धिंगरी अळिंबीचे बेड कसे भरावे या लेखामध्ये आपल्याला धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येईल. त्यासाठी स्पॉनचा वापर करण्याची पद्धत, बेड भरणे, इत्यादींची माहिती होईल. धिंगरी अळिंबीची योग्य प्रकारे काढणी करून अधिक आर्थिक फायदा मिळविता येईल.
अळिंबी उत्पादन म्हणजे काय ?
शेतीव्यवसायास पूरक आणि कमीत कमी भांडवलावर अळिंबी उत्पादन हा व्यवसाय करता येऊ शकतो. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करता शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांना रोजगार मिळवून देणारा घरगुती, खात्रीशीर व्यवसाय म्हणजे अळिंबी उत्पादन हा होय.
शेतमालाची काढणी केल्यावर शिल्लक राहिलेला काडीकचरा, पाचट, पालापाचोळा इत्यादींचा यासाठी वापर करता येतो. अळिंबी उत्पादन घेताना नियंत्रित वातावरणात बटन अळिंबीचे उत्पादन घेता येते; तर सर्वसाधारण वातावरणात भाताच्या काडावर धिंगरी अळिंबी वाढविता येते. बटन अळिंबीच्या लागवडीसाठी सुरुवातीला भांडवली गुंतवणूक आवश्यक असते मात्र धिंगरी अळिंबीचे अत्यंत कमी खर्चात उत्पादन सुरू करता येते.
धिंगरी अळिंबी लागवड कशी करावी ?
- धिंगरी अळिंबी लागवडीसाठी शेतातील वाळलेला काडीकचरा पावसापासून सुरक्षित अशा जागेत साठवून ठेवल्यास त्याचा वर्षभर वापर करता येतो.
- अळिंबी उत्पादन करताना या काडीकचऱ्याचे दोन ते तीन इंच लांबीचे तुकडे करावे. त्यानंतर पातळ पोत्यामध्ये भरून दहा ते बारा तास पाण्यात भिजत ठेवावे.
- त्यानंतर पोते बाहेर काढून पाणी निथळत ठेवावे. त्यानंतर 80 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गरम पाण्यात तीन तास भिजवून काड निर्जंतूक करून घ्यावे.
- धिंगरी अळिंबीची लागवड करण्यासाठी काड भिजविण्यास व निर्जंतूक करण्यास मोठा ड्रम, फॉरमॅलीन, बाविस्टीन, प्लॅस्टिक पिशव्या, डाळीचे पीठ, इत्यादी साहित्य लागते. अळिंबीचे बेड ठेवण्यासाठी कमी खर्चाची बांबूची रॅकदेखील आवश्यक आहे.
- मशरूमच्या बटन, धिंगरी आणि भाताच्या काडावर वाढणाऱ्या अशा तीन प्रकारांची लागवड महाराष्ट्रात करण्यात येते.
अळिंबीसाठी कोणते साहित्य वापरावे ?
निर्जंतूक केलेला पेंडा, स्पॉन, पॉलिथीनच्या पिशव्या, (35 X 50 सेंमी. किंवा 45 X 75 सेंमी. आकराच्या), निर्जंतूक केलेला वर्तमानपत्राचा कागद, पाणी, 20 – 25° सेल्सिअस तापमान व 70 – 80% आर्द्रता असलेली खोली, फॉरमॅलीनचे द्रावण, इत्यादी.
अळिंबी बेड भरणी प्रक्रिया कशी करावी ?
- निर्जंतूक केलेले काड एका बंद खोलीत बेड भरण्यासाठी ठेवा. त्यासाठी ती खोलीदेखील बुरशीनाशक फवारून निर्जंतूक करून घ्यावे.
- बेड भरण्यासाठी दोन फूट बाय दीड फूट आकाराच्या पॉलिथीनच्या पातळ पिशव्या घ्या. पिशव्या फॉरमॅलीनच्या द्रावणात निर्जंतूक करून घ्यावे.
