लसूण उत्पादन तंत्रज्ञान

कंदवर्गीय पिकांमध्ये लसूण हे महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. रोजच्या दैनंदिन आहारात, मसाले तयार करण्यासाठी, तसेच लोणची, सॉस, चटण्या, पापड तयार करताना लसणाचा वापर केला जातो.

लसणामधील विविध औषधी गुणधर्मांमुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये लसणाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रातील लसणाचे सरासरी हेक्टरी उत्पादन सरासरी 9 टन इतके असून सुधारित लागवड पद्धतींचा अवलंब केल्यास लसणाचे उत्पादन वाढविता येणे शक्य आहे.

लसूण पिकाचे व्यापारी महत्त्व काय ?

लसूण हे महत्त्वाचे व्यापारी पीक असून त्याची लागवड महाराष्ट्रातील बहुतांशी सर्व जिल्ह्यांत केली जाते. लसणाचा दैनंदिन आहारात उपयोग होत असून भाज्या आणि आमटीमध्ये तसेच चटणी, लोणची, टोमॅटो केचप, इत्यादी पदार्थांमध्ये वापर केला जातो, त्यामुळे लसूण पिकास व्यापारी महत्त्व प्राप्त झालेले आहे.

लसूणाचे आरोग्याधिष्टि महत्त्व काय?

लसणामध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. खोकला, फुफ्फुस आणि पोटाचे विकार, कान व डोळ्यांचे त्रास यांवर लसूण हे गुणकारी औषध आहे. लसणामध्ये कार्बोहायड्रेट्स्, प्रोटीन्स, तसेच कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. लसणातील उग्र दर्प हा त्यातील ‘अॅलिनीन’ आणि त्यापासून मिळणाऱ्या ‘डायअलिल डायसल्फाईड’ या रसायनामुळे येतो. लसणाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण खालीलप्रमाणे असते.

लसणाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण प्रमाण (%)

अ.क्र.अन्नघटकप्रमाण (%)
1पाणी62
2कार्बोहायड्रेट्स्29.0
3प्रोटीन्स6.3
4तंतुमय पदार्थ0.8
5खनिजे0.1
6कॅल्शियम0.03
7फॉस्फरस0.31
8निकोटिनिक अॅसिड0.004
9जीवनसत्त्व ‘क’0.0013
10उष्मांक कॅलरीज्145
11फॅट्स्0.1

लसूण लागवड कशी करावी?

कंदवर्गीय पिकांमध्ये लसूण हे महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा, उस्मानाबाद, इत्यादी जिल्ह्यांमध्ये लसणाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. लसणाची लागवड रब्बी हंगामात केली जाते. मध्यम, काळी, सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत लसणाचे पीक चांगले येते. 

लसूण पिकास हवामान कसे असावे?

लसूण हे हिवाळी रब्बी हंगामात वाढणारे पीक आहे. लसणाचे पीक विविध हंगामांत घेतले जाते. परंतु अतिउष्ण अथवा अतिथंड हवामान या पिकाला मानवत नाही. परंतु समशीतोष्ण कोरडे हवामान, दिवसाची लांबी अधिक, भरपूर सूर्यप्रकाश आणि समुद्रसपाटीपासून 3,000 – 4,000 फूट उंची असलेल्या ठिकाणी लसणाचे पीक चांगले वाढते. लसणाच्या चांगल्या वाढीसाठी 25-28 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान 10-15 अंश सेल्सिअस पोषक आहे.  

लसूण लागवडीसाठी जमीन कोणती निवडावी?

लसूण लागवडीसाठी जमीन भुसभुशीत आणि मध्यम कसदार असावी. मध्यम काळी, सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन निवडावी. हलक्या जमिनीत लसणाचे गड्डे चांगले पोसत नाहीत; तर भारी चिकण जमिनीत गड्डयांना योग्य आकार येत नाही आणि गड्डे फुटण्याचे प्रमाण वाढते, म्हणून अशी जमीन लसणाच्या लागवडीसाठी निवडू नये.

लसूण पिकाच्या कोणत्या जाती वापराव्या?

