तुती अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया

वेगवेगळ्या पिकाची अभिवृद्धी ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही फळ झाडांची अभिवृद्धी बियापासून रोपे तयार करुन केली जाते. तर काही पिकात शाखीय पद्धतीने अभिवृद्धी केली जाते.

शाखीय पद्धतीमध्ये अनेक उपप्रकार आहेत. या सर्व उपप्रकारापैकी योग्य पद्धतीने अभिवृद्धी केल्यास उत्पादन चांगले मिळू शकते. काही पिकात अभिवृद्धीच्या अनेक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामध्ये उती संवर्धन तंत्रज्ञान हे तर जैव-तंत्रज्ञानाचे प्रमुख अंग असून याचा परदेशातील आणि भारतीय शास्त्रज्ञानी अलीकडच्या काळात झपाट्याने विकास घडवून आणला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती  उत्पादन आमुलाग्र बदल घडून आला आहे.

अभिवृद्धीच्या प्रमुख दोन पद्धती आहेत. यामध्ये बियाण्यापासून अभिवृद्धी आणि शाखीय अभिवृद्धी यांचा समावेश होतो. शाखीय पद्धतीमध्ये पिकाच्या अवयवांचा उपयोग करुन अभिवृद्धी केली जाते. या अवयवामध्ये फांद्या, खोड, पाने यांचा वापर करुन अभिवृद्धी केली जाते. रेशीम उत्पादनात तुती पिकाची लागवड करिता असताना अभिवृद्धी छाट कलमापासून केली जाते.

तुती अभिवृद्धी :

छाट कलम पद्धतीने अभिवृद्धी करीत असताना छाट कलमाचे एकूण तीन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे:

) हार्ड कटिंग : या प्रकारात फाटे कलमांची फांदी पक्व आणि टणक असते.

) सेमिहार्ड वूड कटिंग :  या प्रकारात फाटे कलमाची फांदी अर्धवट पक्व अवस्थेत असते.

) सॉफ्ट वूड कटिंग :  यास मृदुकाष्ठ कलम असेही म्हणतात. या प्रकारात कोवळी आणि अपक्व अशी फांदी कलम करण्यासाठी वापरली जाते. छाट कलम करुन द्राक्षे अंजिर, फालसा तसेच तुतीची ही अभिवृद्धी केली जाते.

छाट कलमासाठी जिवंत, निरोगी आणि जोमदार वाढणाऱ्या झाडावरुन फांद्या निवडून कलम करण्यासाठी वापराव्यात. 3 ते 5 डोळे राखून छाट कलम केले जाते. छाट कलम करत असताना लवकर आणि भरपूर मुळे येण्यासाठी संजिवकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.

तुतीची अभिवृद्धी प्रामुख्याने छाट कलमाद्वारे केली जाते, परंतु छाट कलमाने अभिवृद्धी करित असताना तुतीच्या पक्व झाडापासून छाट काढले जातात. हे छाट काढत असताना तुतीचे झाड कमीत कमी एक वर्षांचे असणे आवश्यक असते. छाट कलम घेत असताना रोग व कीडमुक्त छाट द्यावेत. तसेच छाटावर दोन ते तीन डोळे असणे आवश्यक आहे. छाट काढल्यानंतर लगेचच बीजक्रिया करावी. बीजप्रक्रियेसाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या रासायनिक औषधाचा वापर करण्यात यावा. जेणेकरुन छाट कलमे योग्यरित्या वाढण्यास मदत होईल. छाट कलमांना लवकर मुळ्या फुटण्यासाठी आय.बी.ए. या संजीवकाचा वापर करावा.

तुती बेणे निर्मिती :

तुतीचे बेणे तयार करण्यासाठी वाणांची निवड करताना बाल्यावस्थेतील कीटक संगोपनासाठी एस- 36 अधिक पाला देणारी व्हिक्टरी-1 अथवा व्ही. -1, एस.- 1635, कमी पाण्यात चांगल्या प्रतीचे उत्पादन देणारी एस. – 13, एस – 34 इ. वाणाचे छाट तुतीच्या अभिवृद्धीसाठी वापरण्यात यावे. अभिवृद्धीसाठी वापरण्यात येणाऱ्या तुतीच्या बेण्याचे वय किमान 6 ते 8 महिने असणे आवश्यक आहे. तसेच ते कीड व रोगमुक्त असावे.

तुती बेणे तयार करणे :

 • तुतीची लागवड तुतीची बेणे अथवा रोपवाटिकेत (नर्सरीत) कलमे तयार करुन केली जाते. बागायती तुती लागवडीसाठी एम-5, एस-30, एस-36, व्ही-1 अशा सुधारीत जातीच्या बेण्याचा वापर करावा.
 • पावसाळ्याकरिता एस-13, एस-34 या तुतीच्या जातीचा वापर करावा. बेणे तयार करण्यासाठी तुतीच्या झाडाचे वय 6 ते 8 महिने असावे. तुतीच्या फांद्यीचा आकार 10 ते 12 मि. मी. जाडीचा असावा. बेण्याची लांबी 6 ते 8 महिने असावी.
 • बेण्यावर 3 ते 4 डोळे असावे व तुतीचे बेण तयार करताना धारदार कोयत्याचा वापर करावा जेणेकरुन तुतीचे बेणे व्यवस्थित कट होण्यास मदत होईल.
 • बेणे तयार करण्यासाठी तुतीच्या कोवळ्या फांद्या वापरु नयेत. जेणेकरुन त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणार नाही, म्हणजेच तुती उत्पादनात घट होऊन रेशीम उत्पादनात आपोआप घट होईल.
 • तुतीच्या बेण्याचा जो भाग जमिनीमध्ये गाडायचा आहे, त्या भागाला तिरका छाट द्यावा, त्यामुळे तुतीच्या बेण्‍यास लवकर मुळा फुटतील.

तुतीचे बेणे कलमावरील रासायनिक प्रक्रिया :

 • तुतीचे बेणे लागवडीसाठी वापरत असताना त्याची जोमदार वाढ होण्यासाठी रासायनिक प्रक्रिया तुती बेण्यावर करणे अत्यंत महत्त्वाची असते. जेणेकरुन उष्ण वातावरणामुळे बेणे सुकणार नाही.
 • तुती बेण्याचा वरचा कोवळा व खालच्या जाड भागावर इजा होणार नाही. तसेच लागवडी दरम्यान त्याचे साल निघणार नाही. बेणे दुभंगणार नाही यासाठी तुती बेण्यावर योग्य ती रायानिक प्रक्रिया करावी.
 • तुती बेणे तयार करणे यांचा बुरशीजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी तुती बेणे1 टक्के डायथेन एम-45 या द्रावणात अर्धा तास बुडत ठेवावे. यामुळे तुती बेण्याचे बुरशीजन्‍य रोगापासून संरक्षण होईल. तसेच त्याची चांगली वाढ होण्यासाठी मदत होईल. यासाठी रासायनिक बेणे प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे असते.

तुतीच्या बेण्याची लागवड :

 • तुतीच्या बेण्याची लागवड करताना गादी वाफ्यामध्ये 20 X 10 सें. मी. अंतरावर कलमे लावावे. तुती कलमे लावताना कलमावरील दोन डोळे जमिनीत गाढून एक डोळा जमिनीच्या वर राहिल्याची काळजी घ्यावी.
 • त्यानंतर कमलाभोवती माती बोटाने दाबावी जेणेकरुन तुतीचे कलम, बेणे जमिनीत व्यवस्थिरित्या लावले जाईल.
 • अशा प्रकारे एक एकर क्षेत्रात तुती बागेची लागवड करण्यासाठी अंदाजे 60 लाख तुती बेणे आवश्यक आहेत. एका गादी वाफ्यामध्ये सर्वसाधारणपणे दीडशे तुती बेण्याची लागवड करता येईल.

तुती फुटव्यापासून तुती बागेचे उत्पादन :

 • तुती लागवडीसाठी तुतीच्या बागेत छाट कलमाचा उपयोग केला जातो.
 • छाट कलमाचा उपयोग करुन पहिल्या वर्षी तुती बागेची लागवड केल्यास पुन्हा दुसऱ्या वर्षी तुती बागेची लागवड करणे आवश्यक नसते, कारण तुती बागेची एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष तुती बागेपासून तुती पाला मिळू शकतो.
 • तुती बागेच्या दुसऱ्या वर्षांपासून बागेत फुटव्यापासून तुती बागेची वाढ करण्यात यावी. जेणेकरुन पुन्हा पुन्हा तुती लागवडीचा खर्च कमी होऊन रेशीम उत्पादन चांगल्याप्रकारे मिळण्यास मदत होईल.

तुतीची अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे :

 • तुतीची लागवड चांगल्या प्रकारे होते.
 • तुतीच्या झाडाची वाढ जोमदार व तजेलदार होते.
 • तुतीला नवीन पालवी फुटण्यास मदत होते.
 • तुतीचे पाला उत्पादन अधिक मिळते.
 • उत्पादनात भरघोस वाढ होते.

तुती अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया हा लेख आपणास आवडला असल्यास याविषयी आपले मत, विचार कमेंट्सद्वारे कळवावे. आणखीन इतर शेतीपूरक व्यवसायाबद्दल असलेली उत्सुकता, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसमूहापर्यंत हा लेख शेअर करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

Leave a Reply