अमित औदुंबर तुपे, शास्त्रज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, परभणी
टरबूज- सिटुलस व्हलगॅरिस (वॉटर मेलॉन)
आफ्रिकेच्या जंगलामध्ये वन्य वनस्पती म्हणून आढळलेल्या या पिकाचा भारतामध्ये राजस्थान मार्फत प्रसार झालेला आहे. उष्ण प्रदेशामध्ये येणारे प्रमुख पीक म्हणून जगात कलिंगडाची ओळख आहे.
जमीन :-
टरबूज पिकासाठी हलकी, पोयट्याची, वाळु मिश्रित व पाण्याचा निचरा असणारी जमीन लागवडीस उपयुक्त आहे. चुनखडीयुक्त व चोपण जमिनीत टरबुजाची लागवड करू नये.
हवामान :-
प्रामुख्याने उन्हाळयात घेतले जाणारे हे पीक 25 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगला प्रतिसाद देते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. वातावरणामध्ये थंडी, दमटपणा किंवा धुके असल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. भर पावसाळ्याचे दिवस सोडल्यास वर्षभर कलिंगडाची लागवड करता येते.
सुधारीत जाती :-
शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती, मधु, मिलन, असाही यामाटो, अगस्टाए शुगर किंग.
टरबुजाच्या खाजगी कंपन्यांच्या भरपूर जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीमध्ये शुगर क्वीन ही सिंजेटा कंपनीची जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
बियाणे :-
साधारणत: टरबुजाच्या लागवडीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी अडीच ते तीन किलो बियाणे पुरेसे आहे तर संकरीत जातीचे 500 ते 600 ग्रॅम बियाणे प्रती हेक्टरी आवश्यक आहे.
लागवड :-
टरबुजाची लागवड डिसेंबरचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारी मध्यापर्यंत करता येते. या पिकाची लागवड गादीवाफ्यावर देखील करता येते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :-
लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून 15 ते 20 टन शेणखत प्रती हेक्टरी द्यावे. लागवडीपूर्वी 50:50:50 किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर – एक महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन :-
टरबूजाच्या पिकाकरीता पाण्याचे योग्य वेळी नियोजन करणे आवश्यक आहे. टरबूजाचे पीक जसे वाढेल तसे पाण्याची गरजही वाढते. फळ लागण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा पिकांच्या मुळांशी जास्त संपर्क आल्यास रोग पडण्याची शक्यता जास्त असते.
काढणी व उत्पादन :-
टरबूजाचे फळ पिकल्यावर देठ सुकतात. पुर्ण पक्च झालेले टरबूजातून बोटाने वाजवल्यावर डबडब असा आवाज येतो. तसेच जमिनीवर टेकवलेला टरबुजाचा भाग पिवळसर पडतो. तसेच पिकाचा कालावधी 90 ते 120 दिवसांचा आहे. योग्य व्यवस्थापन व रोग कीड नियंत्रण केल्यास टरबूजाचे हेक्टरी 45 ते 50 टन उत्पादन मिळते.
खरबूज – कुकुमिस मेलो (मस्क मेलॉन)
इराण हे मूळस्थान असणारे व प्रामुख्याने नदी पात्रातील पाणी कमी झाल्यावर उघड्या होणाऱ्या वाळूमध्ये घेतले जाणारे पीक म्हणून खरबुजाची ओळख आहे. परंतु आता उन्हाळी हंगामात बागायती पीक म्हणून खरबूज घेतले जाते. या पिकाची भरतात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, व उत्तर प्रदेश येथे लागवड केली जाते.
जमीन :-
खरबूज पिकासाठी हलकी, पोयट्याची जमीन लागवडीस उपयुक्त आाहे. चुनखडीयुक्त व चोपण जमिनीत खरबुजाची लागवड करू नये.
हवामान :-
प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक 24 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमानामध्ये चांगला प्रतिसाद देते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. वातावरणामध्ये थंडी, दमटपणा किंवा धुके असल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
सुधारित जाती :-
पुसा शरबती, दुर्गापुर मधु, अर्का जीत, अर्का राजहंस, पंजाब सुनहरी.
खरबूजाच्या खाजगी कंपन्यांच्या भरपुर जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सद्य परिस्थितीमध्ये कुंदन ही नोन यु सिड्स (Known You Seeds) या कंपनीची जात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
बियाणे :-
खरबुजाच्या लागवडीसाठी सुधारित जातीचे हेक्टरी दीड ते दोन (1.5-2) किलो बियाणे पुरेसे आहे तर संकरीत जातीचे 200 ते 250 ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी आवश्यक आहे.
लागवड :-
खरबुजाची लागवड डिसेंबरचा दुसरा आठवडा ते फेब्रुवारी मध्यापर्यंत करता येते. या पिकाची लागवड रोपे तयार करून किंवा टोकन पद्धतीने करता येते. लागवडीचे अंतर 1.5 x 1.0 मीटर ठेवावे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :-
लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून 15 ते 20 टन प्रती हेक्टरी द्यावे. लागवडीपूर्वी 50 : 50 : 50 किलो नत्रः स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर – एक महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्र खातीची मात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापन :-
खरबुजाच्या पिकाकरीता पाण्याचे योग्य वेळी नियोजन करणे आवश्यक आहे. खरबूजाचे पीक जसे वाढेल तसे पाण्याची गरजही वाढते. फळ लागण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण बसणार नाही याची विशेष काळजी घोणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा पिकांच्या मुळांशी जास्त संपर्क आल्यास रोग पडण्याची शक्यता जास्त असते.
काढणी व उत्पादन :-
खरबूजाचे फळ पिकल्यावर मधुर व सुवासिक वास येतो. तसेच काढणी योग्य झालेल्या खरबूजाचे देठ सुकतात. या पिकाचा कालावधी 90 ते 100 दिवसांचा असून 20 ते 25 दिवसात काढणी पूर्ण होते. योग्य व्यवस्थापन व रोग कीड नियंत्रण केल्यास खरबूजाचे हेक्टरी 25 ते 30 टन उत्पादन मिळते.
टरबूज व खरबूज पिकातील कीड व रोग नियंत्रण
अ.क्र. | रोग / कीड | नियंत्रण |
1 | फळमाशी | 1) क्ल्यु ल्युरचे एकरी 5 सापळे लावावेत. |
2) मेलॅथिऑन 20 मिल + 10 ग्रॅम गुळ + 10 लि. पाण्यात मिसळुन फवारणी करावी. | ||
2 | नागअळी | निंबोळी अर्क 4 टक्के किंवा ट्रायझोफॉस 20 मिली 10 लि. पाण्यातून फवारणी करावी. |
3 | फलकिडे, मावा व पांढरी माशी | थायामेथोक्झाम 4 ग्रॅम किंवा कार्बोसल्फान 10 मिली 10 लि. पाण्यातून फवारणी करावी. |
4 | भुरी | डिनोकॅप किंवा ट्रायकोडर्मा किंवा कार्बेन्डाझिम 5-10 ग्रॅम 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. |
5 | केवडा (डाउनी मिल्डयु) | मेटॅलॅक्झिल एम-झेड 72, 25 ग्रॅम किंवा फोसेटील 20 ग्रॅम + मॅंकोझेब 20 ग्रॅम किंवा ऑझोक्झिस्ट्रॉबीन 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळुन 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. |
6 | काळा करपा (अॅन्थ्रॅकनोज) आणि पानावरील ठिपके | मॅन्कोझेब अथवा कलोरोथॅलोनील किंवा कॅप्टन किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून – पालटून फवारणी करावी. |
थोडक्यात महत्वाचे :
- टरबूज व खरबूज या पिकामध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन याचा वापर केल्यास उत्पादनामध्ये होणारी वाढ ही उल्लेखनीय आहे. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे या पिकांच्या गुणवत्तेचा दर्जा हा अत्यंत चांगला राहतो. तसेच कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्यास मदत होते.
- ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते दिल्यास हि पिके उत्पादन वाढीसाठी चांगला प्रतिसाद देतात.
- टरबूज व खरबूज ही पिके सुरूवातीच्या काळात रोग किडींना बळी पडत असल्यामुळे या पिकांसाठी सुरूवातीच्या काळात क्रॉप कव्हरचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
अमित औदुंबर तुपे, शास्त्रज्ञ (उद्यान विद्या), कृषि विज्ञान केंद्र, परभणी.
टरबूज व खरबूज लागवड तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.