(1) श्वेता (सिलेक्शन-2) :

या जातीचा गड्डा मोठा (जाडी 5.2 सेंटिमीटर, उंची 5.0 सेंटिमीटर) असून रंग पांढराशुभ्र आणि स्वाद तिखट असतो. पाकळयांची संख्या सरासरी 26 असते. लागवडीपासून 130-135 दिवसांत (4 ते 4.5 महिन्यांत) तयार होतो. हेक्टरी उत्पन्न 10 टन मिळते.

(2) ॲग्रीफाउंड व्हाईट (जी-41) :

या जातीचे कंद मोठ्या आकाराचे, घट्ट, पांढरे, तिखट, पाकळयांची संख्या 20-25, पाकळया मोठ्या, जाड, कालावधी 150-160 दिवस. हेक्टरी उत्पादन 13-14 टन येते. ही जात रोग व किडींना कमी प्रमाणात बळी पडते. पाकळयांचा आणि गड्डयांचा आकार मोठा आणि रंग शुभ्र असल्यामुळे निर्यातीस योग्य असून ही जात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या राज्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे.

(3) गोदावरी (सिलेक्शन-2) :

लसणाच्या या जातीचा गड्डा मध्यम आकाराचा (जाडी 4.35 सेंटिमीटर, उंची 4.3 सेंटिमीटर) असून रंग जांभळट पांढरा आणि स्वाद तिखट असतो. गड्डयातील पाकळ्यांची संख्या सरासरी 24 पर्यंत असते. लागवडीपासून 140-145 दिवसांत (4.5 ते 5 महिन्यांत) तयार होते. हेक्टरी उत्पन्न 11 टन असून जामनगर ह्या स्थानिक वाणापेक्षा 40 टक्के अधिक उत्पादन मिळते. ही जात फुलकिडे, (कोळी) माईट्स् आणि करपा रोगाला कमी प्रमाणात बळी पडते.

(4) यमुना सफेद – 3 (जी-282) :

या वाणाचे कंद शुभ्र पांढऱ्या रंगाचे, मोठे (56 सेंमी. व्यास), मोठ्या आकाराच्या कळयांचे असून कळयांचा रंग पांढरा, उत्पादन हेक्टरी 17-20 टन, 130-140 दिवसांत तयार होते. निर्यातीस योग्य वाण.

लसूण लागवड कोणत्या हंगामात करावी?

 • महाराष्ट्रात लसणाची लागवड रब्बी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच सप्टेंबर ते नोव्हेंबर ह्या काळात केली जाते.
 • पश्चिम महाराष्ट्रात ऑक्टोबर ही लागवडीची योग्य वेळ आणि फेब्रुवारी – मार्च ही काढणीची योग्य वेळ आहे.
 • लसणाचे उत्पादन आणि मालाची प्रत उत्तम येण्यासाठी या पिकाची लागवड ऑक्टोबरच्या 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान करावी.

लसूण पिकातील लागवडीचे अंतर किती ठेवावे?

सर्वसाधारण मोठ्या गड्ड्यांच्या लसणाच्या जातींसाठी दोन ओळींतील अंतर 15 सेंटिमीटर आणि दोन रोपांतील अंतर 10 सेंटिमीटर ठेवावे. मध्यम गड्यांच्या लसणाच्या जातीसाठी लागवडीचे अंतर 10 X 7.5 सेंटिमीटर इतके ठेवावे तर लागवडीची खोली 2 – 3 सेंटिमीटर एवढी ठेवावी.

लसूण लागवडीसाठी कोणती पद्धती वापरावी?

