हरभरा हे रब्बी हंगामातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. राज्यात दरवर्षी अंदाजे 18 लाख हेक्टवर हरभरा पिकाची लागवड केली जाते. हरभरा पिकाचे भारतातील एकूण उत्पादनापैकी 14 टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. हरभरा पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी बियाण्याच्या गुणधर्मानुसार आणि उत्पादनक्षमतनेनुसार अवलंब करणे अत्यंत गरजेचे असते.
यंदा 2021-22 खरीप हंगामात पाऊस समाधानकारक झाला असून रब्बी हंगामातील पिकांसाठी ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. कारण पावसाचे पाणी जमिनीत चांगल्याप्रकारे मुरले असून तळे, विहीर, शेततळे व कूपनलिका यांची पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव रब्बी हंगामात कोणती पिके घ्यावीत, बियाणे कोणते वापरावे अशा विचारात आहे. त्यामुळे त्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे नियोजन करण्यासाठी, लागवडीसाठी सुधारित व काबुली वाणांची शेतकरी बांधवांना ओळख व्हावी, त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी सदरील लेख तयार करण्यात येत आहे.
वाचा : हरभरा उत्पादन तंत्रज्ञान
हरभरा पिकाचे सुधारित वाण या लेखाद्वारे शेतकरी बांधवांना हरभरा पिकाचे सुधारित व काबुली वाणांची माहिती मिळेल. हरभऱ्याच्या सुधारित व काबुली वाणांची तुलना करता येईल. शेतकरी बांधवांना त्यांच्या उपलब्ध जमीन, पाण्याचा स्त्रोत, खते व काढणी यांचे नियोजनानुसार लागवड करता येईल. दर्जेदार उत्पादन मिळणाऱ्याची लागवडीसाठी निवड करता येईल.
हरभरा पिकाचे सुधारित वाणांची पेरणीसाठी निवड कशी करावी?
- ज्या वाणांची आनुवंशिक गुणवत्ता व भौतिक गुणधर्म उत्तम आहेत.
- ज्या वाणांची उत्पादनक्षमता इतर वाणांच्या तुलनेत अधिक आहे.
- वाण कमीत कमी कालावधीत परिपक्व होणारा असावा.
- वाण कीड व रोगांस कमी प्रमाणात बळी पडणारा असावा किंवा कीड व रोगास प्रतिकारक्षम आहे.
- कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारा असावा.
- पाण्याचा ताण व अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरणारा असावा.
- ज्या वाणांना बाजारात चांगला दर मिळतो अशा वाणांची निवड करावी.
अ) देशी सुधारित वाण
1) बी. डी. एन. -9-3
संशोधन संस्था : कडधान्य संशोधन केंद्र, बदनापूर, जालना (वनामकृवि, परभणी)
परिपक्व कालावधी : 100-105 दिवस
एकरी बियाणे : 22 ते 25 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : लवकर तयार होणारा, पाण्याचा ताण सहन करणारा, मर रोग प्रतिकारक, दाणा लहान.
उत्पादन : 10-11 (जिरायती) क्विंटल प्रति हेक्टरी.
2) बी. डी. एन. -797 (आकाश)
प्रसारित वर्ष : 2006
संशोधन संस्था : कडधान्य संशोधन केंद्र, बदनापूर, जालना (वनामकृवि, परभणी)
परिपक्व कालावधी : 105 ते 110 दिवस
एकरी बियाणे : 25 ते 28 प्रती एकरी.
वैशिष्टये : मराठवाडा विभागासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. या वाणांचे दाणे मध्यम आकाराचे असून या जातीचे दाणे मध्यम आकाराचे असून याचे 100 ग्रॅम दाण्याचे वजन 15 ते 18 ग्रॅम इतके आहे.
उत्पादन : जिरायती 14 ते 15 क्विंटल/हेक्टर तर, बागायत 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी.
3) फुले जी -12
प्रसारित वर्ष : 1989
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
एकरी बियाणे : 25 ते 28 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : या वाणाचा रंग आकर्षक, पिवळसर तांबूस आहे. 100 दाण्याचे वजन 15 ते 16 ग्रॅम पर्यंत आहे.
उत्पादन : 10-12 (जिरायती ) 28-30, (बागयती) क्विंटल प्रति हेक्टरी.
