हरभऱ्यास पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रिया

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे पीक आहे, कारण हरभरा पिकास एक ते दोन संरक्षित पाणी दिल्यास सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव जास्त प्रमाणात हरभऱ्याची लागवड करतात.

परंतु पेरणीसाठी बियाणे योग्य मिळत नसल्यामुळे, बियाण्याची आनुवंशिक व भौतिक शुद्धता कमी असल्यामुळे, पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया न केल्यामुळे प्रती हेक्टरी उत्पादनात घट येते. सदरील घट टाळण्यासाठी किंवा बियाण्याची उगवण क्षमता चांगली होण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते.

बीजप्रक्रिया म्हणजे काय?

बियाणे जमिनीत पेरण्‍यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्‍यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी, तसेच बियाण्‍याची शेतातील उगवण क्षमता वाढविण्‍यासाठी व जोमदार रोपे येण्‍यासाठी बियाण्‍यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक कीडकनाशकांची, बुरशी, जिवाणू संवर्धकाची व संजीवकांची प्रक्रिया केली जाते त्यास बीजप्रक्रिया असे म्‍हणतात.

पेरणीपूर्वी बियाण्‍यास बुरशी अथवा जिवाणू संवर्धनाच्‍या केल्या जाणाऱ्या प्रक्रियेस बीजप्रक्रिया असे म्हणतात. बियाण्यापासून उद्भभणाऱ्या निरनिराळ्या रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात जवळपास 79 टक्के पर्यंत घट येते. रोगट बियाण्याची लागवड केल्यास बियाण्यात सुप्तावस्थेत असलेली बुरशी बियाण्याच्या पृष्ठभागावर आणि मुळांवर मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे बियाणे कुजतात व रोपांची मुळे सडून मरतात. आणि शेतातील रोपांची संख्या घटते परिणामी उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होते.

बीजप्रक्रियेचे उद्देश :

 • पिकांचे रोग व कीड नियंत्रण करणे
 • बियाण्यांची उगवण क्षमता जलदगतीने होणे.
 • रोपांची प्रती हेक्टरी संख्या मर्यादित ठेवणे.
 • नत्र स्थिरीकरण करणे.
 • बियाण्यांचे किडीपासून संरक्षण करणे
 • बियाण्याची सुप्तावस्था कमी करणे.
 • नवीन जातींची निर्मिती करणे.

बीजप्रक्रिया करतांना घ्‍यावयाची काळजी :

 • बीजप्रक्रिया करतांना प्रथमतः बुरशीनाशक /कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करून शेवटी जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
 • बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवावे.
 • बुरशीनाशक /कीटकनाशके जिवाणू खतात एकत्र मिसळून नयेत.
 • बीजप्रक्रियेनंतर बियाणे त्याच दिवशी पेरावे.
 • बीजप्रक्रिया करतांना बियाण्या‍ची साल /टरफल निघणारे नाही याची दक्षता घ्यावी.
 • प्रमाणित व सत्यप्रत पिशवीतून विकत घेतलेल्या बियाण्यावर बुरशीनाशक/ कीटक नाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते. अशा बियाण्यांवर फक्ता जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी.
 • बीजप्रक्रिया केलेले आणि पेरणी करून शिल्लक राहिलेले बियाणे खाण्यास वापरू नये.

हरभऱ्याची बीजप्रक्रिया कशी करावी?

हरभऱ्याची बीजप्रक्रिया ही दोन प्रकारची असून सर्वप्रथम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी आणि थोडं वेळाने जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.

अ) बुरशीनाशक

हरभरा पिकाच्या बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. त्या‍साठी पेरणीपूर्वी हरभऱ्याच्‍या प्रतिकिलो बियाण्यास 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम व 2 ग्रॅम कार्बेन्डॅझिम एकत्र करून प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.

) जीवाणू संवर्धन

बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया झाल्यानंतर काही वेळाने हरभऱ्याच्या प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धकाचे (रायझोबियम जापोनिकम) गटातील 250 ग्रॅम वजनाचे एक पाकीट गुळाच्या थंड द्रावणात मिसळून चोळावे. गुळाचे द्रावणासाठी एक लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळ विरघळून घ्यावे.

बियाणे तासभर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावे. त्यामुळे हरभऱ्याच्‍या मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक स्थिर होतो, मुळकुज (रायझोक्टोनिया) आणि मानकूज (स्कोलेरोशियम) इ. प्रमुख बुरशीजन्यस रोग आहे. हे रोखण्यासाठी व नत्र स्थिरीकरणासाठी हरभरा बियाण्याची बीजप्रक्रिया करावी लागते. हरभऱ्याच्‍या बीजप्रक्रिया विविध जिवाणू संवर्धक, जैविक व रासायनिक बुरशीनाशकांची वापर करतात.

) स्फुरद विरघळणारी जिवाणू (पी.एस.बी.)

कडधान्य पिकांच्या दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नत्रयुक्‍त खतापेक्षा स्फुरदयुक्त खतांचा जास्त वापर करावा लागतो. हरभरा पिकासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरदाची मात्रा दिली जाते. रासायनिक खताद्वारे दिलेल्या स्फुरदाचा पिकासाठी भरपूर वापर केला जात नाही किंवा उपलब्ध होत नाही. यातील बराचसा भाग हा मातीच्या कणांवर चिटकून बसतो.

जमिनीतील पाण्यांत न विरघळणाऱ्या घट्ट स्वरूपातील स्फुरद व अन्द्रव्यांचे विघटन करून त्याचे पाण्यात विरघळणारे द्राव्य स्वरूपात रूपांतर करण्याचे कार्य हे स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.) करतात. द्राव्य स्वरूपात असणारे स्फुरद पिकांना उपलब्ध होत असतो.

बीजप्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे

 • जमिनीतून व बियाण्‍यांपासून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
 • बियाण्‍याची उगवण क्षमता वाढून एकसारखी उगवण होते.
 • पिकाची निरोगी व जोमदार वाढ होते.
 • रोग व कीड नियंत्रणावरील खर्चात बचत होते.
 • हेक्‍टरी रोपांची संख्‍या निर्धारित ठेवण्‍यास मदत होते.
 • पिकाच्‍या हेक्‍टरी उत्‍पादन व उत्‍पन्‍नात वाढ होते.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

Prajwal Digital

Leave a Reply