तुती पाला उत्पादनाचे सुधारित वाण

भारतात विशेषत: महाराष्ट्रात रेशीम उद्योगांची झपाट्याने प्रगती झालेली असली तरी आपण प्रति हेक्‍टरी उत्‍पादकता वाढविण्यास  असमर्थ ठरत आहोत. कारण तुती व रेशीम यांच्‍या सुधारित जातींचा लागवडीसाठी अवलंब शेतकरी बांधव करत नसल्यामुळे, स्थानिक व प्राचीन जातींचा पारंपारिक पद्धतीने वापर होत असल्‍यामुळे तुती उत्‍पादनक्षमतेत दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे. त्‍यामुळे रेशीम शेतीचे दर्जेदार व किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी रेशीम व तुतीच्या संकरित व सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे क्रमप्राप्‍त आहे.

प्रस्तुत लेखाद्वारे तुती उत्पादन व रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी तुतीच्या सुधारित जातीची माहिती होईल. तुती सुधारित जातीचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तुती पाला उपलब्ध होईल यामुळे रेशीम उद्योग वाढीस चालना मिळेल.

1) विश्वा (डि. डि.-1) (Vishwa)

पुर्वी विश्वा या जातीला डेहराडून या नावाने ओळखले जाते. ती वेगवेगळ्या जातीच्या संकरातून निवड केलेली आहे. व ही जात के.एस.आर.डी.आय. थलगटपूरा कर्नाटक या संस्थेने विकसीत केलेली आहे. या झाडाच्या फांद्या सरळ उभ्या पसरट आणि हिरव्या करड्या रंगाच्या असतात. पाने कातरलेली नसून समोरासमोर रचना असलेली मोठ्या बोटाच्या आकारासारखी नरम व लुसलुशीत हिरवट रंगाची असतात. या जातीच्या पानात 74 टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे या जातीचे पाने अधिक काळ टिकून राहतात.

उत्पादन : 16 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

2) कनव्हा – 2 (Kanvha-2)

ही जात निवड पद्धतीने 1950 मध्ये कर्नाटक राज्यातील शासकीय कनव्हा गावातील रेशीम केंद्रामध्ये विकसित करुन शिफारस करण्यात आली. या जातीची निर्मिती खुल्या पराग सिंचन या पद्धतीने स्थानिक मैसूर या जातीपासून झाली आहे. या जातीची वाढ जलद असून आंतरमशागत, हवामान व जमीन यांना ही जात प्रतिसाद देते. म्‍हैसूर या जातीपेक्षा या जातीची पाने रेशीम किटकांना अधिक पसंद असतात. तसेच किटकांना पचनास योग्य असते. त्यामुळे या जातीची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच या जातीचे उत्पादन श्रीलंका, बांग्लादेश, फिलीपाईन्स व थॉयलंड इ. देशात प्रचलित झालेली आहे. या जातीमध्ये पानातील पाण्याचे प्रमाण 70 टक्के तसेच प्रथिनांचे प्रमाण 21 टक्के त्याच बरोबर सर्कराचे प्रमाण 11.5 टक्के व मुळे फुटण्याचे प्रमाण 80 टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे रेशीम उत्पादनासाठी ही जात योग्य मानली जाते.

या जातीच्या फांद्या सरळ व हिरवट कड्या रंगाच्या, पाने साधी असून एकमेकांसमोर रचना असलेली आहेत. पाने बोटीच्या आकारा सारखी असून जाडसर नरम असतात.  ही जात बागायती क्षेत्रासाठी विकसित करण्यात आली आहे.

उत्पादन : 8 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते तर बागायती क्षेत्रावर 15000 किलोग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी पानाचे उत्पादन मिळते.

3) व्ही – 1 (V-1)

ही जात केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्‍हैसूर यांनी विकसित केली असून ही जात तांबड्या, काळ्या जमिनीसाठी तसेच जमिनीचा सामू 8.5 पर्यंत असल्यास सुद्धा लागवड करता येऊ शकते. या जातीचे मुळे फुटण्याचे प्रमाण 94 टक्के आहे. या जातीच्या झाडाच्या फांद्या सरळ झाड व रसरसीत पाने त्याचबरोबर या जातीतील पानात पाण्याचे प्रमाण 78 टक्के आहे. आंतरमशागत सेंद्रीय व रासायनिक खताच्या वापरास अनुकूल आहे. त्याचबरोबर मुबलक पाणी पुरवठा उपलब्धतेद्वारे अधिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळते. जोडओळ पद्धतीने या जातीची लागवड करुन इतर जातीच्या तुलनेत अधिक उत्पादन या जातीच्या उत्पादनाची प्रत चांगली असून साठवणूकीत सुद्धा पाने जास्त काळ टिकून राहू शकतात. त्याचबरोबर रेशीम अळी मोठ्या चवीने या जातीचे पाने सेवन करतात.

उत्पादन : 26 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

4) एस – 30 (S-30)

या जातीचे झाड साधे वळणदार, खडबडीत, करड्या फांद्या असणारे असते. पाने सरळ एकमेकांसमोर पानांची रचना नरम व बोटाच्या आकाराप्रमाणे असते. या जातीचे उत्पादन बागायती शेतीमध्ये एम-5 या जाती प्रमाणे योग्य ती जमीन व रासायनिक मात्रा दिल्यानंतर उत्पादन अधिक वाढते.

उत्पादन : 10 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

5) आर. सी. 1/2 (R. C. -30)

या तुतीच्या जातीला गरिबांची तुती असे म्हणले जाते. कारण या जातीच्या तुतीचे उत्पादन घेण्यासाठी उत्पादन खर्च अतिशय कमी येतो. अशा कारणास्तव गरिब शेतकरी, रेशीम शेती उत्पादनात जाणीवपूर्वक या जातीची लागवड करतात. या जातीमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त मुळे फुटण्याची क्षमता आहे. तसेच या जातीचे उत्पादन घेण्यासाठी अत्यंत कमी खताची मात्रा सुद्धा चालते. उत्पादनावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही.

उत्पादन : 10 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

6) एस – 13 (S-13)

या जातीची लागवड पावसाळ्यावर अवलंबून असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. या जातीची निवड के-2 या जातीच्या रोपापासून खुल्या पराग सिंचन निवड पद्धतीने केली आहे. ही जात जलद व सरळ वाढणारी असून या जातीच्या दोन डोळ्यातील अंतर कमी आहे. ही जात शेतीच्या बांधावर किंवा मोठ्या झाडाच्या स्वरुपात वाढविण्यासाठी लागवड करावी. जिरायत जात असली तरी या जातीमध्ये प्रथिनाचे प्रमाण 24.3 टक्के शरकराचे प्रमाण 13.8 टक्के त्याच बरोबर पाण्याचे प्रमाण 70.6 टक्के आहे. या जातीच्या फांद्या वळणदार आणि हिरवट तसेच करंड्या रंगाची तर पाने सादी व गडद व हिरव्या रंगाची एकामेंकासमोर रचना असणारी असतात. पानामध्ये 70 टक्के पानी असल्यामुळे या जातीच्या पानाची साठवणूक क्षमता चांगली आहे. जलद वाढ व मुळे फुटण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे या जातीच्या पानाची साठवणूक क्षमता चांगली आहे. जलद वाढ व मुले फुटण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे मध्यम बागायती भागात या जातीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

उत्पादन : 5 ते 6 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

7) एस – 34 (S-34)

ही जात पावसाळी हंगामात चांगली वाढते या जातीची निर्मिती एस-30 आणि सी-76 या जातीच्या नियंत्रित पद्धतीने पराग सिंचन करुन केलेली आहे. झाडाच्या फांद्या वळणदार आणि हिरवट करड्या पाने बोटाच्या आकाराचे असून गडद हिरव्या रंगाचे असतात.

उत्पादन : 5 ते 6 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

8) . आर. –12 (A.R.-12)

ही जात क्षारयुक्त जमिनीसाठी राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये क्षारयुक्त जमिनीत मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. काही भागात नैसर्गिक रित्या क्षारयुक्त जमीन आहे. अशा जमिनीची पीक लागवडीसाठी उपयुक्तता धोक्यात आली आहे. हा विशिष्ट विचार ठेवून केंद्रीय रेशीम प्रशिक्षण संस्था, म्हैसूर यांनी या जातीची क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करण्यासाठी शिफारस केली आहे. या जातीची लागवड 8.5 पेक्षा सामू असलेल्या जमिनीमध्ये सुद्धा 90 टक्के पेक्षा जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे.

उत्पादन : 8 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

9) सहना : (Sahana)

ही जात केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्‍हैसूर यांनी विकसित केली आहे. ही जात सावलीमध्ये वाढणारी उत्तम जात आहे. या जातीचा दक्षिण भारतात प्रामुख्याने नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्या राज्यातही शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर फळ बाग विकास कार्यक्रम राबवला जातो. फळबागेत प्रारंभिक काळात मुख्य पिकापासून साधारणत: 4 ते 5 वर्ष उत्पादन मिळू शकत नाही. अशा वेळी इतर पिकाचे आंतरपीक म्हणून लागवड करणे शेतकऱ्यांनाना फायद्याचे ठरते. नारळ बागेत कोकणात लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त अशी जात म्हणून या जातीचा उल्लेख केला जातो. प्राथमिक स्वरुपात पाहिले असता विदर्भात संत्रा आणि मोसंबी तसेच इतर फळबागामध्ये सुरुवातीचे चार ते पाच वर्ष रेशीम शेतीचा आंतरपीक म्हणून लागवड केल्यास शेतकऱ्याच्या दृष्टीने अधिक फायद्याचे ठरते.

उत्पादन : 10 हजार किलो ग्रॅम प्रति एकर प्रति वर्षी तुती पानाचे उत्पादन मिळते.

तुती पाला उत्पादनाचे सुधारित वाण हा लेख आपणास आवडला असल्यास याविषयी आपले मत, विचार कमेंट्सद्वारे कळवावी. आणखीन इतर शेतीपूरक व्यवसायाबद्दल असलेली उत्सुकता, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसमूहापर्यंत हा लेख शेअर करून सहकार्य करावे. 

Prajwal Digital

Leave a Reply