हायड्रोपोनिक चाऱ्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. वाढत्या चाऱ्याचा प्रश्न शेतकरी व पशुपालकंना फेडसावत आहे. त्यामुळे चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे.
ज्या वेळेस आपण धान्य भिजत घालून त्याला मोड आणतो, त्यावेळेस या धान्यातील बरेचसे अन्नघटक ह अवघड माध्यमातून पचनासाठी योग्य असणाऱ्या सोप्या माध्यमात रूपांतरीत होतात.तसेच बरेच घटक जे शरीरातील इतर अन्नघटकांचे पचन घडवून आणण्यासाठी आवश्यक आहेत, ते कार्यान्विते होतात व त्यामुळे शरीरातील बऱ्याच प्रक्रिया या व्यवस्तिपणे चालतात. तसेच हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेल्या चाऱ्यात पूर्वी असलेले घटक तर कार्यान्वित होतातच आणि ते शरीरास अधिकाधिक उपलब्ध होतात. असा चारा जनावरांना खाण्यास आवडणारा व चांगल चवीचा असतो. या चाऱ्याची पचनीय क्षमता बऱ्यापैकी वाढलेली असते.
काही प्रकारची धान्ये आपण जनावरास आहे तशी खायला देऊ शकत नाही कारण अशा कच्चा धान्यात काही असे घटक असतात की जे जनावरांच्या शरीरासाठी अपायकारक असतात. परंतु असेच धान्य मोड आणल्यानंतर किंवा हायड्रोपोनिक चाऱ्यात रूपांतरीत झाल्यास जनावरांच्या शरीरासाठी अपायकारक असण्यापेक्षा उपयोगी होतात. उदाहरणार्थ, कच्चे सोयाबीन जनावरांना आहारात देऊ शकत नाही कारण त्यात ट्रिप्सीन इनहिबिटर हे घातक रसायन असते. हे शरीरात पचनासाठी मदत करणाऱ्या ट्रिप्सीनचा पुरवठा थांबवते. परंतु जर सोयाबीनचा हायड्रोपोनिक चारा तयार केला किंवा मोड आणून जनावरांच्या आहारात दिल्यास असे घातक रसायन तयार होत नाहीत तर अनेक महत्वाची अमिनो आम्ले ही सोप्या माध्यमात शरीरात पचनासाठी उपलब्ध होतात.
हायड्रोपोनिक चाऱ्याचे महत्त्व
हायड्रोपोनिक चारा हा पौष्टिक व लुसलुशीत असून त्याची चव चांगली असल्याने जनावरे हा चारा आवडीने खातात. त्यापासून दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावराची रोगप्रतिकार शक्ती, जनावराची त्वचा, गाभण राहण्याचे प्रमाण, जनावराची चयापचयाची क्रिया असा सर्वांगीण फायदा होतो. या सर्व कारणांमुळे हायड्रोपोनिक चारा हा जनावरांसाठी हा चांगला आहार असतो.
जनावरास त्याच्या वजनाच्या २.५ ते ३% इतका (शुष्क स्वरूपात) वजनाचा आहार उपलब्ध होणे आवश्यक आहे. ५०० किलो वजन असणाऱ्या जनावरास एकूण १५ किलो (शुष्क स्वरूपात) आहार देणे आवश्यक आहे, असा सर्वसाधारण नियम आहे. याप्रमाणे पहिले तर वरील आहाराच्या २/३ आहार हा चाऱ्यातून तर १/३ आहार हा खुराकामधून देणे आवश्यक आहे. वरील सर्व आहार हा शुष्क स्वरूपात दाखवण्यात आला आहे.
हायड्रोपोनिक चाऱ्याचे नियोजन
अशाच आहारानुसार जर आपण स्वरूप ठरवले तर पुढीलप्रमाणे चारा देण्याचे नियोजन करावे लागले :
1) सुका चारा
सुक्या चाऱ्यात सर्वसाधारण १०% पाणी असते. आपणास ५०० किलो जनावरासाठी एकूण १५ किलो आहार द्यावा लागेल आणि त्यापैकी २/३ म्हणजे १० किलो अन्नघटक हे चाऱ्यातून द्यावे लागतील.
या १० किलो चाऱ्यापैकी २/३ अन्नघटक हे सुक्या चाऱ्यातून देणे आवश्यक आहे. म्हणजे ६.७ किलो चारा द्यावा लागेल. हे वजन शुष्क आधारावर (पाणी विरहित) असल्याने सुक्या चाऱ्यात १० टक्के पाणी असते. म्हणून आपण ६.५ मध्ये १०% मिळवल्यास प्रत्यक्ष आहारात सुका चारा किती द्यावयाचा आहे, हे निश्चित समजेल. अशा पद्धतीने ७.४ किलो आहार हा सुक्या चाऱ्याचा द्यावा लागेल.
