ब्रोकोली उत्पादन वाढीचे तंत्र

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

स्प्राऊट म्हणजे  फुटवे, फुटव्यांपासून तयार झालेले पानांच्या बगलेतील अनेक गड्डे. ब्रोकोली  या पिकांमध्ये मुख्य मधल्या गड्याव्यतिरिक्त बगलेत बरेच गड्डे ब्रुसेल्स स्प्राऊट मिळतात.

मोहरी कुळातील कोबीवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये आठ प्रकारच्या भाज्या आहेत. यांपैकी पानकोबी, फुलकोबी आणि नवलकोल या तीन पिकांची भारतात व्यापारी तत्त्वावर लागवड होते. परंतु कोबीवर्गातील ब्रोकोलीची लागवड नुकतीच अगदी कमी प्रमाणावर भारतात मोठ्या मोठ्या शहरातील (जसे दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई येथील) हॉटेलला पुरविण्यासाठी केली जाते. ही पिके युरोपियन देशांत तसेच ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांत लोकप्रिय आहेत.

प्रस्तुत  लेखामध्ये आपणास ब्रोकोली या कोबीवर्गातील अपारंपरिक भाजीपिकाच्या लागवडीची माहिती होईल. या पिकांच्या जातींची माहिती होऊन, आपल्याकडे आर्थिक उत्पादनाकरिता कोणत्या योग्य जातींची लागवड करावी हे समजून घेता येईल.

ब्रोकोलीचे महत्त्व

कोबीवर्गातील ब्रोकोली ही पिक नुकतीच भारतात लागवडीखाली आली आहे. तीही मोठ्या शहरातील हॉटेल्सची मागणी पूर्ण करण्यासाठी. या भाज्यांमध्येसुद्धा कोबीवर्गातील इतर पिकांसारखे पोषक अन्नघटक आहेत. ब्रोकोली (स्प्राऊटिंग ब्रोकोली) ही कोबीवर्गीय भाजी ब्रुसेल्स स्प्राऊटपेक्षा पोषक आहे. याच्या झाडावर मध्यभागी हिरवा फुलकोबीसारखा गड्डा तयार होतो. याच गड्याची भाजी करतात. हा मधला गड्डा काढल्यानंतर पानांच्या बगलेत परत लहान लहान गड्डे धरतात.

ब्रोकोली हवामान कसे असावे ?

कोबीवर्गातील पिकासारखेच या भाजी पिकांना थंड हवामान चांगले मानवते; म्हणून ब्रोकोली या पिकाची लागवड हिवाळ्यात करतात. गड्डे पोसण्याच्या काळात चांगले थंड हवामान आवश्यक आहे.

ब्रोकोली जमीन कशी निवडावी ?

ब्रोकोली पिकांसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक जमीन निवडावी. हलक्या जमिनीत लागवड करायची झाल्यास सेंद्रिय खाते वापरावीत.

ब्रोकोलीचे कोणते वाण वापरावे ?

ब्रोकोलीमध्ये हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे गड्डे असणारे असे दोन प्रकार आढळतात. अमेरिकेमध्ये (युएसए) फक्त हिरवा प्रकारच लावतात. जांभळ्या रंगाची ब्रोकोली ही इंग्लंडमध्ये काही प्रमाणावर घेतात आणि त्या हिरव्यापेक्षा कणखर असतात. हिरव्या प्रकारात लवकर येणारे, मध्यम कालावधीचे आणि उशिरा येणारे आणि झाडांच्या आणि गड्ड्याच्या वेगवेगळ्या आकारानुसार प्रकार आहेत.

बाहेरच्या देशातून आलेल्याच हिरव्या गड्ड्याच्या लवकर येणाऱ्या जाती जशा – डी सिक्को, ग्रीन बड, स्पार्टन अर्ली आपल्याकडे लावतात. ब्रोकोलीमध्ये गड्डे पुनर्लागवडीनंतर 6-7 आठवड्यांनी काढणीस येतात. ग्रीन स्प्राऊटिंग मिडियम हा मध्यम कालावधीचा वाण 100 दिवसांत तयार होतो; तर ग्रीन स्प्राऊटिंग लेट हा कमीत कमी 120 दिवसांत तयार होतो.

ब्रोकोली रोपे कसे तयार करावे ?

इतर कोबीवर्गीय पिकासारखेच ब्रोकोली आणि ब्रुसेल्स स्प्राऊट यांचे बी गादीवाफ्यावर पेरून रोपे तयार करतात. गादीवाफ्यावर रोपे फुलकोबीच्या रोपासारखीच काळजी घेऊन तयार करतात. 4 ते 6 आठवड्यांची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरतात.

