करडई हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. महाराष्ट्रात सोयाबीन, सुर्यफूल व भुईमूग पिकानंतर करडई तेलाचा सर्वात जास्त वापर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी केला जातो. यामुळे करडई पिकास पर्यायी तेलवर्गीय पीक म्हणून ओळखले जाते. वाचा : करडई एक तेलबिया पीक….?
करडई उत्पादन तंत्राच्या बाबी :
करडईचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी योग्य जमिनीची निवड करावी. जमिनीची पूर्व मशागत चांगली करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक व जीवाणूसंवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. करडईची पेरणी शक्याते वेळेवर करावी. पेरणीस उशीर झाल्यास पीक उत्पादनात घट येते. पेरणीनंतर आंतरमशागत योग्य करावी. पिकाला रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा. पिकास संवेदशील अवस्थेत पाणी द्यावे. पिकाची काढणी, मळणी व साठवण हे योग्य पद्धतीने करावे या सर्व बाबींचा योग्य समन्वय साधल्यास पीक उत्पादनात निश्चितपणे वाढ होईल आण प्रती हेक्टरी क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे शक्य होईल.
जमीन :
करडई या पिकास मध्यम ते खोल जमीन चांगली असते. करडई पिकास हलकी, मध्यम, भारी या तिन्ही प्रकारची जमीन मानवते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी काळी कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक पर्जन्यमान 700 ते 1000 मि.मी. असणाऱ्या भागात मध्यम, हलकी तसेच भारी जमिनीत जिरायती हंगामात करडई चांगली येते. उथळ, मध्यम जमिनीला हवामान व स्वच्छ सुर्यप्रकाश तसेच पुरेसा ओलावा आवश्यक असतो. असे वातावरण करडईस चांगले असते.
हवामान :
करडई हे पीक उष्ण समशीतोष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे करडई या पिकाला विशेषतः 20 दिवसाचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणतः 100 अंश से. ते 150 अंश से. आणि कमाल तापमान 250 अंश से. ते 300 अंश से. से.ग्रे असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणतः 5.5 ते 8.6 सामू असणाऱ्या जमिनीत करडई पीक चांगले येते.
पूर्व मशागत :
करडई हे पीक महाराष्ट्रात मुख्यत: रब्बी हंगामात घेतले जाते. खरीपाचे पीक निघाल्यानंतर जमिनीची नांगरणी अथवा कुळवणी करून पिकाची लागवड बहुतांशी शेतकरी बांधव करीत असतात. मात्र योग्य पद्धतीने पूर्वमशागत करून करडई पिकाची लागवड केल्यास पिकांतील तणांचा प्रादुर्भाव कमी होऊन पीक उत्पादनात वाढ होते म्हणून लागवडीपूर्वी मशागत करणे अत्यंत झालेले आहे.
खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची टॅक्टरच्या साह्याने खोल 25 सें.मी. नांगरट करावी. त्यानंतर वखराच्या 2 ते 3 पाळ्या देऊन शेणखत कंपोस्ट खत व हिरवळीचे खत वापरावे. जेणेकरून जमिनीत सुपीकता अबाधीत राहण्यास मदत होईल. तसेच हेक्टरी 5 टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणी पूर्वी जमिनीत पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा व्यवस्थित वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करडई पेरणीसाठी शेत तयार करावे.
लागवडीचा हंगाम :
- करडई लागवडीचा हंगाम रब्बी असून या हवामानात करडई पीक चांगले येते.
- कोरडवाहू पेरणीसाठी सप्टेंबर अखेर किंवा 20 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान करावी.
- बागायती क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे करडईची पेरणी 20 ऑक्टोबर पर्यंत करावी.
करडई लागवडीचे वाण
करडईचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी भीमा, फुले कुसूमा, एस. एस. एफ.-658, एस. एस. एफ.-708, एस. एस. एफ.-733, पी. बी. एन. एस. 12, नारी-6, नारी एन. एच.-1, डी. सी. एच.-185, एस. एस. एफ.-748 (फुले चंद्रभागा) यांपैकी कोणत्याही वाणांची पेरणीकरिता निवड करावी. वाचा : करडईचे सुधारित वाण….?
बीजप्रक्रिया :
- करडईची पेरणीपूर्वी थायरम, कॅप्टन किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकाची 2.5 ते 3 ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- अॅझोटोबॅक्टर अथवा अझोस्पिरीलम 250 ग्रॅम अधिक पी.एस.बी. 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो असे प्रमाण घेऊन बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
प्रती हेक्टरी बियाणे :
- कोरडवाहू लागवडीसाठी सरासरी 10 ते 12 किलो बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे.
- बागायत लागवडीसाठी सरासरी 12 ते 14 किलो बियाणे प्रतिहेक्टरी वापरावे.
पेरणीचे अंतर :
करडईच्या सलग पिकाची पेरणी दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. ठेवून करावी. करडईची पेरणी 5 ते 6 सें.मी. पेक्ष जास्त खोल करू नये.
आंतरमशागतीचे कामे :
- कोळपणी : पिकांच्या दोन ओळीतील मोकळ्या जागेत पीक 5-6 आठवड्याचे झाल्यावर कोळपणी करावी.
- सूक्ष्म अन्नद्रव्य : करडई लागवडीसाठी 12.5 किलो + झिंक सल्फेट 1.5 किलो बोरॉक्स 500 ग्रॅम + 4.5 लिंबाचा रस 200 लीटर पाण्यात मिसळून प्रति एकरी याप्रमाणे 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पिकांवर दोन फवारण्या कराव्यात.
- विरळणी : करडई पिकाची उगवणीनंतर 20 ते 25 दिवसांनी अतिरिक्त रोपे उपटून काढावीत व दोन रापांतील अंतर 20 सें.मी. ठेवावे.
- खुरपणी : करडई लागवडीनंतर पहिली खुरपणी सर्व साधारणपणे 30-35 दिवसांनी करावी व दुसरी खुरपणी 15-20 दिवसाचया अंतराने करावी.
तण नियंत्रित व्यवस्थापन :
तणांच्या प्रादुर्भावानुसार पेरणीनंतर 25 ते 30 आणि 45 ते 50 दिवसांनी एक किंवा दोन खुरपण्या आणि कुळवण्या कराव्यात. करडई पिकास तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करावयाचा असल्यास पेरणीनंतर परंतू उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन 0.75 क्रियाशील घटक प्रति हेक्टर 500 लीटर पाण्यात म्हणजे 30 मिली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई, उगवणीनंतर 30 दिवसांपर्यंत क्युझॉल फॉस इथाईल 15 मिली. प्रति 100 लीटर पाण्यात मिसळून योग्य फवारणी करावी, जेणेकरून तणांचा बंदोबस्त होईल आणि पिकांना कोणताही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
(टीप : शेतकरी बांधवांनी तणनाशकाचे प्रमाण, मुदत तारीख, तणनाशकाची तीव्रता इ. लक्षात घेऊन पिकासाठी वापर करावा.)
पाणी व्यवस्थापन :
- हमखास सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास करडई पिकांच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पाण्याची हलक्या 3 पाळ्या द्याव्यात.
- शेतकऱ्याकडे एकच संरक्षित सिंचन करण्याइतके पाणी उपलब्ध असल्यास प्राधान्याने 100 टक्के उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी पाण्याची पाळी द्यावी.
- पेरणीनंतर सरासरी 35 ते 40 दिवसांनी फांद्या फुटण्याच्या अवस्थेत पहिली पाण्याची पाळी द्यावी.
- पाण्याच्या 2 पाळ्या देण्याईतपत पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर सरासरी 35 ते 40 दिवसांनी पहिले व पेरणीनंतर सरासरी 65 ते 70 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
- करडई पिकांस शक्यतो तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावे. यामुळे 30-40 टक्के पाण्याची बचत होऊन कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचित करता येते.
खत व्यवस्थापन :
- करडई हे पीक रासायनिक खतांना अतिशय उत्तम असा प्रतिसाद देते. 50 किलो नत्र (110 किलो युरिया) आणि 25 किलो स्फूरद (153 किलो सिंगल सुपरफॅास्फेट) प्रतिहेक्टरी देणे या पिकास अतिशय आवश्यक आहे. सदर खते पिकास पेरणीपूर्वी द्यावीत.
- कोरडवाहू परिस्थितील शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा प्रति हेक्टरी 40 किलो नत्र व 20 किलो स्फूरद खताची मात्रा पेरणीसोबत द्यावी.
- बागायतीमध्ये 30 किलो आणि नत्र 40 किलो स्फूरद प्रति हेक्टरी पेरणीसोबत द्यावे आणि उर्वरीत 30 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी किंवा पहिले पाणी देण्यापूर्वी युरियाद्वारे पेरून द्यावी. मृद तपासणी करून खतांची मात्रा निश्चित करावी.
आंतरपीक पध्दत :
करडई पिकात आंतरपीक घ्यावयाचे असल्यास हरभरा + करडई (6 : 3) आणि जवस हे करडई (4 : 2) या आंतरपीक घ्यावे.
काढणी व मळणी :
- करडई पिकाची साधारणपणे 130 ते 135 दिवसात करडईचे पीक पक्व होते.
- करडई पिकाची पाने व बोंडे पिवळी पडतात.
- करडई पिकाची पिकाची काढणी सकाळी करावी.
- हवेत आद्रता जास्त असल्याने दोणे गळत नाही व हाताला काटे टोचत नाहीत.
- कापणीनंतर झाडांची कडपे रचुन पेठे करावीत. ते पूर्ण वाळल्यानंतर काठीने बडवुन काढावे व नंतर उफणणी करून बी स्वच्छ करावे.
- काढणी गव्हाच्या एकत्रित काढणी व मळणी (कंबाईन हार्वेस्टर) यंत्राने करावी.
- या यंत्राने काढणी अत्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात करता येते व त्यापासुन स्वच्छ माल मिळतो.
- करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्राचा प्राधान्याने वापर करून खर्च व वेळ वाचवता येतो.
उत्पादन :
- कोरडवाहू मध्यम जमिनीत प्रति हेक्टरी 12 ते 14 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
- खोल जमिनीत करडईचे 14 ते 16 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
- बागायती करडईचे 20 ते 25 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
करडई उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्यवाद !