यवसाय असा फार मोठा बदल गत 68 वर्षांतील असून त्याचे सर्व श्रेय केंद्रीय रेशीम मंडळास जाते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर रेशीम उत्पादनात चीनचा प्रथम क्रमांक आहे, तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रेशीम सूताची उपलब्धता, प्रतवारीनुसार मागणी व उत्पादन खर्च यांची सांगड घालावयाची असल्यास केवळ कोष उत्पादकता वाढविणे हे एकच ध्येय न ठेवता उत्पादन खर्च किमान करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

रेशीम शेती व्यवसायाची गरज :

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति किलो रेशीम सूत उत्पादन खर्च 1000/- रुपये तर राष्ट्रीय स्तरावर तोच 1200 ते 1400/- रूपयाच्या दरम्यान पडतो. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी उत्पादन खर्च म्हणून कमीत कमी राखणे आता आपल्याला क्रमप्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर आपल्या सूताची प्रतवारी किमान 2-अ ते 4-अ अशा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत तरी किमान पोहचविणे गरजेचे आहे.

राज्यात सुधारित दुबार संकरित (डबल हायब्रीड) वाणांचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर मोठ्या प्रमाणात करावा लागेल. तसेच या वाणांच्या उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना अंडीपुंजे पुरविण्यापेक्षा थेट चॉकी (शिशु अळ्या) पुरविणे आता गरजेचे वाटते. अलीकडच्या काही वर्षांत चीनमध्ये फक्त चॉकीच पुरविल्या जातात, तर भारतात बहुतांशी अंडीपुंजे पुरविली जातात.

महाराष्ट्रात रेशीम उद्योगाची सुरुवातच 1960 च्या दशकात झाली पण खरी सुरुवात सन 1970 च्या दशतकात झाली. त्या वेळची अळी संगोपनाची प्रचलित पद्धत म्हणजे अळ्यांना लाकडी ट्रेमध्ये ठेऊन तुतीची व्यक्तिगत पाने लागवडीतून तोडून आणून त्यांना खाद्य म्हणून देणे, या पांरपारिक पद्धतीस प्रारंभिक पायाभूत गुंतवणूक तर अधिक होतीच. परंतु अळी संगोपन प्रक्रियेस लागणारा वेळ, मजूरी खर्च, श्रम वगैरे अधिक लागत असे, शिवाय त्या काळच्या प्रचलित तुती वाणे तसेच लागवड पद्धती यापासून फारसा पाला उत्पादनही मिळत नसे. तद्नंतरच्या चार दशकात दिवसेंदिवस मजूरांची उपलब्धता कमी कमी होत गेली आणि कोष उत्पादन खर्च वाढतच चाललेला आहे. 

व्यावसायिकदृष्टया किफायतशीर नैसर्गिक रेशीम उत्पादन प्रामुख्याने तुती रेशीम अळी, टसर रेशीम अळी, मुगा रेशीम अळी व ऐरी रेशीम अळी यांपासून मिळते. एकूण रेशीम उत्पादनात तुती रेशीम अळीचा सुमारे 90 टक्के वाटा असतो. रेशीम अळ्यांना त्यांच्या आवडीच्या झाडांची पाने खावयास घालून, अळ्या कोषावस्थेत गेल्यानंतर त्यांचे कोष मारून त्यांवर प्रक्रिया करून रेशीम धाग्याचे उत्पादन करतात.

रेशीम शेती व्यवसाय का करावा?

रेशीम शेती उद्योग ग्रामीण व शहरी भागातील कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या व जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता येतो.

दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हा व्यवसाय चांगल्या उत्तम प्रकारे करता येतो.

तुतीची आंतरमशागत मजूरांऐवजी अवजाराने केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत करुन घेता येते.

मजूरी खर्चात व वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. तुतीची पट्टा पद्धतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेऊन उत्पन्नात भर घालता येते.

जागतिक रेशीम उत्पादन :

जागतिक स्तरावरील रेशीम उत्पादनात सन 2019 नुसार चीन देश प्रथम क्रमांकावर असून रेशीम उत्पादन 158400 मे.टन इतके असून यानंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून रेशीम उत्पादन सन मध्ये 30348 मे.टन इतके झाले आहे. यानंतर रेशीम उत्पादनात उझबेकिस्तान 1256, थायलंड 7.20, ब्राझील 650, व्हिएतनाम 923, उ. कोरिया 365, इराण 170, जपान 189, बांगलादेश 78, तुर्कस्तान 76, इंडोनेशिया 66, मादागास्कर 30, सिरिया 6.25, टयुनिशिया 18, बल्गेरिया 9.77, फिलीपाईन्स 1.82, इजिप्त 1.02, द. कोरिया 34 व कोलंबिया 11.77 इ. देशांचा क्रम लागतो. यामुळेच जागतिक स्तरावर रेशीम उत्पादनास भारताला चांगला वाव व संधी आहे यामुळे अधिकाधिक रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन जागतिक स्तरावर अव्वल स्थानाचा मान मिळविण्यासाठी भारताला खूप संधी निर्माण झालेली आहे.

भारतातील रेशीम उत्पादन :

भारतात रेशीम उत्पादनात महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत अग्रेसर रेशीम सूत्र उत्पादन 273.00 मे.टन असून दुसऱ्या स्थानावर कर्नाटक असून याचे उत्पादन 9645.00 मे.टन एवढे असून त्याचखालोखाल देशात आंध्र प्रदेश 6485.00 मे.टन, पश्चिम बंगाल 2450.00 मे.टन, केरळ 14.00 मे.टन, मध्य प्रदेश 187.00 मे.टन, उत्तर प्रदेश 186.00 मे.टन,  उत्तराखंड 29.00 मे.टन, जम्मू-काश्मीर 138.00 मे.टन, आसाम 31.00 मे.टन, बिहार 750.00 मे.टन, मणिपूर 12.00 मे.टन, ओरिसा 19.00 मे.टन, तामिळनाडू 1602.00 मे.टन, मिझोराम 40.00 मे.टन असा रेशीम सूत उत्पादन राज्याचा क्रम लागतो. असे असताना सुद्धा महाराष्ट्रात अजून देखील पारंपरिक पद्धतीनेच रेशीम शेती व्यवसाय केला होता यामुळे प्रती हेक्टरी रेशीम उत्पादकता कमी आहे ते वाढविणे गरजेचे आहे.  

तुती उत्पादनाचे इतर फायदे :

 • तुतीचा वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
 • तुतीचा वाळलेला पाला इंधन म्हणून वापरता येतो. तसेच खत म्हणून सुद्धा वापरता येतो.
 • संगोपनात वापरलेला तुतीचा चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
 • तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते. या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
 • तुतीच्या पानांमध्ये व फळांमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोष प्युपा आयुर्वेद दृष्टया महत्वाचा आहे.
 • विदेशात तुतीच्या पानांचा चहा ‘मलबेरी टी’ करतात, शिवाय वाईन निर्मिती करता येते.
 • कोष मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

रेशीम शेती उद्योगामुळे होणारे फायदे :

 • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सहज करता येणारा शेतीपूरक व्यवसाय आहे.
 • ग्रामीण भागातील वाढती बेकारी व बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात रेशीम व्यवसायामुळे कमी करता येते.
 • रेशीम शेतीपासून उत्तम दर्जाचा धागा निर्मिती करून चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ मिळविता येतो.
 • रेशीम अळ्यांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून एक ते दीड लिटर दूध वाढते.
 • रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय असल्याने रेशीम शेती हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात, कमी भूधारण क्षेत्रात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साधन-सामुग्रीत सहजपणे करता येत असल्यामुळे रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. येणाऱ्या काळात रेशीम शेती व्यवसायापासून चांगल्या प्रकारे किफायतशीर उत्पादन मिळेल शकेल.  

रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय हा लेख आपणास आवडला असल्यास याविषयी आपले मत, विचार, आणखीन इतर शेतीपूरक व्यवसायाबद्दल असलेली उत्सुकता, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसमूहापर्यंत हा लेख शेअर करून सहकार्य करावे.   

Prajwal Digital

Leave a Reply