ब्रोकोली हंगाम व बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे ?

ब्रोकोलीचे बी उत्तर भारतात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. रोपे 4 ते 6 आठवड्यांची झाली म्हणजे पुनर्लागवड करतात. ब्रोकोलीच्या लागवडीसाठी हेक्टरी 400 ते 500 ग्रॅम बियाणे लागते. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम हे औषध लावावे.

ब्रोकोली लागवडीचे अंतर किती ठेवावे ?

ब्रोकोलीची लागवड दोन ओळींत 75 सेंमी. तर ओळीतील दोन झाडांमध्ये 30 सेंमी. अंतर ठेवून रोपे लावतात. उंच आणि मोठ्या गड्यांच्या जाती जास्त अंतरावर म्हणजे 90 X 90 सेंमी. लावतात.  

ब्रोकोली लागवड पद्धत

ब्रोकोली शेतात सरी-वरंब्यावर फुलकोबी पिकासारखीच लागवड करतात.

ब्रोकोलीस खते आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

ब्रोकोली या पिकास फुलकोबीप्रमाणेच हेक्टरी 30-40 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत जमिनीमध्ये मशागतीच्या वेळी मिसळावे. स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा रोपलागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने देऊन लगेच पाणी द्यावे. जमिनीचा प्रकार, हंगाम लक्षात घेऊन 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

ब्रोकोली आंतरमशागत कधी करावी ?

ब्रोकोली पिकातील नियमितपणे तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. पहिली खुरपणी 3-4 आठवड्यांनी करावी. नंतर आवश्यकतेनुसार खुरपण्या कराव्यात. पिकांची मुळे उघडी पडत असल्यास खुरपणीच्या वेळी मातीची भर द्यावी. तणांच्या बंदोबस्तासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी 2 किलो बासालीन हे तणनाशक जमिनीवर फवारावे.

ब्रोकोलीमध्ये कोणते आंतरपिके घ्यावे ?

ब्रोकोली पिकामध्ये गाजर, मुळा आणि पालेभाज्या आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून घेता येतात. परंतु या आंतरपिकांमुळे मुख्य पिकांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.

ब्रोकोली किड आणि नियंत्रण कसावे करावे ?

ब्रोकोली पिकावर महत्त्वाच्या कोबीवर्गीय पिकावर येते त्याच प्रकारे काळी माशी, मावा, चौकोनी ठिपक्यांचा पतंग या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता मॅलेथिऑन या कीटकनाशकांची 0.2 टक्केप्रमाणे फवारणी 10 लीटरला 20 मिली. या प्रमाणात करावी. फवारणी आवश्यकतेनुसार 12-15 दिवसांच्या अंतराने करावी. गड्ड्यांची काढणी फवारणी केल्यावर 10-12 दिवसांनी करावी.

ब्रोकोलीचे रोग आणि नियंत्रण कसे करावे ?

रोपवाटिकेतील रोप कोलमडणे या रोगाच्या नियंत्रणाकरिता पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे किंवा रोपांवर कॅप्टान किंवा फायटोलानचे 0.1 टक्का द्रावण फवारावे (10 लीटरला 10 ग्रॅम). लीफस्पॉट किंवा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यावरील प्रक्रिया, पेरणीपूर्वी बी गरम पाण्यात (50 अंश सेल्सिअस) 30 मिनिटे बुडविणे तसेच पिकांची फेरपालट हे उपाय करावे.

ब्रोकोलीची काढणी कधी करावी ?

स्प्राऊटिंग ब्रोकोली मध्ये जातीनुसार गड्डे 15 ते 25 सेंमी. आकाराचे तर वजनाने 250 ते 500 ग्रॅमपर्यंत असतात. पुनर्लागवडीनंतर 45-55 दिवसांत गड्डे काढणीस तयार होतात. गड्डा घट्ट असतानाच डोळे फुटायच्या आत ते काढावेत अन्यथा गड्डयातून डोळे फुटून फुटवे बाहेर येतात.

ब्रोकोलीची विक्री केव्हा करावी ?

ब्रोकोली बागेतील गड्डे काढावे. गड्डे काढल्यानंतर लवकरात लवकर विक्रीसाठी पाठवावेत. नाहीतर ते पिवळट व्हायला सुरवात होते.

ब्रोकोलीचे किती उत्पादन मिळते ? ब्रोकोलीच्या दर्जेदार लागवडीपासून हेक्टरी उत्पादन 50 ते 100 क्विंटल मिळते.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

ब्रोकोली उत्पादन वाढीचे तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply