गुलाब हे एक महत्त्वाचे व्यापारी फुलपीक आहे. महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाती, विविध सुवासिक गुणधर्म असल्यामुळे या फुलाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात, लग्न-समारंभ व उत्सवात केला जातो. यामुळे गुलाब फुलांना बाजारात ग्राहकांकडून वर्षभर विशेष मागणी आहे.
इतर फुलांमध्ये गुलाबाचे स्थान सर्वांत वरचे आहे. या फुलाला ‘फुलांचा राजा’ असे म्हणतात. माणसाला प्रेम व्यक्त करण्यासाठी लागणाऱ्या विविध साधनांत गुलाब मानाचे स्थान मिळवतो. प्रेम, आदर, कृतज्ञता, आनंद, दुःख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिली जातात.
प्रस्तुत लेखामध्ये आपणास गुलाबाचा उपयोग कसा होतो, गुलाबाचा आरोग्याधिष्टीत उपयोग कसा होतो, गुलाबाचे व्यवसायिक महत्त्व काय आहे, गुलाबाचे आर्थिक महत्त्व काय आहे याविषयी सविस्तर माहिती मिळेल.
वाचा: फुले परिपक्व करण्याच्या पद्धती
गुलाबाचा उपयोग कसा होतो ?
- उपवनांमध्ये म्हणूनच गुलाबाच्या ताटव्यांना अतिशय महत्त्व होते. गुलाब सभोवतालचे वातावरण शांत, प्रसन्न आणि शुद्ध ठेवत असल्यामुळे अलीकडच्या औद्योगिक क्रांतीच्या युगातही या फुलांचा वापर बागांमध्ये शोभेसाठी तसेच प्रदूषण रोखण्यासाठी होतो.
- गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, गुलकंद, जॅम, इत्यादी महत्त्वाचे पदार्थ तयार केले जातात. याशिवाय बागेमध्ये सुशोभनासाठी गुलाबाला महत्त्वाचे स्थान आहे.
- गुलाब हवा शुद्ध राखतो.
- रक्तदाबाचे विकार कमी करता आणि मानसिक संतुलन कायम राखतो.
- महाराष्ट्रातील हवामानात गुलाब वर्षभर फुलतो.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मुंबईसारखी बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे गुलाबफुलाच्या शेतीतून जास्त फायदा मिळू शकतो.
- महानगर आणि मोठी शहरे सध्या देशातील गुलाब फुलांच्या मोठ्या ग्राहकांचे प्रतिनिधित्व करतात. वाढत्या शहरीकरण आणि पाश्चात्य संस्कृतींच्या प्रभावाच्या परिणामी, व्हॅलेंटाईन डे, वाढदिवस, सण, वर्धापनदिन, विवाह, विदाई पार्टी, धार्मिक समारंभ इत्यादीसारख्या कित्येक प्रसंगी ते गुलाब फुलांचे महत्त्व खूप लोकप्रिय झाले आहे. शहरीकरण आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव यांचा ट्रेंड येत्या काही वर्षांत आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
वाचा : फुलांची परिपक्वता
गुलाबाचा आरोग्याधिष्टीत उपयोग कसा होतो ?
- गुलाबाच्या फुलांत प्रकाराप्रमाणे 0.01 ते 0.04-0.06 % अत्तर असते. अत्तर काढण्याकरिता वापरलेल्या पाण्यापैकी अत्तर काढून उरलेल्या पाण्याला ‘गुलाबपाणी’म्हणतात. गुलाबपाणी तंबाखू, तपकीर तसेच सौम्य मद्ययुक्त पेये इत्यादींत घालतात.
- गुलाबकळ्या स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), सारक, हृद्बल्य, शीतकर आणि शक्तिवर्धक असून फुले वाजीकर (कामोद्दीपक), सारक व क्षुधावर्धक असतात. गुलकंद थंड, सारक व पौष्टिक असतो.
- ज्वर, नेत्रदाह, दातदुखी, डोकेदुखी, अपचनामुळे उत्पन्न होणारे आतड्यातील व्रण इत्यादींवर गुलाब फुले गुणकारी असतात.
- फळे आणि बी यांचे चूर्ण रक्तस्त्रावावर व जुलाबावर गुणकारी आहे. चहात वाळलेली पाने सुगंधित करण्यासाठीही गुलाबाच्या फुलांचा उपयोग करतात.
- भिजविलेल्या तिळांत गुलाबाची फुले काही वेळ ठेवून नंतर त्या तिळांपासून काढलेले तेल केसांना लावण्यासाठी वापरतात.
गुलाबाचे व्यवसायिक महत्त्व काय आहे ?
- गुलाब हे पीक फुलवर्गात महत्त्वाचे असल्याने त्याची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते.
- शेतकरी बांधवांना इतर पारंपारिक पिकासोबत गुलाब शेती सुद्धा उत्तमरित्या करता येते.
- गुलाबापासून अत्तर, गुलाबपाणी, जॅम, जेली, सरबत, गुलकंद त्याचप्रमाणे उच्च प्रतीचे मद्यही तयार करतात.
- गुलाब प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेली आहे.
- आधुनिक युगात गुलाबाची फुले ‘कट फ्लॉवर’ म्हणून वापरतात. विविध फुलांच्या जगभर होणाऱ्या उलाढालीत गुलाबाचा नंबर पहिला लागतो.
- गुलाबाच्या पुष्कळ जातींच्या फुलांच्या पाकळ्या गुलकंद करण्यासाठी वापरतात.
- गुलाबाच्या फळांत क- जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते. काही जातींची फळे आकर्षक रंगांची असल्यामुळे झाडांच्या शोभेत भर पडते.
वाचा : फुलांची काढणी व्यवस्थापन
गुलाबाचे आर्थिक महत्त्व काय आहे ?
- फुलांच्या बाजारात गुलाबाचे गजरे मोठ्या प्रमाणात विकले जातात.
- गुलकंद गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेपासून बनवला जातो.
- गुलाबपाणी व गुलाब अत्तराचे कुटीर उद्योग चालवले जातात.
- उत्तर प्रदेशात कन्नौज, जौनपूर इत्यादी ठिकाणी गुलाब उत्पादनांचा उद्योग आहे.
- दक्षिण भारतातही गुलाबाचे विविध पदार्थ चालवले जातात.
- दक्षिण भारतात गुलाबाच्या फुलांचा मोठा व्यवसाय आहे.
- मंदिरे, मंडप, समारंभ, पूजास्थळे इत्यादी ठिकाणी गुलाबाच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
- गुलाब हे आर्थिक लाभाचे साधन असून हजारो ग्रामीण तरुण फुले हे उत्पन्नाचे साधन बनवतात.
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
गुलाबाचे बहुउपयोगी फायदे हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.
वाचा : गुलाब, ग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी * झेंडू उत्पादन तंत्रज्ञान