कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि अकोला हे कांदा पिकविणारे प्रमुख जिल्हे आहेत. खरीप हंगामातील लागवडीमध्ये ढगाळ हवामान, हवेतील आर्द्रता आणि उबदारपणा यामुळे रोग आणि किडींचे प्रमाण जास्त असते. यामुळे कांदा उत्पादन कमी येते व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. सदरील नुकसान टाळण्यासाठी कांदा पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते.
वाचा : कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे वाढवावे
सदर लेखात आपणास कांदा पिकांवरील प्रमुख किडी व रोगांची ओळख होईल. कांद्यावरील किडी व रोगांचे नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती मिळणार आहे. सदर माहिती आधारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कीड व रोगाअभावी होणारे आर्थिक नुकसान कमी होणार आहे.
कांदा पिकांवरील कीड नियंत्रण
1) फुलकिडे (थ्रिप्स)
- कांद्यामध्ये फुलकिडे किंवा टाक्या मुरडा या किडींचा उपद्रव मोठ्या प्रामाणात होतो. प्रामुख्याने खरीप व रब्बी हंगामात फुलकिडे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
- कोरडी हवा आणि 25 – 30 अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते. फुलकिडे आकाराने अत्यंत लहान असतात. पूर्ण वाढलेल्या फुलकिड्याची लांबी 1 मिलिमीटर असते.
- फुलकिड्याचा रंग पिवळसर तपकिरी असून त्याच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात. या किडीची मादी पानावर पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंड्यातून 4 ते 10 दिवसांत पिले बाहेर पडतात.
- पिले आणि प्रौढ कीटक रात्रीच्या वेळी पाने खरडून पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पांढुरके ठिपके दिसतात.
- असंख्य ठिपके जोडले गेल्यास पाने वाकडी होतात आणि वाळतात. दिवसा ही कीड तापमान वाढल्यामुळे पानाच्या बेचक्यात खोलवर जाऊन बसते किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते.
- या किडीने केलेल्या जखमांमधून करपा रोगाच्या जंतूंचा प्रसार होतो. त्यामुळे करपा रोगाचे प्रमाण वाढते.
उपाय :
- किडीच्या नियंत्रणासाठी रोपांची लागवड करताना हेक्टरी 33 किलो फ्युराडान या दाणेदार कीटकनाशकाचा उपयोग करावा.
- 10 लीटर पाण्यात 18 मिलिलीटर नुवाक्रॉन किंवा 10 मिलिलीटर मेटॅसिस्टॉक्स किंवा 10 मिलिलीटर फेनिट्रोथिऑन किंवा 1 मिलिलीटर सायपरमेथ्रिन या प्रमाणात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
- कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी त्यात 10 लीटरला 6 मिलिलीटर सँडोव्हीट किंवा अॅप्सा हे चिकट द्रव्य (स्टीकर) मिसळावे.
- कांद्यावर येणाऱ्या कंद किंवा खोड कुरतडणारी अळी आणि लीफ मायनर या इतर किडी आहेत. फुलकिडीसाठी वापरलेल्या कीटकनाशकांनी यांचेही नियंत्रण होते.
वाचा : काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी
कांदा पिकांवरील रोग नियंत्रण
1) करपा रोग (अल्टरनेरिया ब्लाईट)
- या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण उष्ण आणि दमट हवामानात म्हणजे खरीप हंगामात जास्त प्रमाणात दिसून येते.
- खरीप हंगामातील ढगाळ हवामान आणि पाऊस यांमुळे करपा रोगाचा प्रसार 60 ते 65 टक्क्यांपर्यंत होतो; तर रब्बी हंगामात या रोगाचा प्रसार 38 टक्क्यांपर्यंत होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या पातीवर सुरुवातीला खोलगट पांढुरके चट्टे पडतात.
- चट्टयांचा मध्यभाग जांभळट रंगाचा असतो. चट्टे पडण्याची सुरुवात शेंड्याकडून होते. चट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाळू लागतात आणि संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते आणि शेवटी सुकून गळून पडते.
- हा रोग रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात आल्यास पात जळून गेल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत नाही. कांदा पोसत नाही आणि चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते.
- कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कांद्यापर्यंत होतो आणि कांदा सडतो.
उपाय :
- या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपाच्या लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 10 लीटर पाण्यात 25 ते 30 ग्रॅम डायथेन एम-45 मिसळून फवारावे.
- करपा रोगाची सुरुवात फुलकिड्यांनी पातीवर केलेल्या जखमेमुळे होते. म्हणून फुलकिड्यांचे नियंत्रण करण्यासाठी रोपलागवडीनंतर 15 दिवसांनी 10 लीटर पाण्यात 18 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस मिसळून दहा दिवसांच्या अंतराने पिकावर फवारावे.
- खरीप हंगामात पावसामुळे पिकावर फवारलेले औषध पानावरून लगेच खाली ओघळते. औषध पानावर चिकटून राहून त्याची परिणामकारकता वाढावी म्हणून त्यामध्ये सँडोव्हीट किंवा अॅप्सा हे चिकट द्रव्य 10 लीटर पाण्यात 6 किंवा 3 मिलिलीटर या प्रमाणात मिसळावे.
2) स्टेफीलीयम ब्लाईट
- हा बुरशीजन्य रोग उत्तर भारतात कांदा पिकात आणि कांद्याच्या बीजोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येतो. अलीकडच्या काळात नाशिक भागातही या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
- या रोगामुळे सुरुवातीला पातीच्या आतील बाजूवर पिवळसर चट्टे पडतात आणि हे चट्टे बुंध्याकडून शेंड्याकडे सरळ वाढतात. यामुळे पाने सुकून जातात आणि जळाल्यासारखी दिसतात.
उपाय :
- या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 हे बुरशीनाशक स्टिकरसह मिसळून फवारावे.
3) कोलिटोट्रिकम करपा :
- अलीकडच्या काळात नाशिक, धुळे, सातारा आणि नगर जिल्ह्यांत कोलिटोट्रिकम या बुरशीमुळे येणाऱ्या करपा रोगाचे प्रमाण वाढत आहे.
- या रोगामुळे पानावर खोलगट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मध्यभाग काळपट रंगाचा असतो.
- चट्टे पडण्याचे प्रमाण शेंड्याकडून बुडखाकडे वाढत जाते. चट्ट्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्याकडून वाळू लागतात आणि पात जळू लागते.
उपाय :
- या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन हे बुरशीनाशक स्टीकरसह मिसळून पिकावर फवारावे.
कांदा कीड व रोग नियंत्रण केल्यामुळे होणारे फायदे :
- कांद्याची वाढ जोमदार व चांगली होते.
- कांदा उत्पादनात वाढ होते.
- कीडमुक्त कांद्यास बाजारात मागणी मिळते.
- कांद्याची प्रत व गुणवत्ता उत्तम राखली जाते.
कांद्याचे दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.