कांद्याचे योग्य वाण कसे निवडावे

कांदा पिकाला लागणारे समशीतोष्ण हवामान, योग्य जमीन, कालव्यांच्या आणि विहिरीच्या पाण्याखालील बागायती क्षेत्र तसेच शेतकऱ्यांना अवगत झालेले कांदा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान आणि उत्तम बाजारपेठ यांमुळे नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कांदा पिकविण्यात आघाडीवर आहे.  

असे असले तरीही कांद्याचे प्रती हेक्टरी उत्पादकता कमी आहे, याचे प्रमुख कारण म्हणजेच लागवडीसाठी योग्य वाणाची निवड न केल्यामुळे कांदा लागवड व साठवणुकीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामुळेच कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी कांदा लागवडीपूर्व योग्य व दर्जेदार वाणांची निवड केल्यास कांद्याचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे शक्य होईल. म्हणून “शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी” या उक्तीप्रमाणे बियाणे जर शुद्ध व दर्जेदार असेल तर त्यापासून तयार होणारे बीज सुद्धा गुणवत्तायुक्त व शुद्ध असेल.

प्रस्तुत कांद्याचे योग्य वाण कसे निवडावे या लेखामध्ये आपणास कांदा पिकांचे विविध वाणांची ओळख होईल. कांद्याची हंगामनिहाय लागवडीसाठी निवड करणे सुलभ होईल. कांद्याच्या जातीमध्ये असलेल्या विभिन्न गुणधर्माची माहिती मिळेल. कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ही माहिती उपयुक्त ठरणार नाही. योग्य वाणांची निवड केल्यास कांद्याचे प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे शक्य होईल.

कांद्याचे वाण कसे निवडवावे ?

  • कांद्याच्या लागवडीसाठी जातीची निवड करताना त्या जातींमध्ये पुढील गुणधर्म असणे आवश्यक आहे.
  • कांदा आकाराने गोलाकार असावा.
  • बुडख्याचा किंवा मुळाचा भाग आत दबलेला नसावा.
  • कांद्याचा आकार मध्यम (जाडी 4.5 ते 6.5 सेंटिमीटर) असावा.
  • जातीनुसार लाल, गुलाबी, विटकरी, पांढरा इत्यादी रंगांची चकाकी साठवणीत टिकून राहावी.
  • कांद्याची मान बारीक असावी आणि आतील मांसल पापुद्रे एकमेकांना घट्ट चिकटलेले असावेत.
  • कांदा चवीला तिखट ते मध्यम तिखट असावा; परंतु त्यास उग्र वास नसावा.
  • अशा जातीची उत्पादनक्षमता हेक्टरी किमान 30 ते 35 टन असावी.
  • काढणीसाठी सर्व कांदे एकाच वेळी तयार व्हावेत आणि कांदा साठवणीत चांगला टिकून राहावा.
  • ज्या जातीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी.
  • अशा प्रकारे उत्तम जातीचे सर्व गुणधर्म एकाच जातीमध्ये मिळणे अशक्य असले तरी निवडक महत्त्वाचे गुणधर्म असलेल्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात.

खरीप हंगामासाठी कांद्याचे कोणते वाण वापरावे ?

1) एन -53

एन -53 हा वाणनाशिक येथील स्थानिक वाणातून 1960 मध्ये विकसित केलेला आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे गोलाकार परंतु थोडे चपटे असतात. या जातीच्या कांद्याचा रंग जांभळट लाल असतो आणि चव तिखट असते. ही जात खरीप हंगामातील लागवडीसाठी चांगली आहे. या जातीचे कांदे लागवडीपासून 100 ते 110 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पन हेक्टरी 20 ते 25 टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 11-12% एवढे आहे.

2) बसवंत – 780

बसवंत – 780 हा वाणमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात स्थानिक वाणांतून खरीप हंगामासाठी 1986 मध्ये विकसित केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे गोलाकार आणि शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. या जातीच्या कांद्यांचा रंग आकर्षक लाल असून तो काढणीनंतर 3 ते 4 महिने चांगला टिकून राहतो. डेंगळे आणि जोड कांदे यांचे प्रमाण एन – 53 या जातीच्या तुलनेत अतिशय कमी असते. या जातीचा कांदा लागवडीपासून 100 ते 110 दिवसांत काढणीसाठी तयार होतो. या जातीचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 12% एवढे आहे.

3) अॅग्रीफाउंड डार्क रेड

अॅग्रीफाउंड डार्क रेड हा वाणनाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ.( ए.ए.डी.एफ.) या संस्थेने ही जात स्थानिक वाणांतून 1987 मध्ये विकसित केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे आकाराने गोल, मध्यम आकाराचे असतात आणि त्यांचा रंग गर्द लाल असतो. या जातीचे कांदे लागवडीनंतर 90 – 110 दिवसांनी काढणीला येतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 30 ते 40 टन मिळते. घन पदार्थाचे प्रमाण 12 – 13 टक्के, साठवणीस मध्यम, खरीप हंगामास योग्य. कांदे निर्यातीसाठी योग्य. पेरणी करूनही कांदा पिकाचे उत्पादन घेण्यास योग्य वाण.

4) अर्का कल्याण

अर्का कल्याण हा वाणबंगलोर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्थेने ही जात नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम आकाराचे आणि गर्द लाल रंगाचे असून चव तिखट असते. या जातीचे कांदे 90 ते 110 दिवसांत काढणीला तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 11- 12 टक्के एवढे आहे.

रब्बी हंगामासाठी कांद्याचे कोणते वाण वापरावे ?

1) एन 2 – 4 – 1 :

एन 2 – 4 – 1 हा वाण1960 च्या दरम्यान निफाड येथील संशोधन केंद्राने विकसित केलेला असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने रब्बी हंगामासाठी वाढवला आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. कांद्याचा रंग विटकरी लाल असून साठवणीमध्ये कांद्यावर एक प्रकारची चकाकी येते. साठवणीसाठी ही जात अत्यंत चांगली आहे. निर्यातीसाठी ही जात चांगली आहे. या जातीचे कांदे लागवडीनंतर 120 दिवसांनी काढणीला येतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 12-13 टक्के एवढे आहे. ह्या वाणाचे पीक रागंडा कांद्यासाठीही घेता येते.

2) पुसा रेड

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने रब्बी हंगामासाठी ही जात निवड पद्धतीने 1975 मध्ये विकसित केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचा कांदा गोलाकार चपटा आणि गर्द लाल रंगाचा असतो. या जातीचे कांदे लागवडीनंतर 125 ते 140 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 12-13 टक्के आहे. महाराष्ट्रात रांगडा आणि रब्बी हंगामास योग्य.

3) अर्का निकेतन

अर्का निकेतन हा वाणबंगलोर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्थेने नाशिक येथील स्थानिक वाणांतून 1987 मध्ये विकसित केला आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे गोलाकार, बारीक मानेचे आणि आकर्षक गुलाबी रंगाचे असतात. कांद्याची चव तिखट असून साठवणीतही चांगला राहतो. सर्वसाधारण तापमानाला या जातीचे कांदे 5 ते 6 महिने उत्तम टिकतात. या जातीचे कांदे लागवडीनंतर 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 टन येते. रब्बी आणि रांगडा या दोन्ही हंगामांत या जातीची लागवड करता येते. घन पदार्थांचे प्रमाण 12-14 टक्के आहे.

4) अॅग्रीफाउंड लाईट रेड

अॅग्रीफाउंड लाईट रेड हा वाणरब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी नाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ. या संस्थेने विकसित केला आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचे कांदे फिकट लाल, गोल आणि मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात. कांद्याची चव तिखट असते. या जातीचे कांदे लागवडीपासून 120 ते 125 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 30 ते 32 टन इतके मिळते. या कांद्यांमध्ये डेंगळयाचे प्रमाण कमी असते. साठवणीसाठी ही जात चांगली आहे. प्रामुख्याने नाशिक भागासाठी आणि निर्यातीसाठी ही जात योग्य आहे. घन पदार्थांचे प्रमाण 13-14 टक्के आहे.

5) एन-257 – 91

एन-257 – 91 हा वाणमहात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी विकसित केला आहे.

गुणवैशिष्ट्ये : या जातीचा कांदा पांढरा, मध्यम, गोल आणि चपटा असतो. या जातीचे कांदे साठवणीत चांगले राहतात.या जातीचे कांदे लागवडीनंतर 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी 25 ते 30 टन मिळते.

6) ॲग्रीफाउंड व्हाईट

ॲग्रीफाउंड व्हाईट हा वाणराष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एन. एच. आर. डी. एफ.) नाशिक ह्या संस्थेने ही जात मध्य प्रदेश राज्यात निमाड भागातील रब्बी हंगामात उत्पादन केल्या जाणाऱ्या स्थानिक वाणातून निवड पद्धतीने विकसित केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : कंद गोलाकार, वरचे आवरण घट्ट असलेले, आकर्षक पांढरा रंग, 4-6 सेंमी. व्यासाचे असून घन पदार्थांचे प्रमाण 14 – 15 टक्के एवढे असते. साठवणक्षमता चांगली असून पीक पेरणीपासून 160 – 165 दिवसांत तयार होते. सरासरी उत्पन्न 20-25 मे. टन प्रति हेक्टर एवढे असून खरीप व रब्बी दोन्ही हंगामात लागवडीसाठी योग्य तसेच निर्जलीकरणासाठी योग्य वाण आहे.

7) फुले सफेद

फुले सफेद हा महात्मा फुले कृषि विद्यापीठाने हा वाण कागल भागातील पांढऱ्या कांद्याच्या पिकामधून विकसित केला आहे. सदर वाण सन 1994 मध्ये प्रसारित झाला.

गुणवैशिष्ट्ये : कांदे पांढरे, गोलाकार, मध्यम आकाराचे निर्यातीस योग्य, घन पदार्थांचे प्रमाण 13% आहे. सरासरी उत्पादन हेक्टरी 25-30 टन एवढे मिळते.

8) फुले सुवर्णा

फुले सुवर्णाहा वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केला असून 1997 साली महाराष्ट्रातील तिन्ही हंगामांत घेण्यास शिफारस केली आहे.

गुणवैशिष्ट्ये : यलो टेक्सास आणि एन 2- 4 – 1 ह्या वाणांच्या संकरातून हा वाण विकसित केला आहे. कांदे पिवळ्या, किंचित विटकरी रंगाचे, गोलाकार, घट्ट, मध्यम तिखट, निर्यातीस व साठवणीस योग्य, 110 दिवसांत सरासरी 23 – 24 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

कांद्याचे योग्य वाण वापरल्यामुळे होणारे फायदे :

  • पीक कीड व रोगांना प्रतिकार करू शकेल.
  • पीक उत्पादनात 10 टक्के ने अधिक वाढ होईल.
  • कांद्याचा दर्जा व गुणवत्ता चांगली राखली जाईल.
  • योग्य वाणांस बाजारात चांगली वाढण्यास मदत होईल.
  • निकृष्ट व दर्जाहीन वाणामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल.
  • प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे शक्य होईल.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

कांद्याचे योग्य वाण कसे निवडावे हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply