डाळिंबाचे मूल्यवर्धित पदार्थ

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

डाळींब हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे फळझाड असून डाळिंबाचा उपयोग मानवी आहारात खाण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगात निरनिराळे मूल्यवर्धित पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

डाळिंबापासून स्क्वॉश, जेली, डाळिंबाचे सरबत, डाळिंबाचा रस, अनादाना,सिरप इ. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात त्यामुळे डाळिंबाला व्यावसायिक व औद्योगिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

वाचा :

फळांपासून वाईन निर्मिती उद्योग

गुलाब प्रक्रिया

डाळिंबाचा उपयोग व फायदे (Uses and benefits of pomegranate) :

  • डाळींब फळांच्या रसापासून तयार केलेल्या पेयांना भारतभर वर्षभर मागणी असून ते श्रमपरिहारक, उत्साहवर्धक असून त्याचे विविध औषधी उपयोगही आहेत.
  • डाळींबाच्या रसात 12 ते 16 टक्के सहज पचणारी साखर व जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे.
  • डाळींब फळांपासून सरबत, जॅम अशासारखे टिकाऊ पदार्थही करता येणे शक्य झाले आहे.
  • डाळिंबापासून साली दाणे वेगळे करण्यासाठी यंत्र विकसित झाले असून त्याची क्षमता ताशी 150 किलो डाळींब सोलण्याची आहे.
  • डाळिंबाच्या रसापासून चांगल्या प्रतीचे कर्बयुक्त पेय तयार केल्यास त्याला फार मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
  • डाळिंबापासून अगदी कमी खर्चात अनारदाणा तयार करता येतो.
  • डाळिंबाचा उपयोग प्रामुख्याने भाज्यांमध्ये अन्न शिजवताना चिंच, आमसुलाऐवजी वापरता येतो. त्यामुळे भाज्यांची चव सुधारते त्या स्वादिष्ट, रुचकर लागतात.
  • डाळिंब व त्याच्या इतर घटकांचा औषधी उपयोग म्हणून उपयोग करण्यात येतो.

डाळिंबाचे मूल्यवर्धित पदार्थ (Pomegranate value-added products) :

स्क्वॉश, जेली, डाळिंबाचे सरबत, डाळिंबाचा रस, अनादाना,सिरप इ. पदार्थ तयार केले जातात त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

1) डाळिंबाचा रस (Pomegranate juice)

साहित्य :  डाळिंबातील दाणे काढण्यापूर्वी फळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. दाणे काढण्यासाठी डाळिंबाच्या देठाकडील व फुलाग्राकडील भाग कापून काढला जातो. फळांचे कापून चार भाग करून त्यातील दाणे, साल व पापुद्रे वेगळे करून घेतात. दाणे सोलणी मशिनच्या सहाय्याने सोलल्यास डाळिंबाचे 85 ते 90 टक्के दाणे चांगल्या स्थितीत मिळतात. दाणे काढल्यानंतर दाबयंत्रात अल्प दाबाने त्यांचा रस काढला जाऊ शकतो.

कृती :

  • डाळिंबाच्या फळामध्ये सरासरी 60 ते 70 टक्के दाणे निघतात.
  • पूर्ण पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यापासून 75 ते 85 टक्के रस निघतो.
  • डाळिंबाच्या रसामध्ये 78 टक्के पाणी, 2 टक्के प्रथिने, 2 टक्के स्निग्ध पदार्थ, 15 टक्के साखर, 1 टक्के खनिज आणि 0.3 ते 0.4 टक्के आम्लतेचे प्रमाण जातीनुसार असते.
  • रस 80 ते 85 अंश सेल्सिअस तापमानास 15 मिनिटे तापवून थंड करावा. रात्रभर भांड्यात ठेवून तो न हलविता वरचा रस सायफन पद्धतीने काढून रस बाटल्यांत भरतात.
  • रस भरण्यापूर्वी स्वच्छ केलेल्या बाटल्या 30 मिनिटे उकळत्या पाण्यात गरम करून निर्जंतुक केल्या जातात.
  • रस 80 अंश ते 85 अंश से. ला 25 ते 30 मिनिटे उकळून तो रस निर्जंतुक गरम बाटल्यात भरून क्राऊन कॉर्किंग मशिनच्या सहाय्याने बूच (टोपण) बसवून बंद केला जातो.
  • सोडियम बेन्झाएट संरक्षक 600 मिलिग्रॅम प्रति किलो रसायनाचा वापर करून रस टिकविता येतो.

2) डाळिंबाचे सरबत (Pomegranate syrup)

साहित्य : डाळिंबाच्या रसामध्ये 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून डाळिंब रसाचे सरबत तयार करण्यासाठी डाळिंबाचा रस, 15 टक्के साखर व 0.25 टक्के सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत. यात डाळिंबाचा रस, 15 टक्के साखर व 0.25 टक्के सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थ वापरावेत.

कृती :

  • डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 1 किलो 370 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरुरीप्रमाणे टाकावा.
  • मोठ्या पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे.
  • त्यात साखर टाकून ती पूर्ण विरघळली जाईल, या पद्धतीने ढवळावे.
  • तयार होणारा साखरेचा पाक पातळ मलमल कापडातून दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावा.
  • त्यात डाळिंबाचा रस टाकून तो मोठ्या चमच्याने एकजीव करावा.
  • दोन ग्लासमध्ये थोडे सरबत घेऊन एकामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड व दुसऱ्यात जरुरीप्रमाणे खाद्य रंग टाकून चमच्याच्या सहाय्याने पूर्ण विरघळून घ्यावे.
  • नंतर सरबतात टाकून एकजीव करावे.
  • हे सरबत 200 मि.ली. आकारमानाच्या बाटल्यास भरून बाटल्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवाव्यात.

3) डाळिंबाचा स्क्वॅश (Pomegranate squash)

डाळिंबाचा रस काढून तो पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा. डाळिंब रसात 13 टक्के ब्रीक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून स्क्वॅश तयार करण्यासाठी 25 टक्के डाळिंबाचा रस, 45 टक्के साखर व 1 टक्का सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण पुढीलप्रमाणे वापरावे.

साहित्य :

डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 1 किलो 70 ग्रॅम, पाणी 1.2 किलो, सायट्रिक अ‍ॅसिड 32 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरुरीप्रमाणे व सोडियम बेन्झोएट 2.6 ग्रॅम घ्यावे.

प्रक्रिया :

  • मोठ्या पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड व साखर टाकून पूर्ण विरघळून घ्यावे.
  • हे द्रावण पातळ मलमल कापडातून दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावे.
  • डाळिंबाचा रस टाकून चमच्याने एकजीव करावा.
  • हे द्रावण मंदाग्नी शेगडीवर गरम करून घ्यावे. थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवावे.
  • दोन ग्लासमध्ये थोडा थोडा स्क्वॅश घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झोएट व दुसऱ्यामध्ये जरुरीप्रमाणे तांबडा खाद्य रंग टाकून ते चमच्याने विरघळून घ्यावे.
  • दोन्ही विरघळलेले द्रावण स्कॅशमध्ये टाकून ते चमच्याने एकजीव करावे.
  • निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या बाटल्यांमध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकण (बूच) बसवून त्या हवाबंद कराव्यात.
  • स्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या हवामानात ठेवून त्यांची साठवण करावी.
  • स्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावा व नंतर तो पिण्यासाठी वापरावा.

4) डाळिंब सिरप (Pomegranate syrup)

डाळिंबाच्या रसात 13 टक्के ब्रिक्स व 0.8 टक्के आम्लता गृहीत धरून डाळिंब सिरप तयार करण्यासाठी 25 टक्के डाळिंब रस, 65 टक्के साखर व 1.5 टक्के सायट्रिक अ‍ॅसिड या सूत्रानुसार घटक पदार्थांचे प्रमाण वापरावे.

साहित्य : डाळिंबाचा रस 1 किलो, साखर 2 किलो 470 ग्रॅम, पाणी 4.78 किलो, सायट्रिक अ‍ॅसिड 52 ग्रॅम, तांबडा खाद्य रंग जरूरीप्रमाणे व सोडियम बेन्झोएट 2.6 ग्रॅम घ्यावे. 

प्रक्रिया : एका पातेल्यात पाणी वजन करून घ्यावे. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड टाकून पूर्ण विरघळून घ्यावे व नंतर त्यात डाळिंब रस टाकावा व साखर टाकून चमच्याने हलवून शक्य तेवढी साखर विरघळून घ्यावी. पातेले मंदाग्नी शेगडीवर ठेवून साखर पूर्ण विरघळेपर्यंत सिरप स्टीलच्या मोठ्या चमच्याने किंवा पळीने सतत हलवत राहवे. सिरपमध्ये साखर पूर्ण विरघळल्यानंतर पातेले शेगडीवरनू खाली उतरून घ्यावे. दोन ग्लासमध्ये थोडे थोडे सिरप घेऊन एकामध्ये सोडियम बेन्झोएट व दुसऱ्यामध्ये जरूरीप्रमाणे तांबडा खाद्य रंग विरघळून सिरपमध्ये टाकून एकजीव करावे. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये सिरप भरून त्यांना ताबडतोब झाकण (बूच) बसवून त्या हवाबंद कराव्यात. सिरपची साठवण थंड व कोरड्या ठिकाणी करावी.

वाचा :

टोमॅटो प्रक्रिया

ळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज

डाळिंब प्रक्रिया उद्योगाचे फायदे (Benefits of Pomegranate Processing Industry) :

  • डाळिंबाचे क्षेत्र व उत्पादन वाढविण्यास संधी वाढेल.
  • डाळिंबाचे प्रती हेक्टरी उत्पादन वाढेल.
  • मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यामुळे डाळिंबाची मागणी वाढेल.
  • ग्राहकांना शुद्ध व चांगल्या गुणवत्तेचे पदार्थ उपभोगण्यास मिळतील.
  • प्रक्रिया उद्योग व औद्योगिकीकरणास चालना मिळेल.
  • उद्योजकाचे प्रक्रिया उद्योगातून आर्थिक बळकीटकरण होईल.

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979

डाळिंबाचे मूल्यवर्धित पदार्थ हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

1 thought on “डाळिंबाचे मूल्यवर्धित पदार्थ”

Leave a Reply