करडई एक तेलबिया पीक

महाराष्‍ट्रात सुर्यफूल व सोयाबीन नंतर करडई हे महत्‍वाचे तेलबिया पीक आहे. रब्‍बी हंगामात करडई पिकास पाण्‍याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्‍पादन देऊन जाते. कारण या पिकाच्‍या मुळ्या जमिनीत 140 ते 150 सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेत असल्याने या पिकास पाण्याचा ताण सहन करता येतो.  त्यामुळे करडई हे पीक सुर्यफूल व सोयाबीन नंतर महत्त्वाचे पर्यायी तेलबिया पीक म्हणून पुढे येत आहे.

करडईला मानवाच्‍या दैनंदिन आहारातील एक प्रमुख घटक म्‍हणून खाद्यतेलास महत्‍व आहे. जसजशी भारताची लोकसंख्या वाढत गेली तसा तेलाचा वापरही वाढत गेला आहे. भारतात इतर उद्योगही वाढत गेले आणि उद्योगातही तेलाचा वापर वाढत गेला. ही सर्व वाढ स्‍वातंत्र्य प्राप्‍तीनंतर एवढी झाली की, एकेकाळी जो भारत देश खाद्यतेलात स्‍वयंपूर्ण होता ऐवढेच नाही तर काही प्रमाणात तेल व तेलबिया निर्यातही होत होत्‍या तेथे आज मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागत आहे. ज्‍यासाठी दरसाल 100 कोटींवर विदेशी मात्रा द्यावी लागते.

आजच्या परिस्थितीत भारताची व महाराष्‍ट्राची सध्‍याची खाद्यतेल टंचाई दूर करण्‍यासाठी व तेलबियांच्‍या उत्‍पादनात स्‍वयंपूर्णता आणण्‍यासाठी केंद्र व राज्‍य पातळीवर शासनामार्फत अनेक योजना राबविण्‍यात येत आहेत. तरीही राज्‍याच्‍या गरजेपेक्षा कितीतरी पटीने तेलबियांची तूट भासते आहे.

देशात तेलबियांचे उत्‍पन्‍न वाढवून इ. स. 2027 पर्यंत देश तेलबिया उत्‍पन्नात पुन्हा स्‍वयंपूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट ठरविण्‍यात आले होते. तेलबियांचे उत्‍पादन प्रामुख्‍याने कोरडवाहू क्षेत्रात होत असल्‍याने अपुऱ्या पावसामुळे तेलबियांची लागवड शेतकऱ्यास किफायतशीर होत नाही. आतापर्यंतच्‍या पंचवार्षिक योजनेत गहू, बाजरी, ज्‍वारी, भात यांसारखी अन्‍नधान्‍य व ऊस कपाशी सारखी नगदी पीके यावरच जास्‍त भर दिला गेला आणि तेलबियाखालील क्षेत्र व उत्‍पादन लोकसंख्‍येच्‍या मानाने कमी होऊन खाद्यतेलाची टंचाई जाणवत आहे.

करडई उत्पादनासाठी संधी :

 • भारताची व महाराष्‍ट्राची सध्‍याची खाद्यतेल टंचाई दूर करण्‍यासाठी व तेलबियांच्‍या उत्‍पादनात स्‍वयंपूर्णता आणण्‍यासाठी केंद्र व राज्‍य पातळीवर शासनामार्फत अनेक योजना राबविण्‍यात येत आहेत.
 • राज्‍याच्‍या गरजेपेक्षा कितीतरी पटीने तेलबियांची तुट भासते आहे. यामुळे देशात तेलबियांचे उत्‍पन्‍न वाढवून इ. स. 1990 पर्यंत देश तेलबिया उत्‍पन्‍नात पुनहा स्‍वयंपूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट ठरविण्‍यात आले होते.
 • महाराष्ट्रात तेलबियांचे उत्‍पादन प्रामुख्‍याने कोरडवाहू क्षेत्रात होत असल्‍याने अपुऱ्या पावसामुळे तेलबियांची लागवड शेतकऱ्यास किफायतशीर होत नाही.
 • करडई हे बहुपयोगी पीक असून प्राचीन काळापासून करडईचे महत्व सर्वश्रुत आहे.
 • महाराष्ट्रात करडई उत्पादनासाठी लागणारे पोषक वातावरण व जमीन उपलब्ध असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते.
 • करडई पिकास कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे त्यापासून फारशे नुकसान होत नाही.
 • कोरडवाहू क्षेत्रावर करडई हे पीक उत्तम येते.

करडईचे विविध उपयोग :

 • करडईच्या तेलाचा उपयोग निरनिराळ्या खाद्य पदार्थांमध्ये केला जातो.
 • सोयाबीन व सुर्यफूल तेलाच्या वापरानंतर करडईच्या तेलाचा समावेश खाद्यान्नात होतो.
 • करडईच्‍या प्रत्‍येक उत्‍पादनाचा कोणत्‍या ना कोणत्‍या प्रकारे उपयोग होतो.
 • करडई झाडाचा प्रत्‍येक भाग जसे खोड, पाने, फुले, बिया उपयुक्‍त असून करडईच्‍या फुले व सुगंधी तेल, कपड्यांना रंग देणे यासाठी केला जातो.
 • अलीकडेच करडई पाकळयांचा चहा, हर्बल टी म्‍हणून प्रसिद्ध होत आहे.
 • करडईच्‍या तेलामध्‍ये असणाऱ्या 70-80 टक्‍के लिनोलिक आम्‍ल व 6 ते 8 टक्‍के ओलिक आम्‍लामुळे या तेलाची तुलना ऑलिव्‍ह ऑईल सोबत केली जाते.
 • करडईमध्‍ये सर्वसाधारणपणे 25 ते 35 टक्‍के तेल, 15 टक्‍के प्रथिने, 41 टक्‍के चोथा तसेच 2.3 टक्‍के अॅश आढळते.

करडईची लागवड का करावी?

 • करडई हे रब्‍बी हंगामातील महत्‍वाचे तेलबिया पीक आहे.
 • करडई पीक पाण्‍यास संवेदनशील असल्‍यामुळे या पीकाची लागवड रब्‍बी हंगामातील ऑक्‍टोबर ते नोव्‍हेंबर दरम्‍यान करतात.
 • करडईची सलग पेरणी करण्‍याची शिफारस करण्‍यात आलेली असून करडईच्‍या सलग पिकाचे उत्‍पन्‍न हे पट्टोपर किंवा मिश्रपीकांच्‍या मानाने जास्‍त येते.
 • पीक संरक्षणाच्‍या दृष्‍टीने करडईचे पीक सलग घेणे अधिक सोयीचे असते.
 • अवर्षणप्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर करडईची पेरणी रब्‍बी ज्‍वारीच्‍या पिकात पट्टे घालून करता येते.
 • पिकांची पाण्‍याची गरज वेगवेगळी असल्‍याने एका विशिष्‍ट वेळी यापैकी एकच चांगले पीक येते. म्‍हणून शेतकऱ्यांनी करडईचे मिश्रपीक न घेता सलग पेरणी करता येते.
 • करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे.
 • करडईची मुळे ही जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे हे पीक खालच्या थरातील अन्नांश व ओलाव्याचा उपयोग करुन घेते.
 • पिकाच्या पानावर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होते व प्रतिकुल परिस्थितीत हे पीक तग धरते.
 • करडई पिकासाठी कमी मजुर लागत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो. त्यामुळे हे पीक कोरडवाहूसाठी वरदान ठरले आहे.
 • करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या पिकापासून अधिक फायदा मिळवता येतो.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

करडई एक तेलबिया पीक हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

Leave a Reply