बायोडिझेल पर्यायी इंधन

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

बायोडिझेल हे पर्यायी इंधन म्हणून पुढे येत आहे. अलीकडच्या काळात वाढती लोकसंख्या व गरजा पूर्ण करण्यासाठी दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचा वापर वाढत आहे त्या तुलनेत त्यांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत, यामुळे सर्वसामान्य लोकांना याचे चटके बसत आहेत. त्यामुळे पर्यायी इंधन म्हणून बायोडिझेलचा वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.    

बायोडिझेल म्हणजे काय ? (What is biodiesel?)

बायोडिझेल वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेल इंधन म्हणजेच बायोडिझेल, वनस्पती तेल हे ट्रान्सफॅटी अॅसिडचे मिश्रण असते, यावर विशिष्ट तापमानावर मिथिनॉल व सोडीयम / पोटॅशियम हायड्रोक्साईडच्या द्रावणाची प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून मिथिल इस्टर म्हणजेच बायोडिझेल व ग्लिसरीन हा उपपदार्थ मिळतो. या प्रक्रियेलाच ट्रान्सइस्टरीफिकेशन असे म्हणतात.

बायोडिझेलचे महत्त्व (Importance of biodiesel) :  

  • बायोडिझेल तयार करताना कच्च्या तेलापासून ग्लिसरीन वेगळे काढल्यामुळे ते पातळ होते व त्यामुळे इंजिनमध्ये कोणताही बदल न करता इंधन म्हणून वापरता येते.
  • बायोडिझेलमध्ये जवळपास १० टक्के प्राणवायू असल्यामुळे त्याचे संपूर्ण ज्वलन होते. त्यामधून काळा धुर निघत नाही. तसेच या धुरात वातावरणाचे प्रदुषण करणाऱ्या हायड्रोकार्बन, गंधक, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी सारख्या घटकांचे प्रमाणही कमी असते.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे बायोडिझेल तयार करण्याची पध्दत ही अत्यंत सोपी, सरळ असून ते घरगुती पध्दतीने सुध्दा तयार करता येते.

बायोडिझेलची गरज (The need for biodiesel) :

  • घरगुती उत्पादित बायोडिझेलचा उपयोग डिझेलवर चालणारे विद्युत निर्मिती यंत्र (जनरेटर), सिंचनाकरीता वापरण्यात येणारे डिझेल पंप, तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर वापरण्यात येणारी यंत्रे जसे, थ्रेशर, ट्रॅक्टरकरीता करुन ऊर्जेसाठी कोणावरही विसंबून न राहता स्वयंपूर्णता आणणे शक्य आहे. यामुळे बायोडिझेलची सध्याच्या परिस्थितीत खूप गरज आहे.
  • ट्रान्सइस्टरीफिकेशन पध्दतीने कोणत्याही वनस्पतीजन्य तेलापासून (अखाद्य किंवा खाद्य) बायोडिझेल तयार करता येते.‍
  • आपल्या देशात खाद्य तेलाचा तुटवडा असल्यामुळे अखाद्य तेलबिया पिकांची/ झाडांची पडीक जमिनीवर लागवड करुन त्यापासून मिळणाऱ्या तेलापासून बायोडिझेल उत्पादनास फार मोठा वाव आहे.
  • अखाद्य तेलबिया पिके जसे, वन एरंड (जट्रोफा) करंज, इत्यादी सारख्या झाडांची आपल्या पडीक जमिनीत लागवड करुन शेतकरी त्यापासून स्वतःपुरते बायोडिझेल स्वतःच करु शकतो.
  • महाराष्ट्रासारख्या कोरडवाहू प्रदेशातील पडीक जमिनीवर जर वनएरंड व करंजसारख्या कमी पाण्यावर जगणाऱ्या झाडांची शास्त्रीय पध्दतीने लागवड केल्यास त्यापासून प्रति हेक्टर १५०० ते २५०० लिटर प्रति वर्ष बायोडिझेलचे उत्पादन होवू शकते.
  • घरगुती बायोडिझेल उत्पादन पध्दतीत सर्वसाधारणपणे १ लीटर तेलापासून ९०० मिली बायोडिझेल व १०० मिली ग्लिसरीन मिळते. या ग्लिसरीनला साबण उद्योगात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बायोडिझेल तयार करताना घ्यावयाची काळजी

  • मिथिनॉल व सोडीअम हायड्रॉक्साईडचे द्रावण अत्यंत काळजीपुर्वक तयार करून त्याची हाताळणी करावी.
  • द्रावणाच्या वाफा डोळ्यात गेल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते
  • बायोडिझेल मिश्रण हे त्वचेस लागल्यास कालांतराने त्वचा जळते.
  • त्वचेचा संपर्क या द्रावणासोबत येवू देवू नये व आल्यास ताबडतोब भरपूर थंड पाण्याने धुवावे.
  • खबरदारी म्हणून रबरी हातमोजे, डोळ्यावर गॉगल्स वापरावा.
  • ट्रान्सइस्टरीफिकेशनच्या वेळी तेलाचे तापमान कोणत्याही परिस्थितीत ५५ डिग्री सेल्सिअसच्या खालीच राखावे व हळूवार ढवळते ठेवावे.

बायोडिझेल तयार करण्याची पद्धत (Method of preparation of biodiesel)

  • बायोडिझेलमधील अतिरक्ति सोडीअम काढून टाकण्यासाठी ते बायोडिझेल धुतल्याशिवाय कोणत्याही इंजिन चालविण्यास वापरु नये.
  • बायोडिझेल धुतल्यानंतर त्याची पी. एच ७.०० + ०.२५ (सामू ७.००) आल्यानंतरच हे हिरवे इंधन वापरावे.

बायोडिझेल तयार करण्याची पध्दत

वनस्पतीजन्य तेल (अखाद्य)

कापडातून गाळणे

५० डिग्री से. तापमानापर्यंत गरम करणे.

सोडीअम मिथॉक्साईडचे द्रावण हळूवार ढवळत तेलात टाकणे

ग्लिसरीन वेगळे करण्यासाठी स्थिर ठेवणे

ग्लिसरीनपासून बायोडिझेल वेगळे करणे

बुडबुडा पध्दतीने बायोडिझेल धुणे

बायोडिझेल वेगळे करुन ११० डिग्री से. तापमानावर उकळणे

बायोडिझेल

बायोडिझेलचे फायदे (Benefits of biodiesel)

  • बायोडिझेल हेअपारंपारीक उर्जास्त्रोत आहे.
  • कोणत्याही तेलापासून बनविता येते.
  • अखाद्य तेल उत्पादनास चालना मिळते.
  • तयार करण्याची अत्यंत सोपी, कमी खर्चाची व घरगुती पध्दत आहे.
  • कोणत्याही प्रकारची विशेष यंत्रसामुग्री लागत नाही.
  • एक लिटर तेलापासून सरासरी ०.८ लिटर बायोडिझेल मिळते.
  • बायोडिझेलमध्ये १० ते ११% प्राणवायू (ऑक्सिजन) असतो. त्यामुळे १०० टक्के ज्वलनशील आहे.
  • बायोडिझेलमध्ये गंधकाचे प्रमाण नगण्यच असते. बायोडिझेलचा सिटेन क्र. ४८ च्या वर असल्याने ते त्वरीत पेटते.
  • बायोडिझेल दुर्गंधविरहीत असते.
  • बायोडिझेल फ्लॅश पॉईंट १०० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते.
  • बायोडिझेल जळाल्यानंतर अत्यंत कमी व पांढरा धुर निघतो.
  • धुरात कार्बनडायऑक्साईड व गंधकाचे प्रमाण नगण्य असते.
  • बायोडिझेल व पेट्रोलियम डिझेल कोणत्याही प्रमाणात मिसळून वापरता येते. वाहनाच्या अथवा डिझेलच्या इंजिनात बदल करण्याची आवश्यकता नाही.
  • बायोडिझेल हाताळण्यास व वापरण्यास अत्यंत सोपे आहे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे वातावरणाचे प्रदुषण कमी होते.
  • बायोडिझेल जास्त दिवस साठवून ठेवता येते.

बायोडिझेलचे सामाजिक फायदे (Social Benefits of Biodiesel)

  • ग्रामीण भागाचा विकास होण्यास चालना मिळेल.
  • ग्रामीण उद्योग व स्वयंरोजगारास संधी निर्माण होईल.
  • पडीक व कोरडवाहू जमिनींचा उत्पादनासाठी उपयोगात आणता येईल.
  • बायोडिझेलचा पर्यायी उपाय होईल.
  • पर्यावरणाच्या प्रदुषणाला आळा बसेल.

बायोडिझेल पर्यायी इंधन हा लेख आपणास आवडला असल्यास लाईक करावे व आपल्या जवळील मित्रांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

Prajwal Digital

Leave a Reply