भेंडी, कोबी व वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन

भेंडी, कोबी व वांगी हे प्रमुख भाजीपाला पिके असून यामध्ये किडीमुळे अंदाजे २० ते ३० टक्के पर्यंत नुकसान होते. याशिवाय भाजीपाला उत्पादन वाढीसाठी करण्यात येणारा रासायनिक कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर केल्यास भाजीपाल्यावर कीटकनाशकांचा अंश राहून त्याचे दुष्परिणाम होतात. परिणामी अशाप्रकारचा भाजीपाला हा मानवी आरोग्यास हानीकारक ठरत आहे. त्यामुळे भेंडी, कोबी व वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्या भागातील भाजीपाल्यावर आढळून येणाऱ्या महत्त्वाच्या किडींमुळे शेतकरी बांधवाचे अतोनात नुकसान होते. हाताशी आलेले भाजीपाल्याचे पीक किडींच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होते. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी सहन कराव्या लागतात. अशा अडचणीवर मात करण्यासाठी भेंडी, कोबी व वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणे गरजेचे आहे.

) भेंडी पिकावरील किडींचे व्यवस्थापन

तुडतुडे :

 • ही भेंडी वरील प्रमुख कीड आहे. या किडीचे पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषण करतात.
 • रस शोषण करताना त्यांच्या तोंडाद्वारे विषारी लाळ झाडाच्या पेशीत सोडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात.
 • जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर पाने विटकरी लाल रंगाचे कडक आणि चुरडल्यासारखे दिसतात.
 • ढगाळ वातावरणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि जर जोराचा पाऊस असेल तर त्यांच्या संख्येत घट होते.

शेंडे व फळे पोखरणारी अळी :

 • ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. जास्त आर्द्रता व जास्त उष्णतापमान या किडीला पोषक असते.
 • उन्हाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. एक अळी अनेक कळी, फुले व फळांचे नुकसान करू शकते.
 • पोखरलेल्या कळ्या व फुले वाळतात आणि खाली पडतात तर प्रादुर्भावग्रस्त फळे विकृत आकाराची होतात.
 • फळांची वाढ होत नाही आणि अशी फळे विकण्याच्या दृष्टीने उपयोगी नसतात.

पाने गुंडाळणारी अळी :

 • या अळीचा प्रादुर्भाव तुरळक प्रमाणात होत असतो.
 • या किडींची अळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर असते.
 • अंड्यातून निघालेली अळी दोन दिवसानंतर पानाची गुंडाळी करते आणि त्यामध्ये आत राहून पानाची पेशी खाते.
 • एका गुंडाळीमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक अळ्या आढळतात. परंतु कालांतराने या अळ्या एका पानावरून दुसऱ्या पानावर जाऊन पाने खातात.
 • पिकाला जास्त नत्र दिल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.

मावा :

 • ही कीड भेंडीच्या पानातून तसेच कोवळ्या भागातून रसशोषण करते.
 • याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.
 • झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो.
 • ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.

पांढरी माशी :

 • ही कीड विविध भाजीपाला पिकावर व इतर पिकावर आढळून येते. या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात.
 • जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडतात प्रौढ कीटकांच्या शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. या द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा येते.
 • परिणामी झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर परिणाम होतो. याशिवाय ही कीड विषाणू रोगाचा प्रसार करते.

नियंत्रण : इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.९ सी.एस. ६ मि.ली. किंवा मॅलॅथीऑन ५० टक्के ई.सी. ३० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

) वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन

शेंडा व फळे पोखरणारी अळी : ही कीड वांग्यावरील अत्यंत नुकसानकारक कीड आहे. या किडीमुळे वांगी पिकाचे दरवर्षी अतोनात नुकसान होते.

 • या किडीच्या अळ्या पानाच्या देठातून पोखरून आत शिरतात व देठाचा आतील भाग खातात त्यामुळे पान मलूल होते, त्याच प्रकारे झाडाची कोवळी शेंडीसुद्धा पोखरली जाते व त्यामुळे शेंडे मलूल होऊन खाली झुकलेले दिसतात.
 • याच अळ्या पुढे फुले व फळे पोखरतात. एक अळी ४ ते ६ फळांचे नुकसान करते.
 • या किडीचे पतंग लहान व सुंदर असते.
 • पंख स्वच्छ पांढरे असून त्यावर गुलाबी व पिंगट ठिपके असतात, त्यामुळे ही कीड ओळखण्यास सोपी असते.
 • या किडीच्या अळ्या गुलाबी छटांच्या असतात. अळीने आत घुसताना केलेले छिद्र फार लहान असते, परंतु फळात आत शिरल्यानंतर आतील बराच भाग पोखरून फळ खाण्यास अयोग्य करते.
 • शेंड्यात अथवा फळात शिरलेल्या अळ्या बाहेर येऊन दुसऱ्या शेंड्यात अथवा फळात जातात.

ठिपक्याचे भुंगेरे : ही कीड वांगी पिकावरील महत्त्वाची नुकसानकारक कीड आहे.

ही कीड झाडाच्या पानातील हरितद्रव्य खातात आणि पानाची चाळणी करतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.

पान पोखरणारी अळी : या किडीची अळी पानावरच्या शिरा, मुख्य शीर, पानाचे देठ आणि कोवळे शेंडे पोखरते आणि आतील पेशी खाते. परिणामतः कीडग्रस्त भागावर गाठीसारखा आकार येतो. पोखरलेला भाग अळीच्या विष्ठेने भरला जातो आणि कीडग्रस्त पाने व शेंडे वाळतात.

नियंत्रण : लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.९ सी.एस. ६ मि.ली. किंवा मॅलॅथीऑन ५० टक्के ई.सी. ३० मि.ली. क्लोरॅन्ट्रीनिप्रोल १८.५ टक्के एस.सी. १ मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

) कोबी पिकावरील किडींचे व्यवस्थापन

मावा : ही कीड कोबीवर्गीय पिकावरील महत्त्वाची कीड आहे. या किडीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

 • ही कीड फिकट हिरव्या रंगाची असून आकाराने लहान व शरीराने मृदू असते. पूर्ण वाढ झालेल्या माव्याची लांबी साधारणत: १ ते २ मि.मी. असून पोटाचे मागील बाजूस दोन शिंगाकृती टोके असतात.
 • मावा बहुदा बिनपंखी असतो. परंतु जास्त उष्णतामान व कमी आर्द्रता असल्यास पंख असलेले प्रौढ तयार होऊन एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊन प्रसार होतो.
 • ही कीड पानाच्या खालच्या बाजूस असंख्य प्रमाणात आढळत असून एकाच ठिकाणी निश्चल राहते.
 • या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीपासून तर पीक निघेपर्यंत राहतो. ही कीड पानातून तसेच झाडाच्या इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते.
 • कीड मोठ्या प्रमाणात आढळल्यास पाने पिवळी होऊन वाळतात. तसेच रोपांची वाढ खुंटते व पिकावर वाईट परिणाम होतो. याशिवाय या किडीच्या शरीरातून गोड चिकट पातळ पदार्थ बाहेर टाकला जातो.
 • बुरशीची वाढ होते व त्याचा पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होतो.

चौकोनी ठिपक्याचा पतंग : अळ्या फिकट पिवळसर तसेच फिकट हिरवट असतात. या किडीची अळी पानाचे खालच्या बाजूस राहून पानांना छिद्रे पाडून त्यातील हरितद्रव्य खातात. मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पाने फस्त करून फक्त शिराच शिल्लक राहतात. ही कीड मार्च पर्यंत कार्यक्षम राहते.

कोबीवरील फुलपाखरू : अळी पानाचे खालचे बाजूस राहून पाने कुरतडून खाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अळ्या पूर्ण पान खाऊन टाकतात व पानाचे देठही खातात. पानावर निरनिराळ्या आकाराची छिद्र दिसतात.

गड्डे पोखरणारी अळी :

 • ही कीड जवळपास सर्वच कोबीवर्गीय पिकावर तसेच मुळावर्गीय पिकावर आढळून येते.
 • अळ्या शिराच्या बाजूने पाने पोखरतात. पांढुरक्या पातळ झालेल्या पेशीमध्ये त्याची विष्ठा भरलेली आढळते.
 • तिसऱ्या अवस्थेतील अळ्या हे पानातील हरितद्रव्य खातात तसेच पानाचे देठ आणि खोड किंवा पत्ताकोबी आणि फुलकोबीचे फुल व गड्डे पोखरतात.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ होत नाही आणि फुलांना व गड्डयांना विकृत आकार येतो.

नियंत्रण : मॅलॅथीऑन ५० टक्के ई.सी. ३० मि.ली. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा फ्लुबेंन्डेमाइड ३९.३५ टक्के एस.सी., १ मि.ली. किंवा स्पिनोसॅड २.५ टक्के १२ मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भेंडी, कोबी व वांगी पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

 • उन्हाळ्यामध्ये खोलवर नांगरट केल्यास किडींच्या जमिनीतील सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खाऊन नष्ट होतील.
 • पिकाची योग्य फेरपालट करावी.
 • प्रादुर्भावग्रस्त पाने, शेंडा, फळे गोळा करून नष्ट करावी.
 • ठिपक्याची अळी व घाटेअळी यांचे कामगंध सापळे शेतामध्ये प्रति हेक्टरी ५ या प्रमाणात लावावे.
 • शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी थांबे लावावेत व थोडा भात शेतामध्ये ठेवल्यास पक्षी आकर्षित होऊन किडी खातात.
 • पांढऱ्या माशीसाठी पिवळे सापळे १० प्रति हेक्टरी लावावेत.
 • कीटकनाशकाचा अनावश्यक वापर टाळावा. त्यामुळे परभक्षी कीटक जसे ढालकिडा, क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण इ. व परोपजीवी कीटक जसे ट्रायकोग्रामा, ब्रूकॉन इत्यादींचे संरक्षण होईल. त्यामुळे हानिकारक किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होण्यास मदत होईल.
 • ठिपक्याची अळी, घाटेअळी, चौकोनी ठिपक्याचा पतंग व इतर पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५०,००० प्रती हेक्टरी शेतामध्ये सोडावेत.
 • कोबीवर्गीय पिकांमध्ये २० ते २५ ओळीनंतर २ ओळी मोहरी पेरावी.
 • पांढरी माशी व लहान किडींच्या नियंत्रणासाठी क्रायसोपाच्या २ अळ्या प्रति झाड सोडावेत.
 • फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. २५० एलई प्रति हेक्टरी वापर करावा.
 • ठिपक्याच्या अळीचा, रस शोषण करणाऱ्या किडींचे प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा दशपर्णी अर्काची १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
 • वरील रासायनिक कीटकनाशकाचा वापर फक्त किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर करावा.
 • वरील रस शोषण करणाऱ्या किडींसाठी असिटामीप्रीड किंवा फॅनप्रोपॅथीन ३० टक्के इ.सी. १५ मि.ली., डायमिथोएट ३० ईसी १० मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टीप : शेतकऱ्यांनी कीटनाशकाचा अथवा औषधांचा वापर हा कीटकशास्त्रज्ञ अथवा तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसारच करावा.

कीड व्यवस्थापन केल्यामुळे होणारे फायदे

 • भाजीपाला पीक उत्पादनात वाढ होते.
 • चांगल्या दर्जाचा भाजीपाला उत्पादीत होतो.
 • भाजीपाला पिकाची प्रतवारी करणे सुलभ होते.
 • रासायनिक औषधांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो.
 • भाजीपाल्याची गुणवत्ता उत्तम राखल्यामुळे त्यास बाजारात चांगला दर मिळतो.

विशेष संदर्भ :

Prajwal Digital

Leave a Reply