तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन

महाराष्ट्रात तुतीचे उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योग उभारणी होत आहे. यापासून चांगल्या प्रकारे रेशीम कोष निर्मितीला चालना मिळत आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत रेशीम शेती उद्योगासाठी एक पूरक उद्योग म्हणून पाहिले जात आहे.

प्रस्तुत लेखात आपणास तुती बागेचे वळण व छाटणी व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तुती बागेला वळण देणे, तुतीची छाटणी व प्रकार, तुतीची छाटणी करताना घेण्याची काळजी आणि तुती बागेला वळण आणि छाटणी केल्यामुळे होणारे फायदे याबद्दल उपयुक्त माहिती तुती उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त होईल.

तुती बागेला वळण देणे :

रेशीम शेतीत वळण देणे हे महत्त्वाचे काम असून यामुळे रेशीम शेतीत हवा खेळती राहून प्रखर सूर्यप्रकाश रेशीम शेतीस मिळतो. प्रखर सूर्यप्रकाश आणि स्वच्छ हवा यामुळे उत्पादनात भर पडते. तसेच वळण दिल्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पिकाची कीड व रोगापासून नैसर्गिकरित्या नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच तुती पिकाला वळण दिल्याने रेशीम शेतीत केली जाणारी आंतरमशागत करण्यास सुलभ होते. त्यामुळे रेशीम शेतीत उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर शेतीवर होणारा थोड्या फार प्रमाणात खर्च कमी होऊन शेतकरी वर्गास चांगला दिलासा मिळतो. त्यामुळे रेशीम शेतीस वळण देणे अत्यंत महत्त्वाचे असते.

तुतीची छाटणी प्रकार :

शास्त्रीय दृष्टीकोनातून तुती बागेची छाटणी केल्यास उत्पादन वाढण्यासाठी चांगली मदत होते. तुती हे रेशीम अळ्याचे खाद्य असल्यामुळे तुतीच्या झाडाची वेळोवेळी छाटणी करावी लागते. तसेच छाटणी केल्यामुळे तुतीचे झाडांना नवीन पालवी फुटवे मोठ्या प्रमाणावर येऊन एकूण नवीन पानांची निर्मिती होते. तसेच या पानामध्ये पोषकद्रव्ये मुबलक प्रमाणावर असतात. तुतीचे झाड झपाटयाने व सतत वाढणारे असल्यामुळे त्याची छाटणी वारंवार करणे आवश्यक असते.

1) तळ छाटणी :

तळ छाटणी या पद्धतीमध्ये तुतीची छाटणी जमिनीपासून 15 सें. मी. अंतर ठेवून करतात. वरील छाटणी पद्धतीपैकी तळ छाटणीचा वापर करावा कारण या पद्धतीचा वापर केल्याने फांदीची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच यंत्राच्या साह्राने तळ छाटणी करता येते. या पद्धतीचा सर्वांत मोठा फायदा हा फांदी पद्धत संगोपनासाठी केला जातो. तळ छाटणी करताना आपण तुतीच्या सर्व फांद्या रेशीम किटकांना खांद्य म्हणून देत असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात रेशीम किटकास पचनास उपयुक्त असतो. तसेच या छाटणीतील पाला जास्त काळ टिकण्यास मदत होते.

2) मध्यम छाटणी :

मध्यम छाटणी या पद्धतीमध्ये तुतीच्या झाडाची छाटणी साधारणत: 60 सें.मी. जमिनीपासून अंतर ठेवून केली जाते.

3) उंच (झाड पद्धत) छाटणी :

उंच (झाड पद्धत) पद्धतीने एकच स्टंप तयार करुन जमिनीपासून 4 ते 5 फूट अंतर ठेवून कापणी करतात. कापलेल्या भागास नवीन फुटव्या फुटतात, त्यामुळे झाडाचा पाला चांगला व दर्जेदार मिळण्यास मदत होते.

तुतीची छाटणी करताना घेण्याची काळजी :

 • छाटणी करताना झाडास किंवा फांदीस कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये.
 • तुती कापतेवेळी मुख्य फांदीला भेगा पडू नयेत.
 • धारदार कात्री छाटणीसाठी वापरावी.
 • कापणीनंतर कापलेल्या भागावर चुनखळीचे पाणी फिरवावे, जेणेकरुन विषाणूचा शिरकाव बुंध्यापर्यंत होणार नाही.
 • छाटणी केल्यानंतर बुरशी नाशकाची फवारणी करावी.
 • तुती छाटणी केलेल्या क्षेत्रास पाणी व खते द्यावेत.

तुतीची वळण आणि छाटणी केल्यामुळे होणारे फायदे:

 • रेशीम शेतीस प्रखर व मुबलक सूर्यप्रकाश मिळतो.
 • रेशीम शेतीत चांगल्या प्रकारे हवा खेळती राहते.
 • रेशीम शेतीत कीड व रोगग्रस्त फांद्या कापल्या जातात.
 • अनावश्यक असणाऱ्या फांद्या कापून टाकल्या जातात.
 • वाळलेल्या फांद्या कापून टाकल्या जातात.
 • छाटणीमुळे झाडाची वाढ चांगली होण्यास मदत होते.
 • छाटणी केल्यामुळे झाडास फुटवे भरपूर प्रमाणात फुटतात.
 • झाडाचा आकार व उंची योग्य राखता येते.

तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन हा लेख आपणास आवडला असल्यास याविषयी आपले मत, विचार, आणखीन इतर शेतीपूरक व्यवसायाबद्दल असलेली उत्सुकता, व्यवसायाचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकसमूहापर्यंत हा लेख शेअर करून सहकार्य करावे.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

Popular Article

Prajwal Digital

1 thought on “तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन”

Leave a Reply