रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. धान्य व कडब्याच्या रूपाने रब्बी ज्वारीची दुहेरी उपयुक्तता आहे. देशाची वाढती लोकसंख्या आणि दुभत्या जनावरांना लागणारा चारा तसेच जागतिक स्तरावरील अन्नधान्याची टंचाई लक्षात घेता कमीत कमी क्षेत्रावर रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढविणे नितांत गरजेचे झाले आहे.
रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. धान्य व कडब्याच्या रूपाने रब्बी ज्वारीची दुहेरी उपयुक्तता आहे. देशाची वाढती लोकसंख्या आणि दुभत्या जनावरांना लागणारा चारा तसेच जागतिक स्तरावरील अन्नधान्याची टंचाई लक्षात घेता कमीत कमी क्षेत्रावर रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढविणे नितांत गरजेचे झाले आहे. याकरिता सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रती हेक्टरी पिकाची उत्पादन व उत्पादकता वाढवून देशाच्या अन्नधान्य उत्पादनात आपला वाटा वाढविणे आवश्यक झाले आहे.
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान या लेखाआधारे शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारीचे दर्जेदार उत्पादन घेता येईल. रब्बी ज्वारीच्या सुधारित वाणांची माहिती मिळेल. ज्वारी लागवडीचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान उदा. हवामान, जमीन, बीजप्रक्रिया, पेरणी व लागवडीचा हंगाम, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, पिकाची काढणी, मळणी व उत्पादन याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
ज्वारीचे उत्पादन :
जगातील ज्वारी उत्पादनात संयुक्त राष्ट्रसंघ हे आघाडीवर असून (सन 2021 च्या ग्लोबल आकडेवारीनुसार) ज्वारी उत्पादन 10846 मे.टन आहे तर जगात ज्वारी उत्पादनात वाटा 17.298 टक्के इतका आहे. तर नायजेरिया उत्पादन 6800 मे.टन, इथिओपिया उत्पादन 5200, सुदान उत्पादन 5000 मे.टन, मेक्सिको उत्पादन 4700 मे.टन तर भारताचे उत्पादन 4600 मे.टन असून तो जगात ज्वारी उत्पादनात सहाव्या क्रमांकावर आहे तर जगात ज्वारी उत्पादनात वाटा 7.337 टक्के इतका आहे.
ज्वारीचे उत्पादन महाराष्ट्राबरोबरच, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या सहा राज्यांत घेतले जाते. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा, ओरिसा, केरळ आणि दिल्ली या राज्यांत थोड्याफार प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचे पिकाचे 2020-21 मधील महाराष्ट्रातील लागवडीखालील क्षेत्र 1859.1 हेक्टर असून, ज्वारीचे उत्पादन 1906.6 टन एवढे आहे तर प्रती हेक्टरी उत्पादकता 1025.6 किलोग्रॅम/हेक्टर अशी आहे. (महाराष्ट्र शासन कृषि विभाग) असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील ज्वारी पिकाची प्रती हेक्टरी उत्पादकता कमी आहे ते वाढवणे गरजेचे आहे.
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाचे घटक
जमीन :
रब्बी ज्वारी हे पीक मध्यम ते भारी जमिनीतील येणारे पीक असून खडकाळ व निचरा न होणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
हवामान :
रब्बी ज्वारी या पिकास उष्ण, कोरडे व दमट हवामान असेल तर पीक चांगले येते. परंतु तापमान सरासरी 40 सें. ग्रे. च्यावर आणि 10 अंश सें.ग्रे. च्या खाली आल्यानंतर ज्वारीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व त्यात दाणे भरत नाहीत. त्याचप्रमाणे धुके 85 टक्के पेक्षा जास्त असणारी हवेतील आर्द्रता या घटकांचा ज्वारीच्या वाढीवर पडणाऱ्या होतो. साधारणपणे 300 ते 500 मी. मी. पाऊस रब्बी हंगामात पडणाऱ्या प्रदेशात ज्वारीची लागवड केली जाते.
रब्बी ज्वारीचे वाण :
रब्बी ज्वारीचे फुले चित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी, फुले यशोदा, परभणी ज्योती, फुले अनुराधा इ. रब्बी ज्वारीचे सुधारित व संकरित वाण असून हे वाण अधिक उत्पादनक्षम व रासायनिक खतांचा चांगला प्रतिसाद देणारे आहेत. या वाणापैकी कोणत्याही एका वाणाची निवड करावी.
बीजप्रक्रिया :
रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळावे व कीड व रोगांना पीक प्रतिकारक्षम राहील या उद्देशाने ज्वारीला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते. रब्बी ज्वारीस पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रिया यासाठी प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर काही वेळाने पेरणीस सुरुवात करावी.
लागवडीचा हंगाम :
रब्बी ज्वारी हे महत्त्वाचे अन्नधान्य व चाऱ्याचे पीक असल्यामुळे या पिकाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करण्यात येते. रब्बी ज्वारीची पेरणी ही15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधी करावी. पेरणीस उशीर किंवा पाण्याची पुरेशी व्यवस्था असल्यास पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी.
पेरणी पद्धती :
रब्बी ज्वारीची पेरणी शक्यतो तिफणीने अथवा सुधारित दोन चाड्याच्या पाभरीने करावी. कोरडवाहू भागात दोन ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपातील अंतर 15 सें.मी. ठेवावे. बागायती क्षेत्राची पेरणी 45 x 12 सें.मी. किंवा 45 x 15 सें.मी. अंतरावर करावी.
रासायनिक खताचा वापर :
कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी हेक्टरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद पेरणी बरोबरच तर ओलिताखालील रब्बी ज्वारीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 पालाश वापरावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र 35 ते 40 दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे. खत आणि बियाणे खोल 12 सेंमीपर्यंत पेरून दिल्यास ओलाव्याचा कार्यक्षम वापर होतो. पेरणीपूर्वी 750 किलो शेणखत अधिक 20 किलो नत्र हेक्टरी दिल्यास सुद्धा चांगला फायदा होतो.
पाणी व्यवस्थापन :
रब्बी ज्वारी हे रब्बी हंगामात घेतले जाते व यानंतर उन्हाळी हंगाम सुरु होत असल्यामुळे ज्वारी पिकाला पाणी द्यावे लागते. त्यामुळे पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पिकांना गरजेनुसार एक पाणी द्यावे, ज्वारीची पोटरी अवस्था असताना एक संरक्षित पाणी द्यावे व पीक कणसावर आल्यास एक ते दोन पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.
आंतरमशागत :
अ) नांगे भरणे :
नांगे भरले नाहीत तर हेक्टरी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन कमी येते. हे काम जेवढे लवकरकरणे शक्य आहे तेवढे लवकर करावे. उशीरा नांगे भरले तर आधी उगवलेली रोपे आणि बी टाकून उगवलेली रोपे यांच्या वाढीत जास्त तफावत आढळून येते आणि त्यामुळे आधी पेरलेल्या रोपांच्या छायेचा अनिष्ट परिणाम नंतर उगवलेल्या रोपांवर होऊन त्यांची वाढ कमी होते व उत्पादन अतिशय कमी येते म्हणून नांगे ताबडतोब भरणे फारच गरजेचे आहे.
ब) कोळपणी करणे :
पिकांची चांगली उगवण झाल्यानंतर ताबडतोब वापश्यावर पहिली कोळपणी करणे फारच गरजेचे आहे. त्यानंतर पीक 30 ते 35 दिवसांचे होईपर्यंत किमान दोन ते तीन वेळा कोळपणी करावी म्हणजे पीक तणविरहित राहील व कोळपणी केल्यामुळे वरचा मातीचा थर भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते
क) खुरपणी करणे :
रब्बी ज्वारी या पिकातील तणे हे खुरपणी /निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
ड) आच्छादनाचा वापर :
ज्वारी पिकातील ओलावा टिकवून ठेवण्याकरिता आच्छादन करावे लागते. आच्छादन करत असताना ऊसाचे पाचटाने, गवताचे, किंवा पॉलिथीन कागदाच्या साह्याने जमीन झाकण्याच्या पद्धतीस आच्छादन असे म्हणतात. एक हेक्टर क्षेत्रावर पाचटाचे आच्छादनाचा 10 सें.मी. उंचीचा थर देण्यासाठी 10 ते 12 टन पाचट पुरेशी होते. आच्छादन केल्यामुळे पिकास अवर्षणाचा ताण सहन करून उत्पादनात वाढ होते.
कापणी व मळणी :
रब्बी ज्वारीचे पीक जातीपरत्वे सरासरी 110 ते 130 दिवस काढणीस तयार होते. ज्वारीच्या कणसाचा दांडा पिवळा झाला आणि ताटाचा पाला वाळल्यास म्हणजे पीक तयार झाले असे समजून कापणी करावी. ज्वारी काढणीनंतर कणसे चांगले तीन ते चार दिवस उन्हात वाळवून झाल्यानंतर त्याची मळणी यंत्राद्वारे मळणी करून घ्यावी.
उत्पादन :
कोरडवाहू रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारण 18 – 20 क्विंटल मिळते तर बागायती रब्बी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारण 45 – 50 क्विंटल उत्पादन मिळते. त्याचबरोबर रब्बी कोरडवाहू क्षेत्रात धान्यांपेक्षा दुप्पट तर बागायतीत अडीच ते तीन पट कडब्याचे उत्पादन मिळते.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !