भुईमूग एक बहुउपयोगी पीक

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

भुईमूग हे औद्योगिक व व्‍यापारीदृष्‍ट्या खाद्यतेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते. मनुष्‍याच्‍या आहारात स्निग्‍ध पदार्थ आणि प्रथिने यांचा स्‍वस्‍त पुरवठा भुईमूगातून होत असल्‍यामुळे त्‍याला आंतरराष्‍ट्रीय महत्‍त्‍व प्राप्‍त झाले आहे. सध्‍या भुईमूगाचे तेल सर्वाधिक किंमतीला बाजारात विकले जाते. त्‍याच्‍या तेलाची स्‍वाद, चव, अप्रतिम आहे. शेंगदाणा तेलाच्‍या निर्यातीपासून भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन देखील मिळते. परंतु देशांतर्गत खाद्यतेलाची भरपूर मागणी असल्‍यामुळे सध्‍या तरी भुईमूग तेलास निर्यातीसाठी परवानगी दिली जात नाही. वाचा : खरीप भुईमूग लागवड तंत्र

भुईमूगाचे कुळशास्त्र :

भुईमूगाचे मूळस्थान दक्षिण अमेरिकेतील ब्राझील (Brazil) हे आहे. भुईमूग हे जगामध्ये सोयाबीनच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचे तेलबियांचे पीक आहे. हे पीक ‘अरॅचिस’ (Arachis) या वंशाचे असून त्योचे कुळ ‘हायपोजिया’ हे आहे. ‘अरॅचिस’ (Arachis) याचा अर्थ द्विदल वनस्‍पती असा आहे, तर ‘हायपोजिया’ (Hypoxia) या शब्दाचा अर्थ जमिनीखालील भागात उत्पादन देणारे पीक असा आहे. हे पीक ‘पॅपिलीओनासी’ (Papilionasi) कुटुंबातील आहे.

भुईमूगाचे इतर नावे :

भुईमूगाचे पिकाचे भारतातील विविध प्रांतानुसार आणि भाषांनुसार नामनिर्देश निरनिराळ्या संज्ञांनी परिचित होतो. उदा. इंग्रजीत भुईमूगाला ‘ग्राऊंडनट’ (Groundnut) असे म्‍हटले जाते, तर हिंदीत त्‍याला ‘मूंगफली’ असे म्‍हणतात. गुजराती भाषेत हे पीक ‘भुईमूग चण्‍णा’, ‘मूंगफली’ या नावांनी ओळखले जाते. कर्नाटकात कन्‍नड भाषेत भुईमूगाला ‘नेला गदळे’ असे नावे आहे.

संस्‍कृतमध्‍ये हे पीक ‘शिंबिका’(Shimbika), स्‍नेहबीजक (Snehabeejak), भूचानक, भूमुद्र अशा नावांनी ओळखले जाते. याशिवाय भुईमूगाला पीनट (Peanut), मंकीनट (Monkeynut) गुबरनट (Gubarnut) अशी कितीतरी नावे आहेत. शेंगा निर्माण करणारे हे तेलबियांचे सुपरिचित पीक ‘शिबावंत’ या परिभाषेत मोडले जाते.  

भुईमूगाचा पूर्व इतिहास :

कोलबंसचे काळापूर्वी 2000 ते 3000 इसवी सनापूर्वी हे पीक पेरूमध्ये लागवडीस होते. कोलंबसच्या काळात त्याचा अमेरिकेत प्रसार झाला. ते पश्चिम आफ्रिकेत 16 व्‍या शतकात ब्राझील मधून आणले गेले. त्यानंतर पूर्वेकडील आफ्रिकन किनाऱ्यापर्यंत त्याची लागवड होऊ लागली. आफ्रिकेतून ते भारतात आणण्यात आले तर पेरूमधील एका शेंगेत तीन शेंगदाणे असलेले वाण चीनमध्ये आणण्यात आले.

भारतात ‘वास्को-डी गामा’चे आगमन झाल्यावर त्यांच्या नंतर आलेल्यात ‘पोर्तुगीजपाद्री’ लोकांनी सोळाव्याय शतकाचे प्रथमार्धात भुईमूग भारतात प्रथम आणला. सन 1800 सालापासून भारतात भुईमूगाची पीक म्हणून लागवड होऊ लागली. त्यानंतर पुढे 1890 सालापर्यंत ‘गावरानी’ जातीच्या‍ शेंगांची लागवड करण्यात येऊ लागली. परंतु पुढे सन 1900 पर्यंत या गावरानी जातींचा दर्जा खालावला गेल्यामुळे या पिकाखालील क्षेत्र कमी-कमी होत गेले. तामिळनाडू म्हणजेच मद्रास राज्यात सन 1894 साली आफ्रिकेतील ‘मोझॅम्बीम’ मधील ‘मॉरिशस’ ही भुईमूगाची पसरी जात आणली.

भुईमूगाचे उत्पादन :

भारतातील भुईमूग पिकाखालील क्षेत्र सन 2020-21 मध्‍ये 5596.30 लाख / हे., 7733.33 उत्‍पादन मे.टन तर याची उत्‍पादकता 1765 किलो ग्रॅम एवढी होती. तर 2020-21 मधील महाराष्ट्राचा विचार केल्‍यास भुईमूग पिकाचे क्षेत्र  204.6 लाख हेक्टर, उत्‍पादन 242.9 लाख टन, तर 1187.41 किलो ग्रॅम इतके झालेले आहे.  यावरून असे स्‍पष्‍ट होते की, भुईमूग हे पीक भारतातील तसेच महाराष्‍ट्रातील महत्‍त्‍वाचे तेलबिया पीक असून या पिकाचे क्षेत्र, उत्‍पादन व उत्‍पादकता दिवसेंदिवस वाढतच आहे कारण देशात खाद्यतेलाचा वापर वाढत असून सोयाबीन व सुर्यफूल तेलानंतर इतर पर्यायी तेल म्हणून भुईमूग तेलाचा वापर केला जात आहे.    

भुईमूगाचे विशेष महत्‍त्‍व :

भुईमूग हे खाद्य तेलाच्‍या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक आहे. सोयाबीन तेलाच्‍या तुलनेत भुईमूग पिकाचा दुसरा क्रमांक लागतो.

भुईमूगाच्‍या शेंगांचा मानवासाठी उपयोग होतो तर वेलीचा जनावरांना चारा म्‍हणून प्रमुख उपयोग होतो.

भुईमूगाचे वेल व शेंगा यांचे मानवाच्‍या नेहमीच्‍या जीवनक्रमात व निरनिराळ्या उद्योगधंद्ये, प्रक्रिया उद्योग इ. क्षेत्रात चांगल्‍या प्रकारे उपयोग होतो.

भुईमूगाचे शेंगदाणे आपल्‍या दैनंदिन आहारात खाण्‍यासाठी होतो आणि वेगवेगळ्या भाजी पदार्थात कूट म्‍हणून वापरतात.

भुईमूगाचे शेंगदाण्‍यात 25 ते 28 टक्के प्रथिने व 45 ते 50 टक्के तेलाचे प्रमाण इतके असते.

बदामाच्‍या खालोखाल प्रथिनांचे प्रमाण असल्‍यानेच भुईमूगास गरीबाचे बदाम असे संबोधले आहे.

भुईमूगाची इतर प्रथिनयुक्‍त पदार्थांशी तुलनात्‍मक (%) माहिती

अ. क्र.प्रथिनयुक्‍त पदार्थप्रथिनेशर्करायुक्‍तस्निग्‍ध पदार्थज्‍वलन मूल्‍ये
1भुईमूग25.310.240.5500-600
2तूरडाळ22.357.21.7335
3बकऱ्याचे मांस18.5013.3195
4अंडी13.3013.3175
5गाईचे दूध3.34.83.665
(स्रोत- साबळे रामचंद्र, 2020, भुईमूग लागवड, कॉन्टिनेन्‍टल प्रकाशन, पुणे)

भुईमूगाचे इतर बहुउपयोग :

) भुईमूग पेस्‍ट : भुईमूगाचे शेंगदाण्‍यातील गरापासून पेस्‍ट तयार करण्‍याचे कारखाने आता भारतात आणि महाराष्‍ट्रातही सुरु झालेले आहेत. त्‍यांपैकी एक कारखाना पुण्‍याजवळ सासवड येथे असून तेथे भुईमूगाच्‍या शेंगदाण्‍यातील गरापासून पेस्‍ट तयार केली जाते. या पेस्‍टचा उपयोग ब्रेडबरोबर खाण्‍यासाठी उपयोग केला जातो.

) जीवनसत्‍त्‍वे : भुईमूगाच्‍या शेंगदाण्‍यामध्‍ये जीवनसत्‍त्‍वे अ, ब, ब-2 व ई ही जीवनसत्‍त्‍वे मात्र थोड्या प्रमाणात असतात. त्‍याचबरोबर त्‍यात स्‍फुरद, चुना व लोह ही खनिजे चांगल्‍या प्रमाणात असून तांबे व शिसे यासारखी खनिजेही अल्‍पशा प्रमाणात असतात.

) भुईमूग तेल : भुईमूगाच्‍या दाण्‍यात तेलाचे प्रमाण भरपूर असते. भुईमूगाच्‍या दाण्‍यापासून तेल काढून त्‍याचा उपयोग खाद्यतेल म्‍हणून मोठ्या प्रमाणात स्‍वयंपाकात खाद्यपदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. त्‍यापासून वनस्‍पती तूप मोठ्या प्रमाणात केले जाते. भुईमूगाच्‍या तेलाचा उपयोग साबण व प्रसाधने तयार करण्‍यासाठी केला जातो. या तेलात वैद्यकीय गुणधर्म अधिक आहेत. पशुवैद्यकशास्त्रात जनावरांना रेचक म्‍हणून व जखमेवर लावण्‍यासाठी त्‍याचा उपयोग करतात.

) भुईमूगा पेंड : भुईमूगाच्‍या शेंगातून तेल काढल्‍यानंतर उरलेल्‍या चोथ्‍यास पेंड असे म्‍हणतात. भुईमूगाची पेंड अतिशय पौष्टिक असून ती दुभत्‍या व कामाच्‍या जनावरांना खाद्य म्‍हणून देतात. या पेंडीचा उपयोग खत म्‍हणूनही करतात. भुईमूगाच्‍या पेंडीत 7 ते 8 टक्के नत्र, 1.4 टक्के स्‍फुरद व 1.2 टक्के पालाश ही अन्‍नद्रव्‍ये असतात. भुईमूगाच्‍या पेंडीचे पीठ गव्‍हाची कणीक व इतर पीठ यात सुलभ रितीने मिसळून पाव-बिस्किटे व मिठाईचे पदार्थ व आईस्क्रिम तयार करतात.

) भुईमूग टरफल : भुईमूगाच्‍या शेंगा सोलल्‍यानंतर राहणाऱ्या टरफलाचा उपयोग जळण म्‍हणून केला जातो. जळणाऱ्या दृष्‍टीने तीन टन टरफलात एक टन कोळशाएवढी ज्‍वलनशक्‍ती असते. टरफलाच्‍या राखेचा उपयोग खत म्‍हणून करता येतो.

उ) भुईमूग वेली व मुळे : भुईमूगाच्‍या वेलींचा उपयोग हिरवेपणी किंवा वाळविल्‍यानंतर मुरलेली वैरण म्‍हणून होतो. भातपिकासाठी हिरवळीचे खत म्‍हणून सुध्‍दा उपयोग होतो. तसेच भुईमूगाच्‍या मुळांवर गाठी असतात. त्‍यामुळे जमिनीची सुपीकता वाढवण्‍यास मदत होते. त्‍यामुळे बेवड म्‍हणून भुईमूग हे पीक उत्‍तम असून फेरपालटीसाठी ते चांगले आहे. अशा विविध प्रकारामध्‍ये भुईमूगाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

वाचा : खरीप भुईमूग लागवड तंत्र

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

भुईमूग एक बहुउपयोगी पीक हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

Leave a Reply