अंजीर लागवड तंत्रज्ञान

डॉ. प्रदीप दळवे, मो. नं – 8983310185

अंजीर हे महत्त्वाचे फळझाड आहे. अंजिराची लागवड महाष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात व्यापारी तत्त्वावर केली जाते. कारण अंजीर हे फळपीक मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून अंजिर प्रक्रिया उद्योगास सुद्धा त्याला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

प्रस्तुत लेखामध्ये आपणास अंजिराचे आरोग्यदायी महत्व, अंजीर पिकासाठी हवामान, अंजीर लागवड कशी करावी या याबद्दल माहिती मिळणार आहे. ज्यामुळे अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेणे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. 

अंजिराचे आरोग्यदायी महत्व

 • पोषणदृष्ट्या, औषधीदृष्ट्या आणि व्यापारीदृष्ट्या अंजीर हे अतिशय महत्वाचे फळ.
 • अंजिराचा उष्मांक 75आणि अन्नमूल्य निर्देशांक 11 म्हणजेच सफरचंदापेक्षाही जास्त.
 • फळांमध्ये साखर, लोह, चुना, तांबे तसेच अ आणि ब  जीवनसत्व भरपूर प्रमाणात उपलब्ध.
 • ताजे किंवा सुके अंजीर टॉनिकसारखे उपयोगी पडते. रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यात अंजिराचा फार मोइ उपयोग होतो.
 • अंजीर हे सौम्य रेचक असून, शक्तीवर्धक, पित्तनाशक व रक्तशुध्दी करणारे असल्यामुळे इतर फळांपेक्षा  अधिक पोषक आहे.

अंजीर पिकासाठी हवामान कसे असावे ?

कोरडी व उष्ण हवामान अंजीर फाळास फार चांगली असते. ओलसर दमट हवामान घातक ठरते. अति थंडीमुळे फळात साखर तयार होण्याची क्रिया थांबते. हवेतील आर्द्रता वाढल्यास फळास फेगा पडतात. जोराच्या पावसाच्या सरी पडून गेलयानंतर गार वारा सुटला तर काही  प्रमाणात झाडावर तांबेरा पडतो. जेथे सरासरी 25 इंच 625 मिमी. पाऊस पडतो आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये निश्चितपणे थांबतो, अशा प्रदेशातील हवामान अंजिराच्या लागवडीस अनुकूल असते. कमी पावसाच्या भागाता जिथे ऑक्टोबर ते मार्चपर्यत पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी अंजीर लागवडीस वाव आहे.

अंजीर लागवड कशी करावी ?

 • तांबूस रंगाच्या चिकण मातीच्या व पृष्ठभागखाली  3 ते 4 फुटींवर मुरमाचा थर असलेली चुनखडी चांगली होते. मात्र खूप काळी जमीन या फळझाडाला अयोग्य असते. अंजिराची मुळे साधारणत: 3 फूट खोल जातात. तेव्हा जमिनीची निवड करताना खोल, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी निवडावी. मध्यम ओल टिकवून ठेवणाऱ्या निचऱ्याचा हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा भरपूर पुरवठा केलयास झाडांची चांगली वाढ होते.
 • लागवडीसाठी पुना अंजीर, ‍दिनकर, एक्सेल, कोनाद्रिया, दिएत्रा, फुले राजेवाडी या जातींचा निवड करावी.
 • जमिनीची चांगली मशागत करावी. जमीन नांगरून व ढेकळे फोडून सपाट करून घ्यावी. हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अंजीर लागवडीसाठी 4.5 मीटर बाय 3 मीटर अंतरावर तर भारी जमिनीत 5 मीटर बाय 5 मीटर अंतरावर खुणा करून घ्याव्यात.
 • खुणेच्या ठिकाणी 1 मीटर बाय 1 बाय 1 मीटर बाय मीटर आकारमानाचे खड्डे  खोदून घ्यावे. खड्डे भरताना तळाशी पाला-पाचोळ्याचा पातळ थर द्यावा.
 • त्यानंतर 1 किलो बोनमील किंवा 1.5 किलो सुपर फॉस्फेट, 25 ते 30 किलो कुजलेले शेणखत किवां कंपोस्ट खत आणि पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने भरून घ्यावा. चांगला पाऊस झाल्यानंतर तयार कलमांची लागवड करावी.
 • कलम लागवल्यानंतर लगेच पाणी द्यावे. लागवडीनंतर सुरूवातीच्या काळात 3 ते 4 दिवसाआड पाणी द्यावे.
 • नवीन लावलेल्या कलमांना बांबूचा आधार द्यावा.

अंजिर बागेत आंतरपिकाची लागवड कशी करावी ?  

पहिल्या दोन किंवा तीन वर्षांपर्यत झाडांतील मोकळी जागा आंतरपिके घेण्यासाठी वापरली जाऊ शकते. ताग, बोरू, धैंचा वगैरेसारखी हिरवळीची पिके किंवा मटकी, मूग, उडीद, सोयाबीन लागवड करतात. यामुळे जमिनीची प्रत सुधारण्यास मदत होते.