 • लसणाची लागवड सपाट वाफ्यात करतात. लसणाच्या पिकामध्ये लागवडीचे अंतर योग्य ठेवल्यास गड्ड्यांच्या वाढीस पुरेसा वाव मिळून पिकात दोष निर्माण होत नाहीत, तसेच रोपांची पुरेशी संख्या राखता येऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येते.
 • लसणाच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य मशागत करणे आवश्यक आहे. नांगरणी आणि कुळवणी करून शेत सपाट आणि भुसभुशीत करून घ्यावे. मशागत 10 -15 सेंटिमीटर खोल करावी. शेत तयार करताना 20 टन शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
 • जमिनीच्या मगदुरानुसार सपाट वाफे तयार करावेत. लागवड सरळ ओळीमध्ये कोरड्यात करून लगेच हलके पाणी द्यावे. लागवड करताना तणनाशकांचा वापर केल्यास फायदा होतो. तसेच कार्बोफ्युरॉन दाणेदार कीटकनाशकांचा वापरही लागवडीच्या वेळी करावा.
 • लागवडीसाठी लसणाचे एकसारखे गड्डे निवडून मोठ्या, निरोगी पाकळया (8 – 10 मिलिमीटर जाडीच्या) लागवडीसाठी वापराव्यात. लसणाच्या गोदावरी आणि श्वेता ह्या जातींची लागवड करावयाची असल्यास हेक्टरी 500 किलो बियाणे वापरावे.
 • ॲग्रीफाउंड व्हाईट ह्या जातीची निवड केल्यास हेक्टरी 700 किलो व यमुना सफेद – 3 चे हेक्टरी 800 किलोपर्यंत बियाणे वापरावे. कारण ह्या जातीच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असतात.

लसूण पिकाला खते किती प्रमाणात द्यावे?

 • लसणाच्या चांगल्या वाढीसाठी खतांचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर करणे महत्त्वाचे आहे. लागवडीसाठी जमीन तयार करताना दर हेक्टरी 30 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात मिसळावे.
 • लागवडीपूर्वी हेक्टरी 100-125 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. नत्राची निम्मी मात्रा आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे.
 • नत्राची उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर एक महिन्याने वरखत म्हणून द्यावी. वरखत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा त्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद मिळतो.

लसूण पिकाला पाणी किती प्रमाणात द्यावे?

 • लसणाची मुळे जास्त खोलवर जात नसल्यामुळे तसेच लसणाचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे पिकाला जास्त प्रमाणात पाणी देणे, पाण्याचा ताण देणे आणि वाफ्यांमध्ये पाणी साचू देणे ह्या गोष्टी टाळाव्यात.
 • योग्य उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे. म्हणून लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी त्यानंतर 3 – 4 दिवसांनी द्यावे आणि त्यानंतर पुढच्या पाण्याच्या पाळ्या 8 – 10 दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार द्याव्यात.
 • लसणाचे गड्डे वाढत असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. तापमान वाढेल तसे पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर आवश्यकता भासल्यास कमी करावे. गड्डे तयार झाल्यावर पिकामध्ये माना पडून पात पिवळी पडायला सुरुवात झाल्यावर कंद पूर्ण वाढले असे समजावे आणि पाणी बंद करून कंद पक्के होऊ द्यावे.
 • गड्डे तयार झाल्यावर किंवा पक्व झाल्यावर पाणी दिल्याने गड्डयांचा रंग बदलतो, कंद सडतात आणि लसणाची प्रत बिघडते. लसूण साठवणीत अधिक नुकसान होते. पाकळ्या फुटून प्रत खराब होते. लसूण लागवडीपासून पक्व होईपर्यंत सर्वसाधारणपणे 15 – 18 पाण्याच्या पाळ्या लागतात.

लसूण पिकात आंतरमशागत कशी करावी?

 • पिकवाढीच्या सुरुवातीच्या 1.5 महिन्यात तणे मोठ्या प्रमाणावर वाढतात. म्हणून दोन वेळा खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे.
 • लागवडीच्या वेळी गोल 1 लीटर किंवा स्टॉम्प 3.5 लीटर किंवा बासालीन 1.5 लीटर ही तणनाशके 500 लीटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी वाफ्यांमध्ये फवारून नंतर लागवड करावी आणि लगेच हलके पाणी द्यावे.
 • नंतर 45 – 50 दिवसांनी खुरपणी करावी. गड्डे वाढायला सुरुवात झाल्यास कंदांना इजा होण्याची शक्यता असते म्हणून उशिरा खुरपणी करू नये.
 • लागवड केल्यानंतर 2.5 महिन्यांपर्यंत म्हणजे गड्डे भरायला सुरुवात होण्याच्या काळात पिकाला मातीची भर द्यावी; त्यामुळे गड्डयांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.

लसूण पिकात कोणती आंतरपिके घ्यावे?

लसूण पिकामध्ये वाफ्यांच्या वरंब्यावर कोबी, कोथिंबीर किंवा मुळा ह्यांसारखी कमी कालावधीत येणारी पिके घेता येतात. लसूण पीक आंतरपीक म्हणून ऊस, मिरची, फळबागा ह्या पिकांमध्ये घेता येते.

लसूण पिकाची काढणी कशी करावी?

 • लसणाची पात पिवळी पडून सुकण्यास सुरुवात झाल्यावर पीक काढणीला तयार झाले असे समजावे. लसूण पूर्ण पक्व झाल्याशिवाय काढणी करू नये.
 • तसेच पक्व झालेला लसूण अधिक काळ शेतात राहू देऊ नये.
 • गड्डे उपटून काढणी करावी.
 • जमीन कडक असल्यास कुदळीने अथवा लाकडी नांगराने जमीन मोकळी करून गड्डे वेचून काढावेत.
 • पात हिरवी असल्यास शेतात 4 – 6 दिवस ओळीत पसरवून आणि गड्डे पातीने झाकले जातील अशा प्रकारे ठेवून सुकू द्यावेत.
 • नंतर आकारमानाप्रमाणे निवड आणि प्रतवारी करून जुड्या बांधून ठेवाव्यात अथवा 3 सेंमी. देठ आणि 1 सेंमी. मुळांचा भाग ठेवून पात कापून साठवणी करावी.

लसूण पिकाचे उत्पादन किती मिळते?

योग्य लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास किंवा सुधारित वाणाचा वापर केल्यास लसणाचे प्रती हेक्टरी उत्पादन 12 ते 14 टनांपर्यंत मिळते.

लसूण पिकाची प्रतवारी कशी करावी?

 • सर्वसाधारण लसणाची 3 सेंटिमीटरपेक्षा जास्त व्यासाचे मोठे गड्डे, 2.5 – 3 सेंटिमीटर व्यासाचे मध्यम गड्डे आणि 1 – 2.5 सेंटिमीटर व्यासाचे लहान गड्डे अशा प्रकारे प्रतवारी करावी.
 • फुटलेले, सडके अगर इजा झालेले गड्डे वेगळे काढून टणक, निरोगी आणि निवड केलेले गड्डे साठवावेत. गड्याच्या पॅकिंगसाठी 40 – 60 किलोच्या जाळीदार पिशव्या वापराव्यात.

लसूण पिकाची विक्री कशी करावी?

लसूण पिकास वर्षभर सर्वत्र मागणी असते. यामध्ये मालाची आवक वाढली की, त्याचा बाजारभाव घसरतो अशी असणारी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात शेतकरी आठवडी बाजारात लसणाची व्यापारी व मध्यस्थांच्या मदतीने विक्री करत असतात. तसेच शहरी भागात दररोज किरकोळ किंवा ठोक विक्री विक्री करतात.

लसूण पिकाची साठवण कशी करावी?

 • वर्षभर पुरवठा होण्यासाठी लसणाची साठवण करावी लागते. लसणाच्या वाळलेल्या पातीसहित जुड्या बांधून साठवण करता येते.
 • जुड्या टांगून ठेवाव्या. किंवा रचून ठेवाव्यात. पात कापून, निवड करून जाळीदार पिशव्यांमध्ये लसणाची साठवण करता येते.
 • साठवण करण्याच्या ठिकाणी हवा खेळती राहणे आवश्यक आहे. तसेच साठवणीपूर्वी लसूण चांगला वाळलेला असावा.
 • साठवणीत प्रामुख्याने वजनात घट होते. लसूण पूर्ण पक्व न होऊ देता काढल्यास साठवणीत खूपच नुकसान होते; तर सुकवणी चांगली न केल्यास सडीचे प्रमाण वाढते.
 • 5-6 महिन्यांच्या कालावधीत साठवणीत 15-20 टक्के घट होते.

लसूण उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

Leave a Reply