कृषी सुवर्ण कर्ज योजना

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

विविध कृषी निविष्ठा, कृषिपूरक व्यवसाय आणि यंत्रसामग्रीसाठी बँकेद्वारे ‘कृषी सुवर्ण कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून कर्ज घेता येते. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांना हंगामात विविध शेतीकामांसाठी तसेच कृषिपूरक व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता असते. बँकेतून शेतजमिनीवर कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक किचकट आणि वेळकाढू असल्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असतो. त्यासाठी कृषी सुवर्ण कर्ज योजना शेतकऱ्यांना आणि कृषी उद्योजकांना नक्कीच फायद्याची ठरू शकते.

भारतातील विविध खासगी तसेच शासकीय बँक आणि इतर वित्तीय संस्थांमार्फत शेतकऱ्यांना सोने तारण ठेवून कर्ज देण्यात येते. यायोजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून त्याबदल्यात कर्ज घेऊ शकणार आहेत. या योजनेअंतर्गत जमीन खरेदी, सिंचनासाठी विविध उपकरणे, यंत्रसामग्री आणि कच्चा मालाच्या खरेदी, पीक लागवडीसाठी निविष्ठांची खरेदी अशा विविध शेतीकामांसाठी सोने तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळते.

 • या योजनेच्या माध्यमातून बँकांद्वारे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज पुरवठा केला जातो.
 • कर्ज देतेवेळी बाजारातील सोन्याच्या किमतीच्या आधारावर कर्जाची रक्कम ठरविली जाते.
 • कर्ज काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. नावावर शेती असल्याचा पुरावा बँकेत जमा करावा लागतो. या विशेष योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाचा घेता यावा, यासाठी अट घालण्यात आली आहे.
 • कृषी सुवर्ण तारण कर्ज योजनेतील व्याज आकारणी बँकनिहाय बदलत जाते. मात्र सामान्यपणे प्रति वर्ष साधारण ७ टक्के व्याजदर आकारला जातो. कृषी सुवर्ण तारण कर्जाचा व्याजदर, पात्रता निकष, परतफेडीचा कालावधी, कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घेण्यात येणारे शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे बँकेनुसार काही प्रमाणात भिन्न असतात.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेचे याकरिता मिळेल कर्ज

 • पीक लागवड, व्यवस्थापन. शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, सिंचन उभारणी.
 • फलोत्पादन, कृषी उत्पादने वाहतुक.
 • कृषिपूरक व्यवसाय उदा. दुग्ध व्यवसाय, जनावरांची खरेदी, कुक्कुटपालन कोंबड्या खरेदी, शेड उभारणी.
 • मत्स्य व्यवसायामध्ये तलाव बांधणी, मत्स्य खरेदी आणि विपणन सुविधांसाठी.
 • शेळ्या-मेंढ्या खरेदी.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेची पात्रता निकष

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
 • बँकेद्वारे मागणी केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता अर्जदाराने करावी.
 • भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत व्यवसाय करीत असावा.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये (२०२१)

अ.क्र.कर्ज रक्कम१ हजार ते २५ लाख रुपये
1व्याजदर७ टक्के (वार्षिक)
2परतफेडसुलभ हप्त्यामध्ये
3तारण वस्तूसोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि वजनानुसार त्याचे मूल्य ठरविले जाते.
4कार्यकाळ१ महिन्यापासून ते ३६ महिने
5कर्जप्रक्रियेसाठी घेण्यात येणारे शुल्ककर्ज रकमेच्या १ टक्का

(टीप : पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे ही प्रत्येक बँकेनुसार भिन्न असू शकतात. वर नमूद केलेले कृषी सुवर्ण निकष सामान्य आहेत. सुवर्णतारण कर्जासाठी प्रत्यक्ष बँकेस भेट देऊन पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.)

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

 • पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • अर्जदाराची केवायसी कागदपत्रे (पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पाणी किंवा वीज बिल).
 • अर्जदाराच्या नावे असलेल्या जमिनीची कागदपत्रे पीक लागवडीचा पुरावा वित्तीय संस्थेद्वारे मागणी केलेली इतर कागदपत्रे.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेचे फायदे

 • इतर कर्जाच्या तुलनेत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
 • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज मंजुरी.
 • कर्जदाराकडील सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीप्रमाणे योग्य कर्ज रक्कम मिळण्यास मदत होते.
 • कमी व्याजदर.
 • तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः सुरक्षित.
 • सुलभ कर्ज वितरण.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

Source : https://www.agrowon.com

Prajwal Digital

Leave a Reply