तुती पिकात करावयाची आंतरमशागत

वनस्पतीची लागवड करण्याचे जमीन हे एक महत्त्वाचे माध्यम असून शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे पाहिले असता जमीन हे सुद्धा सजीव असल्याचे दिसून आले आहे. जमिनीत कोणतेही पीक चांगले यावे म्हणून जमिनीची मशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. जमिनीची मशागत ही प्रामुख्याने जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये बदल करुन वनस्पती वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी केली जाते.

जमिनीच्या कठीण व घट्ट पृष्ठभागास एका विशिष्ट खोलीपर्यंत तांत्रिक साधनाचा वापर करुन भूसभूसीत केले असता, वनस्पतीची मुळे जमिनीत खोलवर जाऊन जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे शोषण करुन वनस्पतीची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ होते.

आंतरमशागत म्हणजे काय?

पीक पेरणी नंतर ते कापणी पर्यंत जी मशागत केली जाते त्या मशागतीला आंतरमशागत असे म्हणतात. आंतरमशागत केल्याने जमिनीत हवा खेळती राहून जमीन भुसभुशीत बनते. तसेच आंतरमशागतीमुळे जमिनीत पाणी मुरण्याचा वेग जास्त असतो. तसेच उपयुक्त जीव-जंतूची वाढ चांगल्या त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकांना चांगल्या प्रकारे उपयुक्त अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. तसेच तणाचे नियंत्रण होऊन पीक वाढीस असणारा अडथळा दूर होतो.

आंतरमशागतीचे उद्देश :

  • जमीन ढिली व मोकळी करणे
  • जमिनीत हवा खेळती ठेवणे
  • जमिनीचे तापमान वाढविणे
  • तणाचे नियंत्रण
  • घातक किटकांचा नाश करणे
  • सेंद्रीय खते जमिनीत मिसळणे
  • जमिनीची सुपीकता वाढविणे

आंतरमशागतीचे प्रमुख कामे

1) विरळणी :

रेशीम शेतीत दाट झालेले रोप काढून टाकणे म्हणजे विरळणी करणे होय. विरळणी केल्यामुळे रेशीम शेतीत झाडाची संख्या योग्य राखली जाऊन झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते त्यामुळे रेशीम शेतीत विरळणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.

2) नांग्या भरणी :

रेशीम शेतीची लागवड केल्यानंतर काही कारणास्तव पिकांचे रुपे मरण्याची नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रोपे मृत आवस्थेत असतात. त्या जागेवर पुन्हा रोपांची लागवड करणे म्हणजे नांग्या भरणे होय. या उद्देश म्हणजे रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखून पीक उत्पादनात वाढ करणे हा होय.

3) तण नियंत्रण :

पिकातील तणे ही पिकाबरोबर स्पर्धा करत असतात. त्यामुळे पिकातील तणांचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते कारण तणामुळे पिकाची प्रत बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे तणाचे वेळीच नियंत्रण केल्यास पीक उत्पादनात चांगला फायदा होतो.

4) आच्छादनाचा वापर :

रेशीम शेतीत आच्छादनाचा वापर केल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. त्यामुळे पाण्याची बचत होते. तसेच पीक उत्पादनात चांगल्या प्रकारे फायदा होतो. तसेच आच्छादनामुळे तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते. त्यामुळे रेशीम शेतीत आच्छादनाचा वापर करत असताना काडी कचरा, तुस, दसकटे किंवा प्लॉस्टिक सारख्या आच्छादनाचा वापर करावा.

5) खताची मात्रा देणे :

रेशीम शेती करीत असताना आंतरमशागतीत खताची मात्रा देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे रेशीम शेतीत योग्य त्यावेळी खताची मात्रा दिल्यास पीक उत्पादन भरघोस मिळण्यास मदत होते. त्यामुळे खताची मात्रा पिकांना देणे गरजेचे आहे.

6) पिकाला भर देणे :

रेशीम शेतीची लागवड केल्यापासून ते रेशीम शेतीचे उत्पादन घेत असताना तुतीच्या झाडाची मुळे उघडी पडून ते सूर्यप्रकाशाच्या सन्निध्‍यात येतात. त्यामुळे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत असतो. त्यामुळे पीक उत्पादन आपोआप कमी होते. त्यामुळे रेशीम शेती पिकाला मातीची भर देणे महत्त्वाचे काम आहे.

7) राखण करणे :

रेशीम शेतीची लागवड केल्यापासून ते उत्पादन मिळे पर्यतच्या काळात रेशीम शेतीची राखण करणे महत्त्वाचे काम आहे. जनावरपासून या शेतीस धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या जमिनीत जनावरे मोकाट सुटली तर जमिनीची मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. त्यामुळे जमिनीची राखण करणे हे सुद्धा आंतरमशागतीतील महत्त्वाचे काम आहे.

तुती पिकात करावयाची आंतरमशागत हा लेख आपणास आवडला असल्यास याविषयी आपले मत, विचार, आणखीन इतर शेतीपूरक व्यवसायाबद्दल असलेली उत्सुकता, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसमूहापर्यंत हा लेख शेअर करून सहकार्य करावे.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

Popular Article

Prajwal Digital

2 thoughts on “तुती पिकात करावयाची आंतरमशागत”

Leave a Reply