अंजिराच्या कलमांची निगा, वळण आणि आकार कसा द्यावा ?

 • कलमांची लागवड केल्यानंतर आवश्यक तेवढी काळजी घेतल्यास एक ते दीड महिन्यात त्यांना नवी पालवी फुटते आणि वाढ सुरू झाडे लहान असताना त्यांच्या बुंध्यामधून जमिनीच्या सपाठीपासूनच धुमारे फुटवे फुटतात. तीन ते चार सशक्त फुटवे ठेवून इतर फुटवे काढून टाकावेत, झाडे वाढवावीत
 • झाडाचा बुंधा 4 फूट 1.25 मीटर उंचीपर्यत मोकळा ठेवावा. त्यानंतर मात्र फांद्या येऊ द्याव्यात आणि माथ्यावर सर्व बाजूंना पसरतील अशा पुष्कळ फांद्या ठेवून वळण द्यावे.
 • वळण देण्याचे काम कलमांची वाढ सूरू झाल्यापासून सुरू करावे. नको असलेल्या फांद्या नियमितपणे काढाव्यात.
 • अंजिराच्या झाडास खोड किड्याचा फार मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. एकच खोड ठेवले तर खोडकिड्यामुळे संपूर्ण झाडच वाया जाण्याचा धोका  असतो. परंतु तीन ते चार खोडे राखली असता एखादे खोड किडीने पोखरल्यास तेवढे खोड जमिनीलगत छाटून झाड वाचवता येते.

अंजिराचे बहार नियोजन कसे करावे ?

 • अंजिराला दोन वेळा बहर येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहराला मीठा बहर म्हणतात. खट्टा बहरातील फळे ऑक्टोबर ते जानेवरी महिन्यापर्यंत तयार होतात, परंतु ती आंबट व बेचव असतात.
 • मीठा बहरातील फळे मार्च –एप्रिलमध्ये तयार होतात. या बहरातील फळांचा दर्जा चांगल्या प्रतीचा असल्याने चांगला बाजारभाव मिळतो.
 • लागवडीच्या दुसऱ्या वर्षांपासून तुरळक फळे येऊ लागतात, परंतु फळांचे उत्पादन पहिल्या तीन वर्षांपर्यंत घेऊ नये. सातव्या –आठव्या वर्षापासून उत्पादन वाढत जाते. त्यांनतर 20 ते 25 वर्षे बाग नियमितपणे भरपूर फळे देते.
 • फळ तयार होण्यास सुमारे 120 ते 140 दिवसांचा कालावधी लागतो. फळांचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालू राहतो. फळांचा हिरवा रंग जाऊन फिक्कट हिरवा अंजिरी –विटकरी लालसर जांळा रंग येऊ लागतो. फळांचा कडकपणा जाऊन फळे मऊ होऊ लागतात. निगा राखल्यास एका झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो फळे मिळतात.

अंजीरास अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे ?

 • झाडांची जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरूवातीच्या काळात नियमित खते द्यावीत. पूर्ण वाढलेल्या झाडास 50 किलो शेणखत, 1125 ग्रॅम नत्र 2441 ग्रॅम युरिया, 325 ग्रॅम पालाश 693 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड द्यावे. यातील 50 टक्के नत्र व संपूर्ण आणि पालाश बहर धरताना आणि उर्वरित 50 टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने प्रति वर्ष द्यावे.
 • जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असते. खतांचा संतुलित वापर करणे आवश्यक असतें. सेंद्रिय खते  वापरणे अत्यंत गरजेच असते. बहर नियोजन करताना निंबोळी पेंड, जिवाणू संवर्धक, हिरवळीचे खत, गांडूळ खत, योग्य आच्छादन व पिकांचे अवशेषांचा वापर महत्वाचा आहे.
 • झाडांना कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक, बोरॉन, जस्त, लोह, मॉलिब्डेनम, मँगेनीज, तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. ही अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात व योग्य वेळी द्यावीत.

अंजीर बागेस पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

 • झाडाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. जमिनीच्या मगदुरानुसार भारी जमिनीत 7 ते 8, मध्यम जमिनीत 5 ते 6 आणि हलक्या जमिनीत 3 ते 4 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. फळ वाढीच्या काळात पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
 • जमिनीत जास्त ओलावा टिकून राहिल्यास फळे भेगाळण्याचे प्रमाण वाढते. पाणी देत असताना बुंध्यापाशी पाणी साचून राहणार नाही, याकडे द्यावे. यासाठी खोडालगत मातीची भर लावावी.
 • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास झाडापर्यंत पाटातून वाया जाणारे 60 ते 70 टक्के पाणी वाचवता येते, खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्रेत 25 ते 30 टक्के बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

डॉ. प्रदीप दळवे, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके अंजीर आणि सीताफळ, संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे, मोबाईल नं – 8983310185

Prajwal Digital

Leave a Reply