2) हिरवा चारा
वरीलप्रमाणे आहाराचे नियोजन केले तर एकूण चाऱ्याच्या १/३ भाग म्हणजे ३.३ किलो (शुष्क प्रमाणात) घटक हे हिरव्या चाऱ्यातून द्यावे लागतीत. आता हिरव्या चाऱ्यातील पाण्याच्या प्रमाणाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्यात ८०% पाण्याचे प्रमाण असते. यावरून आपणास शुष्क प्रमाणात ३.३ किलो हिरवा चारा म्हणजे प्रत्यक्षात तो ८०% जास्त म्हणजे १३.२ किलो हिरवा चारा द्यावा लागेल.
3) खुराक
वरील नियमाप्रमाणे खुराकाचे प्रमाण पाहिले तर एकूण आहाराच्या १/३ म्हणजे ५ किलो (शुष्क प्रमाणात) घटक हा खुराकातून द्यावा लागेल.
यामध्ये पाण्याचे प्रमाण गृहीत धरून प्रत्यक्षात खुराकाचे आहारातील प्रमाण मोजावयाचे असेल तर खुराकमध्ये सर्वसाधारण 8 ते 9 टक्के पाण्याचे प्रमाण गृहीत धरून आपणास 5.4 किलो एवढा खुराक जनावरास द्यावा लागेल.
सुका चारा | 7.4 किलो |
हिरवा चारा | 13.2 किलो |
खुराक | 5.4 किलो |
म्हणजेच सर्वसाधारणपणे 500 किलो वजन असणाऱ्या जनावराचा आहार हा वरीलप्रमाणे 26 किलो असू शकतो. यामध्ये हायड्रोपोनिक चाऱ्याचा वापर कसा व किती करता येईल, ते पाहू शकतो. तसेच चाऱ्याला काहीसा पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक चाऱ्याचा चांगला वापर करू शकतो. परंतु या ठिकाणी हे सांगणेही महत्त्वाचे आहे की, हायड्रोपोनिक चारा हा फक्त हिरव्या चाऱ्याला पर्याय म्हणून आहेच पण त्याचबरोबरच त्यातील काही महत्त्वाचे घटक उदाहरणार्थ, एन्झाइम्स, अँटी-ऑक्सिडंट हे घटक शरीरपोषणासाठी व चयापचयाच्या प्रक्रियेसाठी फार महत्त्वाचे आहेत.
अशा प्रकारचे महत्त्वाचे घटक हे पारंपरिक चाऱ्यातून मिळत नाहीत. त्यामुळे याकडे नुसता चारा म्हणून न बघता यातील मिळणाऱ्या घटकांकडे व त्यातून जनावरास होणारा फायदा व आपणास कमी खर्चात मिळणारे जास्त व गुणवत्तायुक्त उत्पादन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामधील पाण्याचे प्रमाण हे 90 टक्के पेक्षा असते. त्यामुळे शरीरासाठी हायड्रोपोनिक चाराच भागवेल असे नाही. म्हणून हायड्रोपोनिक चाऱ्याबरोबर सुका चारा व खुराक देणे अत्यंत गरजेचे आहे.
हायड्रोपोनिक चारा हा पचनास सोपा व चवीने गोड असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. त्यामुळे कितीही चारा खाण्यात आला तर त्यापासून जनावरांना अपायकारक असे काही होत नाही. त्यामुळे जनावरांना 5 किलोपासून 25 किलोपर्यंत त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा देता येऊ शकतो. जर आपण दररोज 15 किलो हिरवा चारा जनावरांना देत असाल तर अशा वेळेस हिरवा चारा कमी करून त्याचबरोबर पशुखाद्याचे प्रमाणही 10 ते 25 टक्क्यांनी कमी करता येऊ शकते.
हायड्रोपोनिक चाऱ्याचा जनावरांच्या आहारात वापर केल्यामुळे होणारे फायदे
- हायड्रोपोनिक चाऱ्याचा वापर केल्यामुळे इतर चाऱ्यावर होणारा खर्च टाळता येतो.
- पशुपालकांना जनावरांसाठी वर्षभर चाऱ्याचे नियोजन करता येते.
- हायड्रोपोनिक चारा हा पौष्टिक व लुसलुशीत असून त्याची चव चांगली असल्याने जनावरे आवडीने खातात.
- दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता उत्तम राखली जाते.
- जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- जनावराची त्वचा व गाभण राहण्याचे प्रमाण यात सकारात्मक बदल होतो.
- जनावराची चयापचयाची क्रिया व्यवस्थित होऊन त्याचा सर्वांगीण फायदा होतो.
विशेष संदर्भ :
- डॉ. एस. पी. गायकवाड : कमी खर्चाचे चारा उत्पादन तंत्र हायड्रोपोनिक, सकाळ प्रकाशन, पुणे.
- https://www.sakalnewsper.com
- https://www.agrowon.com
- https://www.bookganga.com
शब्दांकन : आकाश अशोक बानाटे, (बी.एस्सी. ॲग्रीकल्चर, लातूर.)
हायड्रोपोनिक चाऱ्याचा जनावरांच्या आहारात वापर हा लेख आपणास आवडल्यास जास्तीत जास्त शेतकरी बाधंवापर्यंत Link ,Share करुन, वेबसाईट ला “Subscribe, Web Push Notification Allow” करुन सहकार्य करावे.