- नंतर काड थंड झाल्यावर पिशव्या भरण्यास सुरुवात करावे.
- प्रथम एक ते दीड इंच काडाचा थर द्या त्यावर अळिंबीचे बी पसरवून पेरा आणि त्यावर हरभरा डाळीचे पीठ टाकावे.
- परत त्यावर सुमारे दोन इंच काड पसरून टाका. त्यावर स्पॉन आणि पीठ टाकून हलक्या हाताने एकसारखा दाब द्यावे.
- याप्रमाणे पिशवी तीन चतुर्थांश भरून तोंड बांधण्यास जागा शिल्लक ठेवून दोऱ्याने तोंड घट्ट बांधा. पिशवीला सुईने बारीक छिद्रे पाडा आणि बेड एका बाजूस ठेवावे.
- अशा रितीने उपलब्ध काड भरून बेड पॅक करून ठेवावे. या पद्धतीने बेड भरल्यास तीनशे ग्रॅम स्पॉनमध्ये तीन बेड तयार होतात. हे बेड अंधारात ठेवावे. बेडला सोळा ते अठरा दिवस हात लावू नका. त्यानंतर बेडवर पांढरी बुरशी आलेली दिसल्यास बाहेरील प्लॅस्टिकची पिशवी ब्लेडने काढा. बेड नंतर एका स्वतंत्र खोलीत बांबू किंवा त्या पद्धतीची रॅक तयार करून त्यावर ठेवावे.
- खोलीत हवा खेळती राहील असे पाहावे. पूर्ण अंधार नसावा; मंद प्रकाश ठेवा. अळिंबीच्या बेडवर प्रखर उजेड किंवा ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावे.
अळिंबीची काढणी केव्हा करावी
- या बेडवर नियमित पाण्याचा फवारा द्या. दिवसातून तीन ते चार वेळा पाणी फवारून बेड ओलसर ठेवावा.
- खोलीत 60 ते 70% आर्द्रता राहील आणि तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस राहील असे पाहावे. त्यामुळे बी पेरणीनंतर एकवीस ते बावीस दिवसांनी किंवा बेड उघडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी त्यावर सर्व बाजूंनी अळिंबी वाढलेली दिसेल.
- अळिंबी सकाळी पाणी मारण्यापूर्वी हलकेच देठाजवळ पकडून पिळून काढावी. साधारण कडा वाकड्या होण्यापूर्वी अळिंबी काढणे आवश्यक आहे.
- अळिंबीची काढणी झाल्यावर त्या बेडचा वरचा एक इंचाचा थर धारदार सुरीने खरवडून कापून काढावा. त्यानंतर परत त्याला पाणी मारून अळिंबी उत्पादनास ठेवावा. अशा रीतीने एका बेडपासून 2 ते 3 वेळा अळिंबी मिळते.
- अळिंबी शक्यतो ताजी असतानाच शंभर ते दोनशे ग्रॅम पॅकमध्ये विकावी. धिंगरी अळिंबी फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस चांगली राहते.
- अतिरिक्त अळिंबी उन्हात किंवा ओव्हनमध्ये वाळवून सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येते.
अळिंबी उत्पादन समस्या आणि उपाय
- अळिंबी उत्पादनसाठी पावसात भिजलेले काड वापरू नये. काड निर्जंतूक करून घ्यावे.
- अळिंबी उत्पादन खोलीत किंवा झोपडीत सरळ सूर्यप्रकाश टाळावा.
- खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
- उघड्या खिडक्या किंवा दरवाजे यांना कीटक प्रतिबंधक जाळी बसवावी.
- खराब झालेले बेड किंवा काड लागवडीच्या जागेपासून दूर अंतरावर खड्डयांत टाका.
वाचा :
- धिंगरी अळिंबी एक फायदेशीर व्यवसाय
- अळिंबी लागवड व व्यवस्थापन तंत्रज्ञान
- मशरुम उत्पादन तंत्रज्ञान
- मशरुम एकात्मिक रोग नियंत्रण