4) फुले जी -5 (विश्वास)
प्रसारित वर्ष : 1989
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
परिपक्व कालावधी : 110 ते 120 दिवस
एकरी बियाणे : 22 ते 24 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : घाटे लांब मोठे, हिरवा हरभरा म्हणून चांगला. या वाणाचे दाणे टपोरे असून गोलसर आकाराचे आहे. या वाणाच्या 100 दाण्याचे वजन 26 ते 28 ग्रॅम असते. पाणी व खते यांना चांगला प्रतिसाद देणारा वाण आहे. या जातीला राष्ट्रीय वाण म्हणून प्रसिद्ध आहे. हरभरा पिकाच्या सुधारित व संकरित जातींचा अभ्यास वरील प्रमाणे केलेला असून त्यांपैकी उत्पादनक्षम निवडक जाती विजय, विशाल, दिग्विजय, फुले जी-12, बी.डी.एन.जी-797, काबूली वाण विराट, पीकेव्हीक-2 या प्रमाणे वाणांची निवड करून लागवड करावी.
उत्पादन : जिरायती उत्पादन 10-12 क्विंटल/हेक्टर व बागायती उत्पादन 28-30 क्विंटल/हेक्टरी


5) विजय
प्रसारित वर्ष : 1993
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
परिपक्व कालावधी : जिरायत 85 ते 90 दिवस, तर बागायत 105 ते 110 दिवस
बियाणे : 25 ते 28 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : पाण्याचा ताण सहन करणारा, मर रोग प्रतिकारक जिरायती व बागायतीसाठी योग्य, उशिरा पेरणीसाठी शिफारस. हा वाण मर रोग प्रतिकारक असून जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य असून हा अवर्षणग्रस्त प्रतिकारक्षम व तग धरून राहणारा आहे. याचे 100 दाण्याचे वजन 18 ते 20 ग्रॅम इतके असते. हा वाण आकर्षक पिवळे व टपोरे दाणे, अधिक उत्पापदन क्षमता असणारा आहे.
उत्पादन : जिरायत प्रायोगिक उत्पादन 14 ते 15 क्विंटल/हेक्टर, बागायत प्रायोगिक उत्पादन 35 ते 40 क्विंटल/हेक्टर, उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पादन 16 ते 18 क्विंटल/हेक्टरी.
6) विशाल
प्रसारित वर्ष : 1995
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
परिपक्व कालावधी : 110-115 दिवस
एकरी बियाणे : 28 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : दाणे टपोरे, बागायती व कोरडवाहूसाठी योग्य. दाणे आकर्षक, पिवळे टपोरे दाने असल्याने अधिक उत्पादन क्षमता आहे. याचे 100 दाण्याचे वजन 27 ते 28 ग्रॅम इतके असते. ही जात मर रोग प्रतिकारक असून अधिक बाजारभाव विशाल ही जात महाराष्ट्राकरिता प्रसारित व बागायतीसाठी योग्य वाण आहे.
उत्पादन : 14 ते 15 (जिरायती) तर 30 ते 35 (बागायती) क्विंटल प्रति हेक्टरी.
7) दिग्वीजय
प्रसारित वर्ष : 2006
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी
परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : दाणे मध्यम आकाराचे बागायती व कोरडवाहूसाठी योग्य. या वाणांचा रंग पिवळसर तांबूस, टपोरे दाणे असून, हा वाण मर रोग प्रतिकारक आहे. याचे 100 दाण्याचे वजन 23 ते 25 ग्रॅम इतके असते. ही जात जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आणि महाराष्ट्राकरिता प्रसारित केला आहे.
उत्पादन : 14-15 (जिरायती) व 30-35 (बागायती) क्विंटल प्रति हेक्टरी.
8) जाकी – 9218
प्रसारित वर्ष : 2005
संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
एकरी बियाणे : 25 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : टपोरे दाणे, मर रोगास प्रतिकारक.
उत्पादन : 18-20 क्विंटल प्रति हेक्टरी.
9) साकी – 9516
प्रसारित वर्ष : 2002
संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
परिपक्व कालावधी : 105 ते 110 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : मर रोगास प्रतिबंधक, दाण्याचा रंग पिवळसर करडा
उत्पादन : 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी.
ब) हरभरा काबुली वाण
1) श्वेता (आयसीसीव्ही-2)
प्रसारित वर्ष : 1992
परिपक्व कालावधी : 100-105 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : या वाणाच्या फुलांचा रंग पांढरा असून वाढ पसरट होते. या वाणास सुरुवातीला फुले लागण्यासाठी 38-48 दिवस लागतात. या वाणाच्यास दाण्याला पांढरा रंग प्राप्त झालेला आहे. दाणे टपोरे जड असून 100 दाण्याचे वजन 24-28 ग्रॅम एवढे भरते. हा वाण मररोगास प्रतिबंधक आहे. तसेच ओलिताखाली लागवडीस अत्यंत उपयुक्त आहे.
उत्पादन : बागायती सरासरी उत्पादन 25 -30 क्विंटल प्रति हेक्टरी.
2) पी. के. व्ही. (काबुली-2)
प्रसारित वर्ष : 2000
संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
परिपक्व कालावधी : 100 ते 105 दिवस
एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : काबुली वाण, अतिशय टपोरे दाणे
उत्पादन : 12 ते 15 क्विंटल प्रती हेक्टरी.


3) विराट
प्रसारित वर्ष : 2001
संशोधन संस्था : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
परिपक्व कालावधी : 110 ते 115 दिवस
एकरी बियाणे : 35 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : काबुली वाण, अधिक टपोरे दाणे असून मर रोग प्रतिकारक आहे. याला अधिक बाजारभाव मिळतो. हा वाण महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित केला आहे.
उत्पादन : 10-12 (जिरायती), 20-25 (बागायती) क्विंटल प्रती हेक्टरी.
3) आय.सी.सी.व्ही. 10 (भारती)
परिपक्व कालावधी : 110 ते 115 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : कोरडवाहू लागवडीस उपयुक्तच आहे. 100 दाण्याचे वजन 15 ते 16 ग्रॅम असून हा मर रोगास प्रतिबंधात्मक आहे.
उत्पादन : 14 ते 15 (जिरायती) 30 ते 32 (बागायती) क्विंटल/हेक्टर प्रति हेक्टरी.
क) हरभऱ्याचे हिरवे सुधारित वाण
1) हिरवा चाफा
प्रसारित वर्ष : 1997
संशोधन संस्था : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
परिपक्व कालावधी : 105-110 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो प्रती एकरी.
वैशिष्टये : ओलितासाठी योग्य, वाळल्यानंतर दाणे हिरवे राहतात. बागायती व जिरायती लागवडीसाठी अधिक उत्पादन देणारा वाण.
उत्पादन : 18-20 (बागायती), 12-15 (जिरायत) क्विंटल प्रति हेक्टरी.
2) डी – 8
परिपक्व कालावधी : 135-145 दिवस
एकरी बियाणे : 30 किलो
वैशिष्टये : फुटण्याकरिता उत्कृष्ठ
उत्पादन : 15-16 क्विंटल प्रति हेक्टरी.
हरभऱ्याच्या सुधारित वाणांची निवड केल्यामुळे होणारे फायदे
- बियाण्याची आनुवंशिक गुणवत्ता व भौतिक गुणधर्म उत्तम चांगले राहतात.
- वाणांची प्रती हेक्टरी उत्पादनक्षमता इतर वाणांच्या तुलनेत अधिक मिळते.
- पीक कमी कालावधीत परिपक्व होते.
- पीक कीड व रोगांस कमी प्रमाणात बळी पडते.
- पाण्याचा ताण व अवर्षणग्रस्त परिस्थितीत चांगल्या पीक तग धरू शकते.
- पीक उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होते.
- बाजारात चांगल्या हरभऱ्यास दर्जेदार दर मिळतो.
संदर्भ :
- कृषिदर्शनी (2018) : कडधान्य उत्पादन तंत्रज्ञान, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
- कृषि दैनंदिनी, (2019) : कडधान्य लागवड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
- डॉ. नदंकुमार कुटे, डॉ. चांगदेव वायळ, डॉ. विश्वास चव्हाण, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, शेतकरी मासिक (मे-जून2020)
हरभरा पिकाचे सुधारित वाण हा लेख आपणास आवडला असल्यास लाईक व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे.