पानकोबी आणि फुलकोबीच्या खालोखाल नवलकोल हे एक महत्त्वाचे पीक आहे. नवलकोल या भाजीची मोठ्या शहराच्या जवळपास लागवड केली जाते. शहरी भागात या भाजीला चांगली मागणी आहे. हे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे पानकोबी, फुलकोबी किंवा जास्त अंतरावर लावण्यात येणाऱ्या इतर भाज्यांमध्ये हे आंतरपीक म्हणून उपयुक्त आहे.
नवलकोलची रोपे वाढीला लागल्यावर खोडाचा जमिनीलगतचा भाग जाड होऊन गोल गड्ड्यासारखा होतो आणि त्यात अन्नाचा साठा केला जातो. हा गड्डा किंवा नवलकोल भाजीसाठी वापरतात. यालाच गाठकोबीही म्हणतात. नवलकोलची पिकाची लागवड भारतात विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब व आसाम येथे व्यापारी तत्त्वावर केली जाते. महाराष्ट्रात सुद्धात नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांत जास्त प्रमाणावर नवलकोलची लागवड केली जाते. याच अनुषंगाने नवलकोल उत्पादन तंत्रज्ञानाची सुधारित माहिती शेतकरी बांधवांना मिळावी याकरिता प्रस्तुत लेख तयार केला आहे.
नवलकोल चे उगमस्थान कोणते आहे?
नवलकोल ह्या भाजीपाला पिकाच्या उगमस्थानाबाबत शास्त्रज्ञांत एकमत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते, नवलकोलचे उगमस्थान उत्तर युरोपातील समुद्रालगतचा भाग आहे, तर काही शास्त्रज्ञांना नवलकोल हे पीक इटली, स्पेन आणि जर्मनी या देशांतील शेतकऱ्यांना 16व्या शतकांपासून माहीत असल्याचे लेखी पुरावे सापडलेले आहेत. भारतात हे पीक इंग्रजांनी 19व्या शतकात आणले.
नवलकोल पिकाचे वैशिष्ट्ये व महत्त्व
- नवलकोल ह्या पिकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रोपांच्या लागवडीनंतर अतिशय कमी कालावधीत म्हणजे सुमारे 35 – 40 दिवसांत गड्डे काढणीसाठी तयार होतात आणि 50 ते 60 दिवसांत बहुतेक काढणी पूर्ण होऊन त्या जमिनीत इतर पीक घेता येते.
- नवलकोलच्या पिकापासून अतिशय कमी कालावधीत हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते.
- नवलकोल लागवडीचे अंतर जास्त असणाऱ्या पानकोबी, फुलकोबी, वांगी, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांमध्ये तसेच ऊस, कपाशी, इत्यादी बागायती पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात नवलकोल हे आंतरपीक म्हणून घेता येते.
- नवलकोल ही भाजी जर्मन लोकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. आपल्या देशात ठरावीक शहरी भागांतच या भाजीला मागणी आहे. ग्रामीण भागात या भाजीला फारशी मागणी नाही.
- नवलकोलच्या रोपाच्या खोडापासून जमिनीलगत तयार झालेल्या गड्याचा भाजीसाठी उपयोग करतात.
- नवलकोल भाजीत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त अशी कॅल्शियम, फॅट्स् पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, आणि सल्फर ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात.
- नवलकोल हे भाजी आणि कोशिंबिरीसाठी वापरतात. काही भागांत नवलकोलच्या कोवळ्या पानांचा भाजीसाठी वापर करतात. नवलकोलच्या पानांचा जनावरांसाठी वैरण म्हणून उपयोग होतो.
- इतर कोबीवर्गीय पिकांच्या तुलनेत कमी लोकप्रिय असलेल्या ह्या पिकाची लागवड काश्मीर, पश्चिम बंगाल, आणि दक्षिण भारताच्या काही भागात केली जाते.
- कर्नाटक आणि महाराष्ट्रात नवलकोलची लागवड मोठ्या शहरांच्या आसपास मर्यादित प्रमाणात केली जाते.
नवलकोल पिकास हवामान कसे असावे?
नवलकोल हे मूळचे युरोपातील थंड हवामानातील पीक आहे. भारतात हिवाळी हंगामात ह्या पिकाची यशस्वीपणे लागवड करता येते. तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यास नवलकोलचे गड्डे चांगले पोसतात. रोपवाढीपासून गड्डे पोसण्याच्या काळात थंड हवामान असल्यास गड्डयाचा दर्जा आणि उत्पादन अधिक चांगले येते.
नवलकोल पिकास जमीन कोणती निवडावी?
हे पीक सर्व प्रकारच्या जमिनींत येऊ शकत असले तरी मध्यम प्रतीच्या कसदार आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी नवलकोलच्या लागवडीसाठी उत्तम आहेत. भारी, चिकण आणि पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत नवलकोलची लागवड करू नये.
नवलकोल पिकाचे कोणते वाण वापरावे?
पानकोबीप्रमाणेच नवलकोल हे पीक मूळचे थंड हवामानातील असल्यामुळे भारतातील हवामानात ह्या पिकाला फुले येत नाहीत आणि बीजधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे नवलकोलच्या बहुतेक सुधारित जातींचे बियाणे परदेशातून मागविले जाते आणि येथील हवामानात त्याची चाचणी घेऊन लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. नवीन जाती विकसित करण्याचे काम आपल्या देशात फारसे झालेले नाही. परदेशातून आयात केलेल्या आणि आपल्या हवामानात रुळलेल्या नवलकोलच्या खालील जातींची शिफारस करण्यात आलेली आहे.
(1) व्हाईट व्हिएन्ना : नवलकोलची ही जात लवकर तयार होणारी असून रोपांची वाढ मध्यम असते. रोपांची पाने मध्यम आकाराची असतात. तर गड्डे गोलसर, फिकट हिरव्या रंगाचे असून आतील गर पांढऱ्या दुधाळ रंगाचा असतो. ही जात स्वाद आणि चवीला उत्तम आहे. या जातीचे गड्डे रोपांच्या लागवडीपासून 50 ते 60 दिवसांनी काढणीसाठी तयार होतात.
(2) पर्पल व्हिएन्ना : या जातीच्या रोपांची पाने निळसर हिरव्या रंगाची असून गड्डे मोठ्या आकाराचे असतात. गड्ड्यांवर निळसर जांभळ्या रंगाच्या छटा असतात. गड्याचा रंग आतून फिकट हिरवा असतो. ह्या जातीचे गड्डे रोपांच्या लागवडीपासून 55 ते 60 दिवसांत काढणीसाठी तयार होतात.
(3) किंग ऑफ नॉर्थ : या जातीच्या रोपांची वाढ 20 ते 30 सेंटिमीटरपर्यंत होते. रोपांची पाने गर्द हिरव्या रंगाची आणि रुंद असतात. ह्या जातीचे गड्डे आकाराने गोलसर चपटे आणि हिरव्या रंगाचे असतात. ही जात थोडी उशिरा म्हणजे 55 ते 70 दिवसांत तयार होते. अलीकडच्या काळात काही जपानी बियाणे कंपन्यांनी नवलकोलचे लवकर तयार होणारे संकरित वाण विकसित केलेले आहेत. ह्या जातीच्या गड्ड्यांची काढणी लांबली तरी गड्डे निब्बर न होता बराच काळ त्यांचा दर्जा टिकून राहतो.
नवलकोल पिकाची रोपे तयार करणे प्रक्रिया कशी?
पानकोबीप्रमाणेच नवलकोलची लागवड प्रथम गादीवाफ्यावर रोपे तयार करून करावी. बियांची गादीवाफ्यावर पेरणी करण्यापूर्वी बियाणे 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिसळून तयार केलेल्या द्रावणात 30 मिनिटे बुडवावे आणि सावलीत सुकवावे. सर्व बी एकदम न पेरता दोन ते तीन हप्त्यांत ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत पेरल्यास नवलकोलचा बाजारात सतत पुरवठा करता येतो. बियाण्याच्या पेरणीनंतर तीन-चार आठवड्यांनी रोपे लागवडीस तयार होतात.
नवलकोल : हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवडीचे अंतर किती असावे?
नवलकोल हे हिवाळी हंगामातील पीक असून भारतात हिवाळी हंगामात नवलकोलची लागवड केली जाते. रोपे तयार करण्यासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात बियांची पेरणी करावी. नवलकोलच्या एक हेक्टर लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी एक ते दीड किलो बियाणे लागते.
नवलकोलचे स्वतंत्र पीक घेताना रोपांची लागवड 30 X 20 सेंटिमीटर अंतरावर करावी. जमिनीचा कस, हवामान आणि मशागतीच्या सोयीनुसार लागवडीचे अंतर 25 X 25 सेंटिमीटर, 25 X 30 सेंटिमीटर, 25 X 40 सेंटिमीटर अथवा 30 X 45 सेंटिमीटर ठेवावे. लागवडीचे अंतर कमी ठेवल्यास गड्ड्याचा आकार लहान राहतो; परंतु हेक्टरी उत्पादन जास्त मिळते.
नवलकोल लागवड कशी करावी?
नवलकोलची स्वतंत्र लागवड करण्यासाठी रिजरच्या साहाय्याने 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्यावरंबे पाडून वरंब्यांच्या बगलेत दोन्ही बाजूंस 20 सेंटिमीटर अंतरावर निवडक एकेक रोप लावावे. दोन ओळी आणि रोपांतील अंतर 30 X 20 सेंटिमीटर ठेवावे. रोपांच्या लागवडीचे काम शक्यतो संध्याकाळच्या वेळी करावे आणि लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर एका आठवड्याच्या आत सर्व नांगे भरून घ्यावेत.
नवलकोल पिकास खते कसे द्यावीत?
नवलकोलच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. नवलकोलसाठी हेक्टरी 60 ते 100 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 80 ते 100 किलो पालाश या प्रमाणात वरखते द्यावीत.
ह्यांपैकी नत्राची अर्धी मात्रा (30 ते 50 किलो) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. पहिला हप्ता रोप लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी बांगडी पद्धतीने देऊन रोपांना मातीची भर द्यावी. दुसरा हप्ता त्यानंतर पंधरा दिवसांनी द्यावा.
नवलकोल पिकास पाणी व्यवस्थापन कसे करावे?
खते दिल्यानंतर रोपांना लगेच पाणी द्यावे. इतर कोबीवर्गीय पिकांप्रमाणे नवलकोलला हिवाळी हंगामात 5 – 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे आणि उन्हाळ्यात 3 – 4 दिवसांनी पाणी द्यावे. नवलकोलच्या गड्ड्याच्या वाढीच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास गड्डे तंतुमय होतात आणि त्यांचा दर्जा खालावतो. म्हणून या पिकाला माफक पण नियमित पाणीपुरवठा आवश्यक आहे.
नवलकोल पिकात आंतरमशागत कशी करावी?
नवलकोलच्या रोपांच्या लागवडीनंतर दहा-पंधरा दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी खुरपणी करावी. वरखतांचा हप्ता द्यावा. नवलकोल हे कोबी किंवा इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेले असल्यास मुख्य पिकाबरोबरच या पिकाची आंतरमशागत करावी.
नवलकोल पिकात कोणती आंतरपिके घ्यावेत?
नवलकोलची लागवड कमी अंतरावर करावी तसेच हे कमी कालावधीत तयार होणारे पीक असल्याने यामध्ये आंतरपीक न घेता हेच पीक इतर पिकांमध्ये ज्यांना अधिक कालावधी लागतो आणि अंतर जास्त असते तिथे आंतरपीक म्हणून घेता येते.
नवलकोल पिकाची काढणी कशी करावी?
नवलकोलचे गड्डे पूर्ण वाढल्यावर परंतु कोवळे असतानाच नवलकोलची काढणी करावी. गड्डयावर नखांनी किंचित दाबल्यास अशा गड्डयावर व्रण उठतात. असे गड्डे काढण्यास एक दिवस उशीर झाला तरी गड्डे जून होऊन त्यांची प्रत खालावते. म्हणून तयार गड्यांची लगेच काढणी करावी. काढणी सुरू झाल्यावर दररोज किंवा एक दिवसाआड शेतात फिरून तयार गड्डे रोपांसकट काढून घ्यावेत. गड्ड्याचे खालचे खोड गड्डयालगत धारदार विळ्याने कापून टाकावे. गड्याच्या वरती 3 – 4 पाने ठेवून बाकीची पाने छाटून गड्डयांची प्रतवारी करावी.
नवलकोल पिकाचे उत्पादन किती मिळते?
नवलकोलचे गड्डे सर्वसाधारणपणे 5 ते 8 सेंटिमीटर व्यासाचे आणि 150 ते 200 ग्रॅम वजनाचे असावेत. नवलकोलची उत्पादनक्षमता इतर भाजीपाल्याच्या तुलनेने फार चांगली आहे. रोप लागवडीपासून सुमारे 50 – 60 दिवसांत नवलकोलचे उत्पादन दर हेक्टरी 15 ते 25 टनांपर्यंत मिळते.
पानकोबी आणि फुलकोबीच्या खालोखाल नवलकोल हे मोठ्या शहरांच्या आसपास घेतले जाणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. रोपलागवडीपासून केवळ 50 ते 60 दिवसांत चांगले उत्पादन (15 ते 25 टन) देणारे, लागवड करण्यास सोपे आणि सुटसुटीत असे हे भाजीपाला पीक आहे. नवलकोलच्या भाजीमध्ये खनिजे भरपूर प्रमाणात असतात; तर ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असतात. नवलकोल हे मूळचे थंड हवामानातील पीक असले तरी भारतात हिवाळी हंगामात या पिकाची यशस्वी लागवड करता येते. नवलकोलच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य आहे.
नवलकोल उत्पादन तंत्र हा लेख व्यापारी तत्त्वावर भाजीपाला लागवड व उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती देणारा असून तो आपणास आवडला असल्यास जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत माहिती शेअर करून सहकार्य